आकाशी झेप घे रे पाखरा... 

डॉ. सिसिलिया कार्व्हालो, वसई
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021


कव्हर स्टोरी

‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या गीतात आणि माया आंजेलूच्या कवितेत मला विलक्षण साम्य दिसतं. एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी आवश्‍यक असलेला सकारात्मक भाव या दोन्ही रचनांमध्ये आहे.

कवी जगदीश खेबुडकरांच्या ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या गीताने मनाला जखडून टाकलं होतं. संपूर्ण कविता नीट समजून घेतल्यावर मात्र मनावरची सारी पुटं खडून गेली. मनाने झेप घेतली आणि कवितेच्या ‘अवकाशा’त सामावलेली तशाच आशयाची गीतं माझ्याकडे झेपावू लागली. पृथ्वीच्या वेगवेगळ्या टोकावर ही गीतं, कविता वेगवेगळ्या काळात, परिस्थितीत परंतु पिंजऱ्याच्या बाहेर पडण्याचाच सूर आळवीत होती. 

खेबुडकर म्हणतात...
आकाशी झेप घे रे पाखरा 
सोडी सोन्याचा पिंजरा 
तुजभवती वैभव माया 
फळ रसाळ मिळते खाया 
सुखलोलुप झाली काया 
हा कुठवर वेड्या घेई आसरा 
घर कसले ही तर कारा 
विषसमान मोती चारा 
मोहाचे बंधन द्वारा 
तुज आडवितो हा कैसा उंबरा  

विविध आशयानी परिप्लुत अशी ही पाच कडव्यांची कविता... चित्रगीत आहे. आध्यात्मिक, सामाजिक, लौकिक अर्थाचे विविध पापुद्रे या गीतातून हळूवारपणे उलगडत राहतात. श्रमविचाराच्या बळावर आपण आपल्या सुखासीन कोशातून बाहेर पडण्याची आवश्‍यकता या गीतात प्रतिपादन केलेली आहे. 

माया आंजेलूच्या कविता वाचत असताना त्यांच्या एका कवितेने लक्ष वेधून घेतले. ‘आय नो व्हाय द केजड्‌ बर्ड सिंगज्’ अशा शीर्षकाची त्यांची कविता आहे आणि त्याच शीर्षकाचं त्यांचं आत्मकथनदेखील आहे. तथापि ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या गीतात आणि माया आंजेलूच्या कवितेत मला विलक्षण साम्य दिसतं. एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी आवश्‍यक असलेला सकारात्मक भाव या दोन्ही रचनांमध्ये आहे. व्यक्तिगत आयुष्यात आपण घेतलेली उभारी, भरारी माया आंजेलू यांनी आपल्या कवितेत व्यक्त केलेली आहे.

A free bird leaps
on the back of the wind   
and floats downstream   
till the current ends
and dips his wing
in the orange sun rays
and dares to claim the sky.

But a bird that stalks
down his narrow cage
can seldom see through
his bars of rage
his wings are clipped and   
his feet are tied
so he opens his throat to sing.

अशी माया आंजेलू यांच्या कवितेची सुरुवात होते. त्यांच्या या कवितेचा मराठी भावानुवाद करायचा तर... 

विमुक्त पक्षी वाऱ्याच्या झोतावर 
उंडारत राहतो 
वाहत्या झऱ्याच्या 
शेवटच्या टोकापर्यंत 
तरंगत राहतो 
सूर्याच्या सोनेरी प्रकाशात डुंबत 
आकाशावर मालकी कोरत विहरतो 
अरुंद पिंजऱ्यात अडकवलेला पक्षी 
अडखळत घालत राहातो येरझाऱ्या 
त्याला क्वचितच दिसत राहतं 
पिंजऱ्याच्या गजाबाहेरचं जग 
त्याचे पंख जखडलेले 
त्याचे पाय अडकवलेले 
त्यामुळेच तो मोकळा करतो गळा 
आणि गाऊ इच्छितो गाणे... 
पिंजऱ्यातल्या पक्ष्याच्या गाण्यात असते 
भीतीची थरथर अज्ञात गोष्टींची 
पण त्यातही तो स्थिर होऊ इच्छितो 
एकदा का तो उंच रवात गाऊ लागला 
की दऱ्याखोऱ्यापर्यंत घुमते त्याची तान 
कारण त्याचं गाणं असतं 
स्वातंत्र्याचं... मुक्ततेचं... 
मुक्त पक्षी नवनव्या झुळुकींची 
अपेक्षा करीत राहतो. 
झाडांच्या हुंदक्‍यांतून तलम 
होऊन येतात 
व्यापारी वारे 
मुक्त पक्षी पहाटेच्या प्रकाशात 
हिरवळीवर लोळणारे लठ्ठ किडे 
खाण्यास टपलेला असतो 
आणि तो आकाशाला 
आपलंच नाव देऊन टाकतो 
परंतु पिंजऱ्यातला पक्षी 
आपल्या स्वप्नांच्या थडग्यावर उभा राहतो 
भयकारी दुःस्वप्नाच्या किंकाळ्यांनी 
त्याची सावली आसमंत भेदून टाकते 
त्याचे पंख जखडलेले आणि 
पाय अडकवलेले 
म्हणूनच तो मोकळा करतो आपला गळा 
आणि लागतो गाऊ मुक्ततेचे गाणे... 

