अभिनेता ते दिग्दर्शक 

पूजा सामंत    
सोमवार, 13 एप्रिल 2020

दिलखुलास
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामधील गाणी, लोकेशन्स, शाहरुख -काजोल या रोमँटिक जोडीसह खलनायकदेखील भाव खाऊन गेला. ‘कुलजित’ हे परमित सेठी यांचे ‘दिलवाले...’मधील ऑन स्क्रीन नाव, जे त्यांची आजही पेहचान आहे. नंतर ‘दिलजले’, ‘धडकन’ या सुपर हिट फिल्म्समधूनदेखील त्यांची खलनायकी इमेज ठळक झाली. पुढे ते दिग्दर्शनाकडे वळले आणि आता पुन्हा एका वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनयाकडे परतले आहेत. त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...  

परमित, अलीकडची काही वर्षे तुम्ही पडद्याआड राहून दिग्दर्शकीय जबाबदारी संभाळताय. मग अभिनेता म्हणून ‘स्पेशल ऑप्स’ या हॉटस्टारच्या ‘वेबसीरिज’ची ऑफर कशी काय स्वीकारली? 
परमित सेठी : ‘स्पेशल ऑप्स’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. वेनस्डे, स्पेशल २६, बेबी, नाम शबाना, एम. एस. धोनी यांसारख्या यशस्वी आणि समकालीन फिल्म्सबद्दल नीरज पांडे यांची वाहवा कायम होते. त्यांच्या प्रोजेक्ट्मध्ये काम करण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार धडपडतात. नीरज पांडे हे नाव ऐकूनच मी ‘स्पेशल ऑप्स’मध्ये काम करण्यासाठी लगेच होकार दिला. या वेबमालिकेचे चित्रण जगातील अनेक देशांमध्ये झाले. एका स्पेशल कामगिरीसाठी नियुक्त केलेला ऑफिसर के. के. मेनन याच्या इनव्हेस्टिगेशण ऑफिसरची भूमिका मी साकारतो आहे. त्याच स्वरूपाचे काम माझे असेल. कथेत रहस्य, थरार असल्याने त्याविषयी काही अधिक सांगता यायचे नाही. पण हा शो मी एंजॉय करतोय हे नक्की! 

वेबसीरिज बघण्याकडे कल वाढतो आहे. आगामी काळात सिनेमांचे स्थान वेबसीरिज घेतील असे वाटते का? 
परमित सेठी : हां जी। लाँग रन में वेबशोज की लोकप्रियता फिल्मो पर हावी हो सकती है। इतक्या लवकर तातडीने फरक पडणार नाही असा विश्वास वाटतोय. पण हे चक्र थांबवणे मोठे कठीणच होऊन बसलेय. पाच वर्षांच्या बालकापासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची मनोरंजनाची व्याख्या बदलत चालली आहे. ज्याला त्याला त्याची वैयक्तिक स्पेस हवी आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणी-नोकर यांनाही वायफायचा पासवर्ड हवा आहे. मी, आमची दोन मुले, अर्चना (पत्नी-अभिनेत्री अर्चना पूरण सिंग) आम्ही जेव्हा डिनरला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जातो, आजूबाजूच्या प्रत्येक टेबलावर प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. एकमेकांशी संवाद न साधता सगळेच जण व्हर्च्युअल जगात गुंतलेले असतात. This is very sad phase of today's society! मोबाईलमुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा अस्त होतोय आणि अशाच मोबाईल ॲडिक्ट लोकांसाठी वेबशोज म्हणजे पर्वणी! हे व्यसन थांबवणे कठीण आहे. 

अभिनयात जम बसलेला असताना दिग्दर्शक व्हावे असे का वाटले? 
परमित सेठी : आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात एखादा काळ असा येतो, जेव्हा आपल्या वाटचालीचा आपणच मागोवा घेतो. मी मनात विचार करत होतो, पैसा कमावलाय, नावही मिळवले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’सारख्या क्लासिक सिनेमात आपणही एक मुख्य कलाकार होतो याचे समाधान आहे. पण तरीही काही वेगळी वाट चोखंदळावी असे वाटत होते आणि मनात अशी आंदोलने सुरू असतानाच यशराजकडून ‘बदमाश कंपनी’ हा सिनेमा दिग्दर्शित करण्याची संधी आपोआप मिळाली, तेव्हा ती मी नाकारू शकलो नाही आणि दिग्दर्शन स्वीकारले. 

