मैत्र

इरावती बारसोडे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांमध्ये स्पर्धाभाव असला तर ते समजून घेण्याजोगं असतं. कारण अशा परिस्थितीत, दोघांच्याही महत्त्वाकांक्षा आणि ध्येय एकमेकांच्या आड येण्याची शक्यताच अधिक. पण तरीही मैत्री जमून जाते. स्पर्धाभाव मागे पडत जातो, आणि एकमेकांना परस्परपूरक असा मित्रभाव निर्माण होतो. दोघेही अभिन्न मित्र म्हणून त्या त्या क्षेत्रात स्वीकारलेही जातात. एकमेकांना साथ देत, कधी भांडत-तंडत दोघाही स्पर्धक-मित्रांच्या कारकिर्दी फुलत जातात. संकटाच्या काळात एकमेकांना सांभाळून घेणं, सुखाचे क्षण वाटून घेणं, बघण्यासारखं असतं. अशा मित्रभावात नांदत असतं ते परस्परांबद्दलचं निरपेक्ष सौहार्द, सदिच्छा आणि आदरभाव. या नामवंतांच्या मैत्रीचा फक्त त्यांनाच नव्हे, तर समाजालाही अप्रत्यक्ष लाभ होतच असतो. हे सगळं कसं घडतं? 
गेल्या वर्षातल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अशा नामवंत मित्र-मैत्रिणींच्या जोड्यांनी नेमकं काय केलं? घरातल्या ठाणबंद अवस्थेत आपली मैत्री कशी जपली? त्यांच्या मैत्रीचं नेमकं गमक काय? वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही जोड्यांना आम्ही गाठून बोलतं करण्याचा प्रयत्न केला. काही मित्र-मैत्रिणींनी ‘कॅय?’ असाच प्रतिप्रश्न केला. मैत्री कशी झाली, आणि टिकवली, हे कसं सांगणार बुवा? असं कोडं त्यांना पडलं. ते कोड्यात पडणंसुद्धा कमालीचं बहारदार, आणि मैत्रीभावाचा पुरावा देणारं होतं. काही दोस्तमंडळींनी मात्र आपली मैत्री उलगडण्याचा प्रयत्न केला. 
वाचा त्यांच्याच शब्दांत...

आनंद म्‍हणजे 'युनिक ह्युमन बिइंग'
माझी आणि आनंद देशपांडे याची गेल्या १५ वर्षांपासून चांगली ओळख आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय आदर आहे. आम्ही दोघेही ‘फस्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर’ आहोत. वयाने त्याच्यापेक्षा मी १४-१५ वर्षांनी मोठा आहे. मी १९८३ मध्ये ‘प्राज’ची सुरुवात केली, तर त्याने त्याची कंपनी ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’ माझ्यानंतर सात-आठ वर्षांनी म्हणजे १९९० मध्ये सुरू केली. त्याचे आयटी क्षेत्र आहे. तर, माझे मशिनरी तसेच बायोटेक्नॉलॉजीचे. आमच्या दोघांच्या क्षेत्रांमध्ये साम्य नाही. तरीसुद्धा आमच्या दोघांत बरेच साम्य आहे. आपापल्या बिझनेसमध्ये आमच्या पुढच्या पिढीने यावे, अशी आम्हा दोघांचीही अपेक्षा नाही. तोही याच मताचा आहे. आमचे दोघांचेही उद्योग आंतरराष्ट्रीय स्तराशी मोठ्या प्रमाणावर जोडलेले आहेत. आम्ही दोघेही प्रचंड वर्कोहोलिक आहोत. काम करताना नियोजनबद्ध, रचनात्मक पद्धतीने काम करतो. कुठलीही गोष्ट मनात आली म्हणून आम्ही करत नाही.

अनेक व्यावसायिक व्यासपीठांवरही आम्ही एकत्र असतो. बऱ्याच कार्यक्रमांना आम्हाला एकत्र बोलावले जाते. आम्ही पुण्यामध्ये इंडस्ट्री आणि आंत्रप्रेन्युअरशिप यांचे प्रतिनिधित्व करतो, असे मला वाटते. आम्ही दोघेही आयआयटीचे. तो आयआयटी खरगपूरचा आणि मी मुंबईचा. पुढे तो अमेरिकेत जाऊन डॉक्टरेट झाला आणि मग भारतात परतला. मी अधिक शिक्षणासाठी परदेशी जायचा ध्यास घेतला नाही. इथे राहूनच काम केले. आमच्या बिझनेस डिटेलमध्ये फरक असला, तरी आम्ही दोघांनीही पुणे हीच कर्मभूमी मानली. त्याच्या आयटी व्यवसायाचे मॉडेल हे तेव्हाच्या भारतातील या व्यवसायाच्या स्वरूपासारखे पठडीतले नव्हते. त्यातले मला फार कळत नाही. पण हा काहीतरी वेगळे करतो आहे, याचे मला अप्रुप वाटले होते. त्याची प्रगतीही अतिशय नेत्रदीपक झाली आहे.

