बहुरूपी भात

उषा लोकरे 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पण रोज त्याच चवीचा आमटी/वरण, भात खाऊनही कंटाळा येतो म्हणूनच खास दिवाळी निमित्त भाताचे काही वेगळे प्रकार...

व्हेज पुलाव 
साहित्य : दोन कप बासमती तांदूळ, २-३ कांदे (उभे बारीक (सडी) चिरून), २ गाजरे (उभी बारीक चिरून), १ कप मटार, अर्धा कप फरसबी (लांबस पातळ चिरून), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून काजू तुकडे, २ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून रिफाइंड तेल, १ चमचा लिंबाचा रस, कोरडा मसाला, ४-५ लवंगा, ४-५ दालचिनी तुकडे, ४-५ वेलदोडे, अर्धा चमचा शहाजिरे, १०-१५ मिरी दाणे, २-३ तमालपत्रे, मसाला वाटण, १ इंच आल्याचा तुकडा, १०-१२ लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, सर्व एकत्र वाटून घ्यावे. 
कृती : तांदूळ धुऊन चाळणीत निथळून घ्यावे. पातेल्यात पाणी उकळून त्यात चिमूटभर सोडा घालावा. त्यात सर्व भाज्या २-३ मिनिटे उकळून घेऊन चाळणीत ओतून घ्याव्या. (यामुळे भाज्यांचा रंग छान राहातो). दुसऱ्या भांड्यात तेल- तूप मिश्रण गरम करून त्यात कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. त्यातील थोडा तळलेला कांदा वेगळा ठेवून सर्व्ह करताना पुलावावर घालावा. त्याच तेलात कोरडा मसाला घालून परतावा. काजूही खमंग परतावेत. शेवटी तांदूळ घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. नंतर त्यात मसाला वाटण व भाज्या घालून हे मिश्रण २-३ मिनिटे परतावे. त्यातच तळलेला कांदा थोडा वगळून मिसळावा. तांदळाच्या दुप्पट पाणी, मीठ, लिंबू रस, साखर घालून भात मंद आचेवर शिजवावा. पुलाव सर्व्ह करताना वरून उरलेला तळलेला कांदा घालून सर्व्ह करावा.

रिझोटो - इटालियन राइस 
साहित्य : दीड कप तांदूळ (यासाठी बासमती तांदूळ नको), १ कांदा (बारीक चिरून), एका भोंगी मिरचीचे तुकडे, १०-१२ फरसबी शेंगांचे तुकडे, एका गाजराचे बारीक तुकडे, १०-१२ मशरूमचे तुकडे (ऐच्छिक), ८ टेबलस्पून टोमॅटो प्युरी- पेस्ट, १ टेबलस्पून साखर, १०० ग्रॅम किसलेले चीज, २ टेबलस्पून लोणी, मीठ व मिरपूड चवीला. 
कृती : जड बुडाच्या भांड्यात लोणी गरम करून त्यात कांदा किंचित परतून घ्यावा. त्यातच तांदूळ, भाज्या २-३ मिनिटे परताव्यात. मिश्रणात एक कप पाणी, टोमॅटो प्युरी, साखर, मीठ मिसळून भात अगदी मऊसर शिजवावा. त्यात निम्मे चीज मिसळावे व पावभाजीप्रमाणे सर्व मिश्रण चांगले दाबून एकजीव करावे. मिश्रणावर झाकण ठेवून काही मिनिटे मिश्रण गरम करावे. सर्व्ह करताना उरलेले निम्मे चीज वरून घालून सर्व्ह करावे. 

दही बुत्ती
साहित्य : एक वाटी तयार भात, अर्धी वाटी गोड सायीचे दही, १ वाटी दूध, अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर, १ चमचा साजूक तूप, १ चमचा मोहरी, जिरे व हिंग, १ चमचा भिजलेली उडीद डाळ, २-३ कढीपत्ता पाने, २ चमचा भाजलेले दाणे, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती : शिजवलेला भात हाताला पाणी लावून, गुठळ्या मोडून मोकळा करावा. त्यात दूध, दही, साखर, मीठ घालून कालवून घ्यावे. तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करावी. त्यात मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, उडीद डाळ, दाणे खमंग परतून घ्यावे. फोडणी गार करून भातात मिसळावी व भात कालवावा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावा.

