पराठा, रोटी आणि कुलचा

वैशाली खाडीलकर 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
दिवाळीत घराघरांत पाहुण्यांची चंगळ असते... नाश्त्याला फराळाचे पदार्थ तर असतातच; पण त्याचबरोबर पोटभरीसाठी रोटी किंवा पराठेही करावे लागतात. अशावेळी तेच तेच पराठे किंवा रोटी करण्यापेक्षा काही नवीन प्रकार ट्राय केले तर... पाहुण्यांचा पाहुणचार आणखी उत्तम होईल... त्यासाठीच पराठा आणि रोटीच्या खास रेसिपीज...

दिवाळी डिलाइट पराठा
साहित्य : सात-आठ शंकरपाळे, २ करंज्या, अर्धा अनारसा, २ टेबलस्पून बेसन लाडूचा चुरा, १ टीस्पून गुलकंद, २ टेबलस्पून ड्रायफ्रूट्सची भरड, २ टेबलस्पून किसलेले पनीर, चिमटी मिरपूड व दालचिनीपूड, मीठ स्वादानुसार, ७-८ मोगरा फुले, गुलाब पाकळ्या (सुकलेल्या), ज्वारी आटा, तेल, तूप (कणीक भिजवताना मिश्रण पातळसर वाटले तर जरुरीप्रमाणे खारीक पावडर, डिंक पावडर, ओट्स पावडर, सातू पीठ, गव्हल्यांची पूड, सूर्यफूल बिया व भोपळा बिया पावडर घालावी. या जिन्नस घालून पौष्टिकता वाढेल) 
कृती : शंकरपाळे, करंज्या, अनारसा हाताने मोडून मिक्‍सरवर पावडर करावी. बोलमध्ये ठेवावी. मोगऱ्याची फुले देठ काढून दूध घालून मिक्‍सरवर पेस्ट करावी व काढावी. त्यात गुलकंद ड्रायफ्रूट्सची भरड, मिरपूड, दालचिनीपूड, पनीर व स्वादानुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करावे. स्टीलच्या परातीत हे मिश्रण यावे त्यात सुकलेल्या गुलाब पाकळ्या हाताने तोडून घालाव्यात. ज्वारी आटा यात मावेल एवढा घालावा. नेहमीसारखी कणीक होण्यासाठी गरज असेल, तर दूध घालावे आणि मळून गोळा करावा. पराठा करतेवेळी तेल घालून पुन्हा मळावे व मऊसर गोळा करावा. याचे समान भाग करावेत. पोळपाटावर १ गोळा घ्यावा. तांदूळ पिठी पसरून गोलाकार पराठा लाटावा. असे सर्व करावेत. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर तूप/तेल सोडावे व खमंग भाजावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावेत व लगेच सर्व्ह करावेत. 


कोकोनट-गुलकंद पराठा  
साहित्य : प्रत्येकी १ वाटी गहू आटा व जवार आटा, स्वादासाठी मीठ व चिमटी साखर, तेल 
सारणासाठी - अर्धा कप ओला नारळचव, २ टेबलस्पून गुलकंद, ४ टेबलस्पून दूध पावडर, काजू-बदाम-अक्रोड पावडर, १ वाटी पिठीसाखर, अर्धा टेबलस्पून वेलची जायफळ, तूप जरुरीप्रमाणे, सोबत स्वीट योगर्ट 
कृती : परातीत आटा घ्यावा व जरुरीपुरते पाणी घालून मऊसर कणीक मळावी. १५ मिनिटे झाकून ठेवावी. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर ओला नारळचव मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. काचेच्या बोलमध्ये काढावा. थंड होऊ द्यावा. मग इतर जिन्नस घालून सारण तयार करावे. कणीक पुन्हा तेल लावून मळावी घ्यावी व त्याचे समान लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करावेत. पोळपाटावर एक गोळा ठेवावा व गोलाकार पराठा लाटावा. त्यावर सगळीकडे सारण पसरावे व त्यावर दुसरा पराठा ठेवावा. सर्व कडांना पाणी लावावे व सर्व बाजूंनी बंद करावे. सारण बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी. गॅसवर नॉनस्टिक तवा तापवावा. त्यावर पराठा टाकावा व बाजूने तूप सोडावे. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. गोड खमंग पराठा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावा व स्वीट योगर्टबरोबर खायला द्यावा. 


