पक्वान्नांचा थाट

मुग्धा बापट
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
दिवाळीनंतर काहींचं वजन वाढतं... मधुमेहवाल्यांची साखर वाढते... कारण दिवाळी म्हटली, की फराळ तर असतोच. पण, त्याशिवाय पक्वान्नं आणि गोडाधोडाचे अनेक पदार्थ खाल्ले जातात. अशाच गोड गोड पदार्थांच्या काही रेसिपीज...

लवंग लतिका
साहित्य : पाव किलो खवा, ४ चमचे साजूक तूप मोहनासाठी आणि २ वाट्या तूप तळण्यासाठी, १५-२० लवंगा, १ वाटी साखर, पाव किलो पिठीसाखर, २ वाट्या मैदा, केशर.
कृती : खवा गुलाबी रंगावर भाजून थंड करावा. त्यात गार झाल्यावर खव्याइतकीच पिठीसाखर घालून मळून घ्यावे. त्यानंतर १ वाटी मैद्याला २ चमचे साजूक तुपाचे मोहन घालून जरुरीपुरते पाणी घालून घट्ट भिजवून ठेवावे. अर्ध्या तासाने लता करायला घ्याव्यात. प्रथम पातळसर पुरी लाटून घ्यावी, त्यात मोठा चमचाभर खव्याचे सारण घालून चारही बाजूने दुमडून वडीसारखा चौकोनी आकार द्यावा. तळताना उकलू नये म्हणून व स्वादासाठी लवंग टोचावी. अशा सर्व लता करून घेऊन साजूक तुपात गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात. साखरेचा घट्ट पाक करून त्यात केशर घालावे. त्यात लता बुडवून चाळणीवर निथळून घ्याव्यात. गार झाल्या की जेवणात घ्याव्या. एकदम सॉफ्ट आणि तोंडात ठेवल्या की विरघळतील आशा सुरेख होतात. रुचकर असून सात्त्विक खाणे आहे. वर दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण २५ लता होतात. 


खव्याची पोळी
साहित्य : पाव किलो खवा, पाव किलो पिठीसाखर, साधारण ४ वाट्या कणीक, ४ चमचे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, ८ चमचे तेल, चवीनुसार मीठ.
कृती : एक वाटी गव्हाच्या पिठाला १ चमचा डाळीचे पीठ, गरम केलेले २ चमचे तेलाचे मोहन आणि थोडेसे मीठ घालून कणीक घट्ट भिजवून ठेवावी. खवा गुलाबी रंगाचा भाजून थंड झाला, की खव्याइतकीच त्यात पिठीसाखर घालून मळून घ्यावे. अर्ध्या तासाने पोळी करायला घ्यावी. गुळाच्या पोळीप्रमाणे २ पाऱ्या कणकेच्या कराव्यात.  एका पारीइतकी खव्याच्या सारणाची पारी करून गुळाच्या पोळीप्रमाणे लाटावी. फिरवण्यासाठी तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ वापरले तरी चालते. भाजत असताना पोळी एकदाच उलटावी, पोळ्या पसरून ठेवाव्यात. साजूक तूप लावून खाव्यात. खुटखुटीत व खुसखुशीत होतात. वर दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण १७ पोळ्या होतात. 

पायसम् 
हे दोन प्रकारे करतात. तांदळाचे पायसम् दक्षिणेकडे देवाच्या नैवेद्याला करतात. तर महाराष्ट्रात गव्हाच्या शेवईचे पायसम् नैवेद्य म्हणून करतात.


