मलई बर्फी, चॉकलेट फज

मुग्धा बापट
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

यंदा दिवाळीमध्ये दर वर्षी सारखी नातेवाईक-आप्तेष्टांची घरी ये-जा होणार नसली, तरी सण साजरा होणारच आहे... आणि सणवार म्हटले, की गोडधोड, मिठाई हवीच! त्यासाठीच घरच्या घरी करता येतील अशा पदार्थांच्या काही रेसिपीज...

पंचम लाडू 
साहित्य : दोन वाट्या कणीक, दीड वाटी नाचणी पीठ, १ वाटी सोयाबीन पीठ, १ वाटी तांदूळ पीठ, दीड वाटी खजूर बारीक करून, दीड वाटी गूळ बारीक चिरून, वेलची पूड, २ चमचे मगज बी, २ वाट्या साजूक तूप.
कृती : एक वाटी तूप कढईत घेऊन वरील सर्व पिठे एकत्र मंद आचेवर खमंग भाजावीत. नंतर पिठे थोडी कोमट झाली, की त्यात खजूर व गूळ घालून एकत्र करावे. मिक्सरमधून हलकेच फिरवून एकजीव करावे. वरून थोडे तूप, वेलची पूड, मगज बी घालावी व हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत. मधुमेह असणाऱ्यांनाही हे लाडू खाता येतील.

खजूर रोल  
साहित्य : दोनशे ग्रॅम खजूर, १ चमचा लोणी, ७-८ काजू, ७-८ बदाम, ७-८ पिस्ते, १-२ चमचे खसखस.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये बिया काढून खजूर गरम करून घ्यावा. खजूर छान गरम झाला, की लोणी घालून गोळा होईपर्यंत हलवावा. त्यात ड्रायफ्रूट्स घालावेत. ओट्यावर खसखस पसरून खजुराचा रोल करावा. तयार रोल फ्रीजमध्ये ठेवावा व गार झाल्यावरच काप करावेत.लोण्याऐवजी तूप घालू शकतो. खसखस नको असेल तर सुक्या खोबऱ्यावर रोल करावा. दोन मोठे चमचे मिल्कमेड घालूनही खजूर रोल करता येतो. फक्त खजूर व मिल्कमेड एकाच वेळी गरम करावयास ठेवावे. खजुराचा गोळा कोरडा होत असेल तर लोणी घालावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच करावी.

रव्याच्या गोड पुऱ्या 
साहित्य : अर्धा कप साखर, अर्धी वाटी बारीक रवा, १ वाटी दूध, बदामाची पूड, चमचाभर तूप, तळायला तेल. 
कृती : कोरडा रवा दोन-तीन मिनिटे भाजून घ्यावा. त्यात थोडे थोडे दूध घालत मंद आचेवर गोळा होईपर्यंत (५ मिनिटे) हलवावे. गुठळी होता कामा नये. पॅनमधून गोळा सुटू लागला, की गॅस बंद करावा. नंतर कोमट झाल्यावर तुपाचा हात घेऊन नीट मऊ मळावे. त्यात बदाम पावडर घालावी व त्याच्या जाड जाड पुऱ्या लाटाव्यात. मध्यम आचेवर खमंग तळाव्यात. साखरेचा पाक करावा. पाक मधासारखा चिकट झाला पाहिजे, एक-दोन तारी नसावा. पाक कोमट असताना पुऱ्या त्यात सोडाव्यात. अर्धा तास पाकात ठेवून सर्व्ह कराव्यात. या पुऱ्या १५ दिवस टिकतात.

सोयाबीन लाडू  
साहित्य : एक वाटी सोयाबीन, १ वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे, दीड वाटी गूळ.
कृती : सोयाबीन, कणीक, तीळ, शेंगदाणे मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. सोयाबीनची बारीक पूड करावी. शेंगदाणे व तीळ यांची जाडसर पूड करावी. सर्व मिश्रण एकत्र करावे. गूळ बारीक करून घालावा. वरून २-३ चमचे कोमट पाणी घालावे. सर्व एकजीव झाल्यावर लहान आकाराचे लाडू वळावेत.

मलई बर्फी 
साहित्य : चारशे ग्रॅम मिल्कमेड, ५०० ग्रॅम पनीर, २ मोठे चमचे मिल्क पावडर, १ छोटा चमचा वेलची पूड, बदाम पिस्ता काप.
कृती : पनीर किसून घ्यावे. त्यात मिल्क पावडर, मिल्कमेड घालून एकत्र करावे. मिश्रण भांड्यात घेऊन गॅसवर ठेवावे. मिश्रण कडेने सुटू लागले, की (पाण्याचा अंश गेला की) गॅस बंद करावा. मग वेलची पूड घालावी. सेट करायला ठेवावे. वरून बदाम पिस्त्याचे काप लावावेत. गार झाले की वड्या पाडाव्यात.

