प्रकाशचित्रण ः एक कलातत्त्व

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

डिजिटलाय
प्रकाशचित्रकला मात्र त्यामानाने फारच कमी वारसा असलेली कला आहे. फक्त १८० वर्षांचा वारसा. पण गेल्या दोन शतकांत विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या घडामोडी व त्यात शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याचा सर्वांत जास्त फायदा जर कुठल्या कलेला झाला असेल तर तो प्रकाशचित्रकलेचा असे विधान केले तर ते धाडसाचे ठरू नये.

सर्व कलांचा आपण जर विचार केला तर असे लक्षात येते, की त्या कलांचा वारसा घेऊनच त्यातील कलाकार हे मार्गक्रमणा करीत असतात. तो वारसा शेकडो वर्षांचा असतो. प्रकाशचित्रकला मात्र त्यामानाने फारच कमी वारसा असलेली कला आहे. फक्त १८० वर्षांचा वारसा. पण गेल्या दोन शतकात विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या घडामोडी व त्यात शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याचा सर्वांत जास्त फायदा जर कुठल्या कलेला झाला असेल तर तो प्रकाशचित्रकलेचा असे विधान केले तर ते धाडसाचे ठरू नये. म्हणूनच आज या कलेकडे आकर्षिल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे सुचवावेसे वाटते, की इतर कलांच्या समृद्धीचे गमक कशात आहे हे अभ्यासून मगच प्रकाशचित्रण कलेला आपला छंदाचा अथवा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडण्याचा विचार करावा. 

भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता यावर प्रकाश टाकणारे ‘आवर्तन’ हे पं. सुरेश तळवलकर यांचे पुस्तक काही काळापूर्वी माझ्या वाचनात आले. विचार करताना माझ्या असे लक्षात आले, की त्यातील एका प्रकरणात सुरेशजींनी ‘संगीता’बाबत जे विचार मांडले आहेत ते त्याच अचूकतेने ‘प्रकाशचित्रण’ या कलेसही लागू आहेत. ‘शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला’ याचे महत्त्व सांगणारे ते प्रकरण प्रत्येक कलासाधकासाठी एक मार्गदर्शक दिवाच ठरेल. प्रकाशचित्रकलेच्या अंगाने आपण याचा विचार करू या... 

शास्त्र - प्रकाशचित्रकलेमध्ये आपल्याला काय-काय साध्य करता येईल असा विचार करता लक्षात येते, की त्याला काही सीमा नाहीत. पण ते सारे एका जन्मात साध्य होण्याची शक्‍यता नाही हे ही आपल्या लगेचच ध्यानांत येईल. काय करता येणार नाही हे विचारले तर मात्र शास्त्राचा आधार घेत त्याचा खुलासा लगेचच होऊ शकेल. म्हणजे काय करू नये हे काटेकोरपणे सांगते ते शास्त्र असे म्हणता येईल. शास्त्राचा संबंध बुद्धीशी आहे. मात्र कलानिर्मितीसाठी प्रकाशचित्रकलेचे शास्त्र व त्याची बंधने ही त्यांच्या अंतर्गत राहूनच मोडावी लागतील. ती शास्त्र बंधने लवचिक करणे हेही पुन्हा शास्त्राचे सामर्थ्य. त्या शास्त्र-बंधनात राहून ज्ञातातून अज्ञाताचा शोध घेण्याची दृष्टी जोपासण्याच्या शक्‍यता म्हणूनच वाढत जातात. 

तंत्र ः प्रकाशचित्रकलेचे महत्त्वाचे अंग म्हणजे या कलेचे तंत्र. ते पूर्ण आत्मसात केल्याशिवाय तरणोपाय नाही. कॅमेरा कसा हाताळावा ही झाली तांत्रिक बाब. पण तंत्राचा सबंध शरीराशी आहे. आपण शरीर स्थिर केल्याशिवाय (अर्थातच ट्रायपॉडशिवाय) सुस्पष्ट प्रकाशचित्र टिपणे हे दुरापास्त ठरते. म्हणूनच तंत्रसाधनेची पुण्याई कलाकारासाठी महत्त्वाची आहेच. प्रकाशचित्रकलेचे तंत्र हा सातत्याने रियाझ करण्याचा विषय आहे. आपल्या कलेवरील हुकूमत ही तंत्रानेच सिद्ध होत असते. आपल्या मनांत प्रकाशचित्रणाचे ‘तंत्र’ इतके पक्के झाले पाहिजे की आपल्या मनामधील दृश्‍य आशय व्यक्त होताना तंत्राची अडचण अथवा अडथळा येता कामा नये. अपूर्ण व कमजोर तंत्रामुळे उत्तम आशयाच्या प्रगटीकरणाला मर्यादा येतात व आपण आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होऊ शकत नाही. असे हे तंत्राच महत्त्व. 

