‘माझे कुटुंब माझे विश्‍व’

पूजा सामंत
सोमवार, 7 डिसेंबर 2020

बोमन इराणी यांनी गेली १५ वर्षे बॉलिवूडमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, ३ इडियट्स, मै हूँ ना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या ४४व्या वर्षी अभिनयात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली. सामाजिक बांधिलकी मानणारा हा हॅपी गो लकी अभिनेता सध्या ‘स्क्रिप्ट रायटिंग ऑनलाइन वर्कशॉप घेतोय. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

बोमन, सिनेमाक्षेत्रात येण्यापूर्वीच्या तुमच्या आयुष्याबद्दल काय सांगाल?
बोमन इराणी - मी पक्का मुंबईकर! इराणी झोरोस्ट्रियन कुटुंबातील. २ डिसेंबर १९५९ ला माझा जन्म झाला. मी जन्माला येण्यापूर्वी सहा महिने आधीच माझ्या वडिलांचे देहावसान झाले आणि माझी व तीन बहिणींची जबाबदारी आईवर पडली. मोठा कठीण आणि संघर्षाचा काळ होता तो. माझे शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंटमध्ये झाले. तेव्हा मला डिसलेक्सिया होता. मी तोतरे बोलत असे. वर्गातील मुले माझी चेष्टा करत. माझ्या जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर माझे तोतरेपण निघून गेले हे मलाही कळले नाही.

शाळेत असतानाच मला सिनेमा बघण्याची आवड निर्माण झाली. आईकडून मिळणाऱ्या पॉकेट्मनीमधून मी जवळच्या अल्केझांडर थिएटर्समध्ये फिल्म्स बघत असे. आई सांगायची, बमन फक्त मनोरंजन म्हणून सिनेमा पाहू नकोस, सिनेमा या माध्यमात अभिनय, फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, टेक्निकल बाबी या सगळ्या अंगांचा अभ्यास कर. सिनेमा या माध्यमाची कला जाणून घेण्यासाठी तुझी दृष्टी असली पाहिजे. मी स्वतः मध्यमवर्गीय मूल्यांमध्ये वावरलो, तेच संस्कार माझ्यावर घडले. 

आमचे ग्रँट रोडला एक-नमकीन कम प्रोव्हिजन-कम बेकरी स्टोअर होते. आई दुकान चालवत असे. वेळ मिळेल तसा मी दुकान सांभाळत असे आणि आईवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न करे. मला भूमिका रंगवायला या अनुभवाचा उपयोग झाला. दुकानात येणाऱ्या माणसांकडून विविध भूमिका निभावण्याचा मंत्र मिळाला. याच दुकानात एक युवती (झेनोबिया - बोमन इराणी यांची पत्नी) खाद्यपदार्थ घ्यायला येत असे. याच दुकानाने आमची भेट -प्रेम -लग्न आणि आता त्यानंतरचा सुखी संसार घडवला.

तुम्ही वेटरची नोकरीही केली आहे, हे खरे का?
बोमन इराणी - कोलाबातील ताज महाल पॅलेस अँड हॉटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये मला ट्रेनिंगनंतर वेटरची नोकरी मिळाली. या हॉटेलमध्ये माझे काम वेटरचे आणि रूम सर्व्हिसचे होते. माझ्या कामावर मॅनजेमेंट संतुष्ट होते. दोन वर्षांतच मला प्रमोशन मिळाले आणि रुफटॉप ताजमध्ये राँदेव्हू या प्रतिष्ठित फ्रेंच  रेस्टॉरन्टमध्ये नियुक्ती झाली. या नोकरीमुळे माझ्याही नकळत मी घडत होतो. या वेटरच्या नोकरीने मला सुसंस्कृतपणाची किनार दिली.. मॅनर्स, एटिकेट्स, सफाईदार वागणे, बोलणे, अदब हे पैलू माझ्या मनाने अलगद टिपून घेतले.

जीवनात पुढच्या वळणावर तुम्ही फोटोग्राफरही झालात.
बोमन इराणी- लहानपणापासून मला फोटोग्राफी आणि कॅमेरा याविषयी सुप्त आकर्षण होते. ताज हॉटेलमध्ये मला आकर्षक टीप मिळत असे. या पैशांतून मी एक प्रोफेशनल कॅमेरा घेतला. या कॅमेरातून मी एका शालेय स्पोर्ट्स डेची छायाचित्रे काढून त्या शाळेला २० रुपयास एक अशी छायाचित्रे विकली. त्या फोटोंचे कौतुक झाले आणि माझ्या लक्षात आले, मला बोलकी छायाचित्रे काढता येतात. माझा आत्मविश्वास या कॅमेऱ्याने वाढवला.

छायाचित्रे विकून पैसे साठवण्यात सहा-सात वर्षे गेली. दरम्यान मी विवाहित आणि दोन मुलांचा पिता झालो होतो. मुंबईबाहेर कधीही न गेलेला मी आता कुटुंबासह उटीला निघालो. सगळेच उत्सुक होतो, पण तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आले, आमची फसवणूक झालीये! हॉटेल पूर्णतः बंद पडले होते; आता कुटुंबाला घेऊन मी कुठे जाणार? कारण अन्य हॉटेल्स आमच्या बजेटबाहेर होती. त्या प्रसंगाने मी व्यथित झालो. योग्य मार्गाने चांगला पैसा कमवावा हा निर्धार केला. फोटोग्राफीमध्ये चांगले नाव कमवावे आणि कुटुंबाला सुखी ठेवावे असे ठरवले. योगायोगाने ऑलिम्पिक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अदजानिया यांनी मला बॉक्सिंगचे काही फोटोज घेण्याचे असाइनमेन्ट दिले. माझ्या या कामावर ते भलतेच खूश झालेत आणि माझी ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून नियुक्ती केली. 

