कोशिंबीर व चटण्या 

मंगला गांधी, सोलापूर
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

जेवणाचे ताट कसे भरगच्च असावे. डावी बाजू, उजवी बाजू भरलेली असावी. डाव्या बाजूसाठी या काही कोशिंबिरी, चटण्यांचा पाककृती...

१) चण्याची डाळ व काकडीची कोशिंबीर 
साहित्य ः अर्धी वाटी चण्याची डाळ, ३ लहान आकाराच्या काकड्या, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर फोडणी. 
कृती ः अर्धी वाटी डाळ ४ तास भिजत घाला. नंतर पाण्यातून निथळून काढा व मिक्‍सरला ओबडधोबड वाटून घ्या. त्यात लहान आकाराच्या काकड्या बारीक चिरून घाला. वरून फोडणी तेल, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. ही फोडणी डाळ व काकडीवर ओता. त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला. चवदार कोशिंबीर तयार. 

२) तोंडल्याची कोशिंबीर 
साहित्य ः ७०० ग्रॅम तोंडली, ६ टीस्पून दाण्याचा कूट, ४ टीस्पून नारळाचा चव, १ मोठ्या लिंबाचा रस, मीठ, साखर चवीनुसार, २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद. 
कृती ः तोंडली धुवून स्वच्छ करावीत. मिठाच्या पाण्यात तोंडली किसावी व पाण्यातून किस पिळून काढून घ्यावा. म्हणजे तोंडल्याचा चीक निघून जातो. दाण्याचे कूट, कोथिंबीर बारीक चिरून, नारळाचा चव घालावा, लिंबाचा रस न घालता दही घातले तरी चालेल. वरून तेल, हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता फोडणीत घाला व कोशिंबीर ओता. फोडणीत हळद घाला रंग छान येतो. ही कोशिंबीर काकडीच्या कोशिंबिरीप्रमाणे चांगली लागते. 

३) कोबीची कोशिंबीर (पचडी) 
साहित्य ः हा बंगाली पदार्थ आहे. पानकोबी किसून घ्या. त्यात शेंगदाण्याचे कूट, मीठ, साखर घाला. वरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा व कोशिंबिरीवर घाला. आता लिंबू पिळा व कोथिंबीर घालून छान एकत्र करा. चवदार कोशिंबीर तयार. 

४) हुरड्याची कोशिंबीर 
साहित्य ः १ वाटी हुरडा, पाव वाटी नारळाचा चव, १ चमचा मिरची+लसूण याचे वाटण, साखर, मीठ स्वादानुसार. 
कृती ः हुरडा उकडून घ्या व बाऊलमध्ये काढा. त्यात नारळाचा चव, मिरची+लसूण याचे वाटण, १ चमचा साखर, मीठ घाला व एकत्र करून घ्या. हुरडा ओला असेल तर उकडायची गरज नाही, निबर असेल तर मात्र उकडून घ्यावा लागेल. 

५) बिटाची कोशिंबीर ः 
साहित्य ः साल काढून बीट उकडून घ्या. नंतर किसा. त्यात अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग घाला. वरून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा व त्यावर ओता. त्यात २ ते ३ मोठे चमचे घट्ट दही घाला. चवीपुरते मीठ व साखर घाला. एकत्र करा व कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

६) कांद्याची चटणी 
 साहित्य ः २ कांदे, ८ ते १० लसूण पाकळ्या, अर्धी वाटी दाण्याचे कूट, ४ चमचे लाल तिखट, २ मिरी, चवीपुरते मीठ. 
कृती ः २ कांदे भाजून घ्या. साल काढून बारीक चिरून मिक्‍सरमध्ये टाका. ८ ते १० लसूण पाकळ्या, दाण्याचे कूट, मिरी, लाल तिखट व मीठ घालून मिक्‍सरमधून वाटा. ही चटणी अतिशय झणझणीत लागते. 

७) भोपळ्याच्या सालीची चटणी 
साहित्य ः १ वाटी भोपळ्याची साल, १ टेबलस्पून सुक्‍या खोबऱ्याचा किस, ४ ते ५ सुक्‍या लाल मिरच्या, १ टीस्पून धने+जिरे, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ. 
कृती ः भोपळ्याची साल थोड्या तेलावर परतून घ्या. सुक्‍या खोबऱ्याचा किस तेल न घालता परतून घ्या. ४ ते ५ सुक्‍या लाल मिरच्या, धने, जिरे, सुक्‍या खोबऱ्याचा किस व भोपळ्याची साल मीठ घालून मिक्‍सरमधून वाटून घ्या. वरून तेलाची मोहरी, हिंग घालून फोडणी चटणीवर ओता. एकत्र कालवून सर्व्ह करा. 
टीप ः लाल मिरच्यांऐवजी हिरव्या मिरच्या घालू शकता, तसेच दोडक्‍याच्या सालीचीही अशाच पद्धतीने चटणी बनवू शकतो. 

८) कच्च्या टोमॅटोची चटणी 
साहित्य ः ३ मोठे हिरवे (कच्चे) टोमॅटो, पाव वाटी भाजलेले तीळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, १ टेबलस्पून तेल. 
कृती ः प्रथम थोड्या तेलावर मिरच्या परता. नंतर टोमॅटोच्या फोडी थोडेसे तेल घालून परता. आता मिक्‍सरमधून जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या, तीळ व टोमॅटोच्या फोडी कोथिंबीर घालून वाटा व बाऊलमध्ये काढा. वरून तेल गरम करून हिंग घाला व ही फोडणी चटणीवर ओता. वरून थोडी कोथिंबीर टाका. 

९) खजुराची चटणी 
साहित्य व कृती ः १ वाटी बिया काढलेला खजूर, लहान लिंबाएवढी चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढा. त्यात खजूर वाटावा. २ टेबलस्पून तेलाची फोडणी करा. फोडणी खाली उतरल्यावर २ टीस्पून तिखट घाला. फोडणी गार झाल्यावर चटणीवर ओता. चवीनुसार मीठ घाला. 
टीप ः हळद घालू नका. 

१०) चिंचेची चटणी 
साहित्य ः १ वाटी चिंच, दीड वाटी गूळ, १ टीस्पून अर्धवट कुटलेले जिरे, १ चमचा लाल तिखट, मीठ स्वादानुसार. 
कृती ः चिंच कोमट पाण्यात भिजवा. नंतर मिक्‍सरमधून वाटून पिठाच्या चाळणीने चाळा. गाळलेल्या गरात लाल तिखट, मीठ, गूळ घाला. ही चटणी गॅसवर शिजत ठेवा. तिला चकाकी येईपर्यंत शिजवा. गॅस बंद करून ओबडधोबड कुटलेली जिरे पावडर घाला. छान कालवा. ही चटणी ८ ते १० दिवस आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवल्यास १ महिना ते दीड महिना टिकेल.

संबंधित बातम्या