पॉइंट ऑफ व्ह्यू 

सतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

एखादे रमणीय स्थळ, जेथे चित्रविषयांची विविधता आहे, सुंदर असा प्रकाश उपलब्ध झालेला आहे, कॅमेऱ्यावर आपल्याला हवी असलेली लेन्स लावून आपण आपल्या कॅमेऱ्यासह सज्ज आहोत.. पण... पण आपल्याबरोबर आलेल्या इतर व्यक्ती आपल्याला सतत घाई करण्याचा आग्रह करीत आहेत... असे चित्र प्रवासी कंपन्यांच्या ‘ट्रिप्स’मध्ये वारंवार दृष्टीस पडते. अशावेळी हाडाच्या प्रकाशचित्रकाराची चिडचिड होणे स्वाभाविकच होईल. त्याचे चित्रविषयात हरवून जाणे हे इतरांच्या पचनी पडत नाही. अन मग मनात पाहिलेले चित्र तो प्रकाशचित्रकार कॅमेऱ्यात साठवू शकत नाही. ट्रीपहून परतल्यावर जेव्हा ते फोटो पाहिले जातात, तेव्हा निराशा अनुभवाला येते. याचे महत्त्वाचे कारण असते, की प्रकाशचित्र टिपताना ते योग्य अशा कोनातून न टिपता उभ्या उभ्या, फारसा विचार न करता पटकन कसेतरी टिपलेले असते. 

याउलट - पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा दृश्‍य टिपण्याचा बिंदू या महत्त्वाच्या विषयाचा विचार करून टिपलेले प्रकाशचित्र अर्थातच त्या टिपलेल्या स्थळाचे आपल्याला पुनःदर्शन घडवून आपला आनंद द्विगुणित करते. प्रकाशचित्र टिपताना आपण ते जमिनीवर झोपून चित्रविषयाकडे वर पाहत टिपत आहोत, की उंचावरून एखाद्या विमानातून अथवा एखाद्या क्रेनमधून खाली पाहत टिपत आहोत अथवा जमिनीवर उभे राहूनच चित्रविषयाकडे थेट पाहत टिपत आहोत यावर प्रकाशचित्राची परिणामकारकता खूपच अवलंबून असते. खाली पाहत, वर पाहत अथवा सरळ पाहत टिपलेल्या प्रकाशचित्राचा अर्थ लावण्याचे काम प्रेक्षकाचे मन करीत असते व त्याचा ईप्सित परिणाम हा वेगवेगळा असू शकतो. पॉइंट ऑफ व्ह्यू थोडासाच बदलल्याने येणाऱ्या प्रकाशचित्राचा परिणाम हा नाट्यमयरीतीने बदलू शकतो. एकदम जमिनीलगत जाऊन टिपलेले गवताचे पाते एखाद्या उंचच उंच इमारतीचा आभास निर्माण करू शकेल, तर हवेतून उंचावरून टिपलेली अनेक मजली इमारत एखादे बैठे घर वाटेल. हे सर्व साधता येते ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ या महत्त्वाच्या घटकाने! सर्वसाधारणपणे पॉइंट ऑफ व्ह्यू चे वर्गीकरण सहा प्रकारांत करता येईल. 

१. बर्डस आय व्ह्यू किंवा विहंगमावलोकन. २. हाय व्ह्यू किंवा उच्च दृश्‍यावलोकन. ३. बिकमिंग द सब्जेक्‍ट किंवा चित्रविषयाच्या कोनातून दृश्‍यावलोकन. ४. आय लेव्हल व्ह्यू किंवा डोळ्यांच्या रेषेतील दृश्‍यावलोकन. ५. लो व्ह्यू किंवा कमी उंचीवरून दृश्‍यावलोकन. ६. वर्म्स आय व्ह्यू किंवा कीटकाच्या नजरेतून दृश्‍यावलोकन. 

बर्डस आय व्ह्यू किंवा विहंगमावलोकन ः विहंग म्हणजे पक्षी त्यामुळे अर्थातच तो उंचावरून उडताना त्याच्या दृष्टीस जसे दृश्‍य दिसेल तसा पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण घेतला तर त्याला बर्डस आय व्ह्यू किंवा विहंगमावलोकन म्हणता येईल. यासाठी आपल्याला विमानातून अथवा एखाद्या क्रेनवरून अथवा उंच इमारतीवरून प्रकाशचित्र टिपावे लागेल. अशावेळी आपली जागा ही चित्रविषयाच्या खूप वर असेल. परिणामी प्रेक्षकांना त्यातून चित्रविषयापेक्षा वरिष्ठतेचा अनुभव मिळेल. एखाद्या द्वाड मुलाचे अशा कोनातून टिपलेले प्रकाशचित्र पाहताना आपोआप प्रेक्षकांच्या मनात वडिलकीची भावना निर्माण होईल. जर एखाद्या निर्जीव वस्तूचा फोटो आपण टिपत आहोत तर अशा कोनामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रविषयापासून विभक्त असल्याची भावना निर्माण होईल. 

बर्डस आय व्ह्यू या कोनाचा उपयोग हा उत्तम निसर्गचित्रण करण्यासाठी कल्पकतेने करता येतो. जमिनीवर उभे राहून टिपलेल्या निसर्गचित्रापेक्षा अशा चित्रात वेगळेच सौंदर्य अनुभवास येते. कधी कधी तर अशी निसर्गचित्रे अमूर्ताकडे झुकणारी व वेगळा दृश्‍यानुभव देणारी प्रत्ययास येतात. 

