‘इंडस्ट्रीने प्रेम, समाधान दिले’

पूजा सामंत
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

जगदीश राज यांची कन्या अनिता राज यांनी ८०-९० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. आता सध्या त्या कलर्स वाहिनीवर ‘छोटी सरदारनी’ या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत आहेत. अनिता राज यांच्याशी साधलेला संवाद..

अनिता, ‘छोटी सरदारनी’ ही कलर्स चॅनलची मालिका तुम्ही स्वीकारलीत, काय कारण आहे त्यामागे? 
अनिता राज - माझ्या विवाहानंतर-मातृत्वानंतर मी अभिनयापासून काही काळ दूर होते. माझ्या मुलाचे संगोपन व्यवस्थित व्हावे हा हेतू होता. ‘छोटी सरदारनी’ मालिकेची ऑफर आली तेव्हा ती भूमिका आवडली. नव्या व्यक्तिरेखा स्वीकारणे, नव्या पिढीबरोबर काम करणे हे आव्हान होते. पण मला या भूमिकेचीदेखील भूरळ पडली. ‘गुडी-गुडी’ भूमिकांपेक्षा सशक्त भूमिका करण्याचा आनंद घेण्याचा हा काळ आहे. गावातील शूर सरपंच महिलेची भूमिका आहे. कुलवंत कौर असे नाव असलेली ही महिला अतिशय तल्लख आणि बुद्धिमान आहे. यापूर्वी अशी भूमिका मला कधी मिळाली नाही आणि म्हणूनच मी निगेटिव्ह छटा असून कुलवंत कौर करण्यासाठी होकार दिला.

या भूमिकेला तुमचे पुनरागमन म्हणायचे का?
अनिता राज - अजिबात नाही! ‘छोटी सरदारनी’मधील भूमिका हे माझे पुनरागमन नाही. मी निवडक भूमिका करते आणि निवडक काम करताना आलेली ऑफर कधी वर्षांतून दोनदा, तर कधी दोन वर्षांत एकदा येऊ शकते. मी अनिल कपूरच्या निर्मितीतील ‘२४’ या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका केली होती. ‘एक था राजा’ हा टीव्ही शो केला. काही चित्रपट केलेत. हिरोबरोबर झाडांभोवती नाचगाणी करणाऱ्या भूमिका मला आता मिळणार नाहीत, मी करणारा नाही आणि मला त्या शोभणारही नाहीत! त्यामुळे आपोआपच माझ्यासाठी भूमिकांचा परिघ तसा मर्यादित होतो. पण अशा सिलेक्टिव्ह कामासाठी मला स्वतःचे पुनरागमन म्हणणे रुचणार नाही.

तुमचे पती सुनील हिंगोरानी निर्माते आहेत. ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलासाठी चित्रपट निर्मिती करणार नाहीत का?
अनिता - माझा नवरा सुनील हिंगोरानी आणि नवऱ्याचे काका अर्जुन हिंगोरानीदेखील धुरंधर निर्माते आहेत. काका-पुतण्याने उत्तम सिनेमांची निर्मिती केली होती. पण आता सगळीच व्यावसायिक गणिते बदलली आहेत. कॉर्पोरेट हाउसेसनी फिल्म प्रॉडक्शनमध्ये एंट्री घेतली आणि जुन्या, जाणत्या-अनुभवी मेकर्सनी फिल्म प्रॉडक्शन बंद केले. त्यामुळे अलीकडे हिंगोरानी मेकर्सकडून नवी निर्मिती जवळजवळ थांबलीच! माझा मुलगा शिवम याने करण जोहरच्या ‘धर्मा’ प्रॉडक्शन्समध्ये साहाय्यक दिग्दर्शन केले आहे. ‘अग्निपथ’, ‘जवानी दिवानी’ व अन्य काही फिल्म्सचा तो साहाय्यक दिग्दर्शक होता. शिवमलादेखील माझ्याप्रमाणे फिटनेस, डाएट याची आवड आहे. त्याने स्वतः एका ऑरगॅनिक हेल्थ एनर्जी ड्रिंकची निर्मिती केली. त्यात त्याला उत्तम यश मिळाले. याच उद्योगाला तो पुढे वाढवणार आहे. दिग्दर्शनदेखील करेल.

