चटकदार चिवडा 

निर्मला देशपांडे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

चिवडा हा वर्षभर खाण्यात येणारा आणि आबालवृद्धांना अत्यंत आवडणारा खमंग खुसखुशीत पदार्थ आहे. दिवाळीच्या फराळासाठीसुद्धा भाजके पोहे, पातळ पोहे, मक्‍याचे पोहे अशा अनेक प्रकारचा चिवडा केला जातो.

पातळ पोह्यांचा चिवडा 
साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, २ वाट्या भाजून साल काढलेले शेंगदाणे, वाटीभर पंढरपुरी डाळ, काजू तुकडा, चमचाभर तीळ, १ चमचा जिरेपूड, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, ८-१० हिरव्या मिरच्या, हिंग, मीठ व पिठीसाखर चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, १ वाटी तेल, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. 
कृती : चाळलेले पोहे कढईत थोडे थोडे घालून मंद गॅसवर कुरकुरीत भाजून घ्यावेत व पेपरवर पसरावेत. कढईत तेल घालून दाणे, खोबरे तळून घ्यावेत व बाहेर काढून पोह्यांवर घालावेत. मग त्या तेलात मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात दाणे, खोबरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. तीळ, मीठ, सायट्रिक ॲसिड अंदाजे पाव चमचा घालावे. परतून लगेच गॅस बंद करावा व हळद घालून हलवावे. आता त्यात भाजलेले पोहे घालून परतावे. शेवटी पिठीसाखर व जिरेपूड घालून चांगले परतावे. हलवून सगळे छान मिक्‍स करावे. पूर्ण गार झाल्यावर चिवडा डब्यात भरावा. (काजू तुकडा थेंबभर तेलावर परतून दाण्याबरोबर घालावा).

मक्‍याच्या पोह्यांचा चिवडा 
साहित्य : अर्धा किलो मक्‍याचे सपाट पोहे, वाटीभर भाजून सोललेले शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, थोडेसे काजूचे दाणे, १ चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ व पिठीसाखर, चमचाभर तीळ, अर्धा चमचा आमचूर, फोडणीचे साहित्य, १ मध्यम वाटी रिफाइंड तेल, कोथिंबीर. 
कृती : कढईत तेल घालावे. मक्याचे चाळलेले पोहे तळणीच्या चाळणीत घालून तळून घ्यावेत. दाणे, खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. काजू, बेदाणे थोड्याशा तेलावर परतून घ्यावेत. उरलेल्या तेलात मोहरी हिंगाची खमंग फोडणी करावी. धुऊन कोरडी करून बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता घालावा. मंद गॅसवर मीठ, आमचूर घालून हलवावे. शेवटी हळद घालावी, लगेच मक्याचे पोहे घालावेत व परतावे. गॅस बंद करून पिठीसाखर घालून परतावे. चांगला गार झाल्यावर चिवडा डब्यात भरावा.

लाल पोह्यांचा चिवडा 
साहित्य : मोठा बोलभर लाल पोहे कुरकुरीत भाजलेले, २ खाकरे, १ वाटी कच्चे शेंगदाणे, १ वाटी पंढरपुरी डाळ, थोडे बेदाणे, अर्धी वाटी खोबरे काप, सूर्यफुलाच्या बिया, ४ मग्ज (बाजारात मिळतो), तिखट, हळद, अर्धा चमचा धने, जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडा चाट मसाला, पिठीसाखर, मीठ चवीप्रमाणे, थोडा लिंबाचा रस, ४ मोठे चमचे तेल, हिरव्या मिरच्या. 
कृती : खाकरे मोडून भाजलेल्या पोह्यांवर घालावेत. थोड्या तेलावर दाणे, डाळ, खोबरे परतावे. बेदाणे अगदी एक मिनिट परतावे. सर्व पोह्यांवर घालावे. कढईत चार चमचे तेल घालून त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. हळद, धने, जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला घालून एकत्र परतावे व भाजलेल्या पोह्यांवर घालावे. फोडणीतच लिंबाचा रस घालावा. मीठ व पिठीसाखर एकत्र करून हलवत हलवत पोह्यांवर घालावे. चिवडा हातानेच हलवून चांगला मिसळून घ्यावा. 
टीप ः लाल पोहे कोकणात पिकतात व त्याची चवही छान असते.

