खुसखुशीत शंकरपाळी

सुजाता नेरूरकर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

गोड आणि तिखट अशा दोन्ही चवीची शंकरपाळी फराळात नसली, तर फराळाचे ताट पूर्ण भरलेले दिसणार नाही. म्हणूनच पारंपरिक शंकरपाळींबरोबरच इतरही चविष्ट, खुसखुशीत अशी ही शंकरपाळी करून बघाच...

कसुरी मेथीची शंकरपाळी
साहित्य : दोन कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, प्रत्येकी अर्धा टीस्पून जिरे, ओवा (कुटून), १ टेबलस्पून कसुरी मेथी (वाळवलेली), अर्धा चमचा मीठ, पाव कप कडकडीत तेल (मोहनासाठी), तळण्यासाठी तेल. 
कृती : मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घ्यावे. जिरे, ओवा जाडसर कुटावा. एका परातीत चाळलेला मैदा घेऊन त्यामध्ये जिरे, ओवा व कसुरी मेथी घालावी. त्यात कडकडीत तेल घालून पीठ चांगले एकत्र करावे आणि थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळावे. मळलेले पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे, मग थोडे कुटावे. त्याचे एकसारखे तीन गोळे करून पोळीसारखे लाटावे. मग त्याची शंकरपाळी कापून कढईमध्ये गरम तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत तळाव्यात. शंकरपाळी थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावीत.

खारी चंपाकळी 
साहित्य : दोन कप मैदा, २ टीस्पून मिरे (जाडसर वाटून), १ टीस्पून ओवा (जाडसर वाटून), १ टेबलस्पून तेल (मोहनासाठी), एक चिमूट बेकिंग पावडर, १ टीस्पून मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा व मीठ चाळून घ्यावे. मिरे, ओवा जाडसर कुटावा. मोहन गरम करावे. एका परातीत चाळलेला मैदा, कुटलेले मिरे-ओवा, कडकडीत मोहन घालून एकत्र करावे. बेकिंग पावडर घालावी. पाणी वापरून पीठ घट्ट मळावे. मग पिठाचे लिंबाएवढे गोळे करावेत. एक गोळा घेऊन पुरीएवढा लाटावा. पुरीच्या मधे उभ्या चिरा माराव्यात, पण कडेला पुरी तुटता कामा नये. चिरा मारल्यावर पुरी गुंडाळून कडेला दोन्ही बाजूंनी दाबावे. कढईमध्ये तेल गरम करावे. तीन-चार चंपाकळी गरम तेलात सोडून झाऱ्याने हलवावे, म्हणजे ती थोडी उलगडेल व छान आकार येईल. सुरुवातीला विस्तव मोठा ठेवावा, मग चंपाकळी तेलात सोडल्यावर विस्तव मंद करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळावे व थंड झाल्यावर डब्यात भरावे.

तिखट खारी शंकरपाळी 
साहित्य : चार कप मैदा, ८ टेबलस्पून तेल (गरम), १ टीस्पून मिरपूड (जाडसर), १ टीस्पून जिरे (जाडसर कुटून), अर्धा टीस्पून ओवा (जाडसर कुटून), चवीनुसार मीठ, तेल.
कृती : एका परातीत मैदा व मीठ चाळून घ्यावे. मिरे, जिरे, ओवा जाडसर कुटावा. मग मैद्यामध्ये मिरे-जिरे-ओवा पूड व कडकडीत तेल घालावे. पाणी वापरून घट्ट पीठ मळावे व एक तास बाजूला ठेवावे. नंतर पिठाचे एकसारखे चार गोळे करावेत. एकेक गोळा पोळीसारखा लाटावा. लाटलेल्या पोळीची शंकरपाळी कापावीत. कढईमध्ये तेल गरम करावे. शंकरपाळी तळताना प्रथम विस्तव मोठा ठेवावा. शंकरपाळी तेलात घातल्यावर विस्तव मंद करावा. कुरकुरीत होईपर्यंत तळावीत. शंकरपाळी थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावीत.

