मैत्र

संतोष भिंगार्डे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

मैत्र
एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांमध्ये स्पर्धाभाव असला तर ते समजून घेण्याजोगं असतं. कारण अशा परिस्थितीत, दोघांच्याही महत्त्वाकांक्षा आणि ध्येय एकमेकांच्या आड येण्याची शक्यताच अधिक. पण तरीही मैत्री जमून जाते. स्पर्धाभाव मागे पडत जातो, आणि एकमेकांना परस्परपूरक असा मित्रभाव निर्माण होतो. दोघेही अभिन्न मित्र म्हणून त्या त्या क्षेत्रात स्वीकारलेही जातात. एकमेकांना साथ देत, कधी भांडत-तंडत दोघाही स्पर्धक-मित्रांच्या कारकिर्दी फुलत जातात. संकटाच्या काळात एकमेकांना सांभाळून घेणं, सुखाचे क्षण वाटून घेणं, बघण्यासारखं असतं. अशा मित्रभावात नांदत असतं ते परस्परांबद्दलचं निरपेक्ष सौहार्द, सदिच्छा आणि आदरभाव. या नामवंतांच्या मैत्रीचा फक्त त्यांनाच नव्हे, तर समाजालाही अप्रत्यक्ष लाभ होतच असतो. हे सगळं कसं घडतं? 
गेल्या वर्षातल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अशा नामवंत मित्र-मैत्रिणींच्या जोड्यांनी नेमकं काय केलं? घरातल्या ठाणबंद अवस्थेत आपली मैत्री कशी जपली? त्यांच्या मैत्रीचं नेमकं गमक काय? वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही जोड्यांना आम्ही गाठून बोलतं करण्याचा प्रयत्न केला. काही मित्र-मैत्रिणींनी ‘कॅय?’ असाच प्रतिप्रश्न केला. मैत्री कशी झाली, आणि टिकवली, हे कसं सांगणार बुवा? असं कोडं त्यांना पडलं. ते कोड्यात पडणंसुद्धा कमालीचं बहारदार, आणि मैत्रीभावाचा पुरावा देणारं होतं. काही दोस्तमंडळींनी मात्र आपली मैत्री उलगडण्याचा प्रयत्न केला. 
वाचा त्यांच्याच शब्दांत...

सच्ची मैत्री... पक्‍की मैत्री
घरच्या माणसांच्या पलीकडं जाऊन आपल्या प्रत्येकाला अशी एक व्यक्ती हवी असते जिच्याशी आपण कधीही कोणत्याही विषयावर बोलू शकू, जी आपल्याबद्दल मत तयार न करता आपलं सगळं म्हणणं ऐकून घेईल, वेळप्रसंगी आपल्याला सल्ले देईल. माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती म्हणजे प्रार्थना बेहेरे. ‘मितवा’च्या वेळी तिची व माझी भेट झाली. गोव्याला शूटिंग करताना प्रार्थना आणि माझ्यामध्ये चांगली मैत्री होऊ शकते असं मला वाटू लागलं. मग काय... प्रमोशन्सच्या वेळी आम्ही भेटत गेलो आणि त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला व आमच्यातील मैत्रीचे धागे अधिकाधिक घट्ट होत गेले. चित्रपट संपल्यानंतर आमच्या भेटीगाठी अधिक वाढत गेल्या. एकमेकींच्या घरी येणं-जाणं वाढलं. तिला माझ्या आईच्या हातचं जेवण खूप आवडायचं. माझी आई व तिचीदेखील चांगली गट्टी जमली. घरच्यांबरोबर असतं तसं नातं तयार झालं. आम्ही खूप सहलींना एकत्र गेलो. साताऱ्याला एक आठवडा गेलो. मरीन ड्राइव्हला रात्री एकत्र फिरायला जायचो. आम्हाला दोघींनाही फिरण्याची खूप आवड आहे आणि आम्ही एकत्र असलो की धमाल करतो. वी आर देअर फॉर इच अदर.

