‘...मनात कटुता ठेवली नाही!’

पूजा सामंत
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

अभिनेता कंवलजीत सिंग यांनी अनेक हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका, पंजाबी चित्रपट केले आहेत. पण सध्या ते वेबसीरिज अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळले आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी विविध विषयांवर मारलेल्या गप्पा...

लॉकडाउनचे ५-६ महिने काय केले? वेळ कसा गेला?
कंवलजीत सिंग - सुरुवातीचे ८-१० दिवस हे नेमके काय आहे? लॉकडाउन म्हणजे काय असेल? २-४ दिवस सगळे जिथे असतील तिथे बंदिस्त राहतील असे वाटत होते. मी मार्च-एप्रिलमध्ये खूप बिझी होतो. कॅनडा, दुबई, मथुरा, बिहार अशा सगळ्या ठिकाणी कुठे व्यक्तिगत कामे, तर कुठे फिल्म्स आणि वेबशोजचे शूटिंग सुरू होते. मला तेव्हा असेही वाटले, ही अचानक मिळालेली सुटी आहे. पण दोन महिने उलटून गेले तरी शूटिंगच काय, पण जनजीवन सुरळीत झाले नाही. मायूसी बढती ही गयी। हर दिन डिप्रेसिव्ह होता गया। या ५-६ महिन्यांत करण्यासारखे तसे काही नव्हते. योग-प्राणायाम यात फार तर अर्धा तास जातो. पुढे काय, हा प्रश्न उरतोच.

सध्या हॉटस्टारवर ‘होस्टेजेस-२’मधील तुमच्या परफॉर्ममन्सची चर्चा होतेय. काय सांगाल या वेबशोबद्दल?
कंवलजीत सिंग - ओटीटी प्लॅटफॉर्मवर माझा हा तसा पहिलाच मोठा शो आणि पहिली एंट्री आहे. माझ्या मते अभिनय करताना माझ्यासाठी फिल्म-टीव्ही किंवा ओटीटी माध्यम हे सगळे एकसारखेच आहे. प्रत्येक माध्यमात काम करताना अभिनयाचा आविष्कार एकसारखाच असतो. स्टेजसाठी मी फारसा सक्रिय नसतो. होस्टेजेस २ सीरिजचे डायरेक्टर सुधीर मिश्रा, तर एपिसोड डायरेक्टर सचिन कृष्णन आहेत. त्यांनी कथा ऐकवली आणि मला रोल आवडला. कमांडर ऑफ चीफ ऑफ पोलिसची व्यक्तिरेखा कुणाला आकर्षित करणार नाही? मला स्वतःला सैनिकी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या कामाचे खूप अप्रूप आहे. मला सैन्यातच जायचे होते, पण ते नियतीला मान्य नसावे.. असो!  होस्टेजेस ही वेबमालिका प्रेक्षकांना आवडतेय हे ऐकून समाधान वाटले.
फक्त खेद याचा वाटतो, ओटीटी प्लॅटफॉर्मवर कसलेही निर्बंध नाहीत. अमर्याद हिंसा, कामुक दृश्ये किंवा शारीरिक संबंधांची रेलचेल दाखवा, कुणीही जाब विचारणारे नाही. यामुळे ही अनैतिकता आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे या विचाराने मी अस्वस्थ होतो! कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ६५ वर्षांपुढे वय असलेल्या कलाकारांना काम करण्याची परवानगी हायकोर्टाकडून मिळाली आहे. त्यामुळे बॅकलॉगची सगळी शूटिंग्स आता सुरू झाली आहेत, पण माझ्या मनात धाकधूक आहेच.

अभिनयाकडे कसे वळलात?
कंवलजीत सिंग - मुझे जर्नी में मजा आता है। मुकाम पर पहुँचने में मजा नहीं है। मी धर्माने शीख आहे, पण माझा जन्म पंजाबचा नाही. पंजाबी भाषा मला बोलता येऊ लागली पण थोडी उशिराच. माझा जन्म उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा. मसुरीमध्ये माझे शालेय शिक्षण झाले. दहावी-बारावीपर्यंत मी एअरफोर्समध्ये जाण्याच्या विचारात होतो. घरात एकत्र कुटुंब होते आणि उत्तरप्रदेशात राहिल्यामुळे घरातील खाद्यसंस्कृतीवर पंजाबी आणि उत्तर भारतीय असा मिश्र मिलाफ झाला होता. शेजारी, मित्र, सहकारी बहुतेक हिंदी बोलत त्यामुळे माझ्यावर पंजाबी आमच्या मातृभाषेचे संस्कार फार कमी झाले. अभिनयासाठी तेव्हा पुण्याच्या एफटीआयचे नाव खूप नावाजले जात होते. मित्राने या संस्थेचे फोटो, माहिती मला पाठवली आणि मला अभिनयाची भुरळ पडली. मी अभिनयात जाण्याचे ठरवले. म्हणून मला अभिनयाच्या पुढच्या टप्प्यावर जेव्हा पंजाबी फिल्म्सच्या ऑफर्स आल्या, तेव्हा माझे मन द्विधा झाले. मी अस्खलितपणे माझी मातृभाषा बोलू शकेन का? पण मला पंजाबी फिल्म्समध्ये घेणाऱ्या निर्मात्यांना माझ्याबद्दल आत्मविश्वास होता, की मी पंजाबीमध्ये संवाद म्हणू शकेन. पुढे अनेक पंजाबी फिल्म्स मी करू शकलो.

