फराळाचा राजा लाडू

उमाशशी भालेराव
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

दिवाळीचा फराळ म्हटले की आपण सर्वप्रथम लाडवाचाच विचार करतो. साजूक तूप, खमंग भाजलेली पीठे, खवा, सुकामेवा, वेलची, केशर ह्या सर्व पौष्टिक घटकांमुळे ‘लाडू’ हे पूर्णान्न मानले जाते. सर्वांना प्रिय असणारे बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू आपण नेहमीच करतो. यंदा थोडे वेगळ्या प्रकारचे लाडू करून पाहा. 

राघवदास लाडू 
साहित्य : एक वाटी रवा, २ वाट्या खोवलेला ओला नारळ, दीड वाटी साखर, २ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून दूध, वेलची पूड, केशर, काजू बदामाचे काप. 
कृती : प्रथम कढई तापवून घ्यावी. मग मंद विस्तवावर रवा चार मिनिटे खमंग होईपर्यंत परतावा. गॅस बंद करावा. त्यात ओले खोबरे घालून सर्व नीट मिसळावे. हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावे. दुसरीकडे दीड वाटी साखर व एक वाटी पाणी घालून दोन तारी पाक करून घ्यावा. मंद आचेवर सतत ढवळत पाक करावा. पाच मिनिटे लागतील. त्यात दोन चमचे दूध घालावे. पहिल्या कढईत दोन टेबल स्पून तूप घालून रवा खोबऱ्याचे मिश्रण थोडे परतून घ्यावे. त्यात काजू बदामाचे काप, वेलची पूड, केशर घालावे. त्या मिश्रणावर तयार पाक घालावा व सर्व नीट एकत्र करून परतावे. सतत ढवळावे. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बद करून मिश्रण थंड होण्यास ठेवावे. दोन तासांनंतर लाडू वळता येतील. पुन्हा मिश्रण नीट मळून हाताला थोडे तूप लावून लाडू वळावेत.

वाटल्या डाळीचे लाडू 
साहित्य : चार वाट्या चण्याची डाळ, २ वाट्या खोवलेला ओला नारळ, २ वाट्या तूप, १ वाटी दूध, वेलची पूड, केशर बेदाणे, काजू, बदामाचे काप. 
कृती : प्रथम डाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवावी, नंतर निथळून घ्यावी व मिक्‍सरमध्ये थोडी रवाळ वाटून घ्यावी. ही वाटलेली डाळ साजूक तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत परतून घ्यावी नंतर त्यात खोवलेला नारळ घालून एकत्र कालवून घ्यावे. पुन्हा एक-दोन मिनिटे परतावे. गॅस बंद करावा. दुसरीकडे साखरेचा दोन तारी पाक करावा. या पाकात वरील मिश्रण, दूध, वेलची, पूड, थोडे केशर, बेदाणे, काजू बदामाचे काप सर्व घालून नीट कालवावे व थंड होण्यास ठेवावे. मधूनमधून वर खाली ढवळावे. दोन- तीन तासानंतर लाडू वळता येतील. (तूप वर आल्यास हळूच ओतून काढावे).

कर्नाटकी तंबिटाचे लाडू 
साहित्य : दोन वाट्या पंढरपुरी डाळ, १ वाटी किसलेले सुके खोबरे, अर्धी वाटी तीळ भाजून, दीड वाटी गूळ, वेलची पूड, तूप पाव वाटी (गरज पडल्यास थोडे अधिक). 
कृती : पंढरपुरी डाळ मिक्‍सरमधून पूड करून घेणे. गुळात अगदी थोडे पाणी घालून गूळ विरघळवून घेणे. (उकळी येण्याची गरज नाही) गूळ विरघळला की त्यात प्रथम तूप घालणे. नंतर खोबऱ्याचा कीस, पंढरपुरी डाळीची पूड भाजलेले तीळ, वेलची पूड सर्व मिसळून एकत्र कालवावे व लाडू वळावेत. या लाडवांना वरून खालून थोडा दाब देऊन लाडू चपट्या आकाराचे करतात. हे लाडू करायला सोपे व टिकणारे आहेत. 

पंजाबी पिन्नी लाडू 
साहित्य : एक वाटी उडदाचे पीठ, ३ चमचे रवा, ३ चमचे कणीक, ३ चमचे बेसन (सर्व मिळून १ वाटी), अर्धी वाटी रवा, पाव वाटी डिंक, दीड वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, अर्धी वाटी काजू बदाम काप, अर्धा चमचा सुंठ पूड, अर्धा चमचा वेलची पूड. 
कृती : तूप तापवून प्रथम त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक छान फुलतो व कुरकुरीत होतो, तो चुरडून ठेवावा. उरलेल्या तुपात सर्व पिठे खमंग परतून घ्यावी. खवाही परतून घ्यावा. दुसरीकडे दीड वाटी साखरेत अर्धी वाटी पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात परतलेली पिठे, रवा, दीड पूड सुकामेव्याचे काप, सुंठ पूड, वेलची पूड सर्व घालून एकत्र पुन्हा थोडे परतून घ्यावे. सर्व परतणे मंद आचेवर करावे. सर्व मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळावेत. हे लाडू पण चपट्या आकाराचे करतात.

