‘लिखाणात आनंद मिळतो...’

पूजा सामंत 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

प्रसिद्ध अभिनेता, स्वातंत्र्यसैनिक, लेखक बलराज साहनी यांचे पुत्र म्हणजे परीक्षित साहनी. आधी अभिनय आणि नंतर लिखाणात आपली कला अजमावणारे परीक्षित साहनी यांनी आपला आजवरचा प्रवास आणि वडिलांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा!

तुमचे लॉकडाउनमधले पाच-सहा महिने कसे गेले?
परीक्षित साहनी - लॉकडाउनचा काळ आबालवृद्ध सगळ्यांसाठीच कंटाळवाणा होता. नैराश्य, दुःख अशा सगळ्या भावभावनांमधून आपण जात होतो. पण माझ्यासाठी आतापर्यंतचा काळ फार कंटाळवाणा गेला नाही. मी आताशा  अभिनयात तसा फार सक्रिय नसतो. मी फार पूर्वीपासूनच स्वतःला गुंतवून घेतले आहे. फोटोग्राफीविषयी काम आहे, एका संगणकावर स्क्रिप्ट्स लिहीत आहे, तर नव्या संगणकावर पुस्तक लिहीत आहे, त्यात मी बिझी असतो. संध्याकाळी साडेसातपर्यंत मी लिखाण करतो. नंतर या कामातून ब्रेक घेतला, की टीव्ही, न्यूज पाहणे, डिनर, जमले तर एखादी वेबसीरिज पाहणे आणि रात्री ११ पर्यंत झोपणे असा माझा दिनक्रम होता, विशेषतः लॉकडाउनच्या काळात.

फिटनेस आणि आरोग्य कसे सांभाळता?
परीक्षित साहनी - फिटनेससाठी खूप प्रयत्न करत असतो, असे पूर्वीही नव्हते. मला जमेल-झेपेल इतका व्यायाम मी करतो. सकाळी उठल्यावर प्राणायाम आणि काही मिनिटे योगा करतो. संध्याकाळी घरच्या घरी वॉक करतो. माझ्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे. राहते घर मोठे आहे, त्यामुळे हे शक्य होते. अलीकडे बहुसंख्य लोक शारीरिक व्यायामाकडे लक्ष देतात. पण व्हॉट अबाउट मेंटल हेल्थ? मानसिक आरोग्य निरोगी आहे अथवा नाही हे कुणीच पाहत नाही, म्हणूनच आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. आपले नातेसंबंध आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे जपता आले पाहिजेत. माझे व्यक्तिगत नातेसंबंध सुदृढ राहावेत म्हणून मी प्रयत्नशील असतो. जीवनातील ताणतणाव कमी केल्यास मानसिक आरोग्य उत्तम जपले जाईल. माझ्या दोन्ही विवाहित आणि सिंगापूरला राहणाऱ्या मुलींशी मी व्हिडिओ कॉलवर दररोज बोलतो. माझा मुलगा त्याच्या ॲनिमेशन, डिजिटल वर्कसाठी जयपूरला असतो. मी सगळ्यांच्या दररोज संपर्कात असतो. माझ्या अमेरिकेतल्या मित्रांशी फोनवर गप्पा मारतो. माझ्या पत्नीचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले. मी मुंबईत एकटा असतो. कौटुंबिक सुख अन्य कुठल्याही सुखापेक्षा मोठे असते.

तुमच्या तिन्ही मुलांपैकी कोणीच अभिनयात कसे काय आले नाही?
परीक्षित साहनी - आज बॉलिवूडमध्ये एकूणच जी परिस्थिती आहे, ती पाहता मला वाटते माझ्या लेकींनी अभिनयात न येण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच होता. माझ्या मुलींनी नॉर्मल मुलींप्रमाणे आयुष्य जगावे, संसार करावा अशी तळमळ होती. माझ्या मुलींनी माझे ऐकले, माझ्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला नाही हे माझे भाग्य. मुलाने ॲनिमेशन, ग्राफिक्स आणि पेंटिंगमध्ये करिअर केले आणि जयपूरला तो स्थायिक झाला.