खेबुडकरांच्या गीतातील कवितागत नायक त्या पक्ष्याला आपल्या आत्ममग्न कोशातून बाहेर पडायला सांगतो आहे. स्वतःतील ऊर्जा ओळखायला सांगतो आहे. आत्मसामर्थ्य आणि आत्मसन्मानाची जाणीव देतो आहे. सुखलोलुपता प्रबळ झाली, की आपले घरसुद्धा तुरुंग बनते... मोहमायेची बंधनं उंबरठ्याआत अडकवून ठेवतात. तथापि आपल्या पंखांच्या बळावर पक्ष्याने आकाशात उड्डाण केले तरच दऱ्या-डोंगरातली सृष्टी, सागर-सरितांचा मुक्त खळखळाट त्याला ऐकू येतो... हा अवकाश किती व्यापक आहे याची जाणीव होते. जीवनातले सार आणि साजिरेपण आकलते. श्रम, संघर्ष यातील सौंदर्य आणि स्वास्थ्य यांचा प्रत्यय येतो. 

माया आंजेलूची कवितागत नायिका पक्ष्याच्या रूपकातून स्वातंत्र्य आणि कारावास यातील भेद लख्ख करते. जखडलेल्या पक्ष्याला स्वातंत्र्य साद घालते आणि त्याच्या कंठात अडकलेले गाणे मोकळे करू इच्छिते... ‘आकाशी झेप घे रे..’ मधल्या पक्ष्याने स्वतःभोवतीच सुखासीनतेचा कोश विणून घेतला; त्या कोशासाठी वापरलेल्या काड्यांचा कारावास झाला. ‘केजड् बर्ड’चा कारावास हा बाह्य शक्तींनी लादलेला आहे. अशा कारावासावेळी आतली सारी ऊर्जा निर्मितिक्षम बनते आणि स्वतःला कोंडून घेण्याने आतली ऊर्जादेखील निष्क्रिय आणि मृतवत बनते. त्यामुळे त्यातला स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी बाह्य प्रयत्नांची गरज भासते. ‘पिंजऱ्यातल्या पक्ष्याची'' सारी निर्मितीक्षमता गाण्याची चिळकांडी बनते आणि त्यातील आर्तता दऱ्याखोऱ्यात घुमत राहते... 

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधरस्वामी यांनी अत्यंत सुंदर दृष्टांत दिलेला आहे, 

घरांतु असे तो आतुल सकळही पदार्थ देखे 

परंतु बाहिरील काहीचि न देखे 

बाहिरी असे तो बाहिरील सकळै देखे 

परि आंतुल काहींचि न देखे 

उंबरियावरी असे तो आतुल सकळैः 

पदार्थ देखे आणि बाहिरील सकळैः 

पदार्थ देखे 

घरात असणाऱ्याला घरातलं सगळं दिसतं. बाहेरचं काही दिसत नाही आणि बाहेर असणाऱ्याला बाहेरचं सारं दिसतं; पण आतलं काही दिसत नाही. मात्र उंबरठ्यावर जो असतो त्याला आत-बाहेरचं सारं दिसतं. त्यामुळे त्याला निर्णय घेण्याची कसोटी पार करावी लागते. 

‘आकाशी झेप घे रे..’ मधील पक्ष्याने आपल्याभोवती उंबरे निर्माण केलेले आहेत, तर ‘पिंजऱ्यातला पक्षी''त उंबऱ्यावर उभा राहून आत-बाहेर तो डोकावून बघतोय आणि उंबऱ्यापलीकडे झेप घेण्यास तो सिद्ध झालेला आहे. ‘तलम कोशात’, ‘गलेलठ्ठ किड्यां’मध्ये तो  गुरफटू इच्छित नाही. झाडावरील काटा उरात खुपला की रक्ताच्या चिळकांडीसारखी त्याच्या कंठातील गाण्याची लकेर आसमंताला चिरत जाते. तशी या पिंजऱ्यातल्या पक्ष्याची गत आहे. म्हणूनच पिंजऱ्यातला पक्षी का गातो हे माया आंजेलूला कळालेलं आहे. हा पिंजरा गुलामगिरीचा आहे. आपल्याला मुठीत ठेवू इच्छिणाऱ्याचा वा विवाह ‘बंधना’त अडकल्याने संस्कृती-समाज व्यवस्थेचा, स्थल-काल-भवतालाचा आहे. अशा पिंजऱ्यातून बाहेर पडायचं तर तळहातांवरील रेषा न्याहाळण्यापेक्षा मनगटातील ताकद ओळखायला हवी, तरच पिंजऱ्यातला पक्षी आकाशात भरारी घेऊ शकेल.

संबंधित बातम्या