स्टफ दोस्ती रोटी  
साहित्य : प्रत्येक १ कप नाचणी आटा, मका आटा, मीठ, पाणी. 
सारणासाठी : अर्धा कप किसलेले पनीर, पाव कप बारीक मेथी पाने, १ कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ, अर्धा कप तयार वांग्याचे भरीत 
कृती : स्टीलच्या परातीत नाचणी आटा, मका आटा, मीठ व कोमट पाणी एकत्र करून मऊसर कणीक मळावी. नंतर समान आकाराचे गोळे तयार करावेत. स्टीलच्या वाडग्यात किसलेले पनीर, मेथी पाने, १ कांदा व टोमॅटो, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, वांग्याचे भरीत, मीठ एकत्र करून सारण तयार करावे. पोळपाटावर १ गोळा घ्यावा, पुरीएवढ्या आकाराची रोटी लाटावी. त्यात सारण भरावे. नंतर दुसरी रोटी पहिल्या रोटीवर दाबून घट्ट बसवावी. आता ही दोस्ती रोटी तयार झाली. अशा बाकीच्या कराव्यात. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर सर्व रोट्या दोन्ही बाजूंनी खमंग भाजाव्यात. आवडीप्रमाणे तूप किंवा बटर घालावे व सर्व्ह करावे. त्याच्याबरोबर ताज्या दह्याचा बोल द्यावा. 


चेट्टीनाड मसाला पराठा  
चेट्टीनाड मसाला कृती : एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, १ टेबलस्पून धने व जिरे, ४ सुक्‍या लाल मिरच्या, ७-८ लहान वेलच्या, १ दालचिनी तुकडा, ४ लवंगा, १ स्टार फूल, ८-१० कढीपत्ता पाने, अर्धा टेबलस्पून हळद, २ टेबलस्पून बडीशेप, १ तमालपत्र, १ टेबलस्पून मिरे हे सर्व कोरडे भाजावे व पावडर करावी. 
स्टफींगसाठी : गॅसवर कॉरबॉटम स्टील कढीत तेल तापवावे. १ बारीक चिरलेला कांदा परतावा. मग १ टोमॅटो व २ हिरव्या मिरच्या (मधे चीर दिलेल्या) जराशा परताव्या. १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट परतावे. नंतर १ टेबलस्पून मिरची पावडर, पाव टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून चेट्टीनाड मसाला घालून मंद आचेवर ढवळत राहावे. १ टेबलस्पून टोमॅटो केचअप, मीठ, १ टेबलस्पून काजूपेस्ट घालावी व एकजीव करावे. आता त्यात २ वाट्या उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालावा. मॅशरने एकजीव करावे. सारखे ढवळत २ मिनिटे परतावे. मिश्रण घट्टसर व्हायला पाहिजे. त्यात लिंबूरस पिळावा आणि गॅस बंद करावा. स्टीलच्या परातीत होल व्हीट आटा १ वाटी, २ टेबलस्पून बेसन, २ टेबलस्पून तेल, जरुरीप्रमाणे मीठ व पाणी घालून कणीक मळावी. अर्धा तास झाकून ठेवावे. आता पोळपाटावर कणकेचा १ मोठा गोळा घ्यावा. ४ इंच लांबीचा गोलाकार पराठा लाटावा. त्यावर वरील स्टफिंग भरावे व करंजीसाठी करतो तसे दुमडावे. पुन्हा एकदा दुमडावे म्हणजे त्रिकोण होईल. आता ह्याचा मोठा त्रिकोणी पराठा लाटावा. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर बटर घालावे व पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. असे बाकीचे करावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावा व सर्व्ह करावा. त्याच्याबरोबर आवडीची चटणी द्यावी. 


