बेमिसाल विश्‍वजित

पूजा सामंत    
सोमवार, 27 जानेवारी 2020

दिलखुलास
कोलकता येथे १४ डिसेंबर १९३६ रोजी जन्म झालेल्या विश्‍वजित चॅटर्जी यांनी बंगालीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला. बीस साल बाद, कोहरा, किस्मत, लव्ह इन सिमला, परदेसी... यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी रुपेरी पडदा तब्बल ३० वर्षे गाजवला. आता निवृत्तीनंतरही ते ‘बेमिसाल विश्‍वजित’ या त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांच्या कार्यक्रमामधून गायक आणि परफॉर्मर म्हणून सक्रिय आहेत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

विश्‍वजितदादा, सध्या तुमचे रुटीन काय असते?
विश्‍वजित चॅटर्जी : मी सकाळी सहापर्यंत उठतो. चहा घेतो, त्यानंतर मी अर्धा तास योगा, नंतर चालण्याचा व्यायाम करतो. न्याहारीबरोबर वर्तमानपत्रे वाचतो. टीव्हीवर बातम्या पाहतो. जेवणानंतर मी १५ मिनिटे ते अर्धा तास आराम करतो. दुपारी तीन वाजता आत्मचरित्र लिहितो, ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी सात ते साडेसात किंवा आठ, मी आणि इरा फिरून येतो. साडेआठ ते नऊ रात्रीचे जेवण करून, मग मुलीशी गप्पा मारून साडेदहापर्यंत झोपेच्या अधीन होतो.

अलीकडेच तुम्ही एका हिंदी-बंगाली फिल्मचे शूटिंग पूर्ण केले.
विश्‍वजित चॅटर्जी : फिल्मचे नाव आहे ‘डार्क शॅडो.’ या फिल्मचे दिग्दर्शक सुभाष असून यात एका अशा व्यक्तीची भूमिका मी साकारली होती, ज्याची स्प्लिट पर्सनॅलिटी असते. अनेक फेस्टिव्हल्समधून ही फिल्म दाखवली गेली. माझ्या वाट्याला नेहमीच भयपट अधिक आले. त्यापैकीच हा एक अनुभव. 

‘बेमिसाल विश्‍वजित’ हा म्युझिकल शो करण्यामागे कोणती संकल्पना होती? 
विश्‍वजित चॅटर्जी ः अभिनयात येण्यापूर्वी मी मन्ना डे नाइट करीत असे, त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. पण पुढे अभिनेता म्हणून वाव मिळाल्यानंतर गायकी मागे पडली. पाच वर्षांपूर्वी माझा एक फॅन राजेश नेगी याच्याशी माझी भेट झाली आणि त्यानेच माझ्या म्युझिकल शोची थीम, शीर्षक ‘बेमिसाल विश्‍वजित’ ठरवले.  माझ्यावर चित्रित झालेली गाणी मी स्टेजवर परफॉर्म करतो. हा शो मुंबईसह जगभरात सादर केला. अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 

अभिनयाची पार्श्‍वभूमी नसताना तुम्ही अभिनयात कसे आलात? 
विश्‍वजित चॅटर्जी : मेरे डॅडी आर्मी मै डॉक्टर थे। वडील (डॉ. रंजीत कुमार चॅटर्जी) म्हणून त्यांना वाटायचे मीदेखील डॉक्टर व्हावे. पण मी याचा कधीही गांभीर्याने विचार केला नाही. माझ्या आईला - स्मृती चॅटर्जीला संगीत, नृत्याची खूप आवड होती. दुर्दैवाने माझ्या वयाच्या १३ व्या वर्षी माझ्या आईचे ब्रेन ट्यूमरने निधन झाले. मी एकटा पडलो. वडिलांची बदलीची नोकरी असल्याने त्यांची बदली बगदादला झाली. मला त्यांनी हॉस्टेलला ठेवले. पण एक मात्र झाले, वडिलांच्या सान्निध्यात राहून मी वक्तशीरपणा, शिस्त, स्वावलंबन आपोआप शिकलो, ज्याचा मला पुढील जीवनात फायदाच झाला. 
माझ्या कॉलेज शिक्षणानंतर मी अभिनयात जाणार हे वडिलाना सांगितले आणि घरी धरणीकंप झाला! मला सिनेमात काम न करण्याचा आदेश देण्यात आला. पण मी हट्टाला पेटलो, तेव्हा मला सांगण्यात आले, इथे राहायचे असल्यास अभिनय विसरावा लागेल. मी घर सोडणे पसंत केले.