तळलेल्या पोह्यांचा चिवडा 
साहित्य : अर्धा किलो जाड पोहे, २ वाट्या भाजून सोललेले शेंगदाणे, वाटीभर पंढरपुरी डाळ, वाटीभर सुक्‍या खोबऱ्याचे पातळ काप, ४ चमचे धने पूड, २ चमचे जिरे पूड, थोडी लवंग, दालचिनी पूड, काजू तुकडे, बेदाणे, कढीपत्ता, तिखट, मीठ, हळद, पिठीसाखर, तेल. 
कृती : पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. मग तळणीच्या चाळणीने थोडे थोडे पोहे घालून तळून घेऊन थाळीत बटरपेपरवर टाकावेत, म्हणजे त्यातले तेल कमी होईल. दाणे, खोबरे तळून घ्यावे व पोह्यांवर घालावेत. कढीलिंब कुरकुरीत परतावा. त्यात डाळ परतून ते पोह्यांवर घालावे. थोड्या तेलात काजू, बेदाणे परतून घ्यावेत. थोडी फोडणी करून त्यात हिंग, धने, जिरे, लवंग पूड, १ चमचा तीळ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे, गॅस बंद करून थोडे तिखट, हळद व मीठ घालून परतावे. मग तळलेले पोहे व इतर साहित्य घालावे. शेवटी पिठीसाखर घालून छान हलवून सगळे एकत्र करावे. 
टीप ः या चिवड्यात चवीपुरता लिंबाचा रस व आल्याचा कीसही घालू शकता. आवडत असल्यास फोडणीत घालावा.

नाशिकचा चिवडा 
साहित्य : अर्धा किलो भाजके पोहे, दीड वाटी भाजून पांढरे केलेले दाणे, वाटीभर सुक्‍या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी पंढरपुरी डाळ, १ चमचा धने, जिरे, ५ लवंगा, दालचिनी तुकडा यांची एकत्र पूड, ४ अमसुलांची तळून कुटून केलेली बारीक पूड, ४ मध्यम कांद्यांचा किसून वाळवलेला अगर ताजा कीस, २ चमचे तिखट, २ चमचे मीठ, २ वाट्या तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, ८-१० लसूण पाकळ्या (तळून कुटून), पिठीसाखर. 
कृती : कांदा कीस वाळलेला असल्यास वाटीभर तेल कढईत तापवून काळजीपूर्वक लाल रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा. कीस ताजा असल्यास मंद गॅसवर जास्त वेळ सतत हलवून कुरकुरीत लाल करावा. पोहे-कुरमुऱ्यात चिमूटभर मीठ घालावे व ते थोडे थोडे कढईत घालून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. कढईत फोडणी करून त्यात दाणे, खोबरे, डाळ, कढीपत्ता तळून कुरमुऱ्यांवर घालावा. गॅस मंद करून फोडणीत तिखट, मीठ, मसाला पूड, लसूण पूड, अमसूल पूड घालून हलवावे. भाजलेले कुरमुरे घालून चांगले परतून चिवडा मिसळून घ्यावा. मग चिवडा खाली उतरवून त्यात पिठीसाखर घालावी व नीट ढवळून घ्यावे. शेवटी तळलेला कांदा थोडा चुरगळून तेलातसुद्धा घालावा. हलवून सगळे चांगले मिक्‍स करावे. पूर्ण गार झाल्यावर चिवडा डब्यात भरावा. 
टीप ः अमसूल पुडीमुळे या चिवड्याला पिठीसाखर जास्त लागते. चिवडा देताना त्यावर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर व थोडी लिंबाची फोड पिळल्यास हा चिवडा खूपच टेस्टी लागतो.

