वार्षिक राशिभविष्य २०२१-२०२२

अनिता केळकर
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

वार्षिक राशिभविष्य २०२१-२०२२

मेष 

बेधडक मुसंडी मारून पुढे जाण्याची तुमची वृत्ती असते, त्यात पुढचा विचार न करता कृती करण्याची घाई असते. उत्साह, ताकद व निश्‍चयात्मक प्रवृत्तीमुळे जीवनात बरेच काही मिळते. नवीन वर्षात गुरूच्या कृपेने सर्व स्तरावर निभावून जाणार आहात, तेव्हा काळजीपेक्षा कृती श्रेष्ठ मानून कामाला लागणे बरे. 

धंदा/ व्यवसायात कर्तृत्वाच्या बाबतीत अनुकूलता राहील. नवीन कामे मिळतील. धनप्राप्तीसाठी नोव्हेंबर २०२१, जानेवारी, एप्रिल, जुलै व सप्टेंबर २०२२ हे महिने विशेष अनुकूल आहेत. गुरूकृपेमुळे धनाची चिंता पुढील वर्षभर राहणार नाही. मे २०२२मध्ये विशेष खर्च होईल. स्थावर इस्टेट व वाहनसुख वर्षभर मिळेल. महत्त्वाची कामे वर्षाच्या पूर्वार्धात मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. त्यातून भविष्यात पुढील वाटचाल सुकर होईल. 

नोकरीत नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या मुदतीत पैशापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ असते याचा प्रत्यय येईल. मात्र तुमच्या तापट स्वभावामुळे व रागामुळे शत्रुत्व वाढणार नाही व तुमचे काही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना मार्च २०२२पासून पुढील काळ अनुकूल राहील. जुलै, सप्टेंबर २०२२मध्ये कामाचा विस्तार होईल. नवीन चालना मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. पैशाची ऊब मिळेल. 

घरात जोडीदार व इतर व्यक्तींकडून उत्तम सुख मिळेल. ऐहिक व पारमार्थिक गोष्टींचा झगडा या वर्षी सतत चालणार आहे. आपले खरे हित कशात आहे हे समजून त्याप्रमाणे आचरण करणे हितावह राहील. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासाला नवीन वर्षात अनुकूल वातावरणाची साथ मिळेल. गुरूचे पाठबळ असल्याने अभ्यास उत्तमप्रकारे करता येईल. यश मिळेल. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्तींनी स्वतःचे मत बाजूला सारून विचारपूर्वक निर्णय घेऊन वागण्याचा प्रयत्न करणे व त्यानुसार पावले टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी मनोनिग्रह ठेवावा. आरोग्याच्या दृष्टीने नवीन वर्ष संमिश्र राहील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. एकंदरीत नवीन वर्ष प्रगतीकारक ठरेल. त्यासाठी ‘विवेकदृढ धरावी वाट सत्याची’ हे संतवचन सतत लक्षात ठेवावे. 

वृषभ
तुमची रास शुक्राची असल्याने सर्व काही चांगल्या गोष्टींकडे तुमचे लक्ष केंद्रित होते व ऐहिक गोष्टी उपभोगण्याकडे तुमचा कल असतो. नवीन वर्षात गुरूची साथ मिळेल. मात्र तुमच्या नैसर्गिक स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. पैशाचे गणित मांडून पुढे वाटचाल करावी. 

धंदा/ व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. मार्च ते जून २०२२मध्ये काही बदल घडण्याचे प्रसंग येतील. तरी गुरूकृपेने त्यातून पार पडाल. महत्त्वाची कामे नवीन वर्षारंभी सुरू करून त्यात बरीच मजल माराल. यशाची मजा पुढील वर्षात एप्रिल २०२२नंतर चाखता येईल. आर्थिक बाबतीत मात्र फार अपेक्षा न बाळगणे बरे. तुमच्या कर्तृत्वाने श्रेष्ठत्व लाभेल व भाग्योदयही होईल. 

नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. मात्र स्वार्थी सहकाऱ्यांपासून चार हात लांब राहणेच हितावह राहील. नोकरीत बदल व बढतीसाठी मे ते सप्टेंबर २०२२ हा कालावधी उत्तम राहील. वरिष्ठांकडून महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविली जाईल. त्यामुळे नवीन आव्हाने स्वीकाराल. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. एखादी सुखद बातमी जून २०२२मध्ये कळेल. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. 

घरात व कौटुंबिक जीवनात टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची थोडी चीडचीड होईल. जमाखर्च सांभाळताना जानेवारी ते मे २०२२पर्यंत थोडी तारांबळ होईल. वास्तूबदल करणे तुम्हाला आवडत नाही; परंतु नवीन वर्षात जूननंतर बदल संभवतो. नवीन वर्षात तरुण व विवाहोत्सुकांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विवाह ठरतील व पारही पडतील. 

सामाजिक कामात नवीन वर्षात तुमची हौस फारशी पूर्ण होणार नाही. प्रकृतीचे तंत्र सांभाळून व शारीरिक मर्यादांचा विचार करून कामे हाती घ्या. वयस्कर व्यक्तींना मनातील सुप्त इच्छा सफल करण्याची संधी मिळेल. मानसिक आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी उत्तम संधी चालून येईल. एकंदरीत अनुकूलतेचे वर्ष आहे. 

मिथुन
मिथुनेचा राशीस्वामी बुध आहे; त्याचा संबंध बुद्धीशी आणि वाचेशी असतो. अनेक विषयांचे आकलन करून त्यातून मर्म शोधून काढणे तुम्हाला आवडते. बुद्धीची झेप अचाट व अफाट असते, स्मरणशक्ती उत्तम असते. नवीन वर्षात गुरू व इतरही ग्रह तुम्हाला साथ द्यायला राजी असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. फार मोठी स्वप्ने न बाळगता जमिनीवर राहायचे तुम्ही निश्‍चित केलेत तर अनेक प्रश्‍नांना समर्थपणे तोंड देऊ शकाल. गुरूभ्रमण अनुकूल असल्याने आर्थिक स्थिती व मनोधैर्य चांगले राहील. 

धंदा/ व्यवसायात नोव्हेंबर ते मार्च २०२२ हा काळ प्रयत्नाच्या पटीत यश देणारा आहे. एप्रिल-मे २०२२मध्ये अनपेक्षित कारणांमुळे नवीन खर्च उभे राहतील. त्याला सामोरे जाण्यासाठी इच्छेविरुद्ध कर्ज काढावे लागेल. जूननंतर भरपूर कामे करून आर्थिक तणाव कमी करू शकाल. जुनी येणी वसूल होतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. 

नोकरीत कामाचा ताण राहील; परंतु नवीन वर्षात हे प्रमाण हळूहळू कमी होईल. जानेवारी ते जून २०२२ या काळात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्या. अतिशय आवश्‍यक असेल तरच कामात बदल करा. पगारवाढ व पदोन्नतीचे योग एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या दरम्यान येतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. बेकार व्यक्तींना डिसेंबरपूर्वी काम मिळेल. 

घरात कौटुंबिक जीवनात असणाऱ्या जबाबदाऱ्या मे २०२२पर्यंत पूर्ण कराल. कामाचे योग्य नियोजन व इतर सभोवतालच्या व्यक्तींची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जूननंतर काही सुखद घटना घडतील. तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळत असेल तर अवश्‍य प्रयत्न करावा. मोठ्या व्यक्तींनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघून पुढील वाटचाल आनंदात करावी. मनोबल उंचावेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींनी नशिबापेक्षा प्रयत्नावर भर द्यावा. मे २०२२नंतर उज्ज्वल यश देणारे ग्रहमान राहील. 

कर्क
मुत्सद्दी म्हणून तुमच्या राशीचे विशेष महत्त्व आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या तुमच्या स्वभावाची खरी कसोटी नवीन वर्षात आहे. विनाकारण कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निश्‍चय केलात तर नवीन वर्षात त्याचा उपयोग होईल. गुरूची साथ एप्रिल २०२२ नंतर चांगली मिळेल. 

