विकास की पर्यावरण? 

इरावती बारसोडे
सोमवार, 8 एप्रिल 2019

चर्चा
विकासकामे म्हटली की आसपासच्या पर्यावरणाची हानी हे जणू समीकरणच बनले आहे. प्रगतीसाठी विकास आवश्‍यक, हे मान्यच आहे. पण विकासासाठी पर्यावरणावर गदा आलीच पाहिजे का? विकास आणि पर्यावरण संवर्धन दोन्ही बरोबरीने होऊ शकत नाही का? दोन्हीपैकी कोणत्याही एका गोष्टीला प्राधान्य न देता मध्यम मार्ग शोधणे ही काळाची गरज आहे.

पुण्यात कुठेही हमखास दिसणारा पक्षी म्हणजे कबूतर! नवीन पिढीला कबूतर सोडून दुसरा पक्षी असतो की नाही, असा प्रश्‍न पडावा इतकी पुण्यात कबुतरे आहेत. मग, पुण्यात दुसरे पक्षीच नाहीत का? आहेत तर! फक्त ते बघायला जरा वाट वाकडी करून बऱ्यापैकी झाडाझुडुपांनी फुललेली अशी एखादी टेकडी किंवा अभयारण्य गाठावे लागते. असेच एक अभयारण्य म्हणजे, डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य! गंमत म्हणजे, पुण्यात असे काही अभयारण्य आहे, हेच खूप कमी जणांना माहीत आहे. आता या अभयारण्यासमोर नवीन समस्या येऊन उभी राहिली आहे, कारण लवकरच अभयारण्यामधून मेट्रो धावणार आहे. वनाज-रामवाडी मेट्रो मार्ग अभयारण्यामधूनच जाणार असल्यामुळे, तिथल्या जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. मेट्रोमुळे इथले पक्षी कायमचे तर उडून जाणार नाहीत ना, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

येरवड्यामधील हे पक्षी अभयारण्य साधारण २२ एकर प्रदेशावर विस्तारलेले आहे. खरे तर हे अभयारण्य नाही, तर बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच जैवविविधता उद्यान आहे. मग याला डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य का म्हणतात? तर, ‘फादर ऑफ बर्डिंग’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी इथे एकदा भेट दिली होती. त्यांनी याला पक्षी अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी केली होती. मात्र, अभयारण्य म्हणून घोषित करावा इतका हा प्रदेश मोठा नाही. त्यामुळे कागदोपत्री हे अभयारण्य नसले, तरी त्यानंतर डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य या नावाने ते ओळखले जाऊ लागले. 

येरवड्यातील आगाखान पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान मुठा नदीकाठी हा हरित पट्टा आहे. पुणे शहरात इतकी भरभरून जैवविविधता दुसरीकडे कुठेच नाही. त्यामुळेच हा भाग जपणे महत्त्वाचे आहे. नदीकाठी असल्यामुळे इथे प्रामुख्याने पाणथळ परिसंस्था (वेटलॅंड इकोसिस्टिम) आढळते. नदीभोवताली गवताळ प्रदेश असल्यामुळे इथे गवताळ (ग्रासलॅंड) परिसंस्थाही आहे. नंतर झालेल्या वृक्षलागवडीमुळे इथे झाडीचा प्रदेशही आहे. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये असा जैवविविधतेने समृद्ध हरित पट्टा दुर्मिळच! नवशिके आणि सराईत पक्षीतज्ज्ञ नेहमीच इथे पक्षीनिरीक्षणासाठी येतात. पुण्यामध्ये पक्षीनिरीक्षणासाठी या अभयारण्यासारखी दुसरी उत्तम जागा नाही. हे उद्यान सर्वांत जुने असावे. तसेच कदाचित पुण्यातील हा एवढा मोठा शेवटचा हरित पट्टा असेल. 

इथे जवळपास २०० वनस्पतींच्या प्रजाती आहेत. फुलपाखरांच्या ३० प्रजाती इथे आढळतात. तर, केवळ पक्ष्यांच्याच १०५ प्रजाती आहेत. खंड्या, पांढऱ्या मानेचा करकोचा, चित्रबलाक, लाजरी, जांभळा वंचक, कवड्या, कमलपक्षी, थापट्या, राखी तितर यांसारखे स्थानिक पक्षी, तसेच पिवळ्या डोक्‍याचा धोबी, रंगीत पाणलावा, दलदली तुतारी, दलदली ससाणा यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचा हा हक्काचा अधिवास आहे. एकूण प्रजातींपैकी ३० ते ४० टक्के प्रजाती स्थलांतरित पक्ष्यांच्या आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बहुतांश प्रजाती युरोपीय देशांमधील असतात. जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या एशियन वॉटरबर्ड सेन्ससमध्ये (एडब्ल्यूसी) जगभरात असुरक्षित प्रजाती म्हणून घोषित झालेल्या चित्रबलाक आणि पांढऱ्या मानेचा करकोचा या दोन प्रजातींची उद्यानामध्ये नोंद झाली आहे. 