तुमचा आजवरचा अभिनय प्रवास कसा झाला?
कंवलजीत सिंग - पारंपरिक मूल्ये असलेल्या कुटुंबात मनधरणी करणे, आपले मत पटवून देणे तितके सोपे नाही. पदवी मिळवली आणि सगळ्यांचे मन वळवून मी महाराष्ट्रात, पुण्यात पोचलो. फिल्म्स अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला. रामेश्वरी, शबाना  
आझमी, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डेंगझोपा, नसिरुद्दीन शाह हे सगळेच माझ्या मागे-पुढे होते. रोशन तनेजा आमचे शिक्षक होते. हा अभिनयाचा पाठ्यक्रम पूर्ण झाल्यावर मला ‘दास्तान ए लैला मजनू’ आणि विजय आनंदसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकाचे ‘रहे ना रहे हम’ आणि केतन आनंद यांचे ‘शर्त’, ‘शक’ हे चित्रपट मिळाले. पण माझ्या दुर्दैवाने या फिल्म्सना अपयश मिळाले. त्यामुळे करिअर सुरू झाले तसे ते वेगाने पुढे सरकले नाही. याच दरम्यान मला टीव्हीच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मी ‘बुनियाद’ मालिका स्वीकारली. नामवंत कलाकार, लेखक मनोहर श्याम जोशी, दिग्दर्शक ज्योती स्वरूप आणि रमेश सिप्पी असल्याने मी होकार दिला. कथानक आणि माझी ‘सतबीर’ व्यक्तिरेखा अतिशय आवडली मला. मला या मालिकेने खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि माझ्यासाठी पुन्हा सिनेमाचे दरवाजे सताड उघडे केले. 

पुढे चित्रपट स्वीकारलेत का? हवे तेवढे यश मिळाले नाही, असे कधी वाटले का?
कंवलजीत सिंग - मी नवे चित्रपट स्वीकारले, पण फार कमी स्वीकारले. कारण माझ्याही मनात धाकधूक होतीच.  आय वॉन्टेड टू बी पार्ट ऑफ मिनिंगफुल फिल्म्स! म्हणून मी ब्रेक घेत होतो. तरीही मी या इंडस्ट्रीत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने काम करत राहिलो. गेल्या ४०-४५ वर्षांपासून मला नेहमीच फिल्म्स, टीव्ही शोज आणि आता वेबसीरिज मिळत राहिल्या, यात मोठे मानसिक समाधान आहे. टीव्ही क्षेत्रात माझ्या सगळ्याच भूमिका खूप गाजल्या.
पुढे मग नीना गुप्ता या सहकलाकार आणि उत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीने ‘सांस’, ‘सिसकी’ मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले आणि मला अविस्मरणीय भूमिका त्यात दिल्या. आजही माझ्या या भूमिका ९०च्या दशकातील प्रेक्षकांना आठवतात. टीव्ही मालिका, मधेच एखादा हिंदी चित्रपट करताना पंजाबी फिल्म्सच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘मन्नत’, ‘जी आयांनू’, ‘दिल अपणा पंजाबी’ या पंजाबी फिल्म्सनी घवघवीत यश मिळवले.

