खमंग पराठे

आरती पागे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

पोळी-भाजी हा आपला रोजचा आहार असतो. कधीतरी त्यात चवबदल पाहिजेच; खाणाऱ्यांनाही आणि करणाऱ्यांनाही! त्यासाठीच पराठ्यांच्या या काही आगळ्या-वेगळ्या रेसिपीज...

हिरवे मूग आणि कांद्याच्या पातीचा पराठा 
साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, १ छोटा चमचा तूप, चवीनुसार मीठ. 
सारणासाठी : तीन मोठे चमचे हिरवे मूग (३ तास भिजवून उकडलेले), पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात (कांदे आणि पात दोन्ही घ्यावे), १ छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ. 
कृती : गव्हाचे पीठ, तूप आणि मीठ एकत्र करून पाणी घालून पीठ मळावे. मळलेल्या पिठाचे ६ समान भाग करावेत. सारणाचे ६ समान भाग करावेत. पिठाच्या गोळ्याचा पराठा लाटून घ्यावा. मध्यभागी सारण ठेवून पराठा सर्व बाजूंनी गोळा करून बंद करावा. नंतर तो गोळा पुन्हा लाटावा. तव्यावर तेल घालून सोनेरी रंग येईपर्यंत पराठे भाजावेत व दह्याबरोबर सर्व्ह करावेत.

चीज पनीर पराठा 
साहित्य : सव्वा वाटी गव्हाचे पीठ, तूप (पराठा भाजण्यासाठी), पाणी, चवीनुसार मीठ.
सारणासाठी : अर्धी वाटी किसलेले चीज, १ वाटी किसलेले पनीर, पाव वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड छोटे चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा लसूण पेस्ट, अर्धा छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ.
कृती : गव्हाचे पीठ मळून घ्यावे आणि १५ मिनिटे बाजूला ठेवावे. सारणासाठीचे सर्व साहित्य एकत्र करावे. मळलेल्या पिठाचे आणि सारणाचे ६ समान भाग करून घ्यावेत. पिठाच्या गोळ्याचा मध्यम आकाराचा पराठा लाटून घ्यावा. त्यात मध्यभागी सारण ठेवावे. पराठ्याची घडी घालून पुन्हा लाटून घ्यावे. तव्यावर तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. पराठा गरमगरम सर्व्ह करावा.

राजगिरा पराठा 
साहित्य : एक वाटी राजगिरा पीठ, पाव वाटी उकडून साल काढून कुस्करलेला बटाटा, २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा मिरपूड, तेल, पाणी, चवीनुसार मीठ.
कृती : राजगिरा पिठामध्ये बटाटा, मिरपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे ४ समान गोळे करावेत. गोळे लाटून पराठे करावेत व दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर भाजून घ्यावे. हिरवी चटणी किंवा दह्याबरोबर गरमागरम पराठा सर्व्ह करावा.

चॉकलेट चीज पराठा
साहित्य : अर्धी वाटी गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ, पराठे भाजण्यासाठी तूप. 
सारणासाठी : पाऊण वाटी किसलेले डार्क चॉकलेट, ५ मोठे चमचे किसलेले प्रोसेस्ड चीज. 
कृती : चॉकलेट आणि चीज एका भांड्यात एकत्र करावे. मिश्रण चांगले एकजीव करून त्याचे ४ समान भाग करावेत. गव्हाचे पीठ मळून त्याचे ४ छोटे गोळे करावेत. गोळ्याचा पराठा लाटावा. मध्यभागी सारण ठेवून समोरासमोरील बाजूची घडी घालून पुन्हा लाटावे. तव्यावर तूप घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे व गरमगरम सर्व्ह करावे.