असे हे पक्ष्यांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे रम्य पक्षी अभयारण्य, आता मात्र पर्यावरण महत्त्वाचे की विकास या नेहमीच्याच ज्वलंत प्रश्‍नाच्या कचाट्यात अडकले आहे. कारण, इथेही विकासकामे सुरू झाली आहेत. खराडी-शिवणे या १७ किलोमीटर रस्त्याचा एक भाग उद्यानाच्या मधूनच जातो. उद्यानामधून जाणारा प्रस्तावित रस्ता एकूण ८५० मीटर लांबीचा आहे. त्यापैकी ४०० मीटर रस्ता बांधून झाला आहे. रस्ता बेकायदा नाही, पण रस्ता बांधताना शंभराहून अधिक झाडे तोडली गेली. काही झाडे (झाडांचे बुंधे) उद्यानाच्याच परिसरात पुन्हा लावण्यात आली आहेत. छोटी झाडे पुन्हा रुजतीलही. पण, तोडलेल्या झाडांमध्ये ३०-४० वर्षे जुनी झाडेही होती. इतकी जुनी झाडे नवीन जागेत पुन्हा आपली मुळे रोवू शकतील का, हा प्रश्‍नच आहे. सध्याचे चित्र तरी निर्जीव खोड उगाचच उभे करून ठेवल्यासारखे दिसते आहे. रस्त्यासाठी झाडे तोडताना सरकारने हरकती मागवणे अपेक्षित होते. तशा त्या मागवल्याही गेल्या. त्या हरकतींवर सुनावणी होणे आवश्‍यक होते. मात्र, सुनावणी न होताच झाडे तोडली गेली. आता रस्त्याचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे सध्या तरी वृक्षतोड थांबलेली आहे. पुढचा राहिलेला ४५० मीटरचा रस्ता होईल तेव्हा होईल, पण जेव्हा होईल तेव्हा आणखी किती झाडे पडतील हे सांगता येणे कठीण आहे. 

रस्त्याच्या बांधकामामुळे इथल्या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अडथळा आला आहे. त्यात भर म्हणून पक्षी ज्या कारणामुळे इथे येतात, तो गोड्या पाण्याचा झराच गेल्या काही महिन्यांपासून नाहीसा होत चालला आहे. पक्षीतज्ज्ञ धर्मराज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, बांधकामाचा राडारोडा आणि इतर घाण झऱ्यामध्ये पडत असल्यामुळे झऱ्याची रयाच गेली आहे. त्यामुळे काही पाणपक्ष्यांनी इथे येणेच बंद केले आहे. इथे येणाऱ्या एकूण पक्षी प्रजातींपैकी ९० टक्के प्रजाती पाणपक्ष्यांच्या आहेत. म्हणूनच हा झरा खंड्या (किंगफिशर), नाचण (व्हाइट-स्पॉटेड फॅनटेल), टिकलचा नाचला (टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर) यांसारख्या स्थानिक, तसेच लालकंठी नाचरा (रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर) आणि तुतारी (कॉमन सॅंडपायपर) यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी फारच महत्त्वाचा होता. इथे येणारा चित्रबलाक पक्षी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेच्या लाल यादीमध्ये ‘निअर थ्रेटंड’ या विभागामध्ये समाविष्ट आहे. जोपर्यंत झाडे होती, तोपर्यंत झराही छान वाहात होता आणि पक्षीही येत होते. ‘झऱ्याची दूरवस्था गेल्या चार-सहा महिन्यांमध्येच झाली आहे. त्याचे दूरगामी परिणाम हळूहळू स्पष्ट होत जातील,’ असे धर्मराज पाटील यांनी सांगितले. 

सरकारी कागदपत्रांमध्ये जरी हे उद्यान असले, तरी याला कोणी वालीच नाही. इथे कुंपण नाही, फाटक नाही, कोणाचे नियंत्रण नाही नि कोणतीही संरक्षक सुविधाही नाही. उद्यानाचा नामफलकही अलीकडेच लावण्यात आला आहे. इतके दिवस तोही नव्हता. त्यामुळेच ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ असलेल्या या प्रदेशात कोणीही येते आणि कचरा करून जाते. तो उचलला जात नाही. जवळच स्मशानभूमी असल्यामुळे तिथला कचराही नदीपात्रात येतो. हा कचरा साफसूफ करण्याचे काम ‘जीवित नदी संस्था’ लवकरच सुरू करणार आहे. सुदैवाने त्यांना ‘घनकचरा प्राधिकरणा’ची साथ मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे. 