तांदळाचे पायसम्  
साहित्य : एक डाव सुवासिक तांदूळ, १ लिटर दूध, २ चमचे साजूक तूप, सव्वा वाटी साखर, वेलची पावडर, काजू, बेदाणे, केशर, लवंगा.
कृती : रात्री तांदूळ धुऊन, निथळून, पसरवून ठेवावेत. सकाळी ओलसर असलेले तांदूळ हातानेच चुरावेत. चुरलेले तांदूळ चमचाभर तुपावर २-३ लवंगा टाकून गुलाबीसर परतून घ्यावेत. १ लिटर दूध तापवून त्यात चुरलेले तांदूळ घालून शिजेपर्यंत ढवळत राहावे. १ लिटर दुधाला छोटा डावभर तांदूळ पुरतात. शिजल्यावर त्यात साखर, केशर, वेलची घालावी. तुपात काजू तळून घेऊन घालावेत. गार झाल्यावर बेदाणे घालून सर्व्ह करावे.
गव्हाच्या शेवईचे पायसम् 
साहित्य : एक वाटी गव्हाची शेवई, दूध, साखर, वेलची, जायफळ, काजू, बेदाणे, साबुदाणा.
कृती : एक वाटी शेवईसाठी १ चमचा साबुदाणा भाजून घ्यावा व गार झाला की भिजवावा. शेवया तुपावर गुलाबी परतून घेऊन दूध घालून नेहमीप्रमाणे खीर करून घ्यावी. त्यात तो साबुदाणा घालावा. गार झाल्यावर जायफळ, वेलची, बेदाणे घालावेत व काजू तुपात तळून मग घालावेत. दूध आटले तर जास्ती चविष्ट होते.


तांदळाच्या पिठाच्या शेवया
साहित्य : दोन फुलपात्रे तांदळाचे पीठ, तेल, मीठ, एका नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, जायफळ.
कृती : सुवासिक तांदूळ धुऊन सावलीत वाळवून त्याचे पीठ करावे. १ भांडे पाणी, त्यात अर्धा चमचा मीठ व १ चमचा तेल घालून उकळावे. उकळल्यावर गॅस बारीक करून त्यात १ भांडे तांदळाचे पीठ घालून उलथण्याच्या मागच्या टोकाने ५-७ वेळा टोचावे. झाकण घालून १ मिनिट शिजू द्यावे. गॅस बंद करावा. थोडा तेलाचा हात लावून मोदकाप्रमाणे उकड भरपूर मळून घ्यावी. नंतर त्या उकडीचे मुटके करावेत. मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मुटके सोडावेत. मुटके सुरुवातीला तळाशी बसतात, शिजले की तरंगतात. तरंगू लागले की काढून घ्यावेत. गरम असतानाच सोऱ्यात कुरडईची ताटली घालून एकेका मुटक्याची एकेक शेवई पाडावी.  
नारळाचा चव थोडे पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्यावा. गाळण्याने किंवा स्वच्छ कापडाने गाळून दाटसर नारळाचे दूध काढावे. त्यात गूळ विरघळवावा. या नारळाच्या दुधात शेवई भिजवून सर्व्ह करावी. २ शेवयांमध्ये पोट गच्च भरते. पचायला हलके खाणे आहे.
कोकणात या शेवईसाठी लाकडाचा स्वतंत्र सोऱ्या असतो, त्याला शेवगा म्हणतात. 


घाटलं
साहित्य : सुवासिक तांदळाच्या १ वाटी कण्या, ३ चमचे तूप, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी चिरलेला गूळ, लवंगा, काजू, बदाम, बेदाणे, जायफळ.
कृती : सुवासिक तांदळाच्या १ वाटी कण्या २ तास धुऊन ठेवाव्यात. ३ चमचे तुपावर २-३ लवंगा टाकून, नंतर कण्या घालून, गुलाबी परतून घ्याव्यात. तिप्पट पाणी घालून शिजायला ठेवावे. अर्धे शिजले की त्यात १ वाटी गूळ व नारळ घालावा. शिजत आले की ते घट्ट होते. परत वाटीभर पाणी घालून एकजीव करावे. गार झाले की त्यात जायफळ, बदामाचे तुकडे, बेदाणे, तुपात तळलेले काजू घालावेत. जेवताना त्यावर भरपूर तूप घालून खावे. 


श्रीखंड 
साहित्य : दोन लिटर म्हशीचे दूध, विरजणासाठी ताक, साखर, वेलची, चारोळ्या, जायफळ, केशर.
कृती : दोन लिटर दूध एकदम बारीक गॅसवर तापवावे व नंतर गार करायला ठेवावे. गार होताना कोमट असतानाच त्या दुधाला २ चमचे ताकाचे विरजण घालावे. दूध साईसकटच वापरावे. खूप वेळ ढवळून ठेवावे. १२ तासांनी ते विरजलेले दही पांढऱ्या स्वच्छ कापडावर ओतून बांधून ठेवावे. १८-२० तास टांगून ठेवावे. नंतर पातेल्यात काढून घ्यावे, हा झाला चक्का तयार. त्यात चक्क्याच्या वजनाइतकी साखर मोजून घालावी व ढवळून ठेवावी. दोन तासांनी पुरण यंत्रातून काढावी. त्यात आवडीप्रमाणे चारोळ्या, जायफळ, वेलची किंवा केशर घालावे. २ लिटर म्हशीच्या दुधाचा ६५० ग्रॅम चक्का पडतो.


काला जामुन
साहित्य : अर्धा लिटर गाईचे तापवलेले दूध, अर्धा चमचा व्हाइट व्हिनेगर, १०० ग्रॅम खवा, अर्धा कप मैदा, १ चमचा साजूक तूप, ३ चमचे साखर, अर्धा चमचा सोडा, २ कप साखर पाकासाठी, २ कप पाणी, तेल, खाण्याचा लाल रंग.
कृती : दुधाची साय काढून घ्यावी. परत दूध तापवावे. त्यात अर्धा चमचा व्हिनेगर घालावे. पाणी व पनीर वेगळे झाले, की चाळणीवर घालून धुऊन घ्यावे. रुमालावर घालून पाण्याचा अंश टिपून घेऊन पूर्ण कोरडे करावे. २ चमचे पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा सोडा विरघळवून घ्यावा. परातीत १०० ग्रॅम खवा, पनीर, अर्धा कप मैदा, तूप, ३ चमचे साखर, सोडा, रंग सर्व एकत्र करून चांगले मळून, गोळे करून तेलात मंद गॅसवर काळा रंग येईपर्यंत तळावे. साखरेच्या पाकात घालून २-३ मिनिटे उकळावे. साधारण १८ ते २० जामुन तयार होतात.


शाही फ्रुट डिलाईट 
साहित्य : दूध, साखर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर, ब्रेड, केळी, सफरचंद, डाळिंब, चिकू, पपई, द्राक्ष, अननस. 
कृती : तीन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर अर्धी वाटी गार दुधात मिक्स करावी. अर्ध्या लिटर दुधात ६ टेबलस्पून साखर घालून तापवावी. उकळी आली की कस्टर्ड मिश्रित दूध हळूहळू ओतावे. सतत चमच्याने हलवावे. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा.
सर्व फळे बारीक चिरावीत. ब्रेडचा १ स्लाइस घेऊन थोड्याशा साखर मिश्रित दुधात थोडासा बुडवून पिळून घ्यावा. यात बारीक चिरलेली फळे भरून गोल बॉल करावा. यावर तयार केलेले दूध घालावे. सजवण्यासाठी चेरी लावावी व फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवावे. गार सर्व्ह करावे.


मूग हलवा
साहित्य : एक वाटी मूग डाळ, पावणे दोन वाट्या तूप, १ वाटी साखर, ३ वाट्या दूध, ड्रायफ्रुट्स.
कृती : मूग डाळ ३ ते ४ तास भिजवावी. पाणी काढून टाकून मिक्सर मधून वाटून घ्यावी. कढईमध्ये बारीक गॅसवर तूप घालून वाटलेली डाळ घालावी व परतावी. लाल रंग येईपर्यंत परतावी. या गोष्टीला बराच वेळ लागतो. लाल भाजून झाली की त्यात दूध घालून शिजवावी. दूध कमी वाटले तर अजून दूध घालून पूर्ण शिजू द्यावे. शिजल्यानंतर त्यात साखर घालावी. साखर आळली की गॅस बंद करावा. आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ते, वेलदोडा घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या