बिहारी सातूचे लाडू 
साहित्य : दोन वाट्या सातूचे पीठ, १ वाटी साजूक तूप, दीड वाटी पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ पूड. (सातूचे पीठ बाजारात विकत मिळते. त्यात सर्वसाधारणपणे गहू, चण्याची डाळ व मुगाची डाळ असते. प्रत्येक प्रांतात याचे प्रमाण वेगळे असते. ही धान्ये भिजवून, वाळवून नंतर भाजून त्याचे पीठ केले जाते). 
कृती : साजूक तुपात सातूचे पीठ ३-४ मिनिटे परतावे. पिठे भाजलेली असतात. त्यामुळे फार परतण्याची गरज नाही. गॅस बंद करून पिठीसाखर, वेलची पूड, सुंठ पूड घालावी. थोडे थंड झाल्यावर लाडू वळावे.

बंगाली पनीरचे लाडू 
साहित्य : पाव किलो पनीर, अर्धा टीन कन्डेन्स्ड मिल्क (अंदाजे १ वाटी), काजू बदामाचे काप, किसमिस, वेलची पूड. 
कृती : पनीर हाताने कुस्करून मळून मऊ करून घ्यावे. त्यात कन्डेन्स्ड मिल्क मिसळावे. गॅसवर मंद आचेवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर किसमिस, काजू बदामाचे काप व वेलची पूड घालून लाडू वळावेत.

बिनसाखरेचे लाडू 
साहित्य : एक कपभर खजूर, १ कप काजू बदाम पिस्ते यांची पूड, २ चमचे साजूक तूप, वेलची पूड. 
कृती : खजुराच्या बिया काढून तुकडे करून मिक्‍सरमध्ये वाटून एकजीव करून घ्यावे. काजू बदाम पिस्ते यांची पूड करावी. मंद आचेवर दोन चमचे साजूक तुपात सुकामेव्याची पूड २-३ मिनिटे परतून घ्यावी. नंतर त्यात खजुराचा लगदा घालून पुन्हा थोडे परतून एकत्र नीट मिसळून घ्यावे. गॅस बंद करून वेलची पूड घालावी. हे सर्व मिश्रण थोडे कोमट असतानाच लाडू वळावेत. (या लाडवांत सुके अंजीरही घालता येतात. थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून मऊ करून खजुरासह मिक्‍सरमध्ये घालावेत)

शिंगाड्याचे लाडू 
साहित्य : दोन वाट्या शिंगाड्याचे पीठ, पाऊण वाटी साजूक तूप, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, दीड वाटी पिठीसाखर, वेलची पूड. 
कृती : पाऊण वाटी साजूक तुपात शिंगाड्याचे पीठ छान तांबूस रंग येईपर्यंत परतावे. गॅस बंद करून मग त्यात दाण्याचे कूट, पिठीसाखर, वेलची पूड घालून लाडू वळावेत.

रव्याचे पारंपरिक लाडू 
साहित्य : चार वाट्या रवा, साडेतीन वाट्या साखर, १ नारळ, दीड वाटी तूप, वेलची पूड, काजू, बदाम, बेदाणे. 
कृती : नारळ खोवून घ्यावा. रवा तुपात तांबूस रंग येईपर्यंत भाजावा. सतत परतत राहावे. रवा भाजून झाला की त्यात खोवलेला नारळ घालून पुन्हा थोडे परतावे. दुसरीकडे साडेतीन वाटी साखरेत दीड वाटी पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा, वेलची पूड, काजू, बदामाचे काप, थोडे बेदाणे घालून सर्व नीट ढवळून थंड करण्यास ठेवावे. थोड्या थोड्या वेळाने मिश्रण वर खाली ढवळावे. दोन- तीन तासांनंतर लाडू वळता येतील. 
(हे लाडू खूप दिवस टिकावेत असे वाटत असल्यास नारळाऐवजी वाटी, दीड वाटी खवा परतून घालावा. रव्याबरोबर खवाही मिसळून पाकात घालावा. पाक मात्र दोन तारी करावा).

खास मुलांसाठी बिस्किटाचे लाडू 
साहित्य : अठरा-वीस ग्लुकोज किंवा मारी बिस्किटे, ४ चमचे कोको पावडर अथवा ड्रिंकिंग चॉकलेट पावडर, १ कप कन्डेन्स्ड मिल्क, ३-४ थेंब व्हॅनिला इसेन्स (ऐच्छिक), २ चमचे बटर, १ कप डेसिकेटेड कोकोनट. 
कृती : बिस्किटांचा मिक्‍सरमधून चुरा करून घ्यावा. दोन चमचे बटर विरघळवून त्यात हा चुरा थोडा परतावा. नंतर त्यात चॉकलेट वा कोको पावडर व २-४ थेंब व्हॅनिला इसेन्स मिसळावे. नंतर कन्डेन्स्ड मिल्कमध्ये त्यात मावेल इतके बिस्कीट चॉकलेटचे मिश्रण घालणे व लाडू वळावेत. डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. आवडत असल्यास सुकामेव्याचे काप घालावेत.

