झटपट चटण्या व कोशिंबिरी... 

दीपाली चांद्रायण, नागपूर 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
रोजच्या जेवणात पंचपक्वान्न असले तरीही तोंडी लावायला मात्र चटणी किंवा कोशिंबीर लागतेच. यातही नेहमी एकाच प्रकारची चटणी, कोशिंबीर न करता जरा वेगळ्या किंवा हटके पद्धतीने ती केली, तर सर्वांना नक्कीच आवडेल... अशाच चटण्या आणि कोशिंबीरीच्या काही रेसिपीज...

कोथिंबीर चटणी  
साहित्य : एक वाटी स्वच्छ धुऊन कापलेली कोथिंबीर, १०-१२ लसूण पाकळ्या, ३-४ चमचे तिखट, एक चमचा जिरे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट, आवश्‍यकतेनुसार मीठ आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम मिक्‍सरच्या भांड्यात लसूण, तिखट, मीठ, जिरे बारीक करून घ्यावे. नंतर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा बारीक करावे. मिश्रण एकजीव करून एका भांड्यात काढावे. त्यात शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करावे. वरून गरम जिरे मोहरी घालून केलेली फोडणी घालावी. पराठे, थालीपिठाबरोबर किंवा पोळीबरोबरही छान लागते. 


कढीपत्ता चटणी  
साहित्य : तीन वाट्या स्वच्छ धुऊन सुकलेली कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी भाजलेले तीळ, २-३ चमचे जिरे, आवश्‍यकतेनुसार तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर आणि तेल 
कृती : प्रथम गॅसवर कढईत १-२ चमचे तेलावर कढीपत्त्याची पाने कोरडी होईपर्यंत परतून घ्यावीत. नंतर थोडी थंड झाल्यावर मिक्‍सरमधून बारीक करून एका भांड्यात काढून घ्यावी. आता भाजलेले तीळ, जिरे, तिखट, मीठ, साखर, आमचूर पावडर घालून बारीक करावे. सर्व मिश्रण एकत्र करून पुन्हा बारीक करावे. वाटल्यास थोडे तेल गरम करून त्यात घालावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावे. पोळीबरोबर किंवा रोल करून फारच सुंदर टेस्टी होते. 


कांदा कैरी चटणी 
साहित्य : दोन वाट्या कांद्याच्या चिरलेल्या फोडी, अर्धी वाटी कैरीचा कीस, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, गरजेनुसार तिखट, मीठ, जिरे, साखर आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : कांद्याच्या फोडी, कैरीचा कीस, जिरे, तिखट, मीठ, साखर घालून मिश्रण मिक्‍सरमधून जाडसर फिरवून घ्यावे. एका भांड्यात काढून त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करावे. नंतर वरून जिरे-मोहरीची फोडणी घालावी. आंबूस गोड चवीची चटणी चविष्ट लागते. 


गाजराची कुरकुरीत चटणी  
साहित्य : दोन वाट्या गाजराचा वाळवलेला कीस, आवश्‍यकतेनुसार तिखट, मीठ, साखर, आमचूर पावडर, तेल 
कृती : प्रथम गॅसवर कढईत २-३ चमचे तेल गरम झाल्यावर गाजराचा कीस घालून परतून घ्यावा. वाळलेला असल्याने लवकर कोरडा होतो. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, साखर, आमचूर पावडर घालून परतून घ्यावे आणि सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावे. ही चटणी मस्त कुरकुरीत आंबूस गोड चविष्ट होते. 


सिमला मिरची चटणी  
साहित्य : प्रत्येकी एक वाटी सिमला मिरची आणि कांद्याचे पातळ बारीक काप, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, गरजेनुसार तेल, तिखट, मीठ, हळद, जिरे, धने पावडर 
कृती : प्रथम गॅसवर कढईत २-३ चमचे तेल घालून गरम झाल्यावर त्यात कांदा व सिमला मिरचीचे काप घालून परतून घ्यावे. कोरडे होईपर्यंत परतावे. नंतर हळद, मीठ, तिखट, धने-जिरे पावडर घालून परतावे. सर्वांत शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा परतावे व सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावे. एकदम वेगळी पण छान चव लागते. 


कांद्याची मेतकूट कोशिंबीर  
साहित्य : एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा, ४-५ चमचे मेतकूट, कोंथिबीर, गरजेनुसार मीठ, साखर, एक वाटी गोड दही आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : एका बाऊलमध्ये कांदा, मेतकूट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर घालून दह्यात हे मिश्रण कालवावे. त्यावर हिंग, जिरे, मोहरी, हळद घालून केलेली फोडणी घालावी. वेगळ्या चवीची कोशिंबीर तयार. 


कांद्याची लाल कोशिंबीर  
साहित्य : एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर, आवश्‍यकतेनुसार फोडणीचे साहित्य. 
कृती : एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून गरजेनुसार तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. मिश्रण एकजीव करून त्यावर जिरे-मोहरीची फोडणी द्यावी आणि सर्व्ह करावी. 