चॉकलेट फज  
साहित्य : चारशे ग्रॅम मिल्कमेड, ६ छोटे चमचे कोको पावडर, १०० ग्रॅम अमूल बटर, २ मोठे चमचे दूध, अर्धा कप काजू, अक्रोड तुकडे.
कृती : मिल्कमेड, कोको पावडर, बटर, दूध एकत्र करून गॅसवर ठेवावे. कडेने मिश्रण सुटू लागले की गॅस बंद करून ड्रायफ्रूट्स घालावेत. मिश्रण थाळीत सेट करायला ठेवावे. गार झाले की वड्या पाडाव्यात.

फुलाचे चिरोटे
साहित्य : एक वाटी रवा, १ वाटी मैदा, खाण्याचे रंग - पिवळा, गुलाबी, हिरवा, ४ चमचे तूप, कॉर्नफ्लोअर, तेल, २ वाटी साखरेचा दोन तारी पाक.
कृती : चार चमचे तुपाचे मोहन घालून रवा व मैदा, घट्ट भिजवून दोन तास ठेवावा. दोन तासांनी पीठ कुटून त्याचे सात भाग करावेत. दोन भागांत हिरवा रंग, चार भागांत गुलाबी रंग व एका भागात पिवळा रंग मिक्स करून घ्यावा. ताटात कॉर्नफ्लोअर फेसून घ्यावे. सात भागांच्या वेगवेगळ्या पातळ पोळ्या लाटाव्यात. प्रथम पिवळी पोळी घेऊन त्यावर एकसारखे कॉर्नफ्लोअर लावून त्याची घट्ट वळकटी करावी. नंतर गुलाबी पोळी घेऊन त्यावर कॉर्नफ्लोअर एकसारखे लावून त्यावर पिवळी वळकटी ठेवून दोन्हीची वळकटी करावी. याप्रमाणे चारही गुलाबी पोळ्यांची वळकटी करावी. नंतर दोन हिरव्या पोळ्या घेऊन त्यांना कॉर्नफ्लोअर लावून गुलाबी वळकटी त्यावर ठेवून सगळ्या सात पोळ्यांची घट्ट वळकटी करावी. वळकटीचे पाऊण इंचाचे तुकडे कापावेत. एक तुकडा घेऊन कापलेल्या दिशेने पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने जाड पुरीएवढा लाटावा आणि मंद विस्तवावर तळावे. तळलेले चिरोटे दोन तारी साखरेच्या पाकातून हलक्या हाताने बुडवून काढावेत. पाक गरम असावा.

मिल्कमेड खरवस  
मिल्कमेड कृती व साहित्य : अर्धा लिटर दुधाचे पाव लिटर दूध करावे. थंड झाले की त्यातील थोडे दूध बाजूला ठेऊन त्यात दोन छोटे चमचे कॉर्नफ्लोअर घालून एक उकळी आणावी. गार झाले की मिक्सरमध्ये फिरवावे. जितके दूध असेल तितकी साखर घालून तार येईपर्यंत उकळावे. थंड झाले की बंद डब्यात भरून ठेवावे. भरपूर दिवस टिकते. 

खरवस 
साहित्य : एक वाटी निरसे दूध, १ वाटी मिल्कमेड, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, १ वाटी घट्ट पाणी नसलेले दही, वेलची पूड किंवा दुधाचा मसाला.
कृती : एका भांड्यात दूध, मिल्कमेड, मिल्क पावडर, दही सगळे एकत्र करून ग्राइंडरने नीट एकत्र करावे. कुकरमध्ये पाणी घालून २० मिनिटे शिट्टी न लावता वाफवावे. कुकरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर वेलची पूड किंवा दुधाचा मसाला घालावा. थंड झाले की सर्व्ह करावे.

पाकातले चिरोटे 
साहित्य : तीन वाट्या मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, १ मोठा चमचा तूप, अर्धी वाटी तांदुळाची पिठी, पाव वाटी मोहनासाठी तेल, चवीपुरते मीठ, तळायला तेल, २ वाट्या साखर.
कृती : रवा, मैदा, मीठ व गरम केलेले तेल घालून पीठ घट्ट मळून अर्धा तास ठेवावे. पोळीला लावायला साटा तयार करावा. तूप थोडे गरम करून त्यात तांदूळ पिठी घालून हाताने एकसारखे मळून घ्यावे. तयार केलेल्या पिठाचे दोन भाग करून दोन पोळ्या लाटाव्यात. एका पोळीला साटे लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी, त्याला साटे लावावे व त्याची घट्ट गुंडाळी करून हळूहळू लांब करून सुरीने तुकडे करावेत. साधारण १५-१६ चिरोटे होतात. जसे तुकडे केले तसेच पोळपाटावर ठेवून उभे व आडवे लाटावे. साधारण लांबट आकारात लाटून मंद आचेवर तळावे. साखर बुडेपर्यंत पाणी घालून पक्का पाक करावा. तयार पाकात एकेक चिरोटे पूर्ण बुडवून चाळणीत काढून ठेवावेत, म्हणजे पाक निथळेल. कोरडे झाले की डब्यात भरावेत. चिरोटे बरेच दिवस टिकतात.   

संबंधित बातम्या