सात्त्विक पराठा 
साहित्य : प्रत्येकी पाव कप बाजरी आटा, जवार आटा, नाचणी आटा, गहू आटा, चणा डाळ आटा,  
मका आटा, तांदूळ आटा (यापैकी ७ घ्यावेत), पाव कप दुधी, पाव कप गाजर कीस, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, प्रत्येकी पाव टेबलस्पून हळद, तिखट, सुंठ पावडर, ज्येष्ठ मध पावडर, काळी मिरी पावडर, जिरा पावडर, ओवा पावडर, बडीशोप पावडर, तूप (मुळा, बीट, नवलकोल, कोबी, रताळे यांचा कीसही घेऊ शकता.) 
कृती : काचेच्या बोलमध्ये वरील सर्व साहित्या घ्यावे. त्यात जरुरीप्रमाणे दूध घालून मऊसर कणकेचा गोळा करावा. याचे समान भाग करावेत. पोळपाटावर थोडी कणीक, गव्हाचे पीठ पसरावे. १ गोळा घ्यावा, ४ इंच व्यासाचा गोलाकार पराठा लाटावा. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर तूप घालावे व पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावा व गरमागरम सर्व्ह करावा. त्याच्याबरोबर रायता द्यावा. या पराठ्याचा रोल करावा व त्याला कांदापातीने बांधावे. सिल्व्हर फॉईलमध्ये गुंडाळून लंच बॉक्‍समध्येही भरून देता येतील किंवा प्रवासासाठीही छान पर्याय आहे. 


कच्च्या पपईचा पराठा  
साहित्य :
एक कप सातू आटा, पाव कप दलिया, तेल, मीठ, स्टफिंग, अर्धा कप कच्च्या पपईचा कीस, बारीक चिरलेली हिरवी कांदा पात, १ टेबलस्पून हिरवी मिरची, आले पेस्ट, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ४-५ पुदिना पाने, पाव टेबलस्पून ताजी हिरव्या मिऱ्यांची पेस्ट, बटर 
कृती : दलिया मिक्‍सरमध्ये बारीकसर वाटावा. नंतर थाळीत घ्यावा. त्यात आटा घालावा. मीठ व जरुरीप्रमाणे पाणी घालून कणीक मळावी, १५ मिनिटे झाकून ठेवावी. नंतर समान आकाराचे गोळे करावे. गॅसवर नॉनस्टिक कढीत तेल तापवावे व पपईचा कीस जरासा परतून घ्यावा. थंड होऊ द्यावा. मग बोलमध्ये घ्यावा. त्यात इतर साहित्य घालावे व स्टफिंग करावे. पोळपाटावर थोडे पीठ पसरावे व कणकेचा १ गोळा घेऊन ४ इंच व्यासाचा पराठा लाटावा. गॅसवर नॉनस्टिक पॅनला बटर लावावे व एक पराठा ठेवावा. त्यावर सगळीकडे स्टफिंग भरावे. कडांना पाणी लावावे. त्यावर दुसरा पराठा ठेवावा व घट्ट बसवावा. दोन्ही बाजूंनी खमंग भाजावा. असेच बाकीचे करावेत. रायत्याबरोबर सर्व्ह करावेत. 
खास टीप : याप्रमाणे कोबी कीस, गाजर, मुळा, रताळे, काकडी, लाल भोपळा, दुधी इ. भाज्यांचा कीस घालूनही हा पराठा करता येईल. 