तुमच्या वडिलांना तुमचे अभिनयात येणे मान्य नव्हते. त्यांचा होकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला का?
अनिता राज - दोन बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील असे आमचे सुखी आदर्श कुटुंब होते. माझे वडील त्यांच्या तरुणपणी पाकिस्तानहून मुंबईत आले होते. योगायोगाने अभिनयात संधी मिळाली आणि ते काम करत राहिले. सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या, पण पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत त्यांना फिल्म इंडस्ट्रीने टाइपकास्ट केले. मलाही लहानपणापासून अभिनयात जाण्याची इच्छा होती. मी घरात अशी इच्छा व्यक्त करताच त्यांनी ठामपणे नकार दिला. अन्य कुठलेही करिअर कर असे ते कायम म्हणत. प्रख्यात कथ्थक डान्सर गोपीकृष्ण यांच्याकडे मी डान्स शिकत असे. इथेच माझ्याविषयी कुणीतरी यश अंकल यांना सांगितले. त्यांनी वडिलांना फोन करून माझी तारीफ करत आम्हाला भेटायला बोलावले. त्यांच्या आगामी सिनेमासाठी मला साइन केले, तेव्हा मात्र वडिलांनी त्यांचा विरोध मागे घेतला. यश अंकल त्यांचे मित्र होते. दुर्दैवाने यशराज बॅनरचा हा सिनेमा पुढे झाला नाही. पण हृषिकेश मुखर्जी यांनी मला दरम्यान त्यांच्या फिल्ममध्ये घेतले. हा सिनेमा नंतर रिलीज झाला. पावन  
सिन्हा यांच्या ‘प्रेमगीत’ या सिनेमापासून माझी १९८१ मध्ये फिल्मी कारकीर्द सुरू झाली. या सिनेमाचा नायक राज बब्बर होता.

तुम्ही १९८२-८३ मध्ये एकाच वेळी ६-७ चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम करत होता. एका वेळी इतक्या चित्रपटांमध्ये अभिनय करणे कसे शक्य झाले?
अनिता राज - आज तब्बल ४० वर्षांनी या बाबीचे मला आश्चर्य वाटते, हे कसे शक्य झाले मला? त्या काळात बरीच हिरो मंडळी एका वेळी सहज ३०-४० चित्रपटांमध्ये अभिनय करत. या नायकांच्या तुलनेत माझे एका वेळी ५-६ सिनेमे करणे काही फार कठीण नव्हते. एकदाच मी हैदराबादला दासरी नारायण राव यांच्या फिल्मचे शूटिंग करत असताना दुसऱ्या सिनेमाचा प्रॉडक्शन मॅनेजर या सेटवर हजर झाला. दुसरा चित्रपट होता ‘प्रेम तपस्या’. सेटवर प्रॉडक्शनवाला आल्यामुळे माझ्यावर दडपण आले आणि पहिल्या सेटवर माझ्या वारंवार चुका होऊ लागल्या! आखिर मेरे रबने मुझे बचाया। शॉट एकदाचा ओके झाला आणि मी दुपारी दोनच्या शिफ्टला तीन वाजता पोचले.

मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, राज बब्बर, विनोद खन्ना यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
अनिता राज - मी खूप बोलकी नाहीये. माझ्या कुटुंबाबरोबर रमणारी आहे. सेटवर सगळ्यांशी प्रोफेशनल, तरीही आदराने मी वागत असे. माझ्यावर तसे संस्कार आहेत. मला कुणाचा वाईट अनुभव आला नाही. कारण माझे वडील अभिनेता जगदीश राज इथे काम करत होते. त्यांची मी मुलगी असल्यानेदेखील चुकीचा अनुभव आला नाही. उलट फिल्म इंडस्ट्रीने मला प्रेम, समाधान, आनंद आणि माझा पती दिला. त्यामुळे माझ्या मनात कसलाही गिल्ट, वैफल्य, दुःख, असमाधान नाही. अन्य क्षेत्रात प्रसिद्धी, प्रेक्षकांचे प्रेम मिळत नाही. स्टार धर्मेंद्र यांची मी ऋणी आहे. ‘नौकर बीबी का’ हा आमचा सुपर हिट सिनेमा. या सिनेमासाठी दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनी धर्मेंद्र यांना घाबरतच विचारले, की अनिता राज ही उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तुमची हरकत नसल्यास तिला घेऊ. अन्यथा दुसऱ्या मोठ्या अभिनेत्रीला तुमच्या अपोझिट घेईन मी! यावर धरम पाजी म्हणाले, की मी नवीन असताना सुचित्रा सेनसारख्या सिनियर अभिनेत्रीने माझ्याबरोबर ‘ममता’मध्ये काम करण्यास होकार दिला होता, हे मी कसे विसरेन? म्हणूनच आज अनिता राज नवीन असली, तरी माझ्या सिनेमाची ती नायिका असू द्या!

अनिता राज या बॉलिवूडच्या पहिल्या फिटेस्ट नायिका! त्याबद्दल काय सांगाल?
अनिता राज - दोरीवरच्या उड्या, स्वीमिंग असे खेळ मी लहानपणी खेळत असे. मोठी झाले तशी मी फिटनेसबाबत अधिकच जागरूक झाले. नियमित योगा करू लागले, समतोल आहार घेऊ लागले. ज्या ठिकाणी मी शूटिंग करत असे तिथे व्यायाम करू लागले. मग फिटनेस हे माझे पॅशन झाले. ‘जलजला’ या फिल्मचे शूटिंग सुरू असताना कधीही कुठल्याही शूटिंगला न गेलेल्या प्रकाश कौर (धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी) माझा व्यायाम पाहायला सेटवर आल्या. अनिताका आखाडा देखना है, असे म्हणत त्यांनी माझा व्यायाम पाहिला आणि माझे ‘वाह कुडी, तेनुं जवाब नहीं। असे म्हणत तोंडभरून कौतुक केले. आजही मी न चुकता व्यायाम, योग, प्राणायाम करते, समतोल आहार घेते. 

बॉलिवूडमध्ये कमालीचा बदल झाला आहे. तुम्हाला मुख्यत्वे काय बदल जाणवतो?
अनिता राज - आपण तंत्रज्ञानामध्ये खूप अग्रेसर झालोय, मला इतकेच जाणवते. हल्ली मी सेटवर आपलेपणा मिस करतेय. पूर्वी निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, ज्युनिअर आर्टिस्ट, टेक्निशियन्स सगळे चित्रपट पूर्ण होईपर्यंत एकत्र असत. हास्यविनोद करत सगळे जेवत. एकोपा होता; तो एकोपा आता नाहीसा झालाय! ते दिवस पुन्हा यावेत. माझ्या काळात व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या. झाडामागे जाऊन, आडोसा घेत कपडे बदलणे ही गरज होती. मेकअप, कॅमेरा वर्क आजच्यासारखे प्रगत नव्हते आणि हो बहुतेक चित्रपटांमध्ये नायिकांनी ‘छुईमुई’, ‘गुडी गुडी’, ‘सोशिक’ असणे हे गृहित धरले गेले होते. आज ‘कन्टेन्ट’ हाच राजा आहे सिनेमा माध्यमाचा, हे पाहून खूप बरे वाटते.

कशाची खंत आहे का? 
अनिता राज - माझ्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या मैत्रिणींना भेटून संपर्कात राहणे मला जमले नाही. मेरी सिर्फ टेलिफोन वाली दोस्ती है, पद्मिनी (कोल्हापुरे) और पूनम (ढिल्लों) के साथ। सप्ताह में एक बार बातचीत होती है। मिलने का और साथ में वक्त गुजारने का मौका नहीं मिलता। बस इसी बात का अफ़सोस है।  

संबंधित बातम्या