चित्र चौकट (फ्रेम)

सतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार
गुरुवार, 8 मार्च 2018

डिजिटलाय

सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

बऱ्याच वेळेला आपण अनुभवतो की एखाद्या प्रकाशचित्रात आपली नजर कोणत्याच बिंदूवर स्थिरावत नाही. सतत फिरत राहते. त्यामुळे होते असे की काही वेळातच आपले त्या प्रकाशचित्रावरील लक्ष विचलित होते. आपला त्या प्रकाशचित्रातील रस संपतो. कशामुळे होते असे? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या प्रकाशचित्राच्या चौकटीत अनेक विषय अंतर्भूत झालेले असतात. त्यामुळे मुख्य चित्रविषयाला न्याय न मिळता आपली दृष्टी इतरत्र फिरत राहते. पार्श्वभूमी, पृष्ठभूमीवर नोंदले गेलेले चित्राला मारक असणारे घटक आपला रस कमी करण्याचे काम त्वरित करतात. त्यामुळे प्रकाशचित्र जर आकर्षक, लक्ष खिळवून ठेवणारे करायचे असेल तर अशा अनावश्‍यक घटकांवर आपण वेळीच उपाय करायला हवा. त्यासाठी अर्थातच ‘प्रकाशचित्राच्या चौकटीचे’ योग्य कंपोझिशन करून मगच क्‍लिक करणे ही सवय लावून घ्यायला हवी. 

चित्रचौकटीत अनावश्‍यक जास्त जागा सुटली म्हणजेच आपण लांबून फोटो टिपला तरीही ते प्रकाशचित्राला मारक ठरते. म्हणून ‘भरलेली चित्रचौकट‘ महत्त्वाची ठरते.. येथे प्रसिद्ध फोटोग्राफर रॉबर्ट कापा यांचे एक विधान आठवते. कापा म्हणतात  ‘‘तुमचे प्रकाशचित्र परिणामकारक ठरत नाहीये याचा सोपा अर्थ हा आहे की तुम्ही चित्रविषयाच्या जवळ पोहोचलेले नाही आहात.’’ कापा यांचे हे वाक्‍य दोन अर्थाने घेता येते एक म्हणजे ते तुमच्या चित्रचौकटीबद्दल बोलत आहेत किंवा चित्रविषयाशी तुम्ही तादात्म्य पावलेले नाही हे त्यांना सांगायचे. पण दोन्ही अर्थाने प्रकाशचित्राची परिणामकता वाढण्यासाठी त्यांच्या या वाक्‍याचा उपयोग करता येईल.

म्हणजेच एक प्रकाशचित्रकार म्हणून चित्रचौकट भरून टाकण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागेल, थोडा विचार करावा लागेल, मुख्य चित्रविषयाचे प्राधान्य, त्यातील बारकावे, रंग, पोत तसेच पृष्ठभूमी व पार्श्वभूमी यांचा विचार करावा लागेल. चित्रविषयाच्या आजूबाजूला फिरून, जवळ जाऊन किंवा जास्त फोकललेन्थची लेन्स वापरून आपल्याला हवा तसा परिणाम साधता येईल. 

हे करीत असताना आपण एक चाचणी म्हणून असे पाहू शकतो की जर आपला चित्रविषय आपल्या फ्रेमच्या व आपल्या प्रकाशचित्राच्या सीमारेषेबाहेर उरत असेल तर आपण ‘चित्रचौकट‘ भरून टाकण्यात यशस्वी होऊ लागलो आहोत. चित्रातले अनावश्‍यक घटक टाळत गतिशील घटकांचे प्राबल्य वाढले की आपोआपच ते परिणामकारक व नाट्यमयही होईल. 

चित्रचौकट भरून टाकण्याचे प्रामुख्याने चार फायदे आहेत. 

प्रकाशचित्रातले बारकावे (Details)
प्रकाशचित्रात चित्रविषय मोठा असण्याने त्यातले बारकावे सुस्पष्टपणे नोंदवले जातात. चित्रविषयाच्या जवळ जाऊन अथवा जास्त फोकल लेन्थच्या (टेलीफोटो) लेन्सने प्रकाशचित्र टिपल्यास आपण चित्रचौकट भरून टाकू शकतो. कधी कधी व्यक्तीचित्रणात याचा खूपच उपयोग होतो. समजा आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीचा फोटो टिपत आहोत. तो जर खूप दुरून टिपला तर त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व बारकावे सुस्पष्ट येणार नाहीत उलट जर आपण तोच फोटो जवळून टिपला तर मात्र त्या सुरकुत्या परिणामकारकपणे नोंदवल्या जातील. ज्यायोगे त्या व्यक्तीने अनुभवलेले जग त्या सुरकुत्यांमधून व्यक्त झाल्याचा परिणाम साधता येईल. याचेच दुसरे उदाहरण म्हणजे मॅक्रो व क्‍लोजअप प्रकारची प्रकाशचित्रे. अशा प्रकाशचित्रात आपल्याला चित्रविषयातील एरवी कधी न दिसणारे बारकावे दिसून जातात.