पनीर भुर्जी स्टफ कुलचा  
कुलचासाठी : एक कप मैदा, अर्धा कप कोमट दूध, अर्धा टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून दही, ३ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून शुद्ध घी, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर, मीठ स्वादानुसार, अर्धा टेबलस्पून कलौजी 
स्टफिंगसाठी : एक कप किसलेले पनीर किंवा टोफू, २ टेबलस्पून कांदा पात, अर्धा टेबलस्पून आले कीस, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धा टेबलस्पून चाट मसाला, पाव टेबलस्पून मिरपूड, मीठ स्वादानुसार, २ टेबलस्पून हिरव्या सिमला मिरचीचे तुकडे, १ कांदा बारीक चिरलेला, २ टेबलस्पून टोमॅटो केचअप 
कृती : स्टीलच्या वाडग्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात साखर, दही, दूध, तूप, तेल, बेकिंग पावडर, मीठ, कलौंजी घालून कालवावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून मऊसर गोळा करावा. २ तास झाकून ठेवावा. नंतर पुन्हा चांगला मिळावा व समान आकाराचे गोळे करावेत. 
स्टफिंगसाठी : पनीर व इतर साहित्य घेऊन सारण तयार करावे. कुलच्यासाठी १ गोळा घ्यावा. पोळपाटावर ४ इंच लांबीची पोळी लाटावी. त्यामध्ये २ टेबलस्पून सारण भरावे व सर्व बाजूंनी मिटवून बंद करावे व घट्ट बॉल करावा. नंतर तो दाबून चपटा करावा. नंतर ६ इंच व्यासाचा गोलाकार पराठा लाटावा. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर बटर घालावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खमंग भाजावा आणि रायत्याबरोबर सर्व्ह करावा. 


केळ्याच्या रसाच्या दशम्या (भाकऱ्या)  
साहित्य : एक कप भाकरीचे पीठ, पाऊण कप केळ्याचा रस, पाव कप गूळ, चिमटी मीठ, २ टेबलस्पून मोहन 
कृती : परातीत केळी कुसकरावीत व दाबून रस काढावा. त्यात गूळ एकजीव करावा. पिठात मीठ आणि मोहन घालून कणीक मळावी. थोडा वेळ मुरायला ठेवावे. समान आकाराचे गोळे करावेत. १ गोळा घ्यावा. पोळपाटावर हाताने थापून भाकरी-दशमी करावी. गॅसवर खोलगट तव्यावर भाकरी शेकावी. गरमागरम खावयास द्यावी. भाकरीबरोबर कैरीचे किंवा मिरचीचे लोणचे द्यावे. 