आनंदचे मेंटॉर आयआयटीमधील प्रा. दीपक फाटक हे माझेही वेलविशर आहेत. आयआयटीमधील जे मेंटॉर आहेत, ते माझेही वेल विशर आहेत, प्रा. फाटक. त्यांना आम्हा दोघांबद्दल आपुलकी आहे. मराठा चेंबर्सचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गवा हेदेखील आम्हा दोघांचे मित्र आहेत. व्यावसायिक पातळीवर आम्हाला मार्गदर्शक ठरू शकतात, असे हे दोघे आहेत. एक माणूस म्हणून आनंदबद्दल सांगायचे झाले, तर तो मितभाषी आहे. मी त्याला रागावलेला किंवा वाद घालताना विशेष पाहिलेले नाही. त्याचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे, त्याच गोष्टी तो पुढे रेटतो, असे मला वाटते. 

आम्हा दोघांच्या पत्नी एकमेकींना चांगल्या ओळखतात. त्या दोघी भेटतात, गप्पा मारतात. पण एकमेंकांचे कुटुंब परिचयाचे आहे. माझ्याकडून राग, निराशा पटकन व्यक्त होऊ शकते. काही गोष्टी तीव्रपणे बोलल्या जातात. नंतर मी शांत होतो. पण आनंद सुरुवातीपासूनच सदैव शांत राहू शकतो. 

माझ्याप्रमाणे त्याच्याकडेही खूप ओरिजिनॅलीटी आहे. तो एक युनिक ह्युमन बिइंग आहे. फॅमिली मॅन आहे तो!  सामाजिक पातळीवरही आनंदने खूप काम केले आहे. त्याने आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटसंदर्भात काम करणारी ‘दे आसरा’ संस्था स्थापन केली आहे. त्याशिवाय तो बऱ्याच सामाजिक संस्थांनाही हातभार लावतो. कामासंदर्भात आमचे बोलणे होते. वैचारिक देवाणघेवाण नेहमी होते. पण त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर गप्पा मारायला फारसा वेळ मिळत नाही. माझ्या मते, मैत्रीची व्याख्या करायची झाली, तर एकमेकांच्या सुख आणि दुःखाच्या परिस्थितीबद्दल जाणीव असणे, आदर असणे. चर्चा झालीच पाहिजे असे नाही, पण जाणीव हवी. सुख आणि अ़डचणी या दोन्हीबद्दल आपुलकी हवी. मैत्री फुलवायला बराच वेळही द्यावा लागतो. पण आमच्यासारख्या लोकांकडे हाच वेळ कमी असतो. शिवाय, सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्या, तरी आम्ही दोघेही खासगी आयुष्य स्वतःपुरते ठेवू पाहणारे आहोत. आम्हा दोघांना आपापले कौशल्य वापरून एक जॉइंट प्रोजेक्ट करावा, असे आमच्या दोघांच्याही मनामध्ये बरेच दिवस घोळत आहे. आज ना उद्या तो साकार होईल, अशी आशा मात्र नक्की आहे.

 -  डॉ. प्रमोद चौधरी,
     संस्थापक-अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज
 

*******************************************

माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड...
उद्योजकता हा असा रस्ता आहे, ज्यावरून खूप कमी लोक प्रवास करतात. अंधारामध्ये अज्ञात रस्त्यावरून जाताना पुढच्या गाडीच्या मागच्या दिव्यांच्या प्रकाशाच्या पाठीमागून जाणे सोपे असते; अशा रस्त्यावर डॉ. प्रमोद चौधरी आणि प्राज इंडस्ट्रीज्‌ ही माझ्या समोरची गाडी होती, ज्या गाडीच्या मागोमाग मी गेली ३० वर्षे उद्योजकतेचा प्रवास करत आहे. 

 प्रमोद माझ्या प्रेरणेचा स्रोत आहेत. बरीच वर्षे मी त्यांच्या कामाची पद्धत पाहतो आहे. त्यांच्याकडून शिकतो आहे. त्यांच्याकडे तंत्रज्ञ आणि विक्रेता या दोन्हीचे दुर्मीळ एकत्रीकरण आहे. ते संशोधक आहेत, द्रष्टे आहेत आणि बायोटेक्नॉलॉजी व बायोफ्युएल्सच्या क्षेत्रातील अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आद्य प्रवर्तक आहेत. काही महिन्यांपूर्वी मला मॅट्रिक्स रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळाली. इथे त्यांनी अद्ययावत संशोधन केंद्र उभारले आहे. ते भविष्यासाठी उपयुक्त अशा जैवशास्त्राच्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करत आहेत आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे आणता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. या वर्षीच्या मानाच्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. हा मान मिळणारे ते पहिलेच भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती आहेत. प्रमोद यांनी ‘पर्सनल ब्रॅडिंग’ म्हणजेच स्वतःची ओळख खूप चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ‘पर्सनल ब्रँड’ कसा विकसित करावा आणि माणसांचे नेटवर्किंग ही कौशल्ये त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहेत.