साबुदाण्याचे लाडू 
साहित्य : दोन वाट्या साबुदाण्याचे पीठ, १ वाटी पिठीसाखर, २ मोठे चमचे साजूक तूप, वेलची पूड, काजू बदामाचे काप, किसमिस. 
कृती : साबुदाण्याचे पीठ बाजारात विकत मिळते. घरी करावयाचे झाल्यास साबुदाणा चांगला भाजून घ्यावा व गरम असतानाच त्याचे पीठ करून घ्यावे. तूप फेटून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा एकत्र छान फेटून घ्यावे. त्यात साबुदाण्याचे पीठ, सुकामेव्याचे काप, किसमिस, वेलची पूड घालून सर्व एकत्र मळून त्याचे लाडू वळावेत. (वऱ्याच्या तांदळाच्या पिठाचे लाडूही याचप्रमाणे करावेत).

पोह्याचे लाडू 
साहित्य : अर्धा किलो पोहे, तळण्यासाठी तूप, २ वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २ वाट्या काजू (अगर शेंगदाणे), अर्धी वाटी भाजलेली खसखस, पाऊण किलो गूळ अथवा साखर, वेलची पूड. 
कृती : खोबरे व काजूचे अथवा शेंगदाण्याचे तुकडे भाजून घ्यावे. पोहे तुपात छान कुरकुरीत तळून घ्यावे. गूळ अगर साखरेचा दोन तारी पाक करावा. त्यात तळलेले पोहे (थोडे चुरडून), खोबरे, काजूचे तुकडे, भाजून घेतलेली खसखस, वेलची पूड सर्व घालून चांगले मिसळावे. थोडे थंड झाल्यावर लाडू वळावेत. हे लाडू डिंकाच्या लाडवांप्रमाणे लागतात व पुष्कळ दिवस टिकतात.

झटपट लाडू 
साहित्य : दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट, त्याशिवाय थोडे अधिक सजावटीसाठी, अर्धा टीन कन्डेन्स्ड मिल्क (अंदाजे १ वाटी) आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ते काप, वेलची पूड. 
कृती : कन्डेन्स्ड मिल्क व डेसिकेटेड कोकोनट एकत्र करून मंद आचेवर शिजवून एकजीव करावे. त्यात वेलची पूड व सुकामेव्याचे काप घालावेत. मिश्रण थंड झाल्यावर छोटे छोटे लाडू वळावेत व सजावटीसाठी ठेवलेल्या सुक्‍या डेसिकेटेड खोबऱ्यात घोळवावेत. झटपट होणारे हे लाडू चवीलाही छान लागतात.

नाचणीचे पौष्टिक लाडू 
साहित्य : दोन वाट्या नाचणीचे पीठ, १ वाटी कणीक, अर्धी वाटी तूप, २ वाट्या पिठीसाखर, अर्धी वाटी खारीक पूड, अर्धी  वाटी काजू बदाम काप अथवा पूड, १ चमचा वेलची पूड. 
कृती : चार चमचे साजूक तुपात नाचणीचे पीठ छान खमंग ब्राऊन रंग येईपर्यंत परतावे. दोन चमचे तुपात कणीक पण छान खमंग परतून घ्यावी. दोन्ही एकत्र करून त्यात खारीक पूड, काजू बदाम पूड, वेलची पूड व पिठीसाखर मिसळावी. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे तूप घालून सर्व नीट कालवून लाडू वळावेत. 

बेसनाचे लाडू 
साहित्य : चार वाट्या चण्याच्या डाळीचे जरा जाडसर पीठ, ३ वाट्या पिठीसाखर, पाव वाटी दूध, वेलची पूड, बेदाणे, दीड ते दोन वाट्या तूप, काजू, बदामाचे काप. 
कृती : तुपात बेसनाचे पीठ तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. सुरुवातीस हाताला जड लागेल पण नंतर हलके होईल. बेसन पीठ भरपूर परतणे. हेच या लाडवांचे वैशिष्ट्य आहे. नंतर गॅसवरून उतरवून त्यावर थोडे दूध शिंपडावे. साधारण कोमट झाल्यावर पिठीसाखर मिसळावी. गार झाल्यावर हे सर्व ताटात काढून खूप मळावे. मळून मऊ झाल्यावर वेलची पूड, आवडीप्रमाणे बेदाणे, काजू बदामाचे काप घालून लाडू वळावेत. करायला सोपे व कधीही न बिघडणारे व पुष्कळ दिवस टिकणारे असे हे बेसनाचे लाडू! 

संबंधित बातम्या