 अभिषेकला ती भेटली तेव्हा तिनं पहिल्यांदा मला सांगितलं. आम्ही लंडनला ‘ती अँड ती’ चित्रपटाच्या शूटिंगला गेलो होतो. तेव्हा तिथं मी कुणालला भेटले होते आणि ही बाब तिला सांगितली. एकूणच सांगायचं तर ती प्रत्येक टप्प्यावर कायम माझ्याबरोबर असते. गेल्या पाचेक वर्षांत आमची मैत्री खूप बहरत गेली आहे. आमच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होत असते. स्टायलिंग टिप्स, फिटनेस, रेसिपीज वगैरे गोष्टींवर आम्ही खूप बोलतो. आता आम्ही आमच्या जोडीदारांविषयीदेखील बोलतो. 

मैत्रिणी म्हणून आम्ही अनेकदा वेगवेगळ्या टप्प्यावर, कठीण काळात एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहिलो आहोत. बऱ्याच वेळा आर्थिक वगैरे पाठिंब्यापेक्षा मानसिक आधार आपल्याला हवा असतो; तो आम्ही एकमेकींना दिला आहे. लॉकडाउनच्या काळात मी सहा महिने दुबईला होते आणि ती बडोद्याला. त्या दिवसांतसुद्धा आम्ही वरचेवर एकमेकींच्या संपर्कात होतो. मी यापूर्वी कधीही स्वयंपाक केला नव्हता. दुबईत असताना मी नवनवीन पदार्थ करणं मनापासून एंजॉय करायला लागले. याबद्दल तिला माझं फार कौतुक वाटतं.  लॉकडाउनच्या दरम्यान आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं, समोरच्याला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं याबद्दल आम्ही बोलायचो. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी सगळ्यात आधी मी तिला कळवली होती. तिनं पवित्र रिश्ता मालिकेत त्याच्याबरोबर काम केलं आहे. ती ऐकून तिची काय अवस्था झाली हे मी पाहिलं आहे. त्यावेळी मला तिच्या जवळ राहणं शक्य झालं नाही, तरी फोनवरून मी तिला आधार दिला. मला असं वाटतं की अशा काळात मित्र मैत्रिणीच असतात, जे तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहायला मदत करू शकतात. 

मी काही नवीन करते तेव्हा त्यावर मी तिचं पहिलं मत घेते. ते कसं वाटतंय ते ती मला सांगते. तसंच एकमेकींमध्ये काय चांगले बदल आपण करू शकतो हे कोणताही आडपडदा न ठेवता आम्ही एकमेकींशी बोलू शकतो. प्रार्थनामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती खूप सकारात्मक मुलगी आहे. कुणाबद्दल नकारात्मक ती कधी बोलत नाही किंवा गॉसिपिंग करीत नाही. तिच्या अभिनयाबद्दल तिचं मी कधी फारसं कौतुक केलं नाही. परंतु आता मात्र तिचं खूप खूप कौतुक मला करावंसं वाटतं. तिचा अभिनय सहजसुंदर असतो. तिची वाटचाल उत्तम सुरू आहे. मैत्री म्हणजे एकमेकांसाठी उभं राहणं. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट दिवस येतात आणि ते जातात. आजची जी काही परिस्थिती आहे ती क्षणभंगुर आहे. त्यामुळं तुमचं यश-अपयश दोन्ही स्वीकारून कायम तुम्हाला साथ देणारी जी खरी व्यक्ती आहे, तीच व्यक्ती तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे. आजच्या जगात खरी माणसं मिळणं खूप दुर्मीळ झालं आहे. पण आमची मैत्री ही सच्ची आहे, खरी आहे आणि म्हणूनच ती आज इतकी वर्षं टिकून आहे. 

 - सोनाली कुलकर्णी

***********************************

आम्‍ही बडबड्या मैत्रीणी
चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेक मित्रमैत्रिणी भेटत असतात. परंतु त्यातील काही जणांशीच आपले कायमचे सूर जुळतात. त्यापैकीच एक सोनाली कुलकर्णी. आमची पहिली भेट ‘मितवा’ चित्रपटाच्या सेटवर झाली. सोनालीनं तत्पूर्वी खूप चित्रपट केले होते आणि तिला चांगला नावलौकिक मिळाला होता. माझा हा दुसराच चित्रपट होता. सोनाली स्टार असल्यामुळं ती कशी वागेल करेल, आमची मैत्री होईल की नाही हे मला काहीच माहीत नव्हतं. परंतु पहिल्याच भेटीत ती किती गोड आहे आणि आमची चांगली मैत्री होऊ शकते हे मला समजलं. कारण एकत्र काम करताना सगळेच मित्र आणि मैत्रिणीप्रमाणे काम करतात. परंतु काम संपल्यानंतर ती मैत्री काही ठराविक मंडळीच जपतात किंवा कायम ठेवतात. सोनालीची व माझी तिथं झालेली ओळख आणि त्यानंतर आमच्यामध्ये झालेली मैत्री आजही तशीच टिकून आहे, ती एकमेकींच्या विश्वासावर.