शाही चिवडा 
साहित्य : चार वाट्या तळलेले पोहे, १ वाटी डाळमुठ, प्रत्येकी अर्धी वाटी जाड शेव, तळलेले काजू बेदाणे, पंढरपुरी डाळ, खारी केशरी बुंदी, पाव चमचा सायट्रिक ॲसिड किंवा आमचूर, दीड चमचा मीठ, २-३ चमचे पिठीसाखर, १ वाटी तळलेले दाणे, फोडणीसाठी अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, १ चमचा तीळ, कोथिंबीर, चमचाभर धने जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला. 
कृती : कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. त्यात कोथिंबीर, तीळ, कढीपत्ता घालावा. धने जिरे पूड, गरम मसाला, मीठ, शेंगदाणे, डाळ घालून परतावे. हळद, पोहे, बेदाणे घालून हलवावे. खाली उतरवून पिठीसाखर घालून हलवावे. शेवटी शेव, डाळमुठ बुंदी घालून हलवून, कालवून छान मिसळून घ्यावे.

महाराणी चिवडा 
साहित्य : पाच वाट्या भाजलेले पोहे, अर्धी वाटी जाड शेव, प्रत्येकी अर्धी वाटी तळलेले दाणे, डाळ, केशरी खारी बुंदी, पालकाची हिरवी शेव, थोडासा काजू तुकडा, पाव चमचा/चिमूटभर सायट्रिक ॲसिड, पिठीसाखर, मीठ, तेल, चमचाभर तीळ, मोहरी, हिंग, कढीपत्ता, आले, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा धने जिरे पूड. 
कृती : कढईत तेल घालून थोडे भाजलेले पोहे तळणीच्या चाळणीत घालून तळावेत व पेपरवर टाकावेत. मग तेलात मोहरी, हिंग, जिरे घालून फोडणी करावी. तिच्यात डाळ, तीळ, हळद घालावी. कोथिंबीर घालून हलवावे व गॅस बंद करावा. धने, जिरे पूड, गरम मसाला, पिठीसाखर घालून हलवावे व लगेच त्यात पोहे घालून परतावे. तळलेले दाणे, तळलेला काजू तुकडा, बेदाणे घालून हलवावे. खारी बुंदी, हिरवी शेव घालून झाऱ्याने ढवळून हा रंगीबेरंगी, टेस्टी चिवडा तयार करावा.

पुदिना चिवडा 
साहित्य : अर्धा किलो जाड पोहे, चमचाभर तीळ, अर्धा चमचा जिरेपूड, ७-८ हिरव्या मिरच्या, वाटीभर पुदिन्याची पाने, मोहरी, हिंग, हळद, दीड चमचा मीठ, ३ चमचे पिठीसाखर, अर्धा ते १ चमचा (चवीप्रमाणे कमी जास्त) आमचूर, तळण्यासाठी तेल. 
कृती : मिरच्या व पुदिन्याची पाने किंचित जाडसर वाटून ताटात दोन तास पसरून चांगली वाळवून घ्यावीत. पोहे भाजून तळून घ्यावेत. कढईत थोड्या तेलात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. त्यावर मिरच्या, पुदिन्याने वाटण घालून मंद गॅसवर परतून कोरडे कुरकुरीत करावे. मग त्यात मीठ, जिरेपूड, तीळ, आमचूर घालून थोडे परतावे व खाली उतरवावे. मग त्यात पिठीसाखर घालून हलवावे. छान मिसळून घ्यावे. गार झाल्यावर चिवडा डब्यात भरावा. 
टीप ः पुदिन्याऐवजी कोथिंबीर वापरून कोथिंबीर चिवडा करतात. साहित्य व कृती सर्व पुदिना चिवड्याचीच. 