धंदा/ व्यवसायाच्या दृष्टीने वर्षाचे दोन भाग करता येतील. नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या काळात कोणतेही निर्णय घेताना थोडे जपून, सावधगिरीने घ्या. तुमचे अंदाज चुकण्याची दाट शक्‍यता आहे. खूप पैसे मिळवण्याच्या मोहापायी उंच उडी घेऊ नका. त्यापेक्षा सबुरीचे धोरण महत्त्वाचे व फायदेशीर राहील. वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या गुणांना व उद्योगप्रियतेला चालना देणारे ग्रहमान लाभेल. नवीन कामे मिळतील. कामात विस्तार करण्याचे बेत सफल होतील. जोडधंदा असणाऱ्यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. स्वतःहून कामाची नवीन जबाबदारी स्वीकारताना, त्यातील अडीअडचणींचा विचार करा. एप्रिल २०२२नंतरचा काळ जास्त अनुकूल आहे. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग संभवतो. पुढील वर्षात स्वतःहून कामात बदल न करणे हितावह राहील. बेकार व्यक्तींना मार्चनंतर कामाची नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. 

घरात व कौटुंबिक जीवनात नवीन वर्षात मनःशांती व समाधान मिळेल. मात्र मोठ्या महत्त्वाकांक्षेच्या मागे लागून स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य बिघडवू नका. डिसेंबर २०२१ ते मे २०२२मध्ये वास्तुशांत, विवाह व तशाच प्रकारचा एखादा शुभ समारंभ पार पडेल. नवीन वर्षात खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे आर्थिक तणाव जाणवेल. विद्यार्थ्यांनी अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी तडजोडीची तयारी ठेवावी. मोठ्या व्यक्तींनी आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवावे. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना नवीन वर्ष आव्हानात्मक ठरेल; कमी-अधिक संघर्ष करावा लागेल. 

सिंह
सहसा कोणतेही बदल न करता ठरावीक पद्धतीने, पण आपल्याच नादात मश्‍गुल राहणारी तुमची रास आहे. नवीन वर्षात मात्र स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी तुम्ही मोठे बदल स्वीकाराल आणि त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्याल. तुमच्यातील नेतृत्वगुणांना योग्य संधी मिळाल्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा बळावेल. हे सर्व साध्य करण्यासाठी जून २०२२पर्यंत तपश्‍चर्या करावी लागेल. 

धंदा/ व्यवसायात नवीन कल्पना व नावीन्यपूर्ण कार्यपद्धतीही तुम्हाला दंग ठेवेल. कामानिमित्ताने परदेशगमनाची संधी चालून येईल. नवीन वर्षात तुमची उमेद जरी कायम असली तरी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. पैशाची आवक-जावक समसमान राहील. त्यामुळे हाती शिल्लक फारशी राहणार नाही. एप्रिल २०२२नंतर मात्र तुमच्यातील इच्छा-आकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. काहीतरी भव्यदिव्य केले पाहिजे या कल्पनेने मोठ्या प्रमाणावर धोका पत्करूनही नवीन बेत कृतीत आणाल व त्यातून तुम्ही तुमचे वेगळेपण सिद्ध कराल. 

नोकरीत ग्रहमान अनुकूल राहील. त्यामुळे तुमच्या गुणांची कदर होईल. खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. नवीन वर्षात कामाची महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपविली जाईल. मे २०२२नंतर तुमच्या कामाच्या जागेत व स्वरूपात बदल संभवतो. सुरुवातीला हा बदल नकोसा वाटला तरी पुढे त्यातून काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. जोडधंदा असणाऱ्यांची बरीच उलाढाल होईल. 

घरात व कौटुंबिक जीवनात गृहसौख्याच्या दृष्टीने येणारे वर्ष आनंददायी पर्वणीच राहील. खर्च वाढले तरी तुम्ही समाधानी राहाल. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. तरुणांचे विवाह जमतील व पारही पडतील. विद्यार्थ्यांची अपेक्षित इच्छापूर्ती होईल. वयस्कर व्यक्तींना नवीन वर्षात प्रियजनांच्या भेटीने समाधान मिळेल. आरोग्य चांगले राहील. कलावंत, खेळाडू, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवता येईल. 