तुम्हाला लिखाणाची आवड कशी निर्माण झाली?
परीक्षित साहनी - माझे वडील बलराज साहनी माझे अतिशय जवळचे मित्र. माझे मार्गदर्शक, माझे गुरू, माझे सर्वेसर्वा होते. फक्त एका मुद्द्यावर आमच्या दोघांची मते सर्वस्वी भिन्न होती. ते नास्तिक तर मी आस्तिक होतो. त्यांची ईश्वरभक्ती असावी असे मला वाटत नव्हते. पण या चराचरामागे कुठे तरी ईश्वराचे अस्तित्व आहे हे त्यांना समजावे अशी माझी भावना होती. मी रामायण, महाभारत ते थेट हिंदुत्वावरील सगळी पुस्तके-ग्रंथ, वाचून काढले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा अभ्यास केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. अंदमानला असताना त्यांनी जे काही लिहिले ते मी वाचून काढले. प्राचीन भारतीय इतिहास, मगध, मौर्य ते शिवाजी महाराज-मराठ्यांचा इतिहास, कार्ल मार्क्सची पुस्तके, टॉल्स्टॉयचे साहित्य खूप वाचले, सतत वाचतोय. वडिलांबद्दलचे पुस्तक ‘मेमरीज ऑफ माय फादर - बलराज साहनी’ हे चरित्रपर पुस्तक मी लिहिले. मी काही पटकथा, कथा लिहिल्या आहेत. सध्या काही वेबसीरिजसाठी कथा लिहितोय. लिहिण्याची कला मला कदाचित ताऊजी (काका - भीष्म साहनी) यांच्याकडून लाभली असेलही, पण  मी साहित्यिक नाही. माझ्या लिखाणाला साहित्यिक मूल्ये नाहीत. लिहिणे मला खूप प्रिय आहे. अलीकडे मी लिखाणातला आनंद घेतोय.

बलराज साहनी यांच्या इतके मानाचे स्थान आहे तुम्ही गाठू शकला नाहीत याचा कधी विषाद वाटला का?
परीक्षित साहनी - अनेक पिता-पुत्र भारतीय सिनेसृष्टीत आहेत, ज्यांची कायम तुलना केली गेली. पहिल्या पिढीला जितके यश, नाव मिळाले तितके दुसऱ्या पिढीला नाही मिळाले. मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष वाढत नाही असे म्हणतात. असो.. माझ्या वडिलांना त्यांच्या काळातील सुसंगत कथानके मिळाली, बहुसंख्य चित्रपट चालले. मला योग्य चित्रपट मिळाले नाहीत. जे सिनेमे मिळाले त्यातले काही चालले, काहींना अपयश मिळाले. मला जेव्हा एकाच साच्यातल्या भूमिका मिळू लागल्या, तेव्हा मी सबॅटिकल घेतला. पुनरागमन केले, तेव्हा मेकर्सची नवी पिढी आली. कथांचे फॉरमॅट बदलले होते. त्यामुळे विषाद, खंत न बाळगता जे चित्रपट योग्य वाटले ते आनंदाने केले.
मी टीव्ही सिरियल्स बऱ्याचशा केल्या. गुल गुलशन गुल्फाम ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. नंतरच्या काळात माझे घर ते टीव्ही स्टुडिओज हे अंतर गाठणे मोठे कठीण वाटू लागले. डेली सोप्सचा जमाना आला. १२-१४ तास अखंड शूटिंग करणे अवघड झाले. म्हणूनच नंतरच्या काळात मी टीव्हीसाठी काम करणे कमी केले.

‘पवित्र पापी’ या तुमच्या हिट सिनेमाची कथा तुमची होती. त्याचे दिग्दर्शनही तुम्हीच करणार होतात हे खरे का?
परीक्षित साहनी - या सिनेमापासून माझ्या करिअरची सुरुवात झाली. कथा मीच लिहिली होती आणि माझ्या कथेवरील सिनेमाचे मीच दिग्दर्शन करावे असे ठरवले. पण निर्मात्याने मला दिग्दर्शनापासून रोखले आणि मुख्य हिरोची भूमिका करण्याची गळ घातली. मी वडिलांशी याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, कदाचित नियतीच्या मनात तुला दिग्दर्शक नाही, पण नायक म्हणून कारकीर्द घडवायची असेल! वडिलांची आज्ञा मी शिरसावंद्य मानत दिग्दर्शक म्हणून नव्हे पण नायक म्हणून कारकीर्द सुरू केली.

