खुसखुशीत शंकरपाळी
दिवाळी फराळ
बिस्किटाच्या चवीची, खुसखुशीत, गोड, खारी, तिखट अशा निरनिराळ्या चवीची शंकरपाळी लहानथोर सर्वांनाच आवडतात. इतर फराळाच्या पदार्थांच्या मानाने करायला सोपी, महिनाभरसुद्धा छान टिकणारी, प्रवासाला न्यायला उत्तम म्हणून एरवीसुद्धा शंकरपाळी केली जातात. अशा खुसखुशीत शंकरपाळीच्या विविध रेसिपीज...
गोड शंकरपाळी (मैद्याची)
साहित्य : एक वाटी प्रत्येकी तूप, साखर व दूध (जास्त गोड हवी असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे), चिमूट मीठ, आवश्यक तेवढा मैदा, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती : दूध, तूप, साखर एकत्र करून उकळत ठेवावे. एक उकळी आली व साखर विरघळली, की खाली उतरावे. मैदा चवीपुरते (चिमूट) मीठ घालून चाळून घ्यावा. थंड झाल्यावर दुधाच्या मिश्रणात बसेल एवढा मैदा घालून कणकेसारखे पीठ भिजवावे. हा गोळा दमट कपड्याने झाकून ठेवावा. त्यानंतर भरपूर मळून घेऊन त्याचे गोळे करून किंचित जाडसर पोळी लाटावी. शंकरपाळी कापून तापलेल्या रिफाइंड तेलामध्ये मध्यम ते मंद गॅसवर गुलाबी रंगावर खमंग तळावीत. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरावीत.
गोड शंकरपाळी
साहित्य : एक वाटी साय, पाऊण ते एक वाटी साखर, रवा, मैदा, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती : साय व साखर एकत्र करून मंद गॅसवर ठेवावी. सारखे हलवत राहावे. साखर पूर्ण विरघळल्यावर खाली उतरावे. बुडी लागू देऊ नये. कोमट झाल्यावर त्यात बसेल एवढा रवा-मैदा सम प्रमाणात घालून पीठ किंचित घट्टसर भिजवावे व अर्धातास झाकून ठेवावे. नंतर छान कुटून घेऊन पीठ मऊ करावे व पोळी लाटून शंकरपाळी कापावीत. तापलेल्या रिफाइंड तेलामध्ये मंद गॅसवर खमंग तळावीत.
गुळाची शंकरपाळी
साहित्य : कपभर मऊसर पिवळा गूळ, एक कप कणीक, अर्धा कप मैदा, पाव कप चणाडाळीचे पीठ, दोन चमचे तांदळाची पिठी, दोन मोठे चमचे वनस्पती तूप, अर्धा कप दूध, चमचाभर खसखस, थोडीशी वेलची पूड, तळण्याकरता तेल, (शंकरपाळी भरपूर गोड हवी असतील तर गुळाचे प्रमाण थोडे वाढवावे) चिमूटभर मीठ.
कृती : दूध कोमट करावे. त्यात गूळ किसून घालावा व विरघळवून घ्यावा. परातीत तूप घेऊन भरपूर फेसावे. मीठ घालून परत फेसावे. सर्व पिठे एकत्र करून त्यात घालावीत व चांगली कुस्करून घ्यावीत. मग त्यात दूध-गुळाचे मिश्रण घालून पीठ भिजवावे व अर्धा तास झाकून ठेवावे. त्यानंतर चांगले मळून घेऊन त्याच्या पोळ्या लाटाव्यात. खसखस त्यावर पसरून परत लाटणे फिरवावे. शंकरपाळी कापून तापल्या तेलात मंद गॅसवर खमंग तळावीत.
पाकातील शंकरपाळी
साहित्य : दोन वाट्या मैदा, चिमूट मीठ, अर्धी वाटी वनस्पती तूप, दोन वाट्या साखर, तळण्यासाठी रिफाइंड तेल अगर वनस्पती तूप.
कृती : तूप पातळ करून मैद्यात घालावे. चवीपुरते मीठ घालून मैदा व्यवस्थित कुस्करून घ्यावा. थोडे दूध व पाणी एकत्र करून त्याने पीठ घट्टसर भिजवावे. एक तास झाकून ठेवावे. साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून दोन तारी पाक करावा. भिजवलेला मैदा भरपूर मळून घ्यावा. पोळी लाटून शंकरपाळी कापावीत. खमंग तळावीत. गरम पाकात टाकून बुडवून काढावीत व ताटात निथळत ठेवावीत.
चंपाकळी
साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी कोमट पातळ तूप, चिमूट मीठ, दोन वाट्या साखर, तळण्यासाठी तूप.
कृती : मैद्यात तूप पातळ करून घालावे. चवीपुरते मीठ घालावे व पाण्याने पीठ घट्ट भिजवावे व तासभर झाकून ठेवावे. नंतर चांगले मळून त्याचे पेढे करावेत व त्यांच्या छोट्या पातळ पुऱ्या लाटाव्यात. पुरीला मधे सहा-सात चिरा द्याव्यात व दोन्ही चिमटीत धरून पुरीची दोन्ही टोके पीळ देऊन दाबावीत. कळी तयार होईल. अशा कळ्या करून तापल्या तुपात मंद गॅसवर हलके हलवत गुलाबीसर तळाव्यात. साखरेचा दोन तारी पाक करून त्या गरम पाकात चंपाकळ्या बुडवाव्यात व काढून ताटात निथळत ठेवाव्यात. पाक सतत गरम असावा.
पालकाची शंकरपाळी
साहित्य : पालकाची अर्धी जुडी (२० ते २५ पाने) दोन वाट्या मैदा, ४-५ हिरव्या मिरच्या, एक टीस्पून ओव्याची भरडपूड, एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची भरडपूड, हळद, हिंग, चिमूट सोडा, अर्धी वाटी तेल मोहनासाठी, मीठ, तीळ दोन चमचे, तळण्यासाठी तेल.
कृती : पालकाची पाने २-३ मिनिटे गरम पाण्यात ठेवावीत. चाळणीत ओतून लगेच थंड पाणी घालावे. मग मिक्सरमध्ये ती पाने व हिरव्या मिरच्यांची एकत्र पेस्ट करून घ्यावी. मैद्यामध्ये ओवा, जिरेपूड, मीठ, हिंग, हळद, तीळ, सोडा घालावा. सोड्यावर अर्धी वाटी गरम तेलाचे मोहन घालावे. सगळे चांगले एकत्र करावे. त्यात पालक-मिरची पेस्ट घालून आवश्यक तर साधे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे व २० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पीठ मळून घेऊन जाडसर पोळी लाटावी व शंकरपाळी कापावीत. तापल्या तेलात मंद गॅसवर खुसखुशीत तळावीत.
टीप : १) पालक गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकल्याने त्याचा हिरवा रंग टिकतो.
२) सोड्यावर मोहनाचे तेल घातल्याने सोडा लगेच अॅक्टिव्ह होतो.
शक्करपारे (पंजाबी)
साहित्य : तीन वाट्या मैदा, वाटीभर खवा, दीड कप दूध, दोन वाट्या साखर, तीन मोठे चमचे पातळ तूप, वाटीभर बदाम, गरम पाण्यात भिजत घालून सोललेले पिस्ते, चमचाभर वेलचीपूड, अर्धा चमचा केशर, तूप.
कृती : बदाम-पिस्त्याची मिक्सरवर पेस्ट करावी. ही पेस्ट, वेलचीपूड व मैदा एकत्र करावेत. दूध घालून पीठ घट्ट भिजवावे. तासभर झाकून ठेवावे. मग मऊ होईपर्यंत चांगले मळावे. या पिठाच्या फुलक्याप्रमाणे छोट्या पुऱ्या लाटाव्यात. अशा तीन पुऱ्या तूप लावून एकावर एक ठेवून मैदा लावून लाटाव्यात. त्याची अर्धा इंच जाडीची पोळी लाटून त्याचे शक्करपारे कापावेत. साखरेत कपभर पाणी घालून दोन तारी पाक करावा. त्यात केशर घालावे व पाक खाली उतरावा. तयार शक्करपारे तळून काढून लगेचच पाकात टाकावेत. दुसरा घाणा होईपर्यंत पहिले शक्करपारे पाकात ठेवावेत. मग ते काढून ताटात निथळत ठेवावेत व नवीन शक्करपारे पाकात टाकावेत.
मैद्याची खारी शंकरपाळी
साहित्य : चार वाट्या मैदा, वाटीभर तेल, दोन टीस्पून मीठ, पाव चमचा बेकिंग पावडर, भाजलेल्या जिऱ्याची भरडपूड व भरड मिरेपूड प्रत्येकी एक चमचा, तळण्याकरता रिफाइंड तेल.
कृती : मैद्यात जिरे, मिरेपूड, मीठ, बेकिंग पावडर व वाटीभर गरम तेल घालून कुस्करून घ्यावा. थंड पाणी घालून घट्ट भिजवावा व १५-२० मिनिटे झाकून ठेवावा. मग चांगला मळून घेऊन त्याची पातळसर पोळी लाटावी व शंकरपाळी कापून तापल्या तेलात मंद ते मध्यम गॅसवर खमंग तळावीत.
खारी शंकरपाळी
साहित्य : कपभर दूध, पाऊण कप तूप, चवीप्रमाणे मीठ, चमचाभर ओवा, पाव चमचा जिऱ्याची भरडपूड, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा तिखट, चिमूट मिरपूड, आवश्यकतेप्रमाणे मैदा, दोन टेबलस्पून बेसन, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र चाळावे. त्यात ओवा, जिरे, मिरेपूड, तिखट, मीठ व बेसन घालावे. दूध-तुपाच्या मिश्रणाने पीठ घट्ट भिजवावे. लागेल तर आणखी मैदा घालावा. चांगले मळून घेऊन पोळ्या लाटाव्यात. शंकरपाळी कापावीत. तापल्या तेलात खमंग तळावीत.
रंगीत शंकरपाळी
साहित्य : दोन वाट्या मैदा, दीड वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, पाव चमचा सोडा, तिखट, मीठ, जिरे, तूप, खाण्याचा गुलाबी व हिरवा रंग, ओवा, हिरव्या मिरच्या, लसूण, दही.
कृती : मैद्यात चवीपुरते मीठ, चिमूट सोडा, चार टीस्पून गरम तेल घालावे व सर्व सारखे करावे. या मैद्याचे दोन भाग करावेत. एका भागात गुलाबी रंग व दुसऱ्यात हिरवा रंग घालून हे दोन्ही भाग निरनिराळे घट्ट भिजवावेत. डाळीच्या पिठात दोन चमचे गरम तूप व दही घालावे. मग त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग, जिरेपूड व ओवा किंवा आले-लसूण पेस्ट घालावी. थंड पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. भिजवलेला मैदा व भिजवलेले बेसन स्वतंत्रपणे चांगले मळावे. मैद्याच्या प्रत्येक भागाच्या ४-६ छोट्या गोळ्या कराव्यात. तितक्याच बेसनाच्याही कराव्यात. नंतर त्यांच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. गुलाबी व हिरव्या रंगाच्या पापडीत-पुरीच्या-मध्ये बेसनपुरी ठेवावी. हलके दाबून पोळी लाटावी. पोळी फार पातळ लाटू नये. नंतर त्याची शंकरपाळी कापून तुपात तळावीत. या शंकरपाळ्यांना बाहेरून दोन रंग व मधल्या पिठाचा निराळा रंग असे तीन रंग दिसतात.