कन्या
गुरू, शनी, मंगळ, शुक्र असे सर्व महत्त्वाचे ग्रह संमिश्र फळ देतील. नवीन वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे तुमच्या मनोकामना व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक ऊबही चांगली मिळेल. 

धंदा/ व्यवसायात नवीन वर्षात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. एप्रिल २०२२पर्यंत उत्पन्नात चांगली भर टाकणारे एखादे साधन मिळू शकेल. चालू व्यवसायात कार्यक्षमता वाढवून उलाढालीत लक्षणीय वाढ करू शकाल. मे २०२२ मध्ये महत्त्वाकांक्षेपोटी एखादा मोठा प्रकल्प राबविण्याचा विचार येईल. फायद्याचे प्रमाणही अपेक्षेप्रमाणे वाढेल. तरीही तेव्हा खेळत्या भांडवलाची गरज भासेल. मात्र शारीरिक पात्रतेचा विचार करून कोणतेही पाऊल उचलावे. नाही तर सर्व काही चांगले असूनही आनंद उपभोगता येणार नाही. 

नोकरीत नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२पर्यंत केलेल्या कष्टाचे श्रेय मिळेल. जादा पगारवाढ व बढतीचे स्वप्न नवीन वर्षात साकार होईल. मात्र बढतीबरोबर जबाबदारीही वाढेल याची मनाशी खूणगाठ बांधा. बेकार व्यक्तींना कामे मिळत राहतील. मात्र त्यांनी ती कामे टिकवण्याचा प्रयत्न करावा. जोडधंदा असणाऱ्यांना वर्ष संमिश्र अनुकूल राहील. प्रयत्न सोडू नयेत. घरात कौटुंबिक जीवनात कार्य साफल्यामुळे तुमचे स्थान आदरणीय राहील. अपेक्षित सहकार्य व मान मिळेल. विवाहोत्सुक व्यक्तींचे विवाह मे २०२२पर्यंत ठरतील. जादा कमाईतून फ्लॅट, जमीन इत्यादी गोष्टींमध्ये नवीन गुंतवणूक करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वर्ष अनुकूल आहे. उच्चशिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांनी मिळणारी संधी पदरात पाडून घ्यावी. ज्येष्ठ व्यक्तींना आपला वेळ व पैसे योग्य मार्गाने खर्च करता येतील. मनोबल सकारात्मक राहील. खेळाडू, कलाकार, राजकारणी व्यक्तींना कामाचा आनंद घेता येईल. मानसन्मान मिळतील. एकंदरीत नवीन वर्ष सर्व आलबेल ठेवणारे आहे. 

तूळ
तुमची शुक्राची रास व जीवनाचा उत्तम प्रकारे उपभोग घेण्याची तुमची वृत्ती याला पूरक ग्रहमान नवीन वर्षात मिळेल. आशा-निराशेच्या लपंडावातून तुम्ही भविष्याकडे कुतूहलाने पाहत असाल तर तुम्हाला निश्‍चितच आशादायक चित्र दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्यातील महत्त्वाकांक्षा जागृत होऊन यशाची भरारी मारण्याची मनीषा ठेवू शकाल. 

धंदा/ व्यवसायात एखाद्या चांगल्या घटनेची नोंद मार्च २०२२पर्यंत होईल. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...’ असा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहा. नवीन वर्षात उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कर्जे संपून चार पैसे हाती शिल्लक राहतील. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या काळात अतिमहत्त्वाकांक्षेपोटी भलत्याच प्रलोभनांना बळी पडू नका. 

नोकरीत मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल, मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका. पूर्वी झालेला अन्याय दूर करणे हे तुम्हाला सहज शक्‍य होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना जून २०२२नंतर चांगली नोकरी मिळेल. कामानिमित्ताने परदेशगमनाची संधी चालून येईल. नवीन कामे करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. 

