अभिनेत्री ते योग शिक्षिका

पूजा सामंत    
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

दिलखुलास
प्रख्यात फिल्म दिग्दर्शक महेश भट्ट यांनी १९९० मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘आशिकी’ या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या अनू अगरवाल त्या चित्रपटाच्या यशानंतर हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांसाठी हॉट प्रोपोजल ठरल्या होत्या. पुढे काही मोजके सिनेमे केल्यानंतर त्या गायब झाल्या! त्यांच्याविषयी उत्सुकता वाटत असे. अलीकडेच त्यांचे आत्मकथनपर पुस्तक ‘अनयुज्वल - मेमॉयर ऑफ अ गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड’ प्रकाशित झाले. त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

अनू, तुमच्याविषयी काही सांगावे.
अनू अगरवाल : माझा जन्म दिल्लीत अतिशय संपन्न आणि सुसंकृत कुटुंबात झाला. माझे वडील सरकारी नोकरीत होते, तर आई वकील. भाऊ अतिशय मोठ्या हुद्द्यावर. मी दिल्लीत समाजशास्त्रामध्ये पदवी मिळवली. या विषयात मला गोल्ड मेडल मिळाले. तल्लख बुद्धी आणि स्टायलिश राहणीमान यामुळे कॉलेजच्या स्नेहसंमेलनात मला नेहमी भाग घेण्यासाठी आग्रह होई. उत्तर भारतीय असूनही माझ्यावर आधुनिक विचारसरणीचे संस्कार झालेत.

तुम्ही मॉडेलिंगमध्ये आणि पुढे सिनेमात कशा आलात?
अनू अगरवाल : मला असे वाटते माझे अवघे आयुष्य म्हणजे रहस्यमय प्रवास आहे. काही अतर्क्य-अविश्वसनीय घटना माझ्या आयुष्यात घडत गेल्या. अनेक चढ-उतार आले. आयुष्य आता संपले, पूर्णविराम मिळाला असे वाटत असतानाच पुन्हा माझ्या जीवनाला नवी सुरुवात झाली. घडलेल्या घटनांनी माझे सरळमार्गी आयुष्य पूर्णतः बदलले. मॉडेलिंगशी माझा काहीही संबंध नव्हता. मी काही कॉलेज मित्रांसमवेत मुंबई फिरण्यास आले होते, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने मला स्वतःचा परिचय करून देत मॉडेलिंग करशील का असे विचारले. माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला, जर शिक्षणाबरोबर काही पॉकेटमनी मिळत असेल, तर मॉडेलिंग करायला काय हरकत आहे? मला स्वावलंबी होण्याची संधी या मॉडेलिंगमुळे मिळाली. हा काळ होता १९८६-८७ चा. माझ्यासाठी दिल्लीतून मुंबईत येऊन एकटीने राहणे हा प्रश्न तितका सोपा नव्हता. हळहळू मला इथे काम मिळत गेले. माझी चेहरेपट्टी थेट भारतीय, विदेशी, युरोपियन, आफ्रिकन अशा कुठल्याही साच्यात बसत नव्हती. त्यामुळे हा लुक ग्लोबली खूप स्वीकारला गेला. अनेक आंतरराष्ट्रीय प्रॉडक्ट्ससाठी माझा चेहरा योग्य ठरला. फेस स्वेपस इंडिया टॉनिक पॅरिस या उत्पादनासाठी तीन महिन्यांच्या ऑडिशन्सनंतर माझी निवड झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनू अगरवाल या भारतीय मॉडेलचे नाव प्रसिद्ध झाले. माझा पुढचा प्रवास पॅरिस-मुंबई आणि युरोपच्या अनेक देशांत झाला. मी तिथे एकटीने राहणे, जगणे यात सरावले. सुपर मॉडेल झाल्यानंतर मी जनसंख्या नियंत्रणासाठी ‘कामसूत्र कंडोम’ला एंडॉर्स केले. त्या काळात कुठल्याही भारतीय मॉडेल अथवा अभिनेत्रीने इतके धाडसी पाऊल उचलले नव्हते. माझे नाव तोपर्यंत सर्वदूर प्रसिद्ध झाले होते.

महेश भट्ट यांनी तुमच्याशी कसा संपर्क साधला?
अनू अगरवाल : माझ्याशी संपर्क करणे तसे कठीण नव्हते. मी प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांनी माझी भेट घेतली आणि मला या शब्दांत सांगितले, की एका रोमँटिक सिनेमाची कथा त्यांनी मला समोर ठेवून लिहिली आहे. जर हा सिनेमा मी स्वीकारणार नसेन तर तो सिनेमा ते गुंडाळून ठेवतील. मी त्यांची कथा ऐकली, पण होकार दिला नाही. ते माझ्या होकाराची वाट पाहत होते. संध्याकाळ झाली, त्यांच्या रूममधील लँप त्यांनी लावला आणि का कोण जाणे मी त्या क्षणी महेश भट्ट यांना ‘आशिकी’साठी होकार दिला. राहुल रॉय या नवोदित मुलाला त्यांनी लाँच केले. या सिनेमाने मला स्टारडम दिले. 