व्यवसायामध्ये चढ-उतार प्रत्येकालाच बघावे लागतात. प्रमोदजी त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी, अडचणींविषयी, त्यातून कसे शिकायला मिळाले आणि त्यांनी कसा मार्ग काढला त्याबद्दल नेहमी सांगतात. त्यांचे अनुभव इतरांना सांगतात. त्यातून आमच्यासारख्या उद्योजकांबरोबरच इतरांनाही शिकता येते. 

मला आणखी एक गोष्ट आवडते, ती म्हणजे ते एकावेळी अनेक गोष्टी करू शकतात. आपल्या सर्वांकडे २४ तासच असतात. त्यांना त्यांची आवड जोपासायला वेळ मिळतो, कारण त्यांनी प्राजमध्ये सुरेख लिडरशिप टीम-नेतृत्व संघ तयार केला आहे. वाढत्या व्यवसायामध्ये उत्तम टीम तयार करणे आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकणे महत्त्वाचे असते. त्यांनी हे खूप प्रभावीरीत्या करून दाखवले आहे. ‘महा-इंत्राप्रेन्युअर’ पुरस्कारांच्या वेळी मी याचा अनुभव घेतला आहे. ‘इंत्राप्रेन्युअर’ हा शब्द मी त्यांच्याकडूनच पहिल्यांदा ऐकला. या प्रवासामध्ये त्यांनी प्राजमध्ये इंत्राप्रेन्युरिअल टीम तयार केली. यासाठी तुम्हाला उत्तम-तुमच्यापेक्षा हुशार माणसे शोधावी लागतात, त्यांना जबाबदारीही द्यावी लागते आणि त्याचवेळी त्यांना चुका करण्यासाठीही मोकळीक द्यावी लागते, ज्यातून ते शिकतात आणि व्यवसाय वाढीस लागतो. हे कसे करायचे याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. 

शिक्षण आणि समाजाचा विकास याबद्दल प्रमोद यांना खास जिव्हाळा आहे. त्यांनी एकदा ठरवले की ते जोशाने काम करतात. ते अनेक गोष्टींमध्ये सहभागी असतात आणि तो सहभाग फक्त नावापुरता नसतो. त्यांचा त्या संबंधित गोष्टीचा अभ्यास झालेला असतो. आयआयटी बॉम्बे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) या शैक्षणिक संस्थांमधील अनेक उपक्रमांचे ते नेतृत्व करतात. आयआयटी बॉम्बेमध्ये त्यांनी सेंटर फॉर टिचिंग अँड लर्निंग सुरू केले आहे. एमसीसीआयए, सीआयआय आणि बायोटेक्नॉलॉजीमधील इतर संस्थांमध्येही त्यांचे योगदान असते. ते नेहमी ‘बिग पिक्चर व्ह्यू’बद्दल सांगतात. छोट्या छोट्या मुद्द्यांवर अडकून न राहता ते पार करून पुढे कसे जायचे, ‘बिग पिक्चर’ कसे बघायचे हे सांगतात. मला नवीन काही करायचे असेल, तर या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात. 

त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांनी आयुष्यात जो समतोल राखला आहे, त्याचे मला कौतुक वाटते. वैयक्तिक पातळीवर ते नेहमी शांत असतात आणि उत्कृष्टता मिळवण्याचा प्रयत्न असतो. कौटुंबिक पातळीवर त्यांचे त्यांच्या पत्नी, मुलाबरोबरही छान नाते आहे. कुटुंबाबद्दल ते भरपूर बोलतात. फॅमिली पर्सन आहेत. तुम्हाला गरज असताना समोरची व्यक्ती उपलब्ध असणे, याला माझ्या मते मैत्री म्हणतात. मी त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो, म्हणूनच मी त्यांना माझा मित्र म्हणतो. मला गरज असेल तेव्हा ते मला नाही म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे. ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहेत. मला काही अडचण असली त्यांच्याशी बोलायला मी संकोच करत नाही आणि ते कधीही निराश करत नाहीत. ते माझे व्यावसायिक गुरू आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. ही इज शायनिंग लाइट इन्फ्रन्ट ऑफ मी!

 - डॉ. आनंद देशपांडे, 
    संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पर्सिस्टंट सिस्टिम्स्‌ लि. 

शब्दांकन : इरावती बारसोडे

संबंधित बातम्या