घरात कौटुंबिक जीवनात वाढते खर्च, प्रकृतीच्या तक्रारी व अतिविचार यांमुळे बिघडून गेलेले मानसिक संतुलन डिसेंबर २०२१च्या सुमारास पूर्ववत होऊ लागेल. एखाद्या चांगल्या घटनेमुळे घरात तुमच्या आनंदात भर पडेल. तुमच्या रसिक स्वभावाला वातावरण व सभोवतालच्या व्यक्तींकडून दाद मिळेल. त्यामुळे तुम्ही खूश असाल. 
विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळे पार करून उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. मोठ्या व्यक्तींची जीवनात उद्दिष्ट गाठण्यासाठी व आध्यात्मिक प्रगतीकडे कासवाच्या गतीने वाटचाल राहील. खेळाडू, कलाकार, राजकारणी व्यक्तींना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन स्वतःची प्रतिमा निर्माण करावी लागेल. 

वृश्‍चिक

नवीन वर्षात गुरूची साथ मिळेल. त्यामुळे २०२२मध्ये नैतिक जोराच्या बळावर मार्गक्रमण कराल. निराशेचे काही क्षण येतील; पण त्याला न जुमानता कामे करीत राहिलात तर अखेर सफलता मिळेल. स्थिर बुद्धी व अचल वृत्तीसाठी तुमची रास प्रसिद्ध आहे. मात्र जून ते ऑक्‍टोबर २०२२ या काळात तुमच्या जीवनावर मोठा परिणाम घडवून आणणारे बदल संभवतात व ते स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवा. वर्षाच्या पूर्वार्धात धंदा/व्यवसायाच्या कामात बरीच मजल माराल. नंतर थोडीशी आर्थिक विवंचना राहील. जून २०२२मध्ये तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर असाल. याच काळात मोठे फायदे व मोठे धोके असेच एकंदरीत चित्र असेल. त्यात उडी घेण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन धोका पत्करू नका. 

नोकरीत एप्रिल २०२२पर्यंत एखादी चांगली घटना घडेल. कामाची नवीन कामगिरी तुमच्यावर सोपविली जाईल. प्रशिक्षणासाठी, नवीन कामासाठी, परदेशवारीसाठी तुम्हाला संधी मिळेल. मे २०२२नंतर मात्र कामातील स्वरूप बदलेल. बदली, पदोन्नती यानिमित्ताने घरापासून लांब राहावे लागेल. पैशाची ऊब मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. 

घरात कौटुंबिक जीवनात गृहसौख्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. मार्च २०२२पर्यंतचा काळ खर्चिक व जबाबदाऱ्या वाढवणारा आहे. त्यानंतर मात्र उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत एप्रिल-मे २०२२मध्ये ठरतील. तरुणांचे विवाह ठरतील. मोठ्या व्यक्तींनी मात्र प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात यशाविषयी गाफिल राहून चालणार नाही. अनपेक्षित अडचणी, अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. महिलांना आवडत्या छंदाकडे कितपत लक्ष घालणे जमेल याबाबत साशंकता वाटते. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्तींनी श्रम व कष्टाची तमा न बाळगता कार्यमग्न राहावे. यश निश्‍चितच मिळेल. 

धनू
महत्त्वाचे ग्रह साथ देतील. त्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढतील; पण राश्‍याधिपती गुरूचे भ्रमण तृतीयेतून होत असल्याने तुमच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारची निराशा असेल. आशा-निराशेचा खेळ तुमच्या बाबतीत इतका प्रकर्षाने जाणवेल, की सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्याविषयी कोडे वाटेल; पण एप्रिल २०२२नंतर एक महत्त्वाच्या चांगल्या वळणावर तुम्ही पोचल्यावर सर्व निराशा नाहीशी होईल. धीराने मार्ग आक्रमित राहणे हेच तुमच्या दृष्टीने हितकारक ठरेल. 