महेश भट्ट त्यांच्या नायिकांशी सलगी करतात, असे म्हटले जाते. तुमचा काय अनुभव आहे?
अनू अगरवाल : त्यात तथ्य आहे अथवा नाही हे मला ठाऊक नाही. किमान माझ्याशी ते तसे वागले नाहीत. त्यांच्या आणि माझ्या नात्यात मित्रता होती. त्यांनी तसा कधीही प्रयत्न केला नाही. कदाचित माझ्याशी त्यांनी लगटपणा केला नसेल कारण मी सोशल नव्हते. मी मैत्रीने वागत असले तरी कुणाशी कितपत मैत्री करावी याचे भान मला होते. मी त्यांना हात दिला असता, तर तसा प्रयत्न त्यांनी केला असता. सावनकुमार टाक, मणी कौल, राकेश रोशन, मणिरत्नम अशा अनेक प्रसिद्ध मेकर्ससमवेत मी फिल्म्स केल्या, पण वावगे काही घडले नाही. मी स्वतः माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखलेल्या होत्या. 

‘आशिकी’च्या यशानंतर तुमचे आयुष्य कितपत बदलले?
अनू अगरवाल : आशिकी रिलीज झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक माझ्या घरासमोर जमा होऊ लागले. माझी अवघड अवस्था झाली, कारण या सिनेमाने माझे वैयक्तिक जीवन पूर्णतः थांबवले. आई बाबांना दिल्लीच्या घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवाव्या लागत. माझे रिक्षाने फिरणे, घराबाहेर पडणे बंदच झाले. अनेक ब्रॅंड्सची मी ब्रँड अम्बॅसॅडर झाले, खूप पैसाही मिळाला. अवघ्या दोन वर्षांत मी वरळीसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत फ्लॅट विकत घेतला. आता आई वरचेवर माझ्याबरोबर मुंबईत राहू लागली. कुठले सिनेमे मी करावेत अथवा करू नयेत हे मला समजत नव्हते. अंदाधुंदपणे मी फिल्म्स करत गेले आणि आणि त्यातील बहुतेक चित्रपट अयशस्वी होऊ लागले. माझा मोहभंग होऊ लागला. स्टारडमची नशा जितकी झपाट्याने वर गेली, तितक्या वेगाने ती खाली येऊ लागली. मला वैफल्य आले आणि योगाभ्यास शिकून मी तळागाळातील महिला-मुलांना योगा शिकवू लागले.

तुमचा जीवघेणा अपघात झाला तो केव्हा?
अनू अगरवाल : वरळीहून मी माझ्या गाडीने मरिन ड्राईव्हच्या दिशेने निघाले आणि माझा गाडीवरचा ताबा सुटला. पुढचे मला काहीही आठवत नाही. मला लोकांनी उचलून टॅक्सीत घातले आणि डॉक्टरकडे नेले. माझे अर्धे शरीर पॅरलाईस्ड झाले होते. हाड अन हाड फ्रॅक्चर झाले आणि शरीराचा पुरता भुगा झाला होता. मी कशी बरी झाले हे एक मिरॅकल आहे. डॉक्टरांनी माझ्या जगण्याच्या आशा ठेवल्या नव्हत्या. तब्बल २९ दिवस मी कोमात होते आणि तीन वर्षे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होते. फिजिओ करून तीन वर्षांनी मी पहिले पाऊल टाकले. खरे तर डॉक्टर्स म्हणाले, तीन वर्षेदेखील ही मुलगी जगू शकेल असे वाटत नाही. पण इच्छाशक्तीच्या जोरावर मी जगले, तरले. त्यात माझ्या चेहऱ्याची-शरीराची अपघाताने वाट लागली. पण आई-वडील, भाऊ यांच्या प्रेमामुळेे मी जगले. मला माझे नावदेखील आठवत नव्हते. मी जगणार नाही असे खात्रीने म्हणणारे डॉक्टर माझे वाचणे एक दैवी चमत्कार मानतात. पाच-सहा वर्षांनंतर मी ठीक होत गेले. तोपर्यंत मला अभिनयात घेणारे कुणी उरले नाही. योग हा माझा गुरू झाला. अनू अगरवाल फाउंडेशनची सुरुवात मी केली. या संस्थेचे कार्य मी स्वतः पाहते. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, पर्यावरण, शिक्षण, योग अशा अनेक बाबींवर माझी संस्था काम करते. आता कसल्याही ऐहिक गोष्टींमध्ये मला स्वारस्य उरले नाही. स्वतःचे अनुभव लिहिलेत ते यासाठी, की संपूर्ण वठलेल्या, वाळवी लागलेल्या वृक्षालादेखील पालवी येऊ शकते. फक्त आशावाद हवा. इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येऊ शकते.
मी अभिनय, मॉडेलिंग, फिल्मी दुनिया यापासून दूर गेले. माझा गंभीर अपघात झाला तेव्हा कुणी सहकलाकार-निर्माते माझी दखल घेत होते का असे मला विचारण्यात येते. पण त्याचे उत्तर माझ्याकडे नाही! उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. मग मी त्यात गैर काय मानावे? मी पाच-सहा वर्षे मरणासन्न अवस्थेत होते, त्यामुळे त्या कालावधीत कुणी माझी दखल घेतली अथवा नाही हेदेखील मला ठाऊक नाही, कारण माझे कुटुंबीय कुणालाही ओळखत नाहीत!

सध्या मी मुंबईत एकटीच राहते. आई येत असते दिल्लीहून. मी कुटुंबाच्या संपर्कात  दोन वर्षांपूर्वी ‘आशिकी-२’ हा सिनेमा झाला. त्यांनतर एका सार्वजनिक कार्यक्रमात महेश भट्ट भेटले. मी काही बोलण्याआधी ते म्हणाले, की आशिकी-२ सिनेमालादेखील प्रतिसाद मिळाला, पण नव्या आशिकीला तुझ्या ‘आशिकी’ची सर येणार नाही! त्यांच्या त्या वक्त्यव्यात सारे काही आले.   

संबंधित बातम्या