मनःस्थिती (Mood)
व्यक्तीचित्रणात त्या व्यक्तीची मनःस्थिती अथवा मूड अथवा भावमुद्रा नोंदवली जाणे हे महत्त्वाचे असते. आजूबाजूच्या परिसराच्या तुलनेत जर व्यक्तीचा चेहरा खूप लहान नोंदवला गेला (फोटो दुरून टिपण्याने असे होते) तर त्या व्यक्तीचे भाव सुस्पष्टपणे दिसत नाहीत. या उलट जर चेहऱ्याचा भाग जास्त असेल तर तो चित्रातील  इतर घटकांवर मात करून भावमुद्रा नोंदवण्यात यशस्वी होईल.

पार्श्वभूमी (Background)
प्रकाशचित्रात पार्श्वभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्श्वभूमी चित्राला तारक अथवा मारक ही ठरू शकते. चित्रविचित्र आकार व रंग असलेली  पार्श्वभूमी चित्रविषयाचे महत्त्व कमी करते. अशा वेळी आपण काय करू शकतो तर प्रकाशचित्रात पार्श्वभूमीला कमीत कमी वाव ठेवणे किंवा चित्रविषयाच्या जास्तीत जास्त जवळून प्रकाशचित्र टिपणे. म्हणजेच ’चित्रचौकट’ जास्तीत जास्त भरलेली ठेवणे. व्यक्तीचित्रणात अशा प्रकारे टिपलेली प्रकाशचित्रे असंख्य वर्षे रसिकांना आकर्षून घेण्याची किमया साधतात. कृष्ण-धवल जमान्यातील अशी प्रकाशचित्रे आजही कलादालनांतून रसिकांवर प्रभाव पाडतात.

पुनर्निर्मितीचे प्रमाण (Scale of Reproduction)
आपण टिपलेल्या प्रकाशचित्राचा अंतिम वापर कशा प्रकारे होणार आहे याचा विचार हा ते टिपताना करायला हवा. जर ते लहान आकारात प्रदर्शित होणार असेल तर प्रकाशचित्रात मुख्य चित्रविषय जास्तीत जास्त मोठ्या आकारात असायला हवा. उदाहरणार्थ एखादा लहान आकारातला पण चित्रविषय सुस्पष्टपणे दाखवणारा फोटो भल्या मोठ्या बोर्डवर लावला असेल तरी तो प्रेक्षकांचे लक्ष लगेच वेधून घेईल उलट तोच फोटो जर एखाद्या व्हरांड्यात डिजिटल फ्रेममध्ये लावला तर तो तितका परिणाम साधणार नाही. असे असले तरी सर्व वेळी चित्रचौकट पूर्ण भरून टाकणे हेही अतिरेकाचेच ठरेल. त्यामुळे प्रकाशचित्र टिपताना चित्रचौकटीतील आजूबाजूची रिकामी जागा योग्य प्रकारे सोडून ज्यायोगे मुख्य चित्रविषयाला उठाव येईल व ते कलात्मक होईल अशा प्रकारे रचना केलेली केव्हाही स्वागतार्हच ठरेल. 

सर्व विचार करून आपण एखादे प्रकाशचित्र टिपले आणि नंतर आपल्या मनात त्या प्रकाशचित्राची पुनर्रचना करायची इच्छा झाली तर काय? असा एक प्रश्न पुढ्यात येईल. अशा वेळी त्या डिजिटल प्रकाशचित्रात फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या आधारे हवे तसे क्रॉपिंग करूनही आपल्याला ते उठावदार करता येईल. पण असे करण्यात काही मर्यादा आहेत. जास्त प्रमाणात क्रॉपिंग झाल्यास पिक्‍सेलचा आकार दिसायला लागून प्रकाशचित्राचा परिणाम नाहीसा होईल. तेव्हा प्रकाशचित्र टिपायच्या आधीच ‘चित्रचौकटीचा‘ पूर्ण विचार झालेला असणे कायमच फायदेशीर!

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या