प्रकाशचित्रे टिपल्यानंतर....

सतीश पाकणीकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

काही वर्षांपूर्वीपर्यंत कॅमेऱ्यात आपण फिल्मवर बंदिस्त केलेले क्षण हे त्या फिल्मचे संस्करण झाल्यावर ‘निगेटिव्ह’च्या रूपात आपल्या जवळ राहायचे. आपल्याला परत जेव्हा प्रिंट करण्याची इच्छा होईल त्यावेळी ती निगेटिव्ह वापरून आपण प्रिंट करण्याची सुविधा असे. तो जमाना आता लयास गेला. आज आपण टिपलेले प्रत्येक प्रकाशचित्र हे डिजिटल स्वरूपात आहे. आपण कॅमेऱ्यात वापरत असलेले मेमरी कार्ड किती क्षमतेचे आहे व आपण कोणता फाइल फॉरमॅट वापरत आहोत यावर त्यात किती प्रकाशचित्रे मावू शकतात हे ठरते. आज १२४ जीबी मेमरी असलेले कार्ड आपल्याला उपलब्ध आहे. या क्षमतेमध्ये अर्थातच येणाऱ्या काळात वाढ होत जाईल व जास्त प्रकाशचित्रे आपण कार्डवरच साठवू शकू. पण त्यालाही मर्यादा आहेतच. म्हणूनच टिपलेली सर्व प्रकाशचित्रे आपण आपल्या कॉम्प्युटरवर (डेस्कटॉप अथवा लॅपटॉप) जतन करून ठेवणे फायद्याचे असते. एकदा का ही प्रकाशचित्रे आपण आपल्या
कॉम्प्युटरवर ‘सेव्ह’ केली, की त्या कार्डवर पुन्हा नव्याने पुढील प्रकाशचित्रे घेण्यास आपण मोकळे! ही क्रिया प्रत्यक्षात आणण्याचे तीन-चार प्रकार आहेत.

कॅमेरा ते प्रिंटर
आपला कॅमेरा जर थेट प्रिंटरला जोडण्याची सोय असेल (कॅमेरा व प्रिंटर दोन्हीलाही ती हवी) तर आपण कॅमेऱ्यातील प्रकाशचित्रांच्या प्रिंट्‌स लगेचच घेऊ शकतो. हल्ली कोठेही घेऊन जाता येईल असे छोटे प्रिंटर बाजारात मिळतात. जरी आपण आपल्या घरापासून अथवा ऑफिसपासून दूर असलो, तरीही या प्रिंटरमुळे प्रिंट काढणे शक्‍य होते. तत्काळ प्रिंट मिळणे ही झाली सुविधा, पण यात तोटा असा, की मेमरी कार्डावरील प्रकाशचित्रे आपल्याला तशीच ठेवावी लागतात. त्यावर नंतर काही संस्करण करायचे झाले तर ती ‘सेव्ह’ करणे आवश्‍यक असते. म्हणजे जर मेमरी कार्ड फोटोंनी भरून गेले,तर आयत्या वेळी या पर्यायाचा उपयोग होत नाही. म्हणून ती सर्व प्रकाशचित्रे कॉम्प्युटरवर जतन करणे गरजेचे असते.

कॅमेरा ते कॉम्प्युटर
सर्वसामान्यपणे वापरला जाणारा हा पर्याय आहे. आपल्या कॉम्प्युटरचे युएसबी (USB) पोर्ट व कॅमेऱ्याचे डिजिटल पोर्ट यामध्ये एका युएसबी अथवा फायरवायरच्या साहाय्याने आपण टिपलेले फोटो मेमरी कार्डवरून कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कवर पोहोचवू शकतो. हल्लीच्या आधुनिक कॅमेऱ्यात हे काम कोणत्याही केबलचा वापर न करताही केवळ वाय-फायच्या माध्यमातून करता येते. मेमरी कार्डावरील सेव्ह झालेल्या प्रतिमा आपण डिलीट करू शकतो व तेच कार्ड या प्रकारे पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तसेच कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कवर साठवलेल्या प्रतिमांवर आपण आपल्या सोयीने नंतर केव्हाही संस्करण करू शकतो. प्रकाशचित्रे कॅमेऱ्यातून कॉम्प्युटरवर घेणे ही क्रिया अतिशय सोपी आहे. यात कॉम्प्युटर सुरू करावा, कॅमेऱ्याच्या सोबत आलेली युएसबी केबल कॅमेऱ्याला जोडून तो प्ले बॅक या मोडवर ठेवावा. त्याच्यानंतर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कोणते फोल्डर, कोणत्या फाइल्स तुम्हाला सेव्ह करायच्या आहेत यासाठी एक डायलॉग बॉक्‍स उघडेल. कॉम्प्युटरवर सेव्ह केल्यावर त्या फाइल्स डिलीट करायच्या की नाही हा प्रश्नही विचारला जाईल. तुम्ही एक एक करूनही या फाइल्स कॉपी करू शकाल. फाइल्स नव्वद अंशाच्या कोनात फिरविण्याची सोयही तेथे उपलब्ध असेल. सेव्हिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही नको असलेल्या फाइल्स मेमरी कार्ड वरून पुसून टाकू शकता व ते नवीन प्रकाशचित्रणासाठी परत एकदा तयार असेल. प्रत्यक्ष प्रकाशचित्रण करताना आपला कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप आपल्या जवळ असेल, तर आपण कॅमेऱ्यातून थेट कॉम्प्युटरवरही केबलच्या साहाय्याने पाहू शकतो व त्या प्रतिमा सेव्ह करू शकतो. ‘टाइम लॅप्स’ प्रकारचे प्रकाशचित्रण करताना असंख्य प्रकाशचित्रे टिपावी लागतात. अशावेळी थेट कॅमेऱ्यातून कॉम्प्युटरवर फोटो सेव्ह करणे वेळ वाचवणारेही ठरते.