टेस्टी कुरकुरीत फाफडा 
साहित्य : पाचशे ग्रॅम उडीद डाळ, ५०० ग्रॅम मूग डाळ, २ टीस्पून पापडखार, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, सजावटीसाठी मीठ व तिखट.
कृती : उडीद डाळ व मूग डाळ बारीक दळावी. एका परातीत मूग-उडीद डाळीचे पीठ, पापडखार व मीठ एकत्र करून चाळावे. मग त्यामध्ये थोडेसे पाणी घालून खूप घट्ट मळून १० मिनिटे बाजूला ठेवावे. त्याचे एकसारखे पाच-सहा गोळे करावेत. एक एक गोळा घेऊन कुटून कुटून थोडा सैल करावा. त्याची अगदी पातळ पोळी लाटून सुरीने लांब लांब पट्ट्या कापाव्यात. कापून झाल्यावर एका पेपरवर ठेवावे. एका कढईमध्ये तेल गरम करावे. गरम तेलात थोड्या थोड्या पट्ट्या घालून कुरकुरीत होईपर्यंत तळावे. नंतर पेपरवर ठेवून त्यावर थोडेसे मीठ व तिखट भुरभुरावे. 
टीप : पीठ भिजवताना त्यामध्ये मोहन घालू नये.

गोडाची शंकरपाळी
साहित्य : दोन कप मैदा, १ कप गव्हाचे पीठ, १ कप पिठीसाखर, पाऊण कप तूप, १ कप दूध, अर्धा टीस्पून मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा, गव्हाचे पीठ, मीठ चाळून घ्यावे. तूप व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावी. त्यामध्ये चाळलेला मैदा व दूध घालून घट्ट पीठ मळावे. नंतर त्याचे चार एकसारखे गोळे करावेत. ते लाटून शंकरपाळी कापावीत. कढईमध्ये तेल गरम करून मंद विस्तवावर गुलाबी रंग येईपर्यंत तळावे. 

गाजराची शंकरपाळी 
साहित्य : दोन कप गाजर (किसून), ४ कप गव्हाचे पीठ, १ कप दूध (उकळून घट्ट), १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून बडीशेप, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : गाजर धुऊन किसून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. गव्हाचे पीठ, गाजर, गरम तेल, मीठ, सोडा-बाय-कार्ब व बडीशेप एकत्र करावे. त्यामध्ये उकळलेले दूध व लागेल तसे पाणी घालून घट्ट पीठ मळावे व १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे. मग त्याचे एकसारखे चार गोळे करावेत. गोळा पोळीसारखा लाटावा व शंकरपाळी कापावीत किंवा लहान डब्याच्या झाकणाने गोल गोल कापून त्याला मधे पीळ द्यावा. एका कढईमध्ये तेल गरम करून शंकरपाळी गुलाबी रंग येईपर्यंत तळावीत. थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरावीत.

लाल भोपळ्याची शंकरपाळी 
साहित्य : दोन कप किसलेला लाल भोपळा, ४ कप गव्हाचे पीठ, दीड कप गूळ, पाव कप गरम तेल, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : लाल भोपळा स्वच्छ करून धुऊन किसावा. भांड्यात कीस घेऊन मंद विस्तवावर वाफवून घ्यावा व थंड करावा. गूळ किसून घ्यावा. शिजवलेला लाल भोपळा, मीठ व गूळ एकत्र करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे. त्यामध्ये गरम तेल घालून घट्ट पीठ मळावे (पाणी वापरायचे असेल तर हळूहळू घालावे). मळलेले पीठ १०-१५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे. पिठाचे एकसारखे चार गोळे करून पोळीसारखे लाटावेत व शंकरपाळी कापावीत. कढईमध्ये तेल गरम करून थोडी थोडी शंकरपाळी गुलाबी रंग येईपर्यंत तळावीत. थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरावीत.

गुळाच्या कापण्या 
साहित्य : दोन कप गव्हाचे पीठ, १ कप हरभरा डाळ (चणा डाळ), १ टेबलस्पून बडीशेप, १ टीस्पून सुंठ पूड, दीड कप गूळ (किसून), ४ टेबलस्पून साखर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : बडीशेप थोडीशी भाजून त्याची पूड करावी. खसखस थोडीशी गरम करून बाजूला ठेवावी. गूळ चिरून त्यामध्ये साखर घालून एक कप कोमट पाण्यात विरघळवून घ्यावा. गव्हाचे पीठ, बेसन चाळावे, मग त्यामध्ये बडीशेप पावडर, सुंठ पूड घालून चवीनुसार मीठ घालावे. मग त्यामध्ये दोन टेबलस्पून कडकडीत तेल घालून चांगले एकत्र करावे व गुळाच्या पाण्याने थोडे घट्ट भिजवावे. लागले तर आणखी पाणी वापरावे. पीठ भिजवून झाल्यावर अर्धा तास बाजूला ठेवावे. नंतर पिठाचे एकसारखे चार गोळे करावेत. गोळा घेऊन थोडासा लाटावा.  त्यावर थोडी खसखस घालावी व पोळीसारखे जाडसर लाटावे. मग शंकरपाळी कापावीत. कढईमध्ये तेल गरम करून कुरकुरीत होईपर्यंत शंकरपाळी तळावीत.

