‘मी समाधानी...!’

पूजा सामंत    
सोमवार, 21 डिसेंबर 2020

‘मैने प्यार किया’ या चित्रपटामधून घराघरांत पोचलेली अभिनेत्री भाग्यश्री (पटवर्धन-दासानी) आता पुन्हा मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. पुढील वर्षी तिचे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दोन चित्रपटांचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त तिच्याबरोबर मारलेल्या गप्पा...

भाग्यश्री, प्रदीर्घ कालावधीनंतर तुमचे पुन्हा अभिनय क्षेत्रात येताय. कुठले नवे चित्रपट करताहात?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - मी उत्सुक आहे. संसाराच्या धबडग्यातून जशी, जेव्हा संधी मिळाली, मी ते रोल स्वीकारले. पण सध्या माझा मुलगा अभिमन्यू आणि लेक अवंतिका दोघेही शिक्षण पूर्ण करून त्यांच्या करिअरच्या वाटांकडे वळले. माझा नवरा हिमालय त्याच्या व्यवसायात व्यग्र आहे. सगळे कुटुंब असे मार्गी लागले आहे. त्यामुळे मनात कुठलाही ‘गिल्ट’ न बाळगता मी आता तरी झोकून देऊन अभिनयातला आनंद घ्यावा, असे माझे कुटुंबच मला सांगतेय. म्हणून फिल्म ऑफर्स मी स्वीकारायचे ठरवले. माझ्या दोन मोठ्या आणि बिग बजेट फिल्म्सचे शूटिंग पूर्ण झाले असून २०२१ मध्ये या फिल्म्स रीलिज होतील अशी आशा आहे, अर्थात कोरोनाचा प्रसार, लॉकडाउन यापैकी काहीही नसल्यास!

‘राधेश्याम’ पिरीयड फिल्ममध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे ही रोमँटिक जोडी आहे. तसेच माझी, सचिन खेडेकर, कुणाल रॉय-कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. १९७० मधील प्रेमकथा आहे. सध्या जानेवारी २०२१ मध्ये रीलिजची तारीख ठरलीय. दुसरा महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणजे ‘थलेयवि’. तामिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री जयललिता यांचे हे बायोपिक असून कंगना रनोट मुख्य भूमिकेत आहे. मी जयललिता यांच्या आईच्या भूमिकेत आहे. हे दोन्ही चित्रपट मला अभिनयाला वाव देणारे आहेत याचा आनंद आहे. या फिल्म्सचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे.

आईची भूमिका फार लवकर स्वीकारली असे नाही वाटत?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - आत्ताच्या काळात मला असे वाटत नाही. ‘बेटा, हाथ मुह धो ले, मै खाना लगाती हूँ।’ ‘बेटे, आज तुम्हारे पसंद का गाजर का हलवा बनाया है।’ असे संवाद बोलणाऱ्या आईची व्यक्तिरेखा नाहीये माझी. जयललिता राजकारणात मुरल्या, जनमानसात प्रिय झाल्या, त्यामागे त्यांच्या आईची करडी शिस्त, संस्कार, नीतिनियम होते. अशा धोरणी परिपूर्ण आईची दमदार भूमिका करणे कुणाला आवडणार नाही? ही भूमिका आव्हानात्मक आहे.

‘मैने प्यार किया’च्या यशानंतर तू संसारात रममाण झालीस. आता त्या निर्णयाबद्दल तुझ्या काय भावना आहेत?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - ‘मैने प्यार किया’ रीलिज झाला तेव्हा माझे लग्न झाले. हिमालय आणि मी एका शाळेत होतो, आमचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मी आपणहून स्वीकारल्या. ‘मैने प्यार किया’च्या यशानंतर अनेक निर्मात्यांनी मला साइन करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती, पण मी स्वेच्छेने तो मार्ग दूर ढकलला. आजही मला माझ्या त्या निर्णयाविषयी खेद वाटत नाही. गॅप घेतला नसता तर शिखरावरची अभिनेत्री म्हणून आणखी काही काळ काम केले असते, पण माझ्या मुलांचे बालपण मी कधीही पाहू शकले नसते. आईच्या रूपात मी कमी पडल्याची खंत मात्र आयुष्यभर राहिली असती. मुलांची पूर्ण वेळ शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर त्यातल्या त्यात योग्य ऑफर्स होत्या त्या मी केल्या. मी योग्य वेळेत चित्रपटसृष्टीमध्ये परतली आहे, कारण सध्या रिअलिस्टिक सिनेमाचे युग आहे. त्यामुळे मला माझ्या योग्यतेच्या व्यक्तिरेखा नक्की मिळतील अशी आशा आहे.