विद्या ः विविध प्रकाशचित्रकारांचे वेगवेगळ्या विषयावरील चित्रण त्यातील बारकावे, छाया-प्रकाशाचा खेळ, रंगसंगती, पोत व आकार यांचे खेळ हे सर्व सादरीकरण म्हणजे ‘विद्येचा’ विलास असे म्हणावे लागेल. शास्त्र हे बुद्धीवर अवलंबून, तंत्र हे शरीरावर अवलंबून; तर विद्येचे ग्रहण, आकलन, संकलन, उपाययोजना आणि स्फुरण हे बुद्धीच्या आश्रयाने होते. म्हणजे पुन्हा बुद्धी हेच विद्येचेही आश्रयस्थान ठरते. बुद्धिमानता ही व्यक्तिगणिक बदलत असल्याने वेगवेगळे प्रकाशचित्रकार जरी एकाच विषयावर व्यक्त झाले असले तरीही त्यात वैविध्य पाहायला मिळते. कलाकार आपले सर्वस्व पणाला लावून तंत्रसाधना करतो; पण तंत्रासमोरील विद्येचे आव्हान हे कायमच असते. त्यामुळे कोणतीही कला ही एक महासागर आहे याची आपल्याला जाणीव होत जाते. आपली क्षमता ही त्यात दोन-चार थेंबांइतकीच आहे याची प्रचिती आणून देते ती ‘विद्या.’ 

कला ः कला म्हणजे सौंदर्य व सुंदरतेचे प्रगटीकरण. कला म्हणजे आनंद. कला म्हणजे सहज स्वाभाविक ऊर्मी. सर्वसामान्यांना मोहून टाकते ती कला. अशा कलातत्वाची भूक हेच कलाकाराचे एकमेव भांडवल. त्यामुळे शास्त्र, तंत्र, विद्या यांच्या भक्कम भांडवलावरच कलाकार कलातत्त्वाकडे मार्गस्थ होत असतो. कला म्हणजे प्रत्येक कलाकाराची वैयक्तिक अभिव्यक्ती. कलातत्त्व हे शिकवून येत नाही, तर ते संस्काराने प्राप्त होते. प्रकाशचित्रकलेत हे संस्कार अनेकानेक प्रकाशचित्रकारांची, चित्रकारांची, दृकश्राव्य माध्यमातील प्रतिमांची आपण जेव्हा जाणीवपूर्वक दखल घेतो, त्याचा आस्वाद घेतो तेव्हा नकळत होत जातात. अन ती व्यक्ती ‘कलाकार’ या श्रेणीत प्रवेश करू लागते. शास्त्राचा बुद्धीशी, तंत्राचा शरीराशी तर कलेचा मनाशी संबंध आहे. भावनेशी संबंध आहे. तसा संबंध आला, की कला ही एक ऊर्जा बनून जाते. आणि ही ऊर्जाच कोणत्याही कलाकाराला त्याच्या  आद्य आणि अंतिम असे ध्येय असलेल्या अद्‌भुत ‘कलातत्त्वा’कडे घेऊन जाते. 

गेली दोन वर्षे ‘डिजिटलाय’ हे पाक्षिक सदर लिहिताना मला प्रत्येक क्षणी, मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या प्रकाशचित्रकलेला आजचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी अपरिमित कष्ट घेतले त्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींची, प्रकाशचित्रकारांची, शास्त्रज्ञांची आठवण येत राहिली. भाषाभाषांतील अंतरे ओलांडून एका वैश्‍विक दृश्‍य-अनुभवात घेऊन जाणारी अशी ही प्रकाशचित्रकला. गेली पस्तीस वर्षे या कलेच्या सान्निध्यात घालवताना हा एवढा काळ कसा व्यतीत झाला हे कळलेदेखील नाही. त्यात अनुभवाने आलेल्या थोड्याशा पारंगततेवर, प्रकाशचित्रकलेतील वेगवेगळ्या बाजूंवर लिहिण्याचे धाडस मी कसे केले हेही मला कळले नाही. अजून लिहिण्यासाठी खूप काही शिल्लक आहे. पण आता विरामाची वेळ झाली आहे. या लेखनाचा शेवट माझे एक आवडते प्रकाशचित्रकार ॲन्सेल ॲडम्स यांच्या एका विधानाने करतो. ते म्हणतात - You don’t make a photograph just with a camera. You bring to the act of photography all the pictures you have seen, the books you have read, the music you have heard, the people you have loved. 
(समाप्त) 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या