मिठाईचा आस्वाद

निशा गणपुले-लिमये 
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळी म्हटली की पाहुणेरावळे अन्‌ नातेवाईक येणार! त्यांचे तोंड गोड करण्यासाठी या काही मिठाया...

मिष्टान्न ः वेगवेगळ्या मिठायांचे प्रकार 
प्रकार १ ः सुरती घारी 
साहित्य ः पारीसाठी - २ वाट्या मैदा, पाव वाटी तुपाचं मोहन, २ चिमटी मीठ, जरूर पडेल तसे पाणी. 
सारण ः प्रत्येकी पाव वाटी पिस्ता व बदाम पावडर (पूड), १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खवा, २ टीस्पून बारीक रवा व तेवढेच बेसन, अर्धा चमचा वेलची पूड, पाव वाटी साजूक तूप, तळणीसाठी कोणतेही वनस्पती तूप व रिफाइंड शेंगदाणा तेल. 
कृती ः प्रथम एका तसराळ्यात मैदा घेऊन त्यात तुपाचे कडकडीत गरम मोहन, मीठ घालून घ्यावे व हे मोहन मैद्याला चांगले चोळून घेऊन मुटका वळतो ते बघावे आणि मैदा पाण्याने घट्ट भिजवावा. कढईत तूप घालून २ चमचे बेसन घालून चांगले भाजावे, तसेच रवा पण भाजून घ्यावा. नंतर भाजलेला रवा व बेसन एका बाऊलमध्ये एकत्र करून त्यात खवा, बदाम+पिस्ता पावडर, वेलची पूड आणि पिठीसाखर घालून चांगले एकत्र कालवून सारण तयार करावे. साधारण १ तासाने मैदा मळून घ्यावा आणि घारी करायला घ्यावी. मैद्याच्या लिंबाएवढ्या लाट्या करून मोदकासारखी पारी करून त्यात १ चमचा तयार सारण घालावे व मोदकाप्रमाणे भरल्यावर पिठाचं टोक वरतीच हाताने अलगद दाबून पेढ्याप्रमाणे सर्व घाऱ्या तयार करून त्या बदामी रंगावर तळाव्यात. एका थाळीत पाव वाटी साजूक तूप पांढरे कापसासारखे होईल इतपत फेसावं. आता त्यात पिठीसाखर घालून हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे व यात तळलेल्या घाऱ्या घोळवून बटर पेपरवर ठेवाव्यात आणि १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून लगेचच खाण्यास द्याव्यात. 

प्रकार २ ः बालूशाही 
साहित्य ः २ वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी आंबट दही, १ चिमूटभर खायचा सोडा, दोन वाट्या साखर, चिमूटभर तुरटी पूड, अर्धा चमचा वेलची पूड, पाव वाटी पाणी, तळणीसाठी तूप वा रिफाइंड तेल. 
कृती ः मैद्यात तुपाचे कडकडीत गरम मोहन, दही व सोडा हे सर्व घालून थोडे-थोडे पाणी वापरून पीठ घट्टसर भिजवून गोळा झाकून ठेवावा. एका पॅनमध्ये साखर घेऊन ती भिजेल इतपतच पाणी त्यात घालून दोन तारी पाकापेक्षा थोडा घट्टसर पाक तयार करावा. पाक गरम असतानाच त्यात तुरटी पूड व वेलदोडे पूड घालावी. चांगले ढवळून घ्यावे. आता भिजवलेल्या मैदा गोळ्याच्या लिंबाएवढ्या आकाराची लाटी घेऊन तिला हातावर पेढ्यासारखा चपटा आकार देऊन मध्यभागी अंगठ्याने दाब द्यावा. अशा रीतीने सर्व लाट्यांचे चपटे पेढे करून मधोमध अंगठ्याने दाब द्यावा. आता हे सर्व चपटे पेढे मध्यम आचेवर तापवलेल्या तेलात वा तुपात तांबूस रंग होईतो तळावेत आणि नंतर  तयार केलेल्या गरम पाकात ५-७ मिनिटे ठेवावेत. मग थाळीला तुपाचा हात लावून पाकातल्या बालूशाही छानपैकी त्यात मांडाव्यात. त्यावरील पाक सुकल्यावर बालूशाही खाव्यात. 
टीप ः साखरेच्या पाकात वेलची पूड घालायची आहे आणि पाकात केशर पूड वा केशर सिरप वा जिलेबीचा रंग घातल्यास सर्व बालूशाही आकर्षक दिसतात तशाच एकदम चविष्ट लागतात. 