घर सोडले म्हणजे संघर्ष आला...
विश्‍वजित चॅटर्जी : मी कोलकात्यात फुटपाथवर राहिलो. मिळतील ती कामे करत गेलो. माझ्या आवाजामुळे मला गाण्याची कामे मिळत गेली. बंगाली गायन आणि बंगाली सिनेमा करत मी हिंदीत आलो. बीस साल बाद हा मला सुपरस्टारडम देणारा सिनेमा ठरला.. किस्मत ने आखिर करवट ली।

त्या काळच्या तमाम प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर तुम्ही अनेक फिल्म्स केल्या.
विश्‍वजित चॅटर्जी : सायरा बानू, अाशा पारेख, वहिदा रेहमान, माला सिन्हा, नंदा, विम्मी, साधना, बबिता, हेलन, लीना चंदावरकर, मुमताज, शर्मिला टागोर, रेखा (बेबी नीतू सिंग) अशा सगळ्या आघाडीच्या नायिकांचा मी रुपेरी पडद्यावरचा हिरो होतो. पण कधी अफवा किंवा माझ्याकडून कधी आगळीक घडली आणि कुठल्या नायिकेने माझ्यासमवेत काम करण्यास नकार दिला असे घडले नाही.

अभिनेत्री रेखाला हिंदीमध्ये प्रथम संधी तुम्ही दिलीत, नाही का?
विश्‍वजित चॅटर्जी : माझ्या नव्या सिनेमासाठी डेट्स देणारी नायिका मिळणे कठीण होते. तेव्हा दिग्दर्शक कुंदनकुमार आणि मी चेन्नईमध्ये रेखा आणि तिची आई पुष्पवल्ली यांना भेटलो. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर मी रेखाच्या आईला सुचवले, ‘भानुरेखा हे मोठे नाव आहे. रेखा असे केले तर!’ तिने होकार दिला. याच सिनेमासाठी मी रेखाला इंट्रोड्युस केले. रेखा १६ वर्षांची होती. ‘अंजाना सफर’ हे या सिनेमाचे आधीचे नाव होते. ते बदलून ‘दो शिकारी’ करण्यात आले. हा सिनेमा पुढे रखडला खरा!

तुम्ही रेखाच्या जबरदस्ती घेतलेल्या चुंबनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. या वागण्याची खंत तुम्हाला नंतर कधी जाणवली का?
विश्‍वजित चॅटर्जी : जब सालो साल ॲक्टर्स दिन रात साथ में काम करते हैं, तो उन में प्यार-यारी-दोस्ती हो जाती है। माझे आणि रेखाचे प्रेमप्रकरण नव्हते. पण फिल्म सीक्वेन्स म्हणून मी घेतलेल्या रेखाच्या चुंबनाचा नको तितका गाजावाजा झाला. याची खंत वाटत असली, तरी मी मुद्दाम काहीही घडवून आणलेले नाही. हा चित्रपट होता ‘अंजाना सफर’ आणि दिग्दर्शक होते राजा नवाथे. त्यांनी मला सांगितले, की रेखाचे चुंबन तुला घ्यायचे आहे. पण रेखाला याची कल्पना दिली नसल्याने तिचे एक्स्प्रेशन्स भेदरल्यासारखे होते! असो!

तुम्ही त्या काळात स्टायलिश ॲक्टर म्हणून प्रसिद्ध होतात.
विश्‍वजित चॅटर्जी : मला ‘बीस साल बाद’ आणि ‘कोहरा’ या भयपटांनी खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमात आल्फ्रेड हिचकॉकच्या सिनेमातील नायक जसा असतो, तसे माझे कॉश्च्युम करून घेतले होते. स्टायलो आणि चंदू या दोन त्या काळच्या प्रसिद्ध टेलर्सकडून मी माझे फिल्मी, पण स्टायलिश कपडे शिवून घेत असे. 

तुमचे सहनायक कसे होते? 
विश्‍वजित चॅटर्जी : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बहुसंख्य कलाकार - निर्माते पंजाबी आहेत, होते. आपण जिथे काम करतो तेथील सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावेच लागते.