बलराज साहनी यांच्या अनेक स्मृती तुमच्याकडे असतील.
परीक्षित साहनी - मी त्यांच्या सहवासात घडलो, त्यामुळे ते असताना मला ते किती थोर आहेत याची कल्पना लहान असताना नव्हती. मी ८ वर्षांचा असताना माझी आई वारली. माझ्याकडे लक्ष देणारे कुणी नाही म्हणून मला हॉस्टेलमध्ये ठेवले होते. दहावीनंतर मी त्यांचा पदोपदी सल्ला घेत असे. मी अभिनयात आलो त्या ‘पवित्र पापी’ चित्रपटाच्या सेटवर मी बलराज साहनी यांचा मुलगा आहे, अशी कुठेतरी गर्व मला झाला होता. माझे वर्तन योग्य नव्हते. माझ्या वागणुकीचा त्यांना सुगावा लागलाच. ते त्या वेळी त्यांच्या अन्य फिल्मच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेले होते. तो ट्रंक कॉलचा जमाना होता. त्यांनी सेटवर मला थेट फोन केला. डॅड आधी सौम्य भाषेत माझ्याशी बोलले, ‘बेटे, फिल्म का सेट हमारा मंदिर है, यह बात कभी नहीं भूलना। मंदिर में हम भगवान के सामने कैसे विनम्र नतमस्तक हो जाते है, वैसे ही शूटिंग समय तुम्हें पेश आना है। अपने महिला कोस्टार्स के साथ कभी भी फ्लर्ट मत करना। अपना काम पूरी इमानदारी और विश्वास के साथ करना।’ त्यांचे ते खडे बोल आजही माझ्या कानात घुमत आहेत!

डॅडना त्यांच्या प्रत्येक भूमिकेत खोल शिरताना मी पाहत गेलो. ते एका चित्रपटामध्ये खाण कामगार होते, पण सेटवर त्यांना कुणीही ओळखले नाही. मच्छीमार झाले, तेव्हा ते शूटिंग संपेपर्यंत मच्छीमारांबरोबर त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. हाडाचा कलावंत आणि प्रेमळ वडील, आदर्श पती, उत्कृष्ट सहकलावंत, उत्तम लेखक, एक सहृदय माणूस म्हणून डॅडच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मी अनुभवले आहेत. तेच त्यांच्या चरित्रात मांडण्याचा मी प्रयत्न केला. सेटवर दोन शॉट्समध्ये वेळ मिळे. त्या वेळेत ते त्यांचा टाइपरायटरवर त्यांनी अनुभवलेली प्रवासवर्णने लिहीत. मेरा पाकिस्तानी सफरनामा, मेरा रुसी सफरनामा ही मोठाली पुस्तके त्यांनी सेटवर बसूनच टाइप केलीयत. त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘मेरी फिल्मी आत्मकथा’ हेदेखील लिहून पूर्ण केले.

दिलीप कुमार, देव आनंद, नर्गिस अनेक दिग्गजांबरोबर तुम्ही काम केले. यापैकी कुणाचा प्रभाव तुमच्यावर अधिक पडला?
परीक्षित साहनी - दिलीप कुमार, देव आनंद, नर्गिस, राज कपूर या सगळ्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्यावर कायमच माझ्या वडिलांचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. राज कपूर यांच्याकडे मी ‘मेरा नाम जोकर’साठी साहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले. शम्मी, शशी कपूर यांच्याबरोबरही काम केले. देव आनंद यांच्या भाचीशी माझे पुढे लग्न झाले, त्यामुळे आम्ही नात्यानेही जोडले गेलो. देव साहेब त्यांच्या कामाशी इतके प्रामाणिक होते की त्यांनी ड्रिंक्स, सिगारेटला यांना कायमचा रामराम केला. स्वतःच्या इमेजला खूपच जपणारा हा वर्कोहोलिक स्टार मला जवळचा होता.

माझे आणि अमिताभ बच्चन यांचे आजही चांगले संबंध आहेत. माझ्यावर अमिताभ यांचाही खूप प्रभाव आहे. संजीव कुमार, जो माझ्यासाठी हरीभाई जरीवाला होता. त्याने मला अजय साहनी हे नवे फिल्मी नाव दिले होते. माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी मी हरीभाईबरोबर शेअर करत असे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला राजकुमार यांनी खूप मानसिक बळ दिले. आयुष्यात आलेल्या या सगळ्या मान्यवरांनी माझे आयुष्य समृद्ध केले, म्हणून मी श्रीमंत आहे!

संबंधित बातम्या