धंदा/ व्यवसायात मार्च २०२२पर्यंत जमाखर्चाची बाजू समसमान राहील. हाती शिल्लक राहणार नाही. याच काळात कामात जरी अडथळे आले तरी उत्पन्नाचे मान वाढत राहील. नवीन उपक्रम हाती घेऊन त्यात यशस्वी होण्याची तुमची जिद्द असेल. जून २०२२नंतर मंगळासारखा प्रखर ग्रह तुम्हाला साहसास प्रवृत्त करेल. एप्रिलनंतर गुरूही प्रगतीच्या नवीन संधी निर्माण करेल. या दरम्यान कामानिमित्ताने एखादी परदेशवारी घडल्यास आश्‍चर्य नाही. नोकरीत व्यक्तींना सध्याचा काळ एकंदरीतच बेचैन वाटेल. नवीन वर्षात मनाला न पटणाऱ्या कामात दंग राहावे लागल्याने नोकरीत बदल करण्याचे किंवा सोडून देण्याचे विचार मनात येतील; पण तसे करणे चुकीचे ठरेल. तुमच्या कर्तव्यात कुठेही, कसलीही कसूर होत नाही, याची काळजी घ्या. बेकार व्यक्तींना छोटे-मोठे काम मिळत राहील. सध्याच्या नोकरीतील चित्रही एप्रिल २०२२नंतर बदलेल व उत्साहवर्धक होईल. घरात कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी, किरकोळ मतभेद, तुमचे अंदाज चुकल्यामुळे थोडी निराशा येईल. मात्र नवीन वर्षात चांगला बदल जाणवेल. घरात वास्तुसमारंभ, नवीन खरेदी होईल. विवाह होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधता येईल. मात्र घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांनी तब्येत सांभाळून इतर गोष्टी कराव्यात. कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांतील व्यक्तींना स्वतःची पत व उंची राखता येईल. मान मिळेल. 

मकर
राश्‍याधिपती शनीचे वास्तव्य राशीत व धनस्थानात असल्याने तुमचे कर्तृत्व दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्‍वास तुमच्यात जागृत होईल. मिळणाऱ्या संधीचे सोने करण्याचे स्वाभाविक वैशिष्ट्य तुमच्यात आहेच. त्याला सुयोग्य वातावरण मिळाल्याने तुम्ही खूश असाल. 
धंदा/ व्यवसायात वेगळ्या स्पर्धेला तोंड देत प्रगती करणे हे एक तुमच्यापुढे मोठे आव्हान राहील; पण जिद्द व चिकाटीच्या जोरावर तुम्ही त्यातही यशस्वीपणे टिकून राहाल. जानेवारी २०२२पूर्वी एखादा नवीन उपक्रम सुरू करण्याची इच्छा सफल होईल. त्यामुळे व्यवसायातील तुमची प्रतिमा उंचावेल. गुरूही अनुकूल असल्याने धंद्यातील प्रगतीचा वेग उत्तम राहील. अत्यंत अवघड वाटणारी व आशा सोडून दिलेली वसुली एप्रिल २०२२पर्यंत होईल. तुमचे अंदाज अचूक ठरल्याने चांगल्या संधीचा फायदा मिळेल. 

नोकरीत नवीन वर्ष एक ना अनेक कारणांनी फायदेशीर ठरेल. डिसेंबरमध्ये इतरांना न मिळणाऱ्या संधीचा फायदा घेता येईल. जानेवारी ते जून २०२२ दरम्यान केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांकडून चांगल्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक लाभ होतील. पगारवाढ, बढती मिळू शकेल. जून २०२२नंतर कामानिमित्ताने परदेशगमन व प्रवास होतील. जोडधंदा असणाऱ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. 

घरात पैशाची ऊब व मानसिक समाधान या दोन गोष्टी मिळाल्याने कुटुंबात आनंद व स्वास्थ्य राहील. विवाहोत्सुकांचे विवाह पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवून देणारे ग्रहमान आहे. मनोकामना पूर्ण होतील. ज्येष्ठांना प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्यपूर्ण वर्ष आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करा. ध्येय गाठा. खेळाडू, कलाकार, राजकारणी व्यक्तींना मे २०२२पर्यंतचा काळ विशेष अनुकूल आहे. मानसन्मानाचे योग येतील. एकंदरीत नवीन वर्ष तुमच्या इच्छा साकार करणारे राहील. 

