एक्‍स्पोजरच्या सेटिंग्ज

सतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

एक्‍स्पोजर मीटरच्या साहाय्याने अर्थातच आपण शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ या त्रयींचा वापर करीत अचूक असे एक्‍स्पोजर वापरून प्रकाशचित्र टिपू शकतो. पण सर्वसाधारणपणे कॅमेऱ्यातील ऑटो एक्‍स्पोजर या सोयीचा वापर उपलब्ध प्रकाशातील फोटो टिपण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो.

अतिप्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आजकालचे डिजिटल कॅमेरे बनवले जातात. त्यामुळे अगदी साधा कॅमेरा असो की डीएसएलआर; त्यात प्रकाशचित्राला अचूक एक्‍स्पोजर देण्यासाठी एक्‍स्पोजर मीटर अंतर्भूत असतेच असते. जसजशी कॅमेऱ्यांची श्रेणी वाढत जाईल तसतशी त्यात जास्त सोयी असलेली एक्‍स्पोजर मीटर उपलब्ध होत जातात. त्यामुळे चित्रविषयात असलेला छाया-प्रकाशाचा खेळ उत्तम रीतीने नोंदवत प्रकाशचित्रकलेचा अगदी प्राथमिक अवस्थेतला साधकही उत्कृष्ट प्रकाशचित्र टिपू शकतो. अशा आधुनिक मीटरचा योग्य वापर केला तर चुकीचे एक्‍स्पोजर असलेले प्रकाशचित्र येण्याची शक्‍यता अंधूक होत जाते. 

एक्‍स्पोजर मीटरच्या साहाय्याने अर्थातच आपण शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ या त्रयींचा वापर करीत अचूक असे एक्‍स्पोजर वापरून प्रकाशचित्र टिपू शकतो. पण सर्वसाधारणपणे कॅमेऱ्यातील ऑटो एक्‍स्पोजर या सोयीचा वापर उपलब्ध प्रकाशातील फोटो टिपण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. इथे खरे तर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे, ऑटो एक्‍स्पोजरची सोय वापरताना  सर्वसाधारण प्रकाश असलेला चित्रविषय योग्य रीतीने चित्रित केला जातो (वेगवेगळी निसर्गचित्रे हे त्याचे उदाहरण असेल). पण जेथे मुख्य चित्रविषय आणि पार्श्‍वभूमी यामध्ये प्रकाशात खूपच तफावत असते अशा वेळी आधुनिक एक्‍स्पोजर मीटरही फसू शकते व येणारे प्रकाशचित्र चुकीच्या प्रकारे नोंदवले जाते. 

डिजिटल कॅमेऱ्यांचा एक फायदा असा, की प्रकाशचित्र टिपल्याच्या पुढच्याच क्षणी ते कॅमेऱ्याच्या मागील भागात असलेल्या स्क्रीनवर लगेचच अवतरते. त्यामुळे त्यातील एक्‍स्पोजर, रंग, पोत, छाया-प्रकाश, संरचना हे आपल्याला हवे तसे आले आहे अथवा नाही हे आपण लगेचच पाहू शकतो. आपल्याला हवा तसा परिणाम साध्य झाला नसेल, तर आपण तो फोटो गाळून टाकू शकतो. पुन्हा हवे तसे एक्‍स्पोजर ठेवून नव्याने प्रकाशचित्र घेण्यास कॅमेरा केव्हाही तयार! (फिल्म कॅमेऱ्यांच्या जमान्यात ती संपूर्ण फिल्म प्रोसेस होऊन आल्याशिवाय ते कळत नसे.) एक्‍स्पोजरच्या थोड्याफार फरकाने आलेले प्रकाशचित्र खरे तर फोटोशॉपसारख्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्त होऊ शकते. पण प्रकाशचित्र टिपतानाच जर ते अचूक येण्यासाठी थोडे जास्त कष्ट घेतले तर ते केव्हाही चांगलेच. 