पत्ताकोबी-कांदा कोशिंबीर  
साहित्य : एक वाटी किसलेला पत्ताकोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, १ वाटी दही, १-२ मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, गरजेनुसार मीठ, साखर आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : एका बाऊलमध्ये पत्ताकोबीचा कीस, कांदा, दही, साखर, मीठ, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यावर जिरे, मोहरी, हिंग, किंचित हळद घालून फोडणी करावी. सर्व्ह करायला कोशिंबीर तयार 


काकडी-डाळ कोशिंबीर 
साहित्य : दोन वाट्या साल काढून बारीक केलेले काकडीचे उभे पातळ काप, अर्धी वाटी भिजवून बारीक केलेली चना डाळ, २-३ मिरचीचे तुकडे, कोंथिबीर, लिंबाचा रस, मीठ, साखर, फोडणीचे  
साहित्य. 
कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये काकडीचे काप, कोथिंबीर, बारीक केलेली चना डाळ, गरजेनुसार मीठ, साखर, लिंबूरस व कोथिंबीर घालावी. त्यावर हिंग, जिरे, हळद, कढीपत्ता घालून तयार केलेली फोडणी घालावी. वेगळ्या प्रकारची काकडीची कोशिंबीर हटके लागते. 


पत्ताकोबी-गाजर-सिमला मिरची कोशिंबीर 
साहित्य : एक वाटी किसलेला पत्ताकोबी, अर्धी वाटी गाजराचा कीस, पाव वाटी सिमला मिरचीचा कीस अथवा बारीक काप चिरलेली कोशिंबीर, गरजेनुसार मीठ, साखर, लिंबूरस आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम एका बाऊलमध्ये पत्ताकोबी, गाजर आणि सिमला मिरचीचा कीस एकत्र करून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, साखर, लिंबूरस घालावा. हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करून मिश्रण एकत्र करावे. वरून कोथिंबीर घालावी.


कलरफूल कोशिंबीर 
साहित्य : प्रत्येकी अर्धी वाटी लाल, हिरवी, पिवळी, सिमला मिरची, गाजर, कांदा यांचे उभे पातळ काप, अर्धी वाटी कांद्याची चिरलेली पात, स्वीट बेबीकॉर्नचे बारीक तुकडे, अर्धी वाटी मशरूम आणि ब्रोकोलीचे बारीक काप, २-३ हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबूरस, गरजेनुसार मीठ, तेल, मिरेपूड आणि चाट मसाला 
कृती : गॅसवर कढईत २ चमचे तेल घालून गरम झाल्यावर गाजर, ब्रोकोली, स्वीटकॉर्न घालावे. झाकून मंद गॅसवर एक वाफ आणावी. नंतर त्यात बाकी सर्व काप - कांदा, कांद्याची पात, मशरूम, सिमला मिरची घालून हालवावे व झाकून पुन्हा एक वाफ आणावी. गरजेनुसार मीठ, लिंबूरस घालावा. मिरेपूड, चाट मसाला घालून एकत्र मिश्रण हालवावे आणि बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे. 


सफरचंद-डाळींब-केळाची कोशिंबीर  
साहित्य : एक वाटी सफरचंदाचे लहान काप, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, १ वाटी गोड दही, एका केळाचे काप, मीठ, साखर 
कृती : एका बाऊलमध्ये सफरचंदाचे काप, डाळिंबाचे दाणे आणि केळाचे काप एकत्र करून घ्यावे. त्यात गोड दही, गरजेनुसार मीठ व साखर घालून एकत्र करावे. (आवडत असल्यास चाट मसाला घालावा) 


कॉर्न अॅंड पीज कोशिंबीर  
साहित्य : एक वाटी मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी मटार, मेवोनीज सॉस, ओरीगॅनो पावडर, आवश्‍यकतेनुसार तेल, मीठ 
कृती : गॅसवर कढईत थोडे तेल घालून कॉर्न (मक्‍याचे दाणे) वाफवून घ्यावे. नंतर मटार घालून पुन्हा एकदा वाफवावे. थोडे थंड झाल्यावर आवश्‍यकतेनुसार मेवोनीज सॉस, ओरीगॅनो पावडर, मीठ घालून मिश्रण एकत्र करावे. बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे. 


सॅंडवीच चटणी  
साहित्य : पाच-सहा मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, भाजलेल्या डाळ्या, ८-१० लसूण पाकळ्या, मीठ, जिरे, आवडत असल्यास पुदिना 
कृती : डाळ्याची पावडर करून घ्यावी. मिरचीचे तुकडे, जिरे, मीठ, कोथिंबीर, लसूण सर्व एकत्र मिक्‍सरमधून बारीक करावे. डाळ्याची पावडर घालून पुन्हा एकदा मिश्रण बारीक करावे. गरजेनुसार थोडे पाणी घालून एकजीव करावे आणि सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावे.

संबंधित बातम्या