कुरकुरीत, चमचमीत चकली

राजश्री बिनायकिया, चिंचवड. 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

चकली करणे तसे खूप कौशल्याचे काम आहे. दिवाळीमध्ये भाजणीच्या चकलीला जास्त पसंती दिली जाते. या भाजणीच्या चकली बरोबरच चकल्यांचे इतरही अनेक प्रकार आहेत. चकल्यांच्या काही वेगवेगळ्या प्रकारांवर एक दृष्टिक्षेप...

भाजणी चकली
साहित्य : चार वाट्या तांदूळ, २ वाटी हरभरा डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १ वाटी जाड पोहे, २ टेबलस्पून धने, २ टेबलस्पून जिरे, २ टेबलस्पून तीळ, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, मोहनसाठी अर्धी वाटी तेल, तळणीसाठी तेल.
कृती : भाजणी करण्यासाठी तांदूळ धुऊन घेऊन कापडावर सावलीत वाळत घालावे. तांदूळ सुकल्यावर मंद आचेवर भाजावेत. खूप लाल रंगावर भाजू नयेत. चणा डाळ, उडीद डाळही वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. डाळी धुऊ नयेत. धने-जिरे ही भाजून घ्यावेत. सर्व धान्य गार झाल्यावर धने व जिरे मिक्स करून गिरणीतून दळून आणावे. चार वाट्या भाजणी घ्यावी. तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी तेल, तीळ, हळद, तिखट, मीठ घालावे. चार वाट्या भाजणी घालावी व भाजणी चमच्याने व्यवस्थित एकत्र करावी व झाकून ठेवावी. अर्धा ते एक तासाने थंड पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यावे. त्याच्या चकल्या कराव्यात व तळून घ्याव्यात. (चकल्या तळताना प्रथम गॅसची आच मोठी ठेवावी नंतर मध्यम ठेवावी.)

मुरुक्कु (चकलीचा दाक्षिणात्य प्रकार)
साहित्य : तीन वाट्या तांदळाचे पीठ, १ वाटी फुटाणा डाळीचे पीठ, २ टेबलस्पून तीळ, २ टेबलस्पून तिखट लोणी, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून ओवा, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम फुटाणा डाळीचे पीठ करून घ्यावे नंतर डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, ओवा, तीळ हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. या पिठात पाणी न घालता लोणी घालावे, पिठाच्या मिश्रणाला लोणी नीट एकसारखे एकत्र होईल असे मिक्स करून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून चकलीला भिजवतो तसे पीठ भिजवून घ्यावे. कढईत तेल तापायला ठेवावे. तेल कडकडीत तापवावे. एकसारख्या दोन किंवा तीन वेढ्यांच्या चकल्या कराव्यात. कडकडीत तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत मुरुक्कु तळावेत. हलका गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर तेलामधून काढून पेपर नॅपकिनवर जास्तीचे तेल निथळण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भराव्यात.

झटपट मसाला चकली
साहित्य : चार वाट्या ज्वारीचे पीठ, बेसन दीड वाटी, १ वाटी तांदूळ पीठ, प्रत्येकी २ टीस्पून धने-जिरेपूड, ३ टेबलस्पून तीळ, चवीनुसार तिखट मीठ, हळद आणि तळण्यासाठी तेल, मोहनसाठी ३ टेबलस्पून तेल.
कृती : सहा वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल ,धने-जिरेपूड, ती ळ, हळद, मीठ, तिखट घालावे. उकळी आल्यानंतर ज्वारी, तांदूळ व बेसन पीठ घालून ढवळून गॅस बंद करावे. मिश्रण गार झाल्यावर मळून, नेहमीप्रमाणे चकल्या करून तेलात तळाव्यात.

कणकेच्या चकल्या
साहित्य : ४ वाट्या कणीक, २ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून धने पूड, जिरे पूड, तिखट, हळद, मीठ चवीनुसार, तेल.
कृती : प्रथम पातळ कापडामध्ये कणीक घालून सैलसर पुरचुंडी बांधावी. ही बांधलेली कणीक कुकरच्या डब्यामध्ये ठेवून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. नंतर बाहेर काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पीठ काढून घ्यावे. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. नंतर त्यात तीन टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. त्यामध्ये तीळ, धने पूड, जिरे पूड, तिखट, मीठ, हळद हे सर्व घालावे थंड पाण्याने भिजवावे. अर्धा ते एक तासाने चकल्या करून तळाव्यात.