वेस्टइंडीज राइस (कॅरेबियन राइस)
साहित्य : चार कप शिजवलेला मोकळा भात, सव्वा कप खोवलेले खोबरे, अर्धा कप संत्र्याचा रस, अर्धा कप सोललेल्या संत्र्याच्या फोडी, २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे, २-३ तमालपत्रे, ४ हिरव्या मिरच्या, लहान आल्याच्या तुकड्याच्या फोडी, ३ टेबलस्पून लोणी, मीठ, मिरेपूड, १ टेबलस्पून काजू तुकडे. 
कृती : खवलेल्या खोबऱ्याचे पाणी न घालता मिक्सितून काढून दूध करावे किंवा पॅकमधील कोकोनट क्रीम वापरावे. भात, संत्र्याचा रस, नारळाचे क्रीम व कोथिंबीर एकत्र करावी. कढईत लोणी गरम करून त्यात जिरे, तमालपत्रे, मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे परतून घ्यावे. त्यात शिजवलेला भात हलकेच मिसळावा. त्यात संत्र्याच्या सोललेल्या फोडी, काजूचे तुकडे मिसळावे. मीठ, मिरपूड चवीनुसार घालावी. सर्व्ह करताना वरून थोडे काजू तुकडे व संत्र्याच्या फोडींनी  सजवून राइस सर्व्ह करावे.

पाइनॲपल राइस 
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, ४ कप दूध, २ टेबलस्पून साजूक तूप, ४-५ अननसाच्या चकत्या (साखरेच्या पाकात शिजवून कोरड्या करून त्याचे लांबट तुकडे), ५-६ केशराच्या काड्या, अर्धा चमचा वेलदोडा पूड, पाव वाटी काजू, बेदाणे, ८-१० बदाम (भिजवून सोलून त्याचे लांबट तुकडे), ४-५ टेबलस्पून साखर. 
कृती : दोन टेबलस्पून तूप गरम करून त्यावर धुऊन निथळलेले तांदूळ परतून घ्यावे. त्यातच बेदाणे परतावे. नंतर त्यात दूध, केशर, साखर मिसळावी व मंद आचेवर भात अगदी मोकळा शिजवावा. भात शिजला की त्यात काजू, बदाम व अननसाच्या फोडी अलगद मिसळाव्यात. झाकण घट्ट बंद करून मंद आचेवर नीट शिजवावे. (भात खाली लागू नये म्हणून खाली जाडसर गरम तवा ठेवावा).

व्हेज बिर्याणी 
साहित्य : दोन कप तांदूळ, ४ कप मिक्‍स भाज्या (गाजराचे तुकडे, मटार, फ्लॉवरचे तुरे, बटाटे, पनीर, फ्रेंच बीन्सचे तुकडे), २ चमचे आले पेस्ट, २ चमचे लसूण पेस्ट, ३ टेबलस्पून दही, ३ कांदे, १ टेबलस्पून लिंबाचा रस, पुदिना, कोथिंबीर, तिखट, मीठ, ६ हिरवी वेलचीचे दाणे, लवंगा, २ दालचिनी तुकडे, २-३ तमालपत्र, १ चिमूट जायपत्री, अर्धा चमचा शहाजिरे. 
कृती : चार कप पाण्यात कोरड्या मसाल्यातील अर्धा भाग मसाला व २ कप तांदूळ एकत्र करून त्यात थोडे मीठ, चमचाभर तेल घालून अगदी मोकळा भात करून घ्यावा. कढईत तीन टेबलस्पून तूप गरम करून त्यामध्ये उरलेला कोरडा मसाला घालून परतावा, त्यावर थोडा कांदा, आले- लसूण पेस्ट परतून घ्यावे. शेवटी तिखट घालावे (जळणार नाही). त्यावर सर्व भाज्या घालून चांगल्या परतून घ्याव्या. दोन टेबलस्पून दही थोडे फेटून घालावे. शेवटी मीठ, साखर व लिंबाचा रस मिसळून घ्यावा. कढईत तुपात उरलेला कांदा खमंग तांबूस होईपर्यंत परतावा. उरलेल्या दह्यात कोशिंबीर, पुदिना, केशराचा अर्क मिसळून घ्यावा. जड बुडाच्या पातेल्यात तळाला थोडा तुपाचा हात फिरवून त्यावर थोड्या बटाट्याच्या चकत्या पसरून घ्याव्यात. त्यावर भाताचा हलका थर लावावा, त्यावर भाजीचा व पुदिन्याचा हलका थर लावावा. त्यावर परत भात, भाजी, पुदिना असा थर द्यावा. सर्वात शेवटी भाताचा थर असावा त्यावर पुदिन्याचा थर असावा. झाकण ठेवून भाताला एक चांगली वाफ आणावी.