आंब्याची शंकरपाळी 
साहित्य : पाचशे ग्रॅम मैदा, १ कप पिठीसाखर, २ मोठे आंबे, अर्धा कप तूप, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा चाळून बाजूला ठेवावा. आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. तूप थोडे पातळ करावे. एका परातीत तूप व पिठीसाखर चांगली फेसून त्यामध्ये मैदा घालावा. मग त्यामध्ये आंब्याचा रस घालून पीठ चांगले मळावे व ३० मिनिटे बाजूला ठेवावे. मळलेल्या पिठाचे एकसारखे चार गोळे करावेत. एकेक गोळा घेऊन लाटून त्याला शंकरपाळीचा आकार द्यावा. कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यामध्ये शंकरपाळी छान कुरकुरीत होईपर्यंत तळावीत. शंकरपाळी थंड झाली की घट्ट झाकणाच्या डब्यात भरावीत.
टीप : आंब्याच्या रसात मैदा घातल्यावर पीठ मळताना कोरडे झाले, तर थोडे दूध वापरून पीठ मळावे.

तांदळाच्या पिठाची शंकरपाळी
साहित्य : एक किलो तांदळाचे पीठ, पाव किलो बेसन, १ टेबलस्पून तेल (गरम मोहन), ७-८ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, एक चिमूट खायचा सोडा, चवीपेक्षा थोडे जास्त मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम हिरव्या मिरच्या वाटाव्यात. जिरे थोडे जाडसर कुटावे. तांदळाचे पीठ, बेसन, मीठ, खायचा सोडा, हळद एकत्र करावे. तांदळाच्या पिठात वाटलेल्या मिरच्या, कुटलेले जिरे व गरम कडकडीत तेलाचे मोहन घालून एकत्र करावे. त्यात पाणी घालून पीठ घट्ट मळावे. १० मिनिटे पीठ तसेच ठेवावे. मग त्याचे एकसारखे गोळे करून ते लाटावेत व शंकरपाळी कापावीत. कढईत तेल गरम करून गुलाबी रंग येईपर्यंत शंकरपाळी तळावीत. ही शंकरपाळी ८-१० दिवस चांगली राहतात.

रवा मैदा शंकरपाळी
साहित्य : तीन कप मैदा, १ कप रवा, १ कप वनस्पती तूप अथवा तेल, १ कप दूध, दीड कप साखर (जाड), चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, तेल अथवा वनस्पती तूप तळण्यासाठी.
कृती : प्रथम मैदा व रवा चाळून बाजूला ठेवावा. दूध गरम करून थंड करावे. एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दूध, वनस्पती तूप अथवा तेल व साखर घालून मंद विस्तवावर ठेवावे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करावे. साखर पूर्ण विरघळली की विस्तव बंद करून मिश्रण थंड करावे. मिश्रण पूर्ण थंड झाले की त्यामध्ये मैदा, रवा, मीठ, वेलची पूड घालून पीठ मळावे. पीठ खूप सैल वाटले, तर थोडा रवा व मैदा घालावा. चपातीसाठी पीठ मळतो तसे पीठ असावे. मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे, म्हणजे पीठ चांगले मुरेल व रवाही चांगला फुलेल. मळलेल्या पिठाचे एकसारखे चार-पाच गोळे करावेत. पिठाचा गोळा घेऊन थोडासा जाडसर लाटावा, कटरच्या साहाय्याने शंकरपाळी कापावीत व स्वच्छ कापडावर ठेवावीत. कढईमध्ये तेल अथवा तूप गरम करावे. विस्तव मोठा ठेऊन गरम गरम तेलात थोडी शंकरपाळी घालावीत. कढईमधील थोडे तेल शंकरपाळीवर सोडावे व लगेच विस्तव मंद करावा. कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळावे. तळून झाले की टिशू पेपरवर ठेवावे, म्हणजे जास्तीचे तेल अथवा तूप निघून जाईल. ही शंकरपाळी १५ दिवस छान राहतात.