मुख्य चित्रविषय आणि पार्श्‍वभूमी यामध्ये प्रकाशात खूपच तफावत असताना जर आपण ऑटो एक्‍स्पोजर ही सुविधा वापरली (कॅमेऱ्याने चित्रविषयातील प्रकाशाची सरासरी काढून एक्‍स्पोजर ठरवले) तर काय प्रकारची प्रकाशचित्रे येऊ शकतात यांची उदाहरणे द्यायची झाल्यास - 

  • मुख्य चित्रविषय हा फिक्‍या व जास्त प्रकाश असलेल्या पार्श्‍वभूमीवर असेल व पार्श्‍वभूमीचा भाग जास्त असेल तर कॅमेऱ्याचे मीटर हे पार्श्‍वभूमीवरील प्रकाशाकरिता एक्‍स्पोजर ठरवेल. अशा वेळी मुख्य चित्रविषय कमी एक्‍स्पोजरमुळे काळपट होईल. (अंडर एक्‍स्पोज्ड). 
  • याउलट मुख्य चित्रविषय हा गडद व कमी प्रकाश असलेल्या पार्श्‍वभूमीवर असेल व पार्श्‍वभूमीचा भाग जास्त असेल तर कॅमेऱ्याचे मीटर हे पार्श्‍वभूमीवरील प्रकाशाकरिता एक्‍स्पोजर ठरवेल. अशा वेळी मुख्य चित्रविषय जास्त एक्‍स्पोजरमुळे पांढुरका होईल. (ओव्हर एक्‍स्पोज्ड). 

हे दोन उदाहरणादाखल घेतलेले प्रसंग आहेत. असे घडू नये यासाठी व प्रत्यक्षात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात, रंगात प्रकाशचित्र टिपण्यासाठी कॅमेऱ्यातील एक्‍स्पोजर मीटरमध्ये विविध सेटिंग्ज उपलब्ध असतात. ही सेटिंग्ज साधारणपणे चार प्रकारची असतात. 

  • इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग : या मोडमध्ये संपूर्ण चित्रचौकटीचा विचार करून प्रकाशाची सरासरी काढून एक्‍स्पोजर ठरवले जाते. (वरील दोन उदाहरणात हे वापरले गेले आहे.) 
  • सेंटर वेटेड मीटरिंग : या मीटरिंग मोडमध्ये चित्रचौकटीच्या मध्यवर्ती भागातील प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो. 
  • पार्शल मीटरिंग : या मीटरिंग मोडमध्ये चित्रचौकटीच्या मध्यभागी असलेल्या ४० - ४५ टक्के भागातील प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो. 
  • स्पॉट मीटरिंग : मध्यभागी असलेल्या साधारण ५ टक्के भागात असलेला प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो. उरलेल्या ९५ टक्के भागाचा विचार मीटर करत नाही. 

यावरून असे सहज लक्षात येईल, की चित्रविषयाच्या मागणीप्रमाणे आपण हे वेगवेगळे मोड्‌स वापरून योग्य शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ यांच्या जोड्या वापरत अचूक प्रकाशचित्र मिळवू शकतो. 

कॅमेऱ्याच्या बऱ्याच मॉडेल्समध्ये ऑटो एक्‍स्पोजर लॉक (AEL) ही सुविधा असते. चित्रविषयाच्या अगदी जवळ जाऊन कॅमेऱ्याचे क्‍लिकचे बटण थोडेसे दाबून धरत जर आपण एक्‍स्पोजर मोजले व ऑटो एक्‍स्पोजर लॉक (AEL) ही सुविधा वापरली, तर ते चित्रविषय अचूक एक्‍स्पोज होण्यासाठी उपयोगी ठरते. अशावेळी चित्रविषयाच्या अगदी जवळ जाऊन क्‍लिकचे बटण दाबून धरत एक्‍स्पोजर मोजले, ते बटण तसेच दाबून धरत पुन्हा आपल्याला हवे त्याप्रमाणे चित्राची संरचना करीत नंतर ते बटण पूर्ण दाबत प्रकाशचित्र टिपले, तर येणाऱ्या प्रकाशचित्रात चित्रविषय योग्य पद्धतीने नोंदवला जाईल. 