डबलडेकर पराठा  
साहित्य : सहा नेहमीच्या पोळ्या (ताज्या अथवा सकाळच्या उरलेल्या), बटर, तूप 
हिरव्या थरासाठी : मूठभर ब्लांच पालक पाने, २ टेबलस्पून मेथी पाने, पाव कप वाफवलेले ताजे मटार, २ टेबलस्पून हिरवी कांदा पात, पाव कप हिरव्या सिमला मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना, आले, लसूण, १ टेबलस्पून चाट मसाला, १ टेबलस्पून पावभाजी मसाला, मीठ स्वादानुसार, चिमटी साखर, जिरे, १ टेबलस्पून आमचूर पावडर 
लाल थरासाठी : प्रत्येकी पाव कप भिजवलेल्या बिटाचे तुकडे व गाजर कीस, २ टेबलस्पून डाळिंब दाणे क्रश, सुकी लाल मिरची, १ टेबलस्पून आले पेस्ट, शेजवान सॉस, जिरे, २ टेबलस्पून किसलेले पनीर, मीठ स्वादानुसार 
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. जिरे घालावेत. ठेचलेले मटर, सिमला मिरचीचे तुकडे, मध्यम आचेवर २ मिनिटे परतावे. मग इतर साहित्य घालून हिरव्या थराचे मिश्रण करावे. काचेच्या बोलमध्ये काढावे. त्याच पॅनमध्ये जिरे घालून बीट व गाजर कीस परतून घ्यावा व इतर साहित्या घालून लाल थराचे मिश्रण तयार करावे. नॉनस्टिक तव्यावर बटर किंवा तेल लावावे. मंद आच ठेवावी. त्यावर प्रथम १ पोळी ठेवावी. त्यावर हिरवा थर पसरावा व दुसरी पोळी ठेवावी. ती दाबून बसवावी. त्यावर लाल थर पसरावा. शेवटी तिसरी पोळी ठेवावी व पहिल्या पोळीपर्यंत दाबून घट्ट बसवावी. हा डबलडेकर पराठा प्लेटमध्ये घ्यावा. सर्ब कडांना फोर्कने चेपावे व सुंदर डिझाइन करावे. असा दुसराही करावा. आयत्यावेळी गरम करून घ्यावा. पिझ्झा कटरने ८ त्रिकोणी भाग करावेत. एक भाग सुटा ठेवावा. पावभाजी फ्लेवर्ड पास्ता पराठा  
साहित्य : अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचा लगदा, प्रत्येकी अर्धा कप बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, पाव कप गाजर कीस, १ बीट, पाव कप हिरव्या व पिवळ्या सिमला मिरचीचे तुकडे, वाफवलेले कॉलीफ्लॉवर तुरे व पाव कप ताजे मटर, १ टेबलस्पून चाट मसाला, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, अर्धा टेबलस्पून तिखट, पाव टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून रेडचिली सॉस, मीठ, ३ टेबलस्पून बटर, २ टेबलस्पून लिंबूरस, २ टेबलस्पून किसलेले चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट (ऐच्छिक), एक कप शिजवलेला आवडीचा पास्ता, ३/४ पाव जरुरीप्रमाणे, गव्हाची कणीक जरुरीप्रमाणे. 
कृती : प्रेशर कुकरमध्ये २ बटाटे व लहान बीट वेगवेगळे उकडून घ्यावे. बीट साल काढून एका लहान डब्यात पाणी घालून शिजवावे. हे पाणी भाजीला वापरायचे व बिटाचे सॅलड करावे. सर्व भाज्या धुऊन चिराव्यात. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. मंद आचेवर कांदा, टोमॅटो गुलाबीसर परतावा. मग गाजर कीस व सिमला मिरचीचे तुकडे अर्धवट शिजवावे. आता चाट मसाला, पावभाजी मसाला, तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट घालावी. सर्व एकजीव करावे. नंतर चांगले परतावे. बटाट्याचा लगदा, मटर व कॉर्लाफ्लॉवर तुरे घालून ढवळावे. रेड चिली सॉस व बिटाचे पाणी घालून एकजीव करावे. मॅशरने लगदा करावा. लिंबूरस घालावा. दुसऱ्या गॅसवर कढईत बटर घालावे व शिजवलेला पास्ता घालून मिनिटभर हालवावे व तो वरील पावभाजीत घालावा आणि एकजीव करावा. त्याच कढईत बटरवर पाव भाजून घ्यावेत. प्लेटमध्ये काढावेत. मिक्‍सरमध्ये चुरा करून घ्यावा व तो घालून मिसळावा. हे मिश्रण पराठ्यासाठी तयार झाले. 
पहिली पद्धत : या मिश्रणात मावेल एवढे ज्वारीचे, गव्हाचे, नाचणीचे, बाजरीचे पीठ घालावे. जरुरीप्रमाणे मीठ घालावे व मळून गोळा तयार करावा. याचे समान भाग करावेत. पराठे लाटावेत व तव्यावर बटर (घालून जरुरीप्रमाणे) खमंग भाजावेत. 
दुसरी पद्धत : परातीत कणीक (आटा) घ्यावा. त्यात मीठ व तेल व जरुरीप्रमाणे पाणी घालून नेहमीसारखी कणीक मळावी व १५ मिनिटे झाकून ठेवावी. नंतर समान आकाराचे गोळे करावेत. एक गोळा घ्यावा त्याची मोदकांसाठी करतो तशी पारी करावी. त्यात पावभाजी पास्ताचे तयार सारण भरावे. पारी मिटवावी. पोळपाटावर पीठ पसरावे व याचा पराठा लाटावा. असे बाकीचे करावेत. गॅसवर तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर घालून खमंग भाजावेत.

संबंधित बातम्या