व्हेज चीजी बेक्‍ड राइस 
साहित्य : दोन कप शिजवलेला भात, १ टेबलस्पून लोणी, अर्धा कप दूध, २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, मीठ व मिरपूड चवीला, १ कप फरसबी, फ्लॉवर, मटार, गाजर उकळून शिजवून, सॉससाठी एक बारीक चिरलेला कांदा, ३ कप दूध (कोमट असावे), ३ टेबलस्पून लोणी/बटर, ३ टेबलस्पून मैदा, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, ४ टेबलस्पून किसलेले चीज, १ कांदा बारीक चिरून, मीठ, मिरपूड, साखर. 
कृती : भांड्यात प्रथम लोणी गरम करावे. त्यात कांदा हलकेच परतताना त्यात भात, दूध, मीठ घालून एक वाफ आणावी. सॉससाठी लोणी गरम करावे. त्यात कांदा परतावा त्यावर मैदा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे हलके परतावे. त्यात दूध, चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर मिसळावी. चीज घालून मिश्रण घट्टसर करून व्हाइट सॉस करावा. यातील दोन कप सॉस उकडलेल्या भाज्यांत मिसळावा. आता बेकिंग ट्रेला तुपाचा हात फिरवून त्यावर उरलेला व्हाइट सॉस तळाला पसरावा. त्यावर शिजवलेला भाताचा थर लावावा. वरती भाज्या असलेला व्हाइट सॉस, चीजचा थर लावावा. आता वरून उरलेले किसलेले चीज पसरावे व झाकून भात ४५० फॅरनहाइटला १५ मिनिटे किंवा चीज वितळेपर्यंत बेक करावा. गरम गरम सर्व्ह करावा.

सदर्न राइस 
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी नारळाचे दूध, पॅकेटमधील कोकोनट मिल्क, ३ कांदे लांबट सळीसारखे चिरून, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा आले पेस्ट, २ टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे थोडे तळून, २ टेबलस्पून काजूचे तुकडे तळून, १ चमचा हिरवी मिरची पेस्ट, मीठ, अर्धा चमचा साखर, पाव चमचा हळद (ऐच्छिक), २ टेबलस्पून तूप. 
कृती : गरम तुपात कांदे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावे व काढून ठेवावे. उरलेल्या तुपात लसूण, आले पेस्ट परतावी. त्यावर तांदूळ परतून घ्यावे. तांदळात नारळाचे दूध व पाणी घालून (आवश्‍यक तसे) मोकळा भात शिजवावा, शिजत असतानाच मीठ, साखर मिसळावी. सर्व्ह करताना त्यात तळलेला कांदा, खोबऱ्याचे तुकडे, काजूचे तुकडे, आले मिसळून घ्यावे तसेच थोडे वरून पसरून भात सर्व्ह करावा.

कॉर्न कॅप्सिकम फ्राइड राइस 
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, २ कांदे (उभे पातळ चिरून), मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून रिफाइंड तेल, अर्धी वाटी भोंगी मिरचीचे लांबट तुकडे, अर्धी वाटी कॉर्न (उकडून), ३-४ लसूण पाकळ्या (ठेचून), मीठ व मिरपूड, अर्धा चमचा जिरे, २-३ लवंगा, २-४ मिरी दाणे, २ चमचे हिरवी कांदा पात (चिरून). 
कृती : तांदूळ धुऊन निथळून घ्यावे. दुप्पट पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. शिजवताना एक चमचा तेल घातल्याने भात मोकळा होतो. दोन टेबलस्पून रिफाइंड तेल गरम करून त्यात जिरे, लवंगा व मिरी दाणे परतावे. त्यातच ठेचलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेले कांदे परतावे व त्यावरच भोंगी मिरचीचे तुकडे परतून घ्यावे. नंतर कॉर्न परतून घ्यावेत. या मिश्रणात शिजलेला भात हळूवार मिसळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी मिरपूड मिसळून घ्यावी. सर्व मिश्रण नीट एकत्र करून मंद आचेवर थोडे गरम करावे. सर्व्ह करताना वरून चिरलेली कांदापात घालावी.    

टीप ः जुन्या तांदळाचा भात करताना दुप्पट पाणी वापरावे व नवीन तांदळाला कमी पाणी पुरते. भात शिजत असताना लोणी/ तेल व लिंबाचा रस वापरल्याने भात मोकळा, हलका तसेच पांढराशुभ्र होतो. पुलाव व बिर्याणीसाठी तांदूळ, तेल, लोण्यावर खमंग गुलाबी रंगावर परतले तर पुलाव चविष्ट होतो, फक्त तांदूळ खूप वेळ धुवून ठेवू नये. भात शिजविण्यासाठी उकळते पाणी वापरल्यास भात मोकळा होतो. त्यात वापरावयाच्या भाज्यांचे रंग तजेलदार गडद व हिरवेगार राहण्यासाठी उकळत्या पाण्यात चिमूटभर सोडा घालून उकळून घ्याव्या. 
 

संबंधित बातम्या