‘मी तर खरा सालस वृत्तीचा!’

पूजा सामंत
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी सुमारे ५०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीला आता ३५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी नुकतेच ‘बॅड मॅन’ हे आत्मचरित्रही प्रकाशित केले आहे. त्यांच्या या कडू-गोड आठवणींना दिलेला उजाळा... 

गुलशन, तुमच्या चित्रपट कारकिर्दीला ३५ वर्षे झाली. एवढ्या वर्षांनंतर स्वतःचे आत्मचरित्र लिहावेसे वाटले, काही खास कारण?
गुलशन ग्रोवर - खरे म्हणजे मला स्वतःला आत्मचरित्र लिहिण्याची कधी यापूर्वी इच्छा झाली नाही. उलट माझी भावना होती, की जे कुणी दिग्गज आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडतात, ते बहुधा त्या व्यक्तींवर लिहितात, जे या जगातून गेलेले असतात. ज्या जिवंत व्यक्तींचा उल्लेख असतो, ते आपला बचाव करण्यास असमर्थ असतात. अशीच परिस्थिती मी अनेक वर्षे नेहमी पाहत आलोय. त्यामुळे माझ्या आत्मचरित्राविषयी काही प्रकाशकांनी उत्सुकता दाखविली, लिहिण्यास सांगितले तेव्हा मन साशंक होते. सरतेशेवटी पेंग्वीन या प्रसिद्ध प्रकाशकांनी दोन वर्षांपूर्वी पुस्तक लिहाच, असे सांगितले तेव्हा मी लिहिलेल्या फॅक्ट्सची शहानिशा व्हावी असे ठरले. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहीत मी माझे ‘बॅड मॅन’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित केले.

अन्य कुणा स्टार्सनी त्यांच्या पुस्तकात तुमचा उल्लेख चुकीचा केलाय का? त्यांच्या मजकुराने तुम्ही कधी दुखावले गेलात का?
गुलशन ग्रोवर - हो, असे घडलेय ना! सध्या संजूबाबा पुन्हा चर्चेत आहे. फुप्फुसांचा कॅन्सर त्याला डिटेक्ट झालाय. माझे आणि संजूचे सख्य आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. संजय दत्तने लिहिलेल्या ‘संजू’ आत्मचरित्रावर राजू हिरानीने ‘संजू’ चित्रपट काढला, जो तुफान चालला. बायोपिक चालतात हा अलीकडचा ट्रेंड आहे. संजूच्या बायोपिकमध्ये त्याच्या मेहुण्याचा (कुमार गौरव) उल्लेखच नाही. माझाही नाही! यातही सत्य असे, की एकेकाळी मी स्वतः ॲक्टिंग क्लास घेत असे. संजूला त्याच्या डेब्यू ‘रॉकी’ चित्रपटाआधी मी त्याला ॲक्टिंग शिकवत असे. माझ्या क्लासमध्ये संजू येत असताना मी दत्तसाहेबांना (सुनील दत्त) भेटलो. ते आणि नर्गिस आंटी तेव्हा संजूला लाँच करणार होते. तो क्लासमध्ये अनियमित येत असे. त्याच्याकडे मी लक्ष दिले, तेव्हा लक्षात आले की संजू ड्रग्जच्या आहारी गेलाय! मी दत्तसाहेबांना भेटलो, त्यांना संजूकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणि तो ड्रग्स घेत असल्याचे सांगितले. दरम्यान दत्तसाहेबांनी ‘रॉकी’चे शूटिंग शेड्युल काश्मीरला ठरवले. मीही तीन आठवड्यांच्या शूटिंग शेड्युलसाठी त्यांच्याबरोबर गेलो. त्याच्यावर लक्ष देणे आणि संवादांची तयारी करून घेणे अशी माझी मदत होत होती. पण संजूच्या आत्मचरित्रात आणि नंतर चित्रपटातही कुठेही माझा उल्लेख नाही. असे का घडले असावे या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. अशी अन्य काही उदाहरणे आहेत. त्याबाबत नंतर कधीतरी बोलेन.