सुमन आणि भाग्यश्रीमध्ये फरक आणि समानता काय?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - मी ‘फेक’ व्यक्ती नाहीये. माझ्यात नसलेले गुण घेऊन मी वावरले नाही, मला त्याची कधी आवश्यकता भासली नाही. I am who I am!  ज्या मुलावर मी प्रेम केले, त्याच्याशी लग्न केले. माझ्या दोन्ही मुलांना मी मध्यमवर्गीय संस्कारात वाढवले. कुटुंब आणि माझे करिअर याचा समतोल साधून मी जगले याचा मला आनंद आहे. चित्रपटसृष्टीतील झगमग, ग्लॅमर, पैसा, पार्ट्या यांची भूरळ मला पूर्वी कधीही नव्हती, आजही नाही.  
साधे आयुष्य जगावे, सोबत कुटुंब-प्रियजनांची साथ असावी, यावर माझा विश्वास आहे.

‘माहेरची साडी’ मराठी सिनेमासाठी तुम्हाला ऑफर दिली होती. तुम्ही हा सिनेमा का नाकारलात?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - माहेरची साडी हा चित्रपट मला आधी ऑफर झाला होता. तो १९९१ मध्ये रीलिज झाला. माझा मुलगा अभिमन्यू याचा जन्म त्याच कालावधीतला. इतक्या लहान मुलाला माझ्यापासून दूर ठेवणे मला न पटणारे होते, म्हणून मी नकार दिला. माझ्या व्यक्तिगत जीवनाला-मुलांना मी नेहमीच अग्रक्रम दिलाय. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मी स्वीकारू शकले नाही. नाकारलेल्या अनेक प्रसिद्ध फिल्म्सपैकी एक म्हणजे ‘माहेरची साडी’.

गेल्या ३२ वर्षांत बॉलिवूडमध्ये प्रामुख्याने कोणते बदल झालेले जाणवतात?
भाग्यश्री पटवर्धन-दासानी - खूप बदल जाणवतात! बॉलिवूड गेल्या ३२ वर्षांमध्ये झपाट्याने बदलले आहे. सिनेमाच्या कथा, मेकिंग, तांत्रिक बदल सुखावणारे आहेत. लार्जर दॅन लाइफ सिनेमा कमी झालाय. कलाकारांची नवी पिढी अतिशय प्रोफेशनल आहे. डान्स, ॲक्शन आणि कॅमेरा अशा सगळ्याच अंगांमध्ये नवी पिढी पारंगत आहे. आजचे कलाकार त्यांच्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. माझ्या काळात मला हे अनुभव येत असत. एखाद्या स्टारची वाट बघण्यात अनेक तास व्यर्थ जात. त्या काळातील स्टार्स एकाच वेळी ४०-५० सिनेमांचे कॉन्ट्रॅक्ट घेणे चुकीचे मानत नसत. मिळेल त्या भूमिका करत, भरपूर चित्रपट करत. आज मोजकेच सिनेमे करण्याचा कल आहे. हा बदल उत्तम आहे. त्यामुळे सर्वार्थाने सिनेमाची गुणवत्ता सांभाळली जाते. माझा मुलगा अभिमन्यू दासानी याने त्याचा ‘निकम्मा’ हा सिनेमा पूर्ण केला असून तो लवकरच रीलिज होईल. त्याच्याकडून मला उत्तम अभिनयाची अपेक्षा आहेच. अवंतिकाने लंडनहून बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण केलेय. तिचाही अभिनयात येण्याचा विचार आहे. मी करिअर आणि आयुष्यात पूर्ण समाधानी आहे, हेच माझे संचित आहे!

संबंधित बातम्या