जीवनात आणि सिनेमात आव्हाने कोणती होती?
विश्‍वजित चॅटर्जी : माझ्या जन्मदात्याने मला घरातून हाकलून लावले. मी करिअरमध्ये स्थिर होण्यापूर्वी माझे लग्न लावून देण्यात आले, पण माझा पहिला विवाह सुखकारक ठरला नाही. हे माझ्या जीवनातील कठीण आणि आव्हानात्मक प्रसंग, ज्याने मी त्याकाळी उन्मळून गेलो, खचलो पण पुन्हा उठून अभिनयाकडे वळलो.
करिअरमध्ये अनेकदा माझी डरपोक बंगाली बाबूमोशाय अशी हेटाळणी होत असे. स्टंट्स करताना कधी भीती वाटली, तर ‘कैसे डरता है देखो बाबूमोशाय। आपना पंजाबी हिरो होता तो बिना सोचे छलांग लागा देता,’ असे वारंवार बोलले जायचे. ‘किस्मत’, ‘शिकारी’ सिनेमांच्यावेळी अशा मानहानीच्या प्रसंगांना सामोरे गेलो आहे. 

अशोक कुमार यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केले?
विश्‍वजित चॅटर्जी : एक धार्मिक चित्रपट माझ्याकडे आला. मी राम आणि मौसमी चॅटर्जी सीता! मला प्रेक्षक राम म्हणून स्वीकारतील का? मी बुचकळ्यात पडलो. तेव्हा दादामुनींनी मला सल्ला दिला, ‘कसल्याही भूमिकांना नकार देऊ नकोस.’ मी त्यांचा सल्ला शिरोधार्य मानला आणि ‘बजरंगबली’ या सिनेमात रामाची भूमिका केली. 

शूटिंगमध्ये वेळ मिळाला की तुम्ही कार्टून्स काढायचा, असे ऐकले.
विश्‍वजित चॅटर्जी : मला शाळेपासून व्यंगचित्र, चित्रकलेची आवड होती. अनेकदा असे वाटते या जुन्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे, पण आता सगळी चित्रे माझ्याकडे नाहीत.

शक्ती सामंता यांच्या माइलस्टोन ठरलेल्या ‘आराधना’ सिनेमाची तुम्हाला ऑफर आली होती, हे खरे का?
विश्‍वजित चॅटर्जी : हे १०० टक्के खरे आहे. सचिन भौमिक त्यांनी ‘आराधना’ सिनेमाची कथा लिहिली. त्यांनी मला या सिनेमासाठी साईन केले आणि नायिका म्हणून कल्पनाला घेतले. एस. डी. बर्मन यांनादेखील साईन केले गेले. पण मला ‘नाइट इन लंडन’च्या शूटिंगसाठी बैरुतला जावे लागले. तिथे शूटिंग खोळंबले. त्या दरम्यान सचिन भौमिकऐवजी शक्ती सामंता यांनी निर्मिती-दिग्दर्शन स्वतःकडे घेतले. यांना हा सिनेमा त्वरित सुरू करायचा होता. त्या वेळेस राजेश खन्ना टॅलेंट काँटेस्टमधून आलेला नवा हिरो होता. त्याला आणि शर्मिला टागोरला घेऊन आराधना सुरूदेखील केला. या सिनेमाने राजेश खन्ना या अमृतसरच्या नवोदित युवकाला स्टार केले. 

इरा यांच्याशी लग्न कधी केले?
विश्‍वजित चॅटर्जी : इरामुळेच आजचा विश्‍वजित घडू शकला, स्वाभिमानाने जगू शकला. एका सोशल कार्यक्रमात इराशी भेट झाली, तेव्हा तिने बिझनेस मॅनेजमेंट डिग्री घेतली होती आणि नोकरीच्या शोधात होती. इराला अमेरिकेत नोकरी मिळाली, पण पुढे परिचयातून झालेले हे लग्न ठरले. अमेरिकेला जाणे तिने रहित केले. इराने या भटक्या माणसाला आपल्या जीवनात आधार दिला, आम्ही लग्न केले आणि त्या दिवसापासून मी पूर्णतः इरावर अवलंबून आहे. सुखी समाधानी जीवन मी इरामुळे जगतोय! मी तिचा कृतज्ञ आहे.  

संबंधित बातम्या