अभिनयाकडे कसे वळलात?
बोमन इराणी - मी कॉलेजमध्ये असताना १९८१ ते ८३ मध्ये हंसराज सिध्दीया या ॲक्टिंग गुरूंनी मला दोन वर्षे अभिनयाचे धडे दिले होते. नंतर फोटोग्राफी करताना माझी भेट अलेक पदमसी यांच्याशी झाली. अलेक पदमसी यांनी मला अभिनयात का येत नाहीस असे म्हणत त्यांच्या इंग्रजी नाटकात प्रथम संधी दिली. या पहिल्या प्रयत्नाने माझा आत्मविश्वास वाढला. मी अभिनय करू शकतो हे जाणवले. ‘आय एम नॉट बाजीराव’ हे माझे विनोदी नाटक तब्बल १० वर्षे चालले. १०-१२ वर्षे अलेकने मला रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली. २००० पासून मला जाहिराती मिळू लागल्या. फँटा, सिएट, क्रॅकजॅक बिस्किट्सच्या  जाहिराती खूप गाजल्या. या जाहिरातीनंतर मला ‘डरना मना है’ हा पहिला सिनेमा मिळाला आणि पहिल्याच सिनेमात माझ्या परफॉर्मन्सची दखल घेतली गेली. त्यांनतर २००३ मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये डॉक्टर अस्थाना ही व्यक्तिरेखा खूप गाजली. त्यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘३ इडियट्स’, ‘मै हूँ ना’, ‘दोस्ताना’, ‘नो एंट्री’, ‘हाऊसफुल’, ‘डॉन’ अशा अनेक फिल्म्समधून मला कुठे नॉमिनेशन तर कुठे पुरस्कार लाभले. वयाच्या ४४व्या वर्षी अभिनय प्रवास सुरू झाला. या वयात कुणी कंटाळून निवृत्ती घेतात, पण माझा याच वयात नवीन श्रीगणेशा झाला होता. 

लॉकडाउन काळात तुम्ही अनेकांना स्क्रिप्ट रायटिंग ऑनलाइन शिकवले, तेही विनामूल्य.
बोमन इराणी - लॉकडाउनचा काळ मी इथे मुंबईतच घालवला, माझ्या घरी! माझी दोन मुले डॅनिश आणि कयूर, माझी पत्नी झेनोबिया, माझी आई... माझ्यासाठी हेच माझे विश्व! अभिनयात आल्यापासून कुटुंबाबरोबर वेळ घालवणे कठीण झाले होते, त्यामुळे लॉकडाउनचा बहुतेक काळ मी आई-पत्नीबरोबर गप्पा मारल्या. सकाळचा चहा, ब्रेकफास्ट,लंच, डिनर एकत्रच केले. स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केल्यावर चित्रपट काढला, तो सपशेल आपटला. माझ्या लक्षात आले, चित्रपटाची निर्मिती मूल्ये चांगली असली तरी कथेत आत्मा नव्हता. कथाच सशक्त नसल्याने माझा चित्रपट चालला नाही. तेव्हा मी पटकथांकडे अधिक लक्ष द्यायचे ठरवले आणि स्क्रिप्ट रायटिंग आधी स्वतः शिकलो. मग इतरांना शिकवू लागलो. १५० पेक्षा अधिक विद्यार्थांना मी ‘स्पायरल बायडिंग'' या नावाने स्क्रिप्ट रायटिंग शिकवतो, विनामूल्य. ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजातील उपेक्षित घटकांसाठी मी काही करावे असे नेहमी वाटत होते. पूर्वी माझ्याकडे पुरेसे पैसे नसत. आज मला शक्य आहे म्हणून मी स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉप घेतो. अनेक समाजसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयांतील मुळांना ऑनलाइन शिकवतो. काही गरजू विद्यार्थ्यांना स्क्रिप्ट रायटिंगचे प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यासाठी मी अमेरिकेत माझ्या खर्चाने पाठवणार होतो, पण लॉकडाउनमुळे अमेरिका ट्रेनिंगही रद्द करावे लागले आणि मग ऑनलाइनची शाळा एप्रिलपासून सुरू केली, जी अजूनही घेतोय. 

बॉलिवूडमध्ये असंख्य व्यक्ती आणि वल्ली तुम्हाला भेटले. त्यापैकी तुमच्यावर कुणाचा विशेष प्रभाव पडला?
बोमन इराणी - सर्वाधिक प्रभाव पडला तो अमिताभ बच्चन यांचा! त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात प्रचंड उलथापालट झाली, पण ते डगमगले नाहीत. या महान अभिनेत्याकडून जितके शिकावे तितके कमीच. परिस स्पर्श लाभलेला हा कलावंत देशात जन्मला हे आपले भाग्य! त्यांच्याबरोबर वेळोवेळी काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला जाणवत गेले आणि मी अभिनेता म्हणून धन्य झालो. अमितजी यांच्याकडून मी शिकत गेलो. दिग्दर्शक राजू हिरानी, दिबाकर बॅनर्जी यांनीही मला घडवले.

संबंधित बातम्या