डाळमुठ (मिसळीचा चिवडा) 
साहित्य : एक किलो बटाटे, प्रत्येकी १ वाटी मूग, मसूर, शेंगदाणे, चणा डाळ, १०-१२ हिरव्या मिरच्या, २ चमचे जिरे, तळण्याकरिता तूप किंवा तेल, पादेलोण, फोडणीचे साहित्य. 
कृती : चिवडा करण्यापूर्वी मूग, मसूर व चणा डाळ आठ तास पाण्यात चिमूटभर सोडा घालून वेगवेगळी भिजवावी. भिजलेली धान्ये उपसून, निथळून कापडावर पसरून ठेवावीत. बटाटे धुऊन, साले काढून जाड कीस किसावा, कापडावर पसरावा. कढईत तेल तापवून बटाट्याचा वाळलेला कीस तळावा. नंतर शेंगदाणे, मूग, मसूर, चणा डाळ तळून घ्यावी. तळताना कढईत भरपूर तेल असावे व ते चांगले तापलेले असावे. सगळे तळून झाल्यावर तुपाची फोडणी करावी. त्यात ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग, जिरे पूड घालून त्यावर सर्व तळलेले पदार्थ घालावे. गॅस मंद अगर आवश्‍यक तेवढाच मोठा ठेवावा. नंतर खाली कढई खाली उतरवून त्यावर चवीप्रमाणे मीठ व पिठीसाखर घालावी. झाऱ्याने चांगले हलवून चिवडा एकत्र करावा. 
टीप ः आवडत असल्यास पादेलोण घालावे. घालायचे असल्यास मीठ, पिठीसाखरेबरोबर घालावे.

खुमासदार चिवडा 
साहित्य : अर्धा किलो भाजलेले जाड पोहे, २०० ग्रॅम शेंगदाणे भाजून पांढरे करून, वाटीभर ३-४ तास भिजलेली मूग डाळ, १ वाटी बटाट्याचा वाळलेला कीस, वाटीभर पांढऱ्या स्वच्छ सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २ हिरव्या मिरच्यांचा ठेचा, कढीपत्ता, चमचाभर जिरेपूड, थोडे सायट्रिक ॲसिड, हिंग, मोहरी, रिफाइंड तेल, पिठीसाखर चवीप्रमाणे. 
कृती : कोमट पाण्यात चिमूटभर सोडा घालून मूग डाळ ४ तास भिजवावी. त्यानंतर उपसून कापडावर पसरून चांगली वाळवावी व रिफाइंड तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळावी. बटाट्याचा कीस तळावा. अगदी थोडे तेल घालून खोबऱ्याचा कीस थोडा परतावा. दाणे तळावेत. काजू, बेदाणे थोड्या तेलात थोडेसे तळावेत. सगळे भाजलेल्या पोह्यांवर घालावे. मीठ, सायट्रिक ॲसिड, जिरेपूड, पिठीसाखर एकत्र करून हलवत हलवत पोह्यांवर घालावे व सर्व चांगले मिसळून घ्यावे. शेवटी मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची रिफाईंडमध्ये खमंग फोडणी करावी. गॅस बंद करावा व तिच्यात तयार पोहे घालून हलवावे. चिवडा छान मिसळून घ्यावा.

चिवडा करण्यापूर्वी  
     पोहे, कुरमुरे मंद गॅसवर कढईत थोडे थोडे घालून कुरकुरीत भाजून घ्यावेत. 
     कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या धुऊन, निथळून पूर्ण कोरड्या करून घ्याव्यात. 
     कुरमुरे, पोहे फोडणीत घालण्यापूर्वी मीठ, मसाले फोडणीत घालून परतावे. 
     हळद सर्वांत शेवटी घालून लगेच पोहे घालून परतावेत. 
     चिवडा परतून खाली उतरवावा व मग त्यात पिठीसाखर घालून परतावे. 
     चिवड्याला एकदम खूप तेल न घालता आवश्‍यक वाटल्यास वरून गरम फोडणी घालून चिवडा परतावा. पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आदल्या दिवशी उन्हात ठेवावेत. चाळून घेऊन मंद गॅसवर थोडे थोडे घालून भाजून पेपरवर पसरावेत. म्हणजे पोहे कुरकुरीत होऊन चिवडा सादळत नाही. 
     चिवडा शक्‍यतो रिफाइंड तेलामध्ये करावा.   

संबंधित बातम्या