पांढरी चकली
साहित्य : २ दोन वाट्या मैदा, २ मध्यम उकडलेले बटाटे, १ टेबलस्पून, हिरवी मिरची पेस्ट, १ टेबलस्पून लोणी, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम एका कापडाच्या पुरचुंडीत मैदा घेऊन ती पुरचुंडी कुकरमध्ये चाळणीवर ठेवून चार ते पाच शिट्या करून घ्याव्यात. पुरचुंडी कुकरमधून काढून लगेचच मैदा मोकळा केल्यावर तो मिक्सरमधून काढून घ्यावा. पिठामध्ये गुठळी ठेवू नये. नंतर त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा कीस, हिरवी मिरची पेस्ट, मीठ व लोणी घालून पीठ भिजवून ते मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे व मंद आचेवर चकल्या तळाव्यात.

टोमॅटो चकली
साहित्य : दीड वाटी लाल टोमॅटोचा रस, १ वाटी रवा, १ वाटी मैदा, २ चिमटी सोडा, प्रत्येकी १ टीस्पून मिरपूड, जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ व तेल.
कृती : टोमॅटो रस, मीठ व सोडा एकत्र उकळून घ्यावा व त्यामध्ये रवा, मैदा, तिखट, जिरे पूड, मिरेपूड घालून एक वाफ आणावी. नंतर मिश्रण घोटून घ्यावे. गार झाल्यावर मिश्रण मळून घेणे. नंतर त्या मिश्रणाच्या चकल्या तळाव्यात.

पालक चकली
साहित्य : चार वाट्या भाजणी, १ वाटी धुऊन बारीक चिरलेला पालक, लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट, चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून तीळ, २ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन.
कृती : भाजणीमध्ये बारीक चिरलेला पालक व वरील सर्व साहित्य मिक्स करावे. नंतर पाण्याने पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. नंतर या पिठाच्या चकल्या करून गरम तेलात तळून घ्याव्यात. या पिठामध्ये हळद घालू नये.

ज्वारीच्या पिठाची चकली
साहित्य : चार वाट्या ज्वारीच्या लाह्या, २ वाट्या ज्वारीचे पीठ, २ वाट्या तांदूळ पीठ, लोणी दीड टेबलस्पून, २ टीस्पून धने-जिरेपूड, ३ टेबलस्पून तीळ, तेल, चवीनुसार मीठ, तिखट, हळद.
कृती : प्रथम ज्वारीच्या लाह्या चाळणीत घालून पाण्यात भिजवून निथळून घ्याव्यात. नंतर ज्वारी पीठ, तांदूळ पीठ, धने-जिरेपूड, तीळ, तिखट, मीठ, चवीनुसार हळद व ज्वारीच्या लाह्या सर्व मिश्रण एकत्र करून त्यात लोणी घालावे. नंतर सर्व मिश्रण कोमट पाणी घालून मळून घ्यावे. दहा ते पंधरा मिनिटांनी मिश्रणाच्या चकल्या करून तळाव्यात. या चकल्या गरम गरमच छान लागतात.

टिप्स 

 • भाजणी करताना त्यासाठी तांदूळ खूप जुने घेऊ नयेत.
 • चकलीची भाजणी भाजताना मंद गॅसवर भाजावी.
 • कुठलीही चकली करताना तेल भरपूर घ्यावे म्हणजे चकल्या छान कुरकुरीत तळता येतात.
 • चकली तळताना प्रथम तेल चांगले तापवून घ्यावे. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवावी नंतर मध्यम आचेवर चकल्या तळाव्यात.
 • मोठ्या आचेवर तळल्यास वरून लाल होतात व आतून कच्च्या राहतात नंतर मऊ पडतात.
 • चकल्या पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भराव्यात.
 • चकली तळताना चकलीचा एक तुकडा तोडून पहावा; आतमध्ये नळी पडली असेल तर चकली कुरकुरीत झाली असे समजावे.
 • चकलीमध्ये जास्त तिखट घातले, तर तिखट करपून तळणी मध्ये उतरते. जास्त लाल रंगाची चकली चांगली दिसत नाही. म्हणून चकलीमध्ये तिखट कमी वापरावे.
 • चकलीमध्ये हळदही कमी घालावी. हळद जास्त झाली तर चकली काळसर दिसते.
 • चकली आकाराने व रंगाने एकसारखी असावी.
 • चकलीचे सर्व पीठ एकदम मळू नये.
 • पीठ भिजवताना उकळलेले पाणी वापरून ते खाली उतरवून नंतर त्यात पीठ व सर्व मसाले घालून पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर चकल्या करायच्या वेळेस थोडे थोडे पीठ घेऊन थंड पाण्याचा हाताने मळून चकल्या कराव्यात.    

संबंधित बातम्या