प्रकार ३ ः राजभोग 
साहित्य ः १ मोठी वाटी छान लुसलुशीत शक्‍यतो घरी केलेले पनीर, १ वाटी साखर, २-३ केशर काड्या वा केशर पूड २ वालांएवढी, दूध - गरमच, १ टीस्पून. 
आतील सारणास - प्रत्येकी २० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ते, अर्धा चमचा वेलची पूड आणि पिठीसाखर १ मोठा चमचा. 
कृती ः प्रथम सर्व सुक्‍या मेव्याची पूड करावी. त्यात पिठीसाखर, वेलची पूड घालून कालवावे. गरम दुधात केशर काड्या वा केशर पूड घालून ढवळावे. यातील २-३ थेंब वरील मेव्याच्या पुडीत घालायचे आहेत. हे मिश्रण कालवून तिचे वाटाण्याएवढे गोळे करावेत. आता पनीर खूप मळून घ्यावे. त्यात उरलेले केशर मिश्रण घालून पनीरचे लहान लिंबाएवढे गोळे करावेत. हे गोळे करताना प्रत्येक गोळ्याच्या आत सुकामेवा गोळी भरावी, घालावी. साखरेत थोडे पाणी घालून त्याचा दाट पाक करावा. इतका दाट की मूळ पाकाच्या १/३ भाग राहावा. आता त्यात तयार केलेले गोळे घालून, सोडून ते रसगुल्ल्याच्या पद्धतीने शिजवून घ्यावेत. रात्रभर ते तसेच ठेवावेत. सकाळी थंड करून खावेत. 

प्रकार ४ ः लाल भोपळ्याचा हलवा 
साहित्य ः अर्धा किलो लाल भोपळा, पाव किलो खवा, भोपळ्याच्या किसाइतकी साखर, दोन-तीन वेलदोडे पूड, काजू, चारोळे, बेदाणा इत्यादी व अर्धी वाटी साजूक तूप. 
कृती ः प्रथम लाल भोपळ्याची साल काढून धुवून किसून घ्यावे. भोपळा किस मोजून घ्यावा. खवा हाताने मळून घ्यावा. आता तो कढईत थोडा परतून घ्यावा म्हणजे मऊ होईल. तूप गरम करून त्यावर किस परतावा. १०-१२ मिनिटे मंद आचेवर परतून तूप सुटू लागले की खवा घालावा. परतून झाल्यावर किसाइतकीच मोजून साखर घालावी. साखर विरघळून मिश्रण आळेपर्यंत ढवळत राहावे. मिश्रण आळायला लागले, की खाली उतरवून वेलची पूड, सुकामेवा घालावा. हा हलवा उपवासालादेखील चालतो. 

प्रकार ५ ः काजू-अननस पुडिंग 
साहित्य ः १ वाटी काजूची बारीक पूड, १ वाटी अननसाचे बारीक तुकडे (डब्यातला अननस), सव्वा वाटी दूध, ५-६ चमचे पिठीसाखर, नसल्यास साधी साखर, २ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, ४-५ चेरी. 
कृती ः पाव वाटी गार दुधात कस्टर्ड पावडर मिसळून गुळगुळीत पेस्ट करावी. उरलेले वाटीभर दूध गरम करावे व त्यात कस्टर्ड पावडरची पेस्ट घालावी. मंद आचेवर ठेवून सारखे ढवळावे. म्हणजे पातेल्याच्या बुडाला लागणार नाही. असेच २-३ मिनिटे ढवळत राहावे. पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे. गार कस्टर्डमध्ये काजूची पूड, अननसाचे तुकडे घालावेत. मिश्रण ब्लेंडरमध्ये घालून दोन मिनिटे मिसळू द्यावे. श्रीखंडासारखे गुळगुळीत झाले पाहिजे. आता सुबक भांड्यात ओतून वर चेरीचे उभे काप घालून सजवावे. फ्रिजमध्ये ६ ते ७ तास ठेवून चांगले गार झाले, की खाण्यास द्यावे. खूपच पौष्टिक पुडिंग आहे. 
टीप ः अननसाप्रमाणे सफरचंदे किंवा केळी वापरूनही हे पुडिंग करता येते. फक्त केळी चिरली की त्यावर अर्धा टीस्पून लिंबाचा रस घालावा, म्हणजे काळसर पडणार नाही. 