‘मितवा’चं चित्रीकरण संपल्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर तिनं काही वेगळे प्रोजेक्ट्स केले आणि मीदेखील. परंतु आम्ही एकमेकींना भेटत राहिलो. मी कधी पुण्याला गेले आणि तिचं शूटिंग तिथं आसपास असलं की मी तिला भेटायला जायचे आणि ती कधी मुंबईत असली की मला भेटायला यायची. कधी कधी माझ्या घरी राहायची. एक-दोन पुरस्कार सोहळ्याला आम्ही बाहेरगावी गेलो होतो, तेव्हा ती आणि मी एकाच रूममध्ये राहिलो होतो. आमच्या दोघींमध्ये खूप गोष्टी एकसारख्या आहेत आणि आम्ही दोघीही वेड्यासारख्याच वागतो. भेटलो की खूप बडबड करतो.

आम्ही साताऱ्याला गेलो होतो आणि तिथं सात दिवस राहिलो होतो. तेव्हा आम्ही खूप मजा केली. आम्ही दोघीही एकमेकींना नेहमीच मदत करतो. माझा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर सोशल मीडियावर त्याबद्दल ती लिहिते. माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला ती नेहमी येते आणि मीदेखील तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरला जाते. माझ्या चित्रपटातील कोणत्या गोष्टी तिला आवडल्या आणि कोणत्या नाहीत याबाबत सडेतोडपणे सांगते आणि चांगला सल्लाही देते. तिचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो, तेव्हा तिच्याएवढाच मलाही आनंद होतो. तसंच माझा चित्रपट प्रदर्शित होणार असतो, तेव्हा तिलाही आनंद होतो. त्यामुळं आम्ही एकमेकींच्या मदतीकरता आणि सहकार्याकरता नेहमीच पुढं असतो. मला वाटलं होतं की माझ्या लग्नानंतर आमच्या मैत्रीमध्ये काहीसा दुरावा निर्माण होईल किंवा खंड पडेल. परंतु तसं काही झालेलं नाही. आम्ही आमची मैत्री आजही तितकीच टिकवून ठेवली आहे.

आम्ही कोणत्याही विषयावर गप्पा मारतो आणि कित्येक तास आमच्या गप्पा रंगतात. त्या कालावधीत काही जणांचे फोन येऊन गेलेले असतात परंतु आमच्या गप्पांमध्ये काही खंड पडत नाही. आता कोरोनाच्या काळातही आम्ही दोन-तीन दिवसांनी व्हिडिओ कॉल्स करायचो आणि फोनवर गप्पा मारायचो. आज कोरोनामुळं काही नात्यांमध्ये दुरावा आला असला, तरी या काळातही आम्ही आमची मैत्री छान जपली आहे. आमची मैत्री छान टिकली आहे त्याला कारण एकमेकींचे विचार. तिचे विचार मला पटतात आणि माझे विचार तिला पटतात. त्यामुळं मतभेद कमी होतात. ‘मितवा’नंतर आम्ही दोघींनी ती अँड ती या चित्रपटामध्ये काम केलं. परंतु कधी मैत्रीमध्ये कटुता आली नाही. आता तिचंही लग्न ठरलेलं आहे. यापूर्वी आम्ही दोघी एकत्र फिरायचो. मात्र आता आम्ही चौघेजण एकत्र फिरणार आहोत, कारण आम्हा दोघींनाही ट्रॅव्हलिंगची भारी हौस आहे. 

खरंतर आई-बाबा आपल्याला जन्म देतात. पण मित्र किंवा मैत्रीण कोण असावी याची निवड आपण करत असतो. आपल्याला साथ देईल आणि नेहमीच मदत करेल असