चविष्ट चकली

राजश्री बिनायकिया, चिंचवड
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ  
चक... चक... चकली काट्यांनी माखली, अशी ही कुरकुरीत चकली सर्वांनाच आवडणारी.. चकली करणे खूप कौशल्याचे काम आहे. दिवाळीमध्ये भाजणीच्या चकलीला जास्त पसंती दिली जाते.. या भाजणीच्या चकलीबरोबरच इतर चकल्यांचे अनेक प्रकार आहेत.. अशाच चकलीच्या नावीन्यपूर्ण रेसिपीज...

भाजणी चकली
साहित्य : चार वाट्या तांदूळ, २ वाटी हरभरा डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १ वाटी जाड पोहे, २ टेबलस्पून धने, २ टेबलस्पून जिरे, २ टेबलस्पून तीळ, चवीनुसार मीठ, तिखट हळद, मोहनासाठी अर्धी वाटी तेल, तळणीसाठी तेल
कृती : तांदूळ धुऊन कपड्यावर सावलीत वाळत घालावे. तांदूळ सुकल्यावर ते मंद आचेवर भाजावेत. खूप लाल होऊ देऊ नये. चणा डाळ, उडीद डाळ वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. या डाळी धुऊ नयेत. धने-जिरेही भाजून घ्यावेत. सर्व धान्य गार झाल्यावर धने व जिरे मिक्स करून गिरणीतून दळून आणावे. चकल्या करताना भाजणीमधील ४ वाटी भाजणी घ्यावी. ३ वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी तेल, तीळ, हळद, तिखट, मीठ घालावे. ४ वाट्या भाजणी घालावी व भाजणी चमच्याने व्यवस्थित एकत्र करावी व झाकून ठेवावी. अर्धा ते एक तासाने थंड पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यावे व त्याच्या चकल्या कराव्यात व तळून घ्याव्यात...
(चकल्या तळताना प्रथम गॅसची आच मोठी ठेवावी नंतर मध्यम ठेवावी.)


कणकेच्या चकल्या
साहित्य : चार वाट्या कणीक, २ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून धनेपूड, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ चवीनुसार, तेल
कृती : प्रथम पातळ कपड्यांमध्ये कणीक घालून सैलसर पुरचुंडी बांधून घ्यावी. ही बांधलेली कणीक कुकरच्या डब्यामध्ये ठेवावी. २-३ शिट्ट्या करून घ्याव्यात. नंतर बाहेर काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पीठ काढून घ्यावे. गुठळ्या राहणार नाहीत. नंतर ३ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. त्यामध्ये तीळ, धनेपूड, जिरेपूड, तिखट, मीठ, हळद हे सर्व घालावे व थंड पाण्याने भिजवावी. अर्धा ते एक तासाने चकल्या कराव्यात व तळाव्यात.


ओनियन चकली
साहित्य : चार वाट्या कणीक, २ वाट्या कांदा किसून पिळून घेतलेला रस, प्रत्येकी १ टीस्पून धनेपूड, जिरेपूड, अर्धा टिस्पून मिरी पूड, २ टेबलस्पून, हळद, २ टीस्पून हिरवी मिरची-लसूण वाटण (पाण्यात घालून गाळून घेणे), २ टेबलस्पून साजूक तूप, चवीनुसार मीठ
कृती : तुपावर मंद गॅसवर कणीक भाजून घ्यावी. गार झाल्यावर, त्यामध्ये कांद्याचा रस, धने, जिरे, मिरेपूड हळद, मिरची लसूण वाटणाचे पाणी व मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. लागले तर पाणी वापरून पीठ मळावे. नंतर त्या पीठाच्या चकल्या कराव्यात व चकल्या गरम तेलात तळाव्यात.


टोमॅटो चकली
साहित्य : दीड वाटी लाल टोमॅटोचा रस, १ वाटी रवा, १ वाटी मैदा, २ चिमटी सोडा, प्रत्येकी १ टीस्पून मिरपूड, जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, तेल
कृती : टोमॅटो रस, मीठ व सोडा एकत्र उकळून घ्यावा. त्यामध्ये रवा, मैदा, तिखट, जिरेपूड, मिरेपूड घालून एक वाफ आणावी. नंतर मिश्रण घोटून घ्यावे. गार झाल्यावर मिश्रण मळून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाच्या चकल्या तळाव्यात.


झटपट मसाला चकली
साहित्य : चार वाटी ज्वारीचे पीठ, दीड वाटी बेसन, १ वाटी तांदूळ पीठ, प्रत्येकी २ टीस्पून धने-जिरेपूड, ३ टेबलस्पून तीळ, चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि तळणीसाठी तेल, मोहनासाठी ३ टेबलस्पून तेल.
कृती : सहा वाटी पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये ३ टेबलस्पून तेल, धने-जिरेपूड, तीळ, हळद, मीठ, तिखट घालावे. उकळी आल्यानंतर ज्वारी, तांदूळ व बेसन पीठ घालून ढवळून गॅस बंद करावा. गार झाल्यावर मिश्रण मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे चकल्या करून तेलात तळाव्यात.


ज्वारी लाह्या चकली
साहित्य : चार वाटी ज्वारी लाह्या, २ वाटी ज्वारी पीठ, २ वाटी तांदूळ पीठ, दीड टेबलस्पून लोणी, दोन टीस्पून धने-जिरेपूड, ३ टेबलस्पून तीळ, तेल, चवीनुसार मीठ, तिखट, हळद
कृती : प्रथम ज्वारीच्या लाह्या चाळणीत घालून पाण्यात भिजवून निथळून घ्याव्यात. नंतर ज्वारी पीठ, तांदूळ पीठ, धने-जिरेपूड, तीळ, तिखट, मीठ चवीनुसार, हळद व ज्वारीच्या लाह्या सर्व मिश्रण एकत्र करावे. नंतर त्यामध्ये लोणी घालावे. नंतर सर्व मिश्रण कोमट पाण्याने मळून घ्यावे व दहा ते पंधरा मिनिटांनी मिश्रणाच्या चकल्या करून तळाव्यात. या चकल्या गरमगरमच छान लागतात.


बटाटा मैदा चकली
साहित्य : दोन वाटी मैदा, २ मध्यम उकडलेले बटाटे, २-४ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, एक टीस्पून आले पेस्ट, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून लोणी
कृती : प्रथम मैदा एका कपड्यात बांधून पुरचुंडी करून कुकरमध्ये ठेवून २-३ शिट्ट्या करून घ्याव्यात. नंतर कुकरमधून मैद्याची पुरचुंडी काढून घ्यावी. मैदा गार झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यावा. गुठळी ठेवू नये. नंतर एका ताटामध्ये मैदा, उकडलेल्या बटाट्याचा कीस, हिरवी मिरची आले पेस्ट, मीठ व लोणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. मंद आचेवर या पिठाच्या चकल्या करून तळून घ्याव्यात.  
         
पालक चकली
साहित्य : चार वाट्या भाजणी, १ वाटी धुऊन बारीक चिरलेली पालक, १ टेबलस्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट, चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून तीळ, ३  
टेबलस्पून गरम तेलाचे मोहन
कृती : भाजणीमध्ये बारीक चिरलेली पालक व वरील सर्व साहित्य मिक्स करावे. नंतर पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. या पिठाच्या चकल्या करून गरम तेलात तळून घ्याव्यात. या पीठामध्ये हळद घालू नये.


टिप्स

  • भाजणी करताना तांदूळ खूप जुने घेऊ नयेत.
  • चकलीची भाजणी भाजताना मंद गॅसवर भाजावी.
  • कुठली ही चकली करताना तेल भरपूर घ्यावे म्हणजे चकल्या छान कुरकुरीत तळता येतात.
  • चकली तळताना प्रथम तेल चांगले तापवून घ्यावे. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवावी व नंतर मध्यम आचेवर चकल्या तळाव्यात.
  • मोठ्या आचेवर चकल्या तळल्यास वरून लाल होतात व आतून कच्च्या राहतात व नंतर मऊ पडतात.
  • चकल्या पूर्ण गार झाल्यानंतरच डब्यात भराव्यात.
  • चकली तळताना चकलीचा एक तुकडा तोडून आतमध्ये नळी पडली असेल, तर चकली कुरकुरीत झाली असे समजावे.
  • चकलीमध्ये जास्त तिखट घातले, तर तिखट करपून तळणीमध्ये उतरते. जास्त लाल रंगाची चकली चांगली दिसत नाही. म्हणून चकलीमध्ये तिखट कमी वापरावे.
  • चकलीमध्ये हळदही कमी घालावी. जास्त घालू नये नाहीतर चकली काळसर दिसते.
  • चकली आकाराने व रंगाने एकसारखी असावी.
  • चकलीचे सर्व पीठ एकदम मळू नये.
  • पीठ भिजवताना उकळलेले पाणी वापरून ते खाली उतरून नंतर त्यात पीठ व सर्व मसाले घालावे. झाकून ठेवावे त्यानंतर चकल्या करायच्या वेळेस थोडे थोडे पीठ घेऊन थंड पाण्याच्या हाताने मळून चकल्या कराव्यात. एकदम चकलीचे पीठ मळून ठेवू नये

संबंधित बातम्या