प्रकार ६ ः मिठी बुंदी 
साहित्य ः २ वाट्या बेसन, २ वाट्या साखर, चिमूटभर खायचा सोडा, २-३ थेंब पिवळा रंग (जिलेबीचा रंग पण चालेल), दीड वाटी कोमट पाणी, वेलची पूड पाव टीस्पून, तळणीस तूप, थोड्या बदाम-पिस्ता बिया. 
कृती ः बेसन, सोडा, रंग घालून दाट पेस्ट करावी. पाच मिनिटे सतत घोटत राहावे. साखरेत पाणी घालून (एक ते सव्वा वाटी) पाक करावा. तूप गरम करावे. वर चाळण धरावी व त्यातून मिश्रण टाकावे. बुंदीचे सारख्या आकाराचे दाणे बनू द्यावेत. ते फार लाल होईपर्यंत तळायचे नाहीत. आता तयार पाकात ही सुंदर बुंदी टाकावी. वरून वेलची पूड पसरावी - भुरभुरावी. ही बुंदी सर्व्ह करताना प्लेटमध्ये वा डिशमध्ये काढून देताना त्यावर बदाम व पिस्ता काप पसरावेत. खूपच सुंदर बुंदी मोत्यासारखी शोभा आणेल. 

प्रकार ७ ः गोड गोलगप्पे 
साहित्य ः २ वाट्या भडंग, २ वाट्या भाजके पोहे, प्रत्येकी १ वाटी भाजलेले शेंगदाणे सालासकटच घ्यावेत कारण त्याच्यात सत्त्व असते. भाजलेले देशी तीळ सालासकट, भाजलेला गोटा (सुके) खोबरे किस, खजुराचे लहान केलेले तुकडे, अर्धी वाटी खारीक पावडर, इतर सुकामेवा (ऐच्छिक), २ टीस्पून जायफळ पूड, ३ वाट्या कोरडा व काळा गूळ बारीक चिरून अथवा गुळाची पावडर (बाजारात मिळते.) 
कृती ः प्रथम दाणे, तीळ, खोबरे किस, थोडा गूळ घालून तेल सुटेतो मिक्‍सरमध्ये दळावे. प्रत्येक घाण्याबरोबर गूळ दळावा. थोडा खजूर १-२ तास उन्हात ठेवून दळावा वा त्याचे अगदी बारीक तुकडे करावेत. खारीक पूड थोडा गूळ घालून दळावी आणि अगदी शेवटी उन्हात तापवलेले वा परतलेले भडंग व भाजके पोहे दळावेत म्हणजे मिक्‍सरच्या भांड्याला चिकटलेला गूळ, ओशटपणा त्याला पुसला जातो व भांडे कोरडे होते. आता दळलेले सर्व घटकपदार्थ चांगले एकत्र कालवून पुन्हा हे मिश्रण दळावे. दळायच्या आधी त्यात जायफळ पूड मिसळावी. 
आता हे सर्व मिश्रण हाताने कुस्करून घ्यावे. मळावे आणि त्याचे आपल्या आवडीच्या आकारात लाडू वळावेत किंवा मुटकुळी करावीत. हे गोलगप्पे खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. 

प्रकार ८ ः टूटी फ्रुटी संदेश 
साहित्य ः १ लिटर दूध, १ केळे, १ संत्रे, ३ अननस चकत्या, १०० ग्रॅम सीडलेस द्राक्षे, ३ टीस्पून ड्रिंकिंग चॉकलेट, ८ मध्यम आकाराचे चमचे  पिठीसाखर, ४-५ वेलदोड्यांची पूड, अर्धा टीस्पून जायफळाची पूड. 
कृती ः दुधाचा छेना करताना उकळत्या दुधात (१) लिंबाचा रस, (२) व्हिनेगर घालून (३) २ डाव दही घालून दूध फाडावे. 
टीप ः गोड पदार्थासाठी, दूध फाडायचे असल्यास दही घालून फाडावे. चोथा पाणी झाले, की पातेले उतरवावे व तासाभरानंतर स्वच्छ फडक्‍यावर टाकावे व त्यावर वजन ठेवावे. पाणी निथळले की (सुमारे अर्ध्या तासानंतर) फडक्‍यावरील छेना काढून घ्यावा. हेच पनीर आहे. 
संदेश कृती ः दूध फाडून छेना करून अर्धा तास निथळत ठेवावा. फळे सोलून, चिरून ठेवावीत. द्राक्षे सुटी करून धुवून फडक्‍यावर पसरावीत. छेन्यात पिठीसाखर मिसळून ७-८ मिनिटे मंद आचेवर कढईत भाजावे म्हणजे मिश्रण कोरडे व मऊ होईल. छेन्याचे (पनीरचे) दोन भाग करावेत. एकात ड्रिंकिंग चॉकलेट मिसळावे. एका पसरट डिश (थाळी)मध्ये चॉकलेटी छेन्याचा पातळ थर लावावा. त्यावर फळांचे तुकडे घालावेत. त्याच्यावर पांढरा छेन्याचा थर घालून पृष्ठभाग बोटांनी सारखा करावा. त्यावर वेलची पूड व जायफळ पूड भुरभुरावी. फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर खावे. हे पुडिंग मस्तच लागते. 