कार्ड रीडरचा वापर
दुसरा पर्याय म्हणजे कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड बाहेर काढून ते कार्ड रीडर नावाच्या एका छोट्याशा डबीत सरकवून त्याद्वारे सर्व प्रकाशचित्रे कॉम्प्युटरवर स्थलांतरित करणे. कार्ड रीडर हे बहुधा युएसबी केबलच्या आधारेच कार्य करतात. त्यांच्या किमतीही आज बऱ्याच कमी झालेल्या आहेत व त्यांचा कॉपी करण्याचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे. आपल्या संग्रहात असे कार्ड रीडर असणे नेहमीच योग्य ठरते. कारण अचानकपणे जर जास्त प्रकाशचित्रे टिपली गेली व मेमरी कार्ड भरून गेले तरी अशा अडचणीच्यावेळी कार्ड रीडर वापरून आपण आपली प्रकाशचित्रे कोणत्याही कॉम्प्युटरवर जतन करू शकतो. आजकाल बऱ्याचशा लॅपटॉपमध्ये कार्ड रीडर अंतर्भूत केलेले असतात.

पोर्टेबल हार्ड डिस्कचा वापर
जास्त क्षमता असलेली काही मेमरी कार्ड आपल्या संग्रहात असली तरी आजकालच्या अफाट मेगापिक्‍सेलच्या कॅमेऱ्यातील प्रत्येक प्रकाशचित्राचा फाइल साईजही मोठाच असतो. त्यामुळे मोठ्या कालावधीच्या ट्रीपला आपण जाणार असलो तर जास्त मेमरी असलेल्या कार्डच्याऐवजी सहज घेऊन जाता येणारी व प्रचंड क्षमता असलेली कॅमेऱ्याला अथवा कॉम्प्युटरला बाहेरून जोडता येणारी अशी हार्ड डिस्क बरोबर असणे स्वागतार्ह आहे. किमतीच्या दृष्टीने पाहिल्यास मेमरी कार्डच्या मानाने ती महाग वाटली तरीही त्याची साठवण क्षमता खूपच जास्त असल्याने ती परिणामतः स्वस्तच पडते असे म्हणावे लागते.

डिजिटल फोटोंच्या दोन मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांची केवळ डिजिटल उपस्थिती. त्यामुळे अनपेक्षितपणे, ती डिलीट होणे किंवा त्यात दूषित बदल होण्याचा महत्त्वपूर्ण धोका असतो. डिजिटल प्रकाशचित्र टिपण्याचा अत्यंत सोपेपणा आणि त्याच्या तत्काळपणामुळे ही कला काही अंशी प्रकाशचित्रण क्रांतिकारक बनवते, पण त्या बरोबरीनेच त्या प्रकाशचित्रांच्या जतनाची, (सेव्ह होण्याची) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना नाजूकपण व तात्पुरतेपणही बहाल करते.

दुसरे म्हणजे, डिजिटल प्रकाशचित्रणात मूलभूतता नाही. त्याऐवजी त्यात आवृत्ती आहेत. फिल्म प्रकाशचित्रणात, फिल्मच्या एका फ्रेमवर एक्‍स्पोजर घेणे ही एक अद्वितीय घटना असे आणि तो फिल्मचा छोटा तुकडा मुख्य प्रतिमा बनत असे. याउलट डिजिटल प्रकाशचित्रणात, सामान्यतः कोणत्याही चांगल्या, उपयुक्त प्रतिमेच्या अनेक आवृत्त्या असतील. ज्यामध्ये सुधारणा (एडिटिंग) करणे आणि प्रतिमा सहज पाहण्यासाठी लहान आकारात व कमी रिजोल्यूशन असलेल्या बनवणे सहजसाध्य असते. आणि म्हणूनच कोणताही गोंधळ टाळण्यासाठी प्रकाशचित्रण पूर्ण झाल्यावर लगेचच त्या प्रतिमा आपल्या कॉम्प्युटरवर अथवा हार्ड डिस्कवर त्वरित जतन करून त्यावर आपल्या मनाप्रमाणे संस्करण करणे हे फक्त उपयुक्तच आहे असे नाही तर ते अगत्याचेही आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या