खुसखुशीत शंकरपाळी 

निर्मला देशपांडे 
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

वाळीच्या फराळात झटपट होणारा, फारसा न बिघडणारा, खुसखुशीत, लहानथोरांना प्रिय असा पिटुकला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. तिखट, गोड, खारी अशा विविध चवींची, निरनिराळ्या पदार्थांची, विविध आकारांची शंकरपाळी ही दिवाळीतच नव्हे, तर एरवीसुद्धा केली जातात.
 
गोड शंकरपाळी (पद्धत १) 
साहित्य ः साडेचार वाट्या मैदा, दीड वाटी साखर, १ वाटी दूध, अर्धी वाटी तूप, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तूप किंवा तेल, चिमूटभर सोडा. 
कृती ः दूध कोमट करून त्यात साखर घालून विरघळून घ्यावी. मैदा सपीटाच्या चाळणीने चाळून घ्यावा. त्यात चवीपुरते मीठ व चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. परातीत अर्धी वाटी तूप घेऊन खूप फेटावे. त्यात मैदा घालावा व सगळे चांगले एकत्र करून कुस्करावे. मग थंड झालेले साखरेचे दूध घालून घट्ट भिजवावे व १ तास झाकून ठेवावे. त्यानंतर पीठ चांगले मळून घेऊन मऊ करावे. पोळपाटावर मध्यम जाडीची पोळी लाटून शंकरपाळी कापून तापलेल्या तेलात अगर तुपात खमंग होईपर्यंत तळावीत. 
टीप ः साखर कमी घातल्याने कमी गोडीची ही शंकरपाळी चहाबरोबर बिस्किटासारखी खाता येते. 

गोड शंकरपाळी (पद्धत २) 
साहित्य ः दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप (मोहनासाठी), पाऊण ते १ वाटी साखर, चिमूटभर मीठ, दूध, तळण्यासाठी तूप. 
कृती ः मैद्यात चवीपुरते मीठ, गरम तूप व साखर घालावी. दूध घालून तो मैदा मध्यम भिजवावा. २ तास दमट कपड्याखाली झाकून ठेवावा. नंतर तो भरपूर कुटून मऊसर करावा. त्याच्या मध्यम जाडीच्या पोळ्या लाटून शंकरपाळी कापून तापलेल्या तुपात मंद गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत तळावीत. 

गोड शंकरपाळी (पद्धत ३) 
साहित्य ः एक वाटी दूध, १ वाटी साखर, १ वाटी तूप, चवीपुरते मीठ, मैदा, तळण्यासाठी तूप (सर्व पदार्थ एकाच वाटीने घ्यावेत). 
कृती ः दुधात साखर व तूप घालून दुधाला उकळी आणावी. त्यात चिमूटभर मीठ घालावे व खाली उतरवावे. मैद्याच्या चाळणीने मैदा चाळून घ्यावा व थंड झालेल्या दुधात बसेल एवढा घालावा. पीठ किंचित सैलसर भिजवावे व चांगले मळून घ्यावे. नंतर २ तास तो गोळा दमट कपड्याखाली झाकून ठेवावा. मग त्याच्या पोळ्या लाटून शंकरपाळी कापावीत. तापलेल्या तुपामध्ये गुलाबीसर तळावे. 

शंकरपाळी (पद्धत ४) 
साहित्य ः दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, वाटीभर पिठीसाखर, दूध, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी रिफाइंड तेल. 
कृती ः मैद्यात पातळ केलेले तूप, पिठीसाखर व चिमूटभर मीठ घालून एकत्र करावे. आवश्‍यक तेवढे दूध घालून मध्यम भिजवावे. हा गोळा तासभर झाकून ठेवावा. नंतर तो चांगला कुटून घेऊन मऊसर करावा (भरपूर मळूनही घेऊ शकता). नंतर त्याच्या किंचित पातळ पोळ्या लाटून त्याच्या शंकरपाळी कापावीत. गुलाबी रंग येईपर्यंत तळावीत. 

गाजराची शंकरपाळी 
साहित्य ः दोन वाट्या लालबुंद गाजराचा कीस, ४ वाट्या कणीक, १ वाटी कंडेंस्ड मिल्क, चवीपुरते मीठ, १ छोटा चमचा बडीशेप, चिमूटभर सोडा, तळण्याकरिता तूप अगर तेल. 
कृती ः गाजराचा कीस मिक्‍सरवर बारीक वाटून घ्यावा. कणकेत बडीशेप, मीठ, सोडा, चमचाभर गरम तेल व गाजराचा वाटलेला कीस घालावा व कालवून एकत्र करावे. मग त्यात कंडेंस्ड मिल्क घालून कालवून गोळा तयार करावा. आवश्‍यक वाटले तर थोडे दूध घालावे व चांगले मळून घ्यावे. त्या पिठाची पोळी लाटून शंकरपाळी कापावीत व तापल्या तुपात अगर रिफाइंड तेलात तळावीत. 

गुळाची शंकरपाळी (प्रकार १) 
साहित्य ः प्रत्येकी १ वाटी दूध, तूप आणि गूळ, अर्धी वाटी पाणी, चिमूटभर मीठ, कणीक व मैदा निम्मा-निम्मा, तेल. 
कृती ः दूध, तूप, गूळ व पाणी एकत्र करावे. चिमूटभर मीठ घालून उकळावे. थंड झाल्यावर त्यात बसेल एवढी चाळलेली कणीक व तेवढाच मैदा घालून पीठ भिजवावे. चांगले मळून घ्यावे. त्याची गोल पोळी लाटावी. पोळीला लावतो त्याप्रमाणे तेल लावून तिच्यावर कणीक भुरभुरावी. दुमडून घेऊन परत लाटावी. तिची शंकरपाळी कापून तेलात  
खमंग होईपर्यंत तळावीत. 

गुळाची शंकरपाळी (प्रकार २) 
साहित्य ः एक वाटी कणीक, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पातळ तूप, चिमूटभर मीठ, १ वाटी कोमट दूध, दीड वाटी किसलेला गूळ, तळण्याकरिता तेल. 
कृती ः कणीक, रवा, पातळ तूप व मीठ एकत्र करावे. त्याचा मुटका झाला पाहिजे. ते कुस्करून घ्यावे. कोमट दुधात किसलेला गूळ घालून विरघळवून घ्यावा. मग तो गाळून पिठात घालावा व पीठ मऊसर घट्ट भिजवावे. आवश्‍यक असल्यास दूध घालावे. हे पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. मग चांगले मळून घेऊन पोळी लाटावी. पोळीची शंकरपाळी कापून तापलेल्या तेलात खमंग होईपर्यंत तळावीत. 

चंपाकळी 
साहित्य ः एक मोठा वाडगाभर साखर, त्याच वाडग्याने अर्धा वाडगा पाणी, अर्धा किलो मैदा, अर्धी वाटी तेल, चिमूटभर मीठ, तेल. 
कृती ः साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा. मधून-मधून हलवावे. साखर पूर्ण विरघळून बुडबुडे आले, की पाक तयार झाला असे समजावे. मग त्यात वेलची पूड घालावी. परातीत अर्धा किलो मैदा चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालावे. अर्धी वाटी गरम तेल घालावे. हलवून मिसळून घ्यावे. मग थंड पाण्याने हा मैदा किंचित सैलसर भिजवावा व अर्धा तास झाकून ठेवावा. नंतर मळून घेऊन त्याचे पुरीसाठी गोळे करावेत. पीठ लावून पुरी लाटावी. या पुरीचा थोडा भाग सोडून कुठेच कडेला न जाता उभ्या चिरा द्याव्यात. दोन्ही हातात धरून गुंडाळत यावे. मग तिथेच चिमटीने त्या चिकटवाव्यात. तापल्या तेलात तेल उडवत तळाव्यात म्हणजे सर्व पाकळ्या मोकळ्या होतील. मग गरम पाकात बुडवून ताटात निथळत ठेवाव्यात या सुंदर चंपाकळ्या. 

खारी शंकरपाळी (प्रकार १) 
साहित्य ः दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी गरम तूप, १ मध्यम चमचा मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल. 
कृती ः मैदा चाळून घ्यावा. त्यात तूप घालावे. चमच्याने हलवावे. कोमट झाल्यावर कुस्करून घ्यावे म्हणजे तूप सगळीकडे लागेल. नंतर त्यात मीठ व भरड मिरपूड घालावी व कालवावे. थंड पाण्याने घट्टसर भिजवून तासभर झाकून ठेवावे. त्यानंतर पुन्हा मळून घेऊन पीठ मऊसर करावे. किंचित जाडसर पोळी लाटून शंकरपाळी कापाव्यात व रिफाइंड तेलात खमंग तळाव्यात. 

खारी शंकरपाळी (प्रकार २) 
साहित्य ः दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी गरम तूप, चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद, चमचाभर धने-जिरे पूड, चमचाभर कसुरी मेथी, तळण्याकरिता रिफाइंड तेल. 
कृती ः मैद्यामध्ये तूप घालून मैदा कुस्करावा. मग त्यात तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पूड, कसुरी मेथी घालून कालवावे. थंड पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे व अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर पुन्हा ते चांगले मळून घेऊन पोळी लाटावी व शंकरपाळी कापून तापलेल्या तेलात खमंग तळावीत.

मैदा-बेसनाची खारी शंकरपाळी
साहित्य ः कपभर दूध, अर्धा कप तूप, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे बेसन, चमचाभर ओव्याची भरड पूड, अर्धा चमचा जिऱ्याची भरड पूड, चिमूटभर बेकिंग पावडर, मैदा, तळण्याकरिता तेल. 
कृती ः दूध गरम करून त्यात तूप घालावे, विरघळवून घ्यावे व थंड करायला ठेवावे. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळावी. त्यात बेसन घालावे. मसाले व मीठ घालावे. थंड झालेले दूध घालून पीठ घट्ट भिजवावे व अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर चांगले मळून घेऊन पोळ्या लाटून शंकरपाळी कापावीत व तापलेल्या तेलात तळावीत. 

संबंधित बातम्या