वर म्हटल्याप्रमाणे अतिप्रगत कॅमेऱ्यात हल्ली जी एक्‍स्पोजर मीटर्स असतात त्यामध्ये जवळपास ६३ झोन इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग व थ्री डी कलर मॅट्रिक्‍स मीटरिंग ज्यायोगे प्रकाशचित्रातील सर्व रंगांची नोंदणीही उत्तमरित्या करण्याची सोय उपलब्ध आहे. ज्या कॅमेऱ्यांत प्रोग्राम मोडची सोय आहे, अशा कॅमेऱ्यांत आपण निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण, खेळ (ज्यात ॲक्‍शन आहे), वन्यजीव चित्रण या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रणांसाठी वेगवेगळी सेटिंग्ज ठेवून योग्य वेळी ती सुविधा वापरू शकतो. 

डिजिटल कॅमेऱ्यांत अजून एक महत्त्वाची सोय दिलेली असते. ती म्हणजे प्रत्येक प्रकाशचित्राच्या बरोबरीनेच त्या प्रकाशचित्राची सर्व ‘कुंडली’ मेमरी कार्डवर जतन करून ठेवली जाते. यालाच फोटोग्राफीच्या परिभाषेत ‘मेटाडेटा’ असे संबोधतात. या बरोबरीनेच प्रत्येक 

प्रकाशचित्राचा ‘हिस्टोग्रामही नोंदवलेला असतो. कधीकधी कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रावरून प्रकाशचित्राचे एक्‍स्पोजर योग्य आहे की नाही हे कळत नाही. अशावेळी जर आपण त्या प्रकाशचित्राच्या ‘हिस्टोग्राम’चा अभ्यास केला तर झालेली चूक आपल्या लगेच लक्षात येऊ शकते. ‘हिस्टोग्राम’ हा एक आलेख असतो. या आलेखात ‘Y’ अक्षावर रंगांचे एकूण पिक्‍सेल्स किती आहेत हे दिसते, तर ‘X’ या अक्षावर अगदी डावीकडे कमी प्रकाश असलेले पिक्‍सेल्स व अगदी उजवीकडे जास्त प्रकाश असलेले पिक्‍सेल्स दर्शवले जातात. 

योग्य एक्‍स्पोजर असलेल्या प्रकाशचित्रात हा आलेख साधारण मध्यभागात असतो. जर प्रकाशचित्रात प्रकाश कमी पडला (अंडर एक्‍स्पोज्ड), तर हा आलेख आपल्याला डावीकडे सरकलेला दिसतो व जर प्रकाशचित्रात प्रकाश जास्त पडला (ओव्हर एक्‍स्पोज्ड) तर हा आलेख उजवीकडे सरकलेला दिसतो. आलेख जर डाव्या बाजूला चिकटलेला असेल तर प्रकाशचित्रात काही भाग पूर्ण काळा ज्यात कोणतेही बारकावे नोंदले गेले नाहीत असा असतो. आलेख जर उजव्या बाजूला चिकटलेला असेल तर प्रकाशचित्रातील काही भाग हा पूर्ण पांढरा ज्यात कोणतेही बारकावे नोंदले गेले नाहीत असा असतो. कॅमेरा सेटिंग्जमध्ये योग्य असा काँट्रास्ट ठेवून वरील दोष नाहीसे करता येतात. 

फिल्मच्या जमान्याचा विचार करता व आज डिजिटल कॅमेऱ्यात असलेल्या या सोयी पाहता प्रकाशचित्रणकलेने अगदी कमी काळात केलेली ही प्रगती पाहून अचंबित व्हायला होते व बरोबरीनेच प्रत्येक प्रकाशचित्रकारावर आलेल्या जबाबदारीची जाणीवही करून देते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या