चवळीच्या पानांचा (अमरनाथ) पराठा 
साहित्य : एक वाटी बारीक चिरलेली चवळीची (अमरनाथ) पाने, गव्हाचे पीठ, पाव छोटा चमचा लसूण पेस्ट, अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेली मिरची, अर्धा छोटा चमचा तेल (परतण्यासाठी), पराठे भाजण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चवळीची पाने परतावीत. नंतर मिक्सरमध्ये पाव वाटी पाणी घालून वाटावे. हे वाटण आणि बाकीचे साहित्य गव्हाच्या पिठात घालून पीठ मळावे. मळलेल्या पिठाचे ५ सारखे भाग करावेत. गोळ्याचा पराठा लाटावा. मग त्याची सुरळी करून पुन्हा लाटून घ्यावा. तेलावर सोनेरी रंग येईपर्यंत भाजावा आणि गरमगरम सर्व्ह करावा.

केळीचा पराठा
साहित्य : दीड वाटी चिरलेली केळी, दीड वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी गूळ (जाडसर चिरलेला), अर्धा छोटा चमचा वेलची पूड, पराठे भाजण्यासाठी तूप. 
कृती : केळी, गूळ, वेलची पूड, पाव वाटी पाणी आणि मीठ एका पॅनमध्ये एकत्र करून मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे. शिजवताना अधूनमधून ढवळावे. शिजलेले मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड मिश्रण आणि गव्हाचे पीठ एकत्र करून पाणी घालून मऊसर मळावे. पिठाचे आठ समान गोळे करावेत. प्रत्येक गोळा मध्यम आकाराचा लाटून तव्यावर तूप सोडून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. गरम गरम सर्व्ह करावे.

पनीर लिफाफा पराठा 
साहित्य : दोन वाट्या मैदा, १ वाटी दूध, १ मोठा चमचा तूप, चवीनुसार मीठ, पराठा भाजण्यासाठी बटर.
सारणासाठी : दोन वाट्या किसलेले पनीर, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेला पुदिना, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, १ छोटा चमचा लिंबाचा रस, १ छोटा चमचा साखर, १ छोटा चमचा वाटलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ.
कृती : सारणाचे ८ सारखे भाग करून घ्यावेत. मैदा, दूध, तूप आणि मीठ एकत्र करून मऊसर मळून घ्यावे. पिठाचे ८ समान भाग करून घ्यावेत. पिठाचा गोळा लाटून घ्यावा. त्यात मध्यभागी सारण ठेवावे. समोरासमोरील बाजूची घडी घालून लिफाफा करावा. स्टफिंग सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करावे. तव्यावर बटरमध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे आणि गरमगरम सर्व्ह करावे.

स्टफ्ड बाजरी पराठा 
साहित्य : प्रत्येकी २ वाट्या बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ, पराठा भाजण्यासाठी बटर. 
सारणासाठी : अर्धी वाटी बारीक चिरलेली चवळी, अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग, १ छोटा चमचा तेल, चवीनुसार मीठ.
कृती : बाजरी आणि गव्हाचे पीठ, तेल आणि मीठ एकत्र करून गरम पाणी घालून मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे ८ समान भाग करावेत. प्रत्येक गोळ्याचे मध्यम आकाराचे पराठे लाटून त्यात सारण भरून नीट बंद करावे. पुन्हा लाटून तव्यावर बटर घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे व गरम गरम सर्व्ह करावे. 

सातधान पराठा 
साहित्य : प्रत्येकी ३ मोठे चमचे गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, नाचणीचे पीठ, मक्याचे पीठ, प्रत्येकी २ मोठे चमचे बेसन, तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा लसूण पेस्ट, अर्धा छोटा चमचा हळद, दीड छोटा चमचा तिखट, अर्धी वाटी किसलेला दुधी भोपळा, अर्धी वाटी किसलेले गाजर, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ मोठे चमचे दही, १ छोटा चमचा तेल, चवीनुसार मीठ.
कृती : सर्व पिठे, लसूण पेस्ट, हळद, तिखट, भोपळा, गाजर, कोथिंबीर आणि दही एकत्र करून पीठ मळावे. मळलेल्या पिठाचे १० समान भाग करावेत. तव्यावर तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे व गरमगरम पराठे सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या