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने यशाचे अनेक रेकॉर्ड्‌स मोडले. काय आठवणी आहेत या सिनेमाबद्दल? 
परमित सेठी : सिनेमाची निर्मिती सुरू झाली तेव्हा असे कधीही वाटले नाही, की हा सिनेमा अनेक बाबतीत जागतिक स्तरावर नोंद घेण्यास भाग पाडेल. अलीकडेच आलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांनीदेखील ‘दिलवाले..’चे नाव घेतले. आजही मी जातो तिथे माझी ‘कुलजित’ या नावाने दखल घेतली जाते. या प्रेमाने-आदराने मी कृतार्थ आहे. या सिनेमाची ऑफर जेव्हा यश चोप्रा यांनी शाहरुखला दिली, तेव्हा त्याने ती आनंदाने स्वीकारली नाही. यशअंकल मुझे थोडा टाइम दिजीये, असे त्याने म्हटले. त्याने ‘राज मल्होत्रा’ ही भूमिका स्वीकारण्यासाठी अवधी मागून घेतला, कारण त्याच्या मते त्याचे व्यक्तिमत्त्व ‘हिरो’छाप नव्हते. रोमॅंटिक भूमिका करण्यासाठी नायक हँडसम असावा, तसे आपले लुक्स कन्व्हेन्शनल नाहीत असे त्याला वाटत होते. पण यशअंकल आणि पामेला आंटीने त्याला समजावून सांगितले आणि त्याने त्यांच्या मताला मान देत हा सिनेमा स्वीकारला. 
सिमरन हिरव्यागार शेतातून राजला भेटायला धावत येते, या दृश्‍यावर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सरसोचे पीक तयार आहे, त्यातून नायिकेला धावण्यास आम्ही परवानगी देणार नाही, असा गलका झाल्यावर शाहरुखने या शेतकऱ्यांची मनधरणी त्यांच्या पंजाबी-हरियाणवी भाषेत केली... अशा काही आठवणी आठवतात. 
फिल्मची तीन गाणी स्वित्झर्लंडमध्ये चित्रित झाली. दोन-तीन गाणी इथे सेटवर केली गेली. एकूणच हसत खेळत हा सिनेमा पूर्ण झाला. हा सिनेमा इतके रेकॉर्ड्‌स निर्माण करेल असे आम्हाला चुकूनसुद्धा वाटले नव्हते. 

नकारात्मक भूमिका कराव्या लागल्या, याचा कधी विषाद वाटला का? 
परमित सेठी : तेव्हाही असे कधी वाटले नाही, आज तर तसा काळच उरला नाही. आयुष्मान खुराना, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव हे आजचे आघाडीचे कलाकार. ते पारंपरिक हिरोच्या व्याख्येत न बसणारे आहेत. पण खूप यशस्वी आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी नॉन फिल्मी होती, अभिनयात जी संधी मिळाली ती घेतली. विनोद खन्ना किती देखणा होता, पण त्याला सुरुवातीला निगेटिव्ह रोल मिळाले, तसेच शत्रुघ्न सिन्हाचे. अभिनयात करिअर फारच कमी भाग्यवान लोकांना प्लॅन करता येते. काहींना ट्रॅक बदलण्याची संधी मिळते, काहींना मिळतही नाही. मी संतुष्ट नसलो तरी समाधानी आहे. 

बॉलिवूडमध्ये, अभिनयाच्या क्षेत्रात वैवाहिक संबंध फारसे टिकत नाहीत असे दिसून येते. अर्चना आणि तुम्ही एकाच क्षेत्रात असूनही तुमच्या संसाराला २५ वर्षे होऊन गेली. या यशाचे श्रेय कुणाचे? 
परमित सेठी : सुखी संसाराचे श्रेय आम्हा दोघांना जाते. अर्चना माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी आहे. आम्ही काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, तेव्हा असलेले मैत्रीचे नाते आमच्या लग्नानंतरही कायम राहिले. अर्चना असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात तिच्या तोंडी एक संवाद आहे, ‘प्यार दोस्ती है’ आणि अर्चनाने या संवादाला तिच्या वैवाहिक जीवनात निभावले. एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले, गुणांची तारीफ केली आणि म्हणूनच आम्ही सुखाने नांदू शकलो. पुढेही आमचे नाते असे ताजेतवाने राहील याची मला खात्री आहे. 

तुमच्या दोन्ही मुलांना अभिनयात करिअर करायचे आहे का? 
परमित सेठी : आर्यमन आणि आयुष्मान आमच्या दोन्ही मुलांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन अभिनय-दिग्दर्शन असे कोर्स केले आहेत. त्यांना कसलेही मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही दोघेही आहोतच. पण त्यांनी स्वतः संघर्ष करून अभिनय-दिग्दर्शन यात स्थान निर्माण केल्यास त्यांना संघर्षाची, पैशांची, मेहनतीची किंमत कायम कळेल. त्यांना शिक्षण देण्यात आम्ही कमी पडलो नाही. पुढे त्यांनी स्वतः करिअर घडवावे अशी इच्छा आहे.

संबंधित बातम्या