हाय व्ह्यू किंवा उच्च दृश्‍यावलोकन ः बर्डस आय व्ह्यू या कोनापेक्षा बऱ्याच कमी उंचीवरून (पण चित्रविषयाकडे आपण खाली पाहत आहोत असा भास निर्माण करणारी) टिपलेली असंख्य प्रकाशचित्रे आपण रोजच्या जीवनात पाहत असतो. अशा प्रकाशचित्राचा प्रेक्षकांशी पटकन संवाद होऊ शकतो. थोड्याशा उंचीमुळे चित्रविषयातील घटकांचे आकारमान वास्तवातील वाटते. प्रकाशाचा उत्तम वापर केल्यास अशा चित्रात छाया-प्रकाशाची मजा अनुभवता येते. पाककृतींच्या पुस्तकातून छापले जाणारे बरेचसे फोटो हे या प्रकारात मोडतात. 

लो व्ह्यू किंवा कमी उंचीवरून दृश्‍यावलोकन 
 या कोनातून प्रकाशचित्र टिपले तर आपण चित्रविषयाकडे मान वर करून पाहत असल्याचा भाव निर्माण होतो. अशा चित्रात नाट्यमयता अनुभवायला मिळते. लहान बालके, प्राणी तसेच वस्तू अशा कोनातून टिपल्यास नेहमी सर्वसामान्य दिसणारा विषय वेगळ्याच प्रकारे सामोरा येतो.

बिकमिंग द सब्जेक्‍ट किंवा चित्रविषयाच्या कोनातून दृश्‍यावलोकनः व्यक्तिचित्रणात या कोनातून टिपलेली प्रकाशचित्रे जास्त परिणामकारक होतात. आपण जर हे तंत्र वापरून एखाद्या कुंभाराचे प्रकाशचित्र टिपत आहोत व पृष्ठभूमीवर कुंभाराच्या हातांची रचना येईल अशी चित्रचौकट असेल, तर अशा चित्रामुळे प्रेक्षकाला प्रत्यक्ष कुंभारकामाचा अनुभव बघत आहोत अशी भावना येऊ शकेल. जणूकाही प्रेक्षकच प्रत्यक्ष प्रकाशचित्रकार आहे. अशा कोनातून टिपलेली प्रकाशचित्रे मोहक, हृदयस्पर्शी भासतात. तर कधी कधी ती प्रेक्षकाच्या मनात थोडा तणाव निर्माण करणारीही ठरू शकतात.. हे अर्थातच चित्रविषय काय आहे यावर अवलंबून असेल. 
आय लेव्हल व्ह्यू किंवा डोळ्यांच्या रेषेतील दृश्‍यावलोकन ः प्रकाशचित्रणातील

साधारण निम्म्याहून जास्त प्रकाशचित्रे ही या कोनात टिपलेली आढळतात. दररोजच्या जीवनात आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती आपल्याशी जशा संवाद साधतात तोच डोळ्यांचा संवाद अशा प्रकाशचित्रांतून आपल्याला अनुभवायला मिळतो. समान पातळीवरून देवघेव झाल्याचा आभास अशा चित्रातून प्रत्ययास येतो.  व्यक्तिचित्रणात होणारा हा आभास प्राण्यांच्या बाबतीत मात्र वेगळे परिमाण घेतो. प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेषेत जर असे प्रकाशचित्र टिपले, तर प्रेक्षकाला त्या प्राण्याशी जवळीक निर्माण झाल्याचा अनुभव देऊन जाते. प्रेक्षकाच्या मनात त्या प्राण्याविषयी सहानुभूती निर्माण करते. 

वर्म्स आय व्ह्यू किंवा कीटकाच्या नजरेतून दृश्‍यावलोकन ः एखाद्या कीटकाला भवतालचा आसमंत कसा दिसेल अशी आपण कल्पना केली, तर त्या दृश्‍यकोनाचा नाट्यमय परिणाम अशा वर्म्स आय व्ह्यू प्रकाशचित्रात दिसून येतो. कीटकाच्या डोळ्यांना दिसणारी भव्यता अशा प्रकाशचित्रांत आपण अनुभवतो. अशा चित्रांत प्रेक्षकाला खालून वर बघितल्याच्या अनुभवाबरोबरच एक असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. 

वेगवेगळ्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’चे असे वेगवेगळे परिणाम प्रेक्षक अनुभवतोच; पण प्रकाशचित्रकाराने या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’बरोबरीनेच वेगवेगळ्या लेन्सेस वापरल्या तर हा परिणाम अजूनच दृगोच्चर होऊ शकतो. म्हणूनच आपल्या प्रकाशचित्रात वेगळेपणा आणण्यासाठी प्रकाशचित्रकाराने काही तत्त्वे कायमच लक्षात ठेवली पाहिजेत; ती म्हणजे कोणतेही प्रकाशचित्रण सुरू करण्याअगोदर चित्रविषयाचा गृहपाठ करायला हवा. बुद्धी व हृदयाबरोबरच पायांचा वापर करून चित्रविषयाभोवती फिरून योग्य असा दृश्‍यकोन निवडायला हवा, असामान्य असा दृश्‍यकोन शोधण्याची धडपड करायला हवी, चित्रचौकट पूर्ण भरेल असा दृश्‍यकोन घ्यायला हवा, स्वतःच्या सुरक्षिततेचा पक्का विचार करून मग थोडे धाडस दाखवले तर वेगळा दृश्‍यकोन सापडणे फार अवघड नाही आणि मग अशा प्रकाशचित्रकाराला ना  विषयांची कमतरता ना आभाळाची मर्यादा! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या