प्रकार ९ ः कणिका भोग 
साहित्य ः दीड वाटी बासमती अगर उंची तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, १ तमालपत्र, २ मसाला वेलदोडे, ३ लवंगा, ३ चमचे साखर, १ चमचा मीठ, १ चमचा बेदाणे, २ मोठे चमचे साजूक तूप. 
कृती ः डाळ व तांदूळ मिसळून तासभर भिजत ठेवावी. तासानंतर चाळणीवर निथळत ठेवावी. तुपावर तमालपत्र, वेलदोडे, ३ लवंगा टाकून डाळ-तांदूळ १० मिनिटे परतावे. साखर, मीठ व बेदाणे घालून डाळ-तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून भात मंदाग्नीवर शिजू द्यावा. शिजल्यावर खाली उतरवून अर्धा चमचा तूप वरून सोडावे म्हणजे दाणे मोकळे दिसतात. 

प्रकार १० ः पपईचा हलवा 
साहित्य ः अर्धा किलो कच्ची पपई, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, १ कप (१ वाटी) साखर, २ वाट्या पाणी, २ मोठे चमचे चॉकोलेट, ५-६ वेलदोडे पूड, १ लिंबू, १० ग्रॅम पिस्ते, २५ ग्रॅम काजू, साजूक तूप. 
कृती ः पपईची साले काढून बारीक तुकडे करावेत व पाण्यात टाकून शिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे व पुरणयंत्रातून काढावेत. 
थोड्या पाण्यात ड्रिंकिंग चॉकलेट, साखर, कॉर्नफ्लोअर घालावे. साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे. थोड्या तुपावर पपईचा शिजवलेला गर टाकून जरा परतावे व नंतर त्यावर साखरेचे पाणी घालावे. सतत ढवळत राहावे. मिश्रण कडेपासून सुटू लागले की लिंबाचा रस घालावा. थोडे काजूचे काप वगळावेत व बाकीचे काजू, वेलची पूड घालावी. जरा ढवळावे. नंतर तूप लावलेल्या थाळीत थापावे. काजूचे काप व पिस्त्याचे काप लावून शोभिवंत करावे व गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. अगदी वेगळा प्रकार छानच लागतो. 

प्रकार ११ ः बोर्नव्हिटा डिलाईट 
साहित्य ः १ वाटी दुधाची पावडर, अडीच वाटी साखर, अर्धी वाटी लोणी, १०० ग्रॅम काजू, ४ टेबलस्पून (मोठे) बोर्नव्हिटा, ७-८ बदाम, ८-१० पिस्ते, पाव वाटी तूप, चिमूटभर केशर, वर्खाचा कागद (ऐच्छिक). 
कृती ः गरम पाण्यात काजू एक तास भिजत घालावेत. नंतर बाहेर काढून बारीक वाटून घ्यावेत. ५ वाट्या गरम पाण्यात मिल्क पावडर घालून सारखी करावी. साखर, लोणी, वाटलेले काजू व मिल्क पावडरचे मिश्रण सर्व एकत्र करावे. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात घालून गॅसवर ठेवून ढवळावे. मिश्रण घट्टसर व्हायला लागले, की त्याचे दोन भाग करावेत. एका भागात बदाम, इसेन्स (ऐच्छिक) व केशर घालून गॅसवर ठेवून ढवळावे. मिश्रण कडेने सुटू लागले, की थोडे तूप घालून खाली उतरावे व तूप लावलेल्या ट्रेमध्ये थापावे. वर बदाम-पिस्त्याचे काप पसरावेत. 
थोड्या दुधात बोर्नव्हिटा घालून वर काढून ठेवलेल्या दुसऱ्या भागात घालून मिश्रण गॅसवर ठेवावे. पहिल्याप्रमाणेच घट्ट होत आले, बाजूला सुटायला लागले, की थोडे तूप घालून खाली उतरवावे व पहिल्या थापलेल्या मिश्रणावर ओतून थापावे. कोमट असताना वर्खाचा कागद थापावा. गार झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात. 
अर्धी वडी पांढरी व अर्धी वडी ब्राऊन - खूप छान दिसते व लागतेही छान.

संबंधित बातम्या