या सगळ्यामध्ये आणखी एका समस्येची भर पडणार आहे. ती म्हणजे, महा-मेट्रो. वनाज-रामवाडी मेट्रोचा मार्गही उद्यानामधूनच आखण्यात आला आहे. वनाज-रामवाडी मेट्रोचा मूळ मार्ग नगर रस्त्यावरून आगाखान पॅलेसवरून जात होता. मात्र, आगाखान पॅलेस राष्ट्रीय स्मारक असल्यामुळे या मार्गावर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून हरकत घेण्यात आली. कारण, राष्ट्रीय स्मारकाच्या १०० मीटर परिसरामध्ये अशा प्रकारच्या बांधकामास बंदी असते. त्यामुळे मेट्रोचा मार्ग कल्याणीनगर-रामवाडीमार्गे वळविण्यात आला आहे. याला अर्थातच निसर्गप्रेमींकडून आणि कल्याणीनगरमधील रहिवाशांकडूनही विरोध होतो आहे. हरित पट्ट्याच्या क्षेत्रात मेट्रोसाठी भुयारी मार्ग असावा, अशीही मागणी होत आहे. मेट्रो अधिकारी म्हणतात, ‘आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. मेट्रोला या नवीन मार्गासाठी साधारण २०० कोटी जास्त मोजावे लागणार आहेत. १०० मीटर मोजताना मूळ स्मारकापासून न मोजता वाहनतळापासून मोजले आहे. त्यामुळे मूळ स्मारकापासून मोजल्यास हे अंतर १०० मीटरपेक्षा अधिक भरेल आणि मेट्रो मूळ मार्गावर हलवता येईल.’ असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

उद्यानातील या सगळ्या घडामोडींना निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, स्थानिक नागरिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यासाठी चळवळच उभी राहते आहे. धर्मराज पाटील यांचा ‘सेव्ह डॉ. सलीम अली बर्ड सॅंक्‍च्युअरी ग्रुप’, ‘फ्रेंड्‌स ऑफ डॉ. सलीम अली बर्ड सॅंक्‍च्युअरी’, ‘रेसिडेंट्‌स ऑफ कल्याणीनगर’, ‘स्वच्छ कल्याणीनगर’, ‘जीवित नदी’ या सर्व संस्था गेले कित्येक महिने उद्यानांमध्ये घडत असलेल्या सर्व प्रकारांना विरोध करीत आहेत. बर्ड वॉक, मानवी साखळ्या यांसारख्या कार्यक्रमांमधून अधिकाधिक लोकांपर्यंत उद्यानाचे महत्त्व पोचवत आहेत, जेणेकरून आणखी लोक यामध्ये सहभागी होतील. याशिवाय जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. 

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यामध्ये आतापर्यंत पर्यावरणाचे महत्त्व आणि गरज डोळ्यासमोर न ठेवता झाडांवर बिनबोभाट कुऱ्हाड चालवली गेली. यामुळे तिथल्या जैवविविधतेचे भरून न निघणारे नुकसान नक्कीच झाले आहे. अजून निम्मा रस्ता व्हायचा बाकी आहे. रस्ता झालेल्या पट्ट्यामध्ये अतिक्रमणे होऊ लागली आहेत. मेट्रोच्या कामाची तर सुरुवातही नाही. पण, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का? खरे तर अजूनही वेळ गेलेली नाही. पुढचे काम करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्राधान्याने काळजी घेणे आवश्‍यक आहे आणि हे सरकारलाच करावे लागेल. पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनाबाबतीत सरकार अतिशय उदासीन असल्याचा आरोप वारंवार होतो. लोकांच्या लेखी सरकारची ही प्रतिमा बदलायला हवी. तर, पर्यावरणप्रेमींचा विकासाला नेहमीच विरोध असतो, असा गंभीर आरोप पर्यावरणाची कदर करणाऱ्यांवर होत असतो. तेही चुकीचे आहे. नेहमीच परिस्थिती अशी नसते. विकासाशिवाय प्रगती नाही, हे जरी खरे असले, तरी पर्यावरण संवर्धनाशिवाय निरोगी आयुष्य नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रगती साधताना विकास आणि पर्यावरण संवर्धन यांना बरोबरीने प्राधान्य का असू नये? मध्यम मार्गाचा विचार होणे अत्यंत आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या