पौष्टिक कुरकुरीत स्ट्रीप्स 
साहित्य : प्रत्येकी २ कप चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ (डाळी थोड्या भाजून बारीक दळून २ कप पीठ घ्यावे), २ टेबलस्पून वनस्पती तूप, १ टीस्पून कसुरी मेथी, १०-१२ कढीपत्ता पाने, १०-१२ पुदिना पाने, २ टीस्पून तिखट, २ टीस्पून धने-जिरे पूड, अर्धा टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : कसुरी मेथी थोडीशी गरम करून कुस्कुरावी. पुदिना व कढीपत्ता पाने धुऊन बारीक चिरावीत. एका बोलमध्ये डाळींचे पीठ, कसुरी मेथी, कढीपत्ता, पुदिना, तिखट, धने-जिरे पूड, हिंग, मीठ एकत्र करावे. मग त्यामध्ये गरम तूप घालावे. थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळावे. मळलेल्या पिठाचे एकसारखे चार गोळे करून बाजूला ठेवावेत. कढईमध्ये तेल गरम करावे. चकलीचा सोरया घ्यावा, त्यामध्ये गोळा ठेऊन गरम गरम तेलामध्ये पट्ट्या घालाव्यात. मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत होईपर्यंत पट्ट्या तळाव्यात. स्ट्रीप्स गरम गरम सर्व्ह कराव्यात. आवडत असेल तर वरून चाट मसाला घालावा.

पाकातली शंकरपाळी 
साहित्य : शंकरपाळीकरिता : दोन कप मैदा, पाव कप डालडा (गरम), अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी २ कप तूप. 
पाकासाठी : एक कप साखर, २ टेबलस्पून पाणी.
कृती : मैदा, बेकिंग पावडर, मीठ व गरम तूप एकत्र करावे. त्यामध्ये थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून एक तास बाजूला ठेवावे. पाकासाठी साखर व पाणी एकत्र करावे व मंद विस्तवावर थोडा घट्टसर थोडा चिकट पाक करावा.मळलेल्या पिठाचे तीन एकसारखे गोळे करावेत. गोळा थोडा जाडसर लाटून त्याची शंकरपाळी कापावीत. कढईमध्ये तूप गरम करून शंकरपाळी तळावीत. शंकरपाळी तळताना विस्तव मंद ठेवावा. शंकरपाळीचा रंग जास्त गुलाबी होता कामा नये. सर्व शंकरपाळी तळून झाल्यावर पाकामध्ये घोळून घेऊन एक-दोन तास तशीच झाकून ठेवावीत. सुकल्यावर शंकरपाळीवर साखरेच्या पाकाचा थर येईल. मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावीत.

पाकातील चंपाकळी 
साहित्य : दोन कप बारीक रवा, १ टेबलस्पून कडकडीत तेल, चवीनुसार मीठ, तळ्यासाठी तूप. 
साखरेच्या पाकासाठी : दीड कप साखर, पाव कप पाणी, १ टीस्पून वेलची पूड, २ थेंब केशरी रंग, १ टीस्पून लिंबू रस.
कृती : प्रथम बारीक रवा एका बोलमध्ये घेऊन त्यामध्ये कडकडीत मोहन व मीठ घालावे. घट्ट पीठ मळून एक तास तसेच झाकून ठेवावे. पीठ चांगले मुरले की त्याचे एकसारखे गोळे करून मोठी पातळ पोळी लाटावी. एका झाकणाच्या साहाय्याने छोट्या गोल पुऱ्या कापाव्यात. पुरीला मधे उभ्या चिरा माराव्यात, पण कडेला पुरी तुटता कामा नये. चिरा मारल्यावर पुरी गुंडाळून कडेला दोन्ही बाजूंनी दाबावे. चंपाकळी ओल्या कापडावर ठेवाव्यात म्हणजे वाळणार नाहीत. पाक करण्यासाठी जाड बुडाच्या पसरट भांड्यात साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक करायला ठेवावे. साखर विरघळल्यावर लिंबू रस, वेलची पूड व रंग घालून एकत्र करावे. दोन तारी पाक करावा. पाक होत आला की लगेच चंपाकळी करायला घेऊन पाकात सोडावी. कढईमध्ये तूप गरम करावे. तीन-चार चंपाकळी गरम तेलात सोडून झाऱ्याने हलवावे, म्हणजे ती थोडी उलगडेल व छान आकार येईल. सुरुवातीला विस्तव मोठा ठेवावा, मग चंपाकळी तुपात सोडल्यावर विस्तव मंद करून गुलाबी रंग येईपर्यंत तळावे. तळून झाल्यावर पाकात सोडून एकसारखे हलवून एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून ठेवावे, म्हणजे जास्तीचा पाक निघून जाईल. 
टीप : पाक थंड झाल्यावर घट्ट झाला, तर एक टेबलस्पून पाणी घालून परत गरम करावा.   

संबंधित बातम्या