कुंभ
राश्‍याधिपती शनीचे भ्रमण काही काळ व्ययात, तर नंतर राशीतच आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रयत्न आणि नशीब यांची सांगड तुम्ही किती चांगल्या प्रकारे घालू शकता यावर तुमची यशाची खरी भिस्त आहे. स्थितप्रज्ञ म्हणून समजली जाणारी तुमची रास नवीन वर्षात अनेक चढ-उतार पाहणार आहे. अर्थाअर्थी काहीही संबंध नसणाऱ्या बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे काही संभ्रमाचे क्षण येतील. हीच तुमची खरी कसोटी आहे असे समजून समतोल ढळू देऊ नका. 

धंदा/ व्यवसायात पूर्वार्धात बरीच मेहनत करून नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकाल. उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढल्याने थोडेसे विचारात पडाल. उत्तरार्धात एप्रिल २०२२नंतर तुम्हाला व्यवसायपूरक घटना घडतील. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. मनातील बेत कृतीत आणता येतील. नवीन कामांना योग्य दिशा मिळेल. परदेशव्यवहार व परदेशगमन या संधी जून २०२२नंतर येतील. 

नोकरीत व्यक्तींना नवीन वर्षात स्वतःचे कौशल्य वाढवण्याखेरीज गत्यंतर राहणार नाही. सध्याच्या नोकरीत एप्रिल-मे २०२२ च्या दरम्यान बदल घडतील. त्यामुळे थोडा तणाव वाढेल. तेव्हा नोकरीत बदल न करता आहे तेथेच टिकून राहणे, हेच धोरण हितावह ठरेल. कामातील सहकारी व सभोवतालच्या व्यक्तींवर जास्त विश्‍वास ठेवणे घातक ठरू शकेल हे लक्षात ठेवावे. मे २०२२ नंतर बढती व पगारवाढ होईल. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. 

घरात, कौटुंबिक जीवनात काही सुखद प्रसंग घडतील. स्वास्थ्य व समाधान टिकून राहण्यासाठी वर्षभर प्रकृतीचे तंत्र सांभाळणे गरजेचे आहे. तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील. करिअरच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड करणे गरजेचे आहे. उच्चशिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी. कलावंत, खेळाडू, राजकारणी व सामूहिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काही गोष्टींमुळे टीकेला तोंड द्यावे लागेल. 

मीन
शनीचे वास्तव्य लाभात व व्ययात असेल त्यामुळे प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करावी लागतील. नवीन वर्षात माणसांची पारख करणे हे तुमच्यापुढे मोठे आव्हान असेल. कामाचे योग्य नियोजन करून कामे हातावेगळी करावी लागतील. 

धंदा/ व्यवसायात आर्थिक स्थितीत फारशी सुधारणा झाली नसली तरी तुमची उमेद मात्र प्रचंड मोठी असेल. जानेवारी २०२२मध्ये इतर वेळेला अशक्‍य वाटणाऱ्या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल. हाती घेतलेली कामे पूर्ण करून त्याचा खऱ्या अर्थाने लाभ उठवाल. एप्रिल २०२२नंतर आर्थिकदृष्ट्या लाभ घडवून आणणारे ग्रहमान आहे. याच काळात विचारपूर्वक निर्णय घेऊन कामे हाती घ्या. क्षमतेच्या बाहेर जाऊन धोका पत्करू नका. नोकरीत नवीन वर्षात तुम्ही हवी असलेली एखादी चांगली संधी चालून येईल. बढती व पदोन्नतीचे योग येतील. नवीन नोकरीत समाधान मिळेल. जून २०२२नंतर परदेशगमनाची संधी येईल. पैशाच्या पाठीमागे लागून/ धावून हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. जोडधंद्यातून कमाई होईल.  

घरात, कौटुंबिक जीवनात खर्चिक पण आनंददायी प्रसंगांची नोंद होईल. तुमच्या मनाशी बाळगलेले दीर्घकाळचे एखादे स्वप्न एप्रिल २०२२नंतर साकार होईल. याच काळात नवीन वास्तू, मोठी खरेदी, विवाह व इतर समारंभ पार पडतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी थोडे श्रम जास्त घ्यावे लागतील. ज्येष्ठांना आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी नवीन ओळखींचा लाभ होईल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना परिश्रमाबरोबर नशिबाची साथ मिळेल. एकंदरीत ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’.

 

संबंधित बातम्या