अमिताभ बच्चन, रेखा, राजेश खन्ना, दीप्ती नवल अनेक कलाकारांबरोबर तुम्ही काम केले. तो अनुभव कसा होता?
कंवलजीत सिंग - ‘अकेला’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ असे दोन चित्रपट मी बच्चनसरांबरोबर केले. त्यांच्याशी खूप छान दोस्ताना झाला. सत्ते पे सत्ताचे शूटिंग काश्मीरला होते. अमितजी तिथेही वक्तशीर असत. राजेश खन्ना नेहमी पंजाबी भाषेतून माझ्याशी गप्पा मारीत. स्मिता पाटील इतकी साधी होती, की ही मुलगी वाट चुकून इथे आलीय का असे वाटावे! कधी शूटिंग दरम्यान कलाकारांबरोबर तात्त्विक मतभेदही झाले, पण त्याबद्दल मी आजतागायत कधीही कटुता मनात ठेवली नाही. 

अभिनयात अनेक वर्षे आहात. या क्षेत्रात काही बदल जाणवतायत का?
कंवलजीत सिंग - आपण तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगती केलीय. पण माझ्या मते सगळ्यात मोठा बदल म्हणजे, या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मानसिकता बदलली आहे. कंटेम्पररी विषय येणे हा सुखद बदल आहे. एक गंमत सांगतो, १९८०-८५ च्या सुमारास ‘शेरदिल-शेरगील’ अशा शीर्षकाची मालिका घेऊन आमच्या काही मित्रांनी दूरदर्शन केंद्राशी संपर्क साधला. त्यांना हे शीर्षक योग्य वाटले नाही, शेरगील आडनावाचे लोक बंड करतील असा त्यांचा कयास होता. त्यांनी या मालिकेला नवे नाव दिले, ‘हमारी भाभी’. या शीर्षकाने या मालिकेची हवाच काढून घेतली! नीना गुप्ता यांची ‘सांस’ मालिका विवाहबाह्य अनैतिक संबंधावर आधारित होती. ही मालिका सॅंक्शन करून घेण्यासाठी एक वर्ष लागले. पण नंतर या मालिकेने लोकप्रियतेचे नवे विक्रम गाठले. आत्ताच्या काळात इनोव्हेटिव्ह विषय हातोहात उचलले जातात.

अभिनेत्री अनुराधा पटेलबरोबर तुमचा प्रेमविवाह झाला होता, बरोबर ना?
कंवलजीत सिंग - अनुराधाचा आणि माझा प्रेमविवाह. तिला मी स्वतः आणि बरेच जण मिनी म्हणतो. १९८७ मध्ये ‘खिलाडी’ या फिल्ममध्ये मी, मिनी, शबाना आझमी होतो. यह फिल्म रिलीज नहीं हुई, पर हमारे बीच प्यार पक्का हुआ। चारचौघांचे होतात तसे आमचे मतभेद, अगदी कडाक्याची भांडणे झाली, होतात. पण एकमेकांवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे आमचे वैवाहिक नाते टिकले. आता दुरावा निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. सिद्धार्थ आणि आदित्य या आमच्या दोन मुलांना अभिनयात स्वारस्य नाही. आदित्यला चित्रकलेमध्ये रस आहे. त्याच्या पेंटिंग्जची प्रदर्शने सर्वत्र भरतात. मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत होतात. अमिताभ, जया, जावेद अख्तर, शबाना त्याच्या पेंटिंग्जचे प्रशंसक आहेत. सिद्धार्थला म्युझिकमध्ये करिअर करायचे आहे. 

अशोक कुमार यांची चित्रपटसृष्टीतील दादामुनी अशी ओळख, जे तुमचे आजे सासरे. त्यांच्या काही आठवणी असतीलच.
कंवलजीत सिंग - असंख्य आठवणी आहेत. त्यांना गप्पा मारणे, मैफिली भरवणे खूप आवडे. नंतरच्या काळात त्यांना दम्याने ग्रासले. ते स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर होते. शूटिंग नसले की त्यांचे औषधांवर संशोधन सुरू असे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ते औषध देत, पण विनामूल्य! स्वतःच्या दम्यावर मात्र रामबाण उपाय त्यांना मिळाला नव्हता. माझ्या मोठ्या मुलाला दम्यावर अनेक ॲलोपथी औषध दिली, पण आराम पडला नाही.  पणजोबा दादामुनींनी दिलेल्या होमिओपॅथिक औषधांनी खूप आराम मिळाला. मी त्यांना दम्यासाठी एक पंप दिला होता, त्याने त्यांना बरे वाटे. सगळ्यांना कौतुकाने माझ्याबाबत सांगत, त्यामुळे मी ओशाळून जाई. संगीत, साहित्य, अभिनय, खाणे, पेंटिंग, गार्डनिंग सगळ्यात रस असलेला बहुश्रुत आजे सासरा होता माझा! अशा व्यक्ती आताशा दुर्मीळच! आमचे नाते मैत्रीपलीकडचे होते!

संबंधित बातम्या