तुमची ही नाराजी कधी संजय दत्त अथवा राजू हिरानींकडे व्यक्त केलीत का?
गुलशन ग्रोवर - हो... अनेकदा. यावर राजू हिरानी यांनी अतिशय मुत्सद्दीपणाची भूमिका घेतली. ‘सर, आपके साथ बैठना है,’ हे वाक्य मी दोन वर्षे ऐकतोय. पण ती बैठक अजून झालेली नाही. राजू हिरानी यांनी चित्रपटामध्ये संजूच्या अनेक हितचिंतक-मित्रांना एकाच भूमिकेत (विकी कौशल) गुंडाळून टाकले. आत्मचरित्र असे नसते. माझ्या ‘बॅड मॅन’ पुस्तकात मी सगळी खरीखुरी तथ्य मांडली आहेत आणि पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी सारी तथ्य-संदर्भ पडताळून पाहिली गेली आहेत.

तुमचा आजवरचा प्रवास कसा झाला? तुमचे अनुभव कसे होते?
गुलशन ग्रोवर - माझ्या अभिनय प्रवासाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. अभिनयात नसतो तर माझी आज जी ओळख आहे, ती नसती. दिल्लीपासून जवळ असलेल्या एका छोट्या गावात माझा जन्म झाला. माझे वडील किरकोळ व्यवसाय करत असत. जवळच्या स्थानिक छोट्याशा हिंदी माध्यमाच्या शाळेत मी दहावी उत्तीर्ण झालो आणि मग श्रीराम कॉलेजमधून मी ९३ टक्के मिळवून एम.कॉम. केले. शाळेत असल्यापासून सिनेमे बघण्याची चटक लागली होतीच.  
पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर घरी हळूच विषय काढला, ‘मैनु बम्बई जाना सी।’ (मला मुंबईला जायचेय) घरी सगळे हैराण झाले. तोपर्यंत मुंबई म्हणजे नेमके काय, तिथे जाऊन मी काय करणार, कुणाला भेटणार, कुठे राहणार? या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. मुंबईला समुद्रकिनारा आहे, तिथे लोक नारळपाणी पितात हे मी चित्रपटांमध्ये पाहिले होते. घरच्यांची मिनत्तवारी करून आईला रडत ठेवून मी मुंबई गाठली. अतिशय भयंकर असा संघर्ष पाहिला. अंत भला तो सब भला, असे मानून आजवर चालत राहिलो. आज नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आलाय, पण मी तर आउट सायडर होतो. तरीही संघर्ष आणि थोडी बहुत प्रतिभा यांमुळे टिकून राहिलो!

मुंबईत सुरुवात कशी झाली?
गुलशन ग्रोवर - पैसे फार तर दोन हजार होते, हीच माझी पुंजी! आईने मला उदरनिर्वाहासाठी दिले होते. कसलीही फिल्मी कनेक्शन्स-ओळखपाळख नसताना मी कुठे जाऊ, काय करू असे प्रश्न होते, पण आत्मविश्वासही भरपूर होता. काही तरी मार्ग निघेल असे नक्की वाटत होते. पण मुंबईत आल्यावर लक्षात आले, की इथे राहण्याची सोय करणे अतिशय कठीण आहे. हिरो म्हणून काम शोधावे, तर धर्मेंद्र-जितेंद्र-अमिताभ-विनोद खन्ना अशा ‘हिरो’छाप अभिनेत्यांनी जागा व्यापलेली आहे. मग वाटले, माझा हिरो म्हणून निभाव लागणार नाही. खलनायक म्हणून संधी शोधावी. तर तिथे डॅनी डेंगझोप्पा, अमरीश पुरी, अमजद खानसारखे तगडे खलनायक होते. मी शरीरानेदेखील खलनायकाच्या साच्यात बसत नव्हतो! मी माझे फोटोसेशन माझ्या पैशाने करून घेतले. हे फोटोज घेऊन फिल्मी मॅगझीन्सच्या ऑफिसमध्ये घिरट्या घातल्या. निर्मात्यांचे उंबरे झिजवत राहिलो आणि मला एक संधी द्या अशा विनंत्या करीत राहिलो. हळूहळू मला काम मिळत गेले. हिरो किंवा व्हिलनसारखे व्यक्तिमत्त्व नसताना टिकलो ही ‘रब दी मेहेर।’

बॉलिवूड ते हॉलिवूड हा प्रवास कसा शक्य झाला? इंग्रजी येत नसताना तिथे काम करताना किती अडचणी आल्या?
गुलशन ग्रोवर - कबीर बेदी, सईद जाफरी, पर्सिस खंबाटा या भारतीय कलाकारांनी फार आधीपासून हॉलिवूडमध्ये फार उत्तम कामे केली आहेत, पण यातले सगळे तिथेच स्थायिक झाले. मी मुंबईत राहून तिथे शूटिंग करण्यापुरता जात असे. मी एकाचवेळी हिंदी आणि हॉलिवूडची धुरा वाहिली. मुश्कील था, हॉलिवूडवाले इंडियन फिल्म्स और कलाकारों के बारे में जानते ही नहीं। २०-२५ वर्षांपूर्वीच्या काळात गुगल किंवा इंटरनेट आपल्याकडे नव्हते. माझे इथले काम त्यांच्यापर्यंत कसे पोचवावे हा यक्ष प्रश्न होता. अस्खलित इंग्रजी मला बोलता येत नव्हते. सर्वप्रथम मी इंग्रजी शिकलो. हिंदी चित्रपटसृष्टीत सिनियर झाल्यावरदेखील मी दररोज दोन तास इंग्रजी भाषेची शिकवणी सुरू केली. हे बाहेर समजल्यावर माझी चेष्टा सुरू झाली. पण मी नेटाने प्रयत्न सुरू ठेवला. नंतरच्या टप्प्यावर हॉलिवूड मेकर्सना त्यांच्या देशात जाऊन भेटणे आणि काम मागणे हे मोठे दिव्य होते. पण ३-४ वर्षांच्या आराधनेनंतर मला तिथे काम मिळाले आणि माझी ओळखही बनली.

स्लमडॉग मिलेनियर हा सुपर हिट सिनेमा तुम्हाला मिळाला होता, तो नंतर इरफान खानने केला. हे खरे का?
गुलशन ग्रोवर - डॅनियल (दिग्दर्शक)ने मला ऑफर दिली. पण मी विचार केला, मी हिंदी आवृत्ती करण्यापेक्षा इंग्रजी करेन. पण हिंदी आवृत्तीचे कलाकार त्यांनी इंग्रजीमध्ये ठेवले. मी नकार दिल्याने इरफान खानने ही भूमिका केली. माझा मूर्खपणा मला नडला!

तुमच्या आत्मचरित्राचे नाव ‘बॅड मॅन’ आणि या नावाने तुम्हाला ओळख मिळाली. ते कसे काय?
गुलशन ग्रोवर - हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी करूनच जवळ जवळ ३५ वर्षे माझी रोजीरोटी सुरू आहे! प्रत्यक्ष जीवनात मी पापभीरू-सालस वृत्तीचा आहे. पण ज्या कामाने मला ओळख दिली, नाव दिले तीच माझी रुपेरी पडद्यावर ओळख ठरली, तर त्याला माझी काही हरकत नाही! सुभाष घई यांनी ‘रामलखन’ सिनेमाचा प्रिमीयर केला, तेव्हा प्रचंड गर्दीने माझ्या नावाचा ओरडा सुरू केला. ‘बॅड मॅन’ असा त्यांचा ओरडा ऐकून सुभाष घई म्हणाले, ‘पब्लिकने दिलेले हे प्रेमाचे नाव आहे, त्याचा स्वीकार कर.’ त्यांची आज्ञा मी शिरोधार्य मानली! म्हणूनच मी ‘बॅड मॅन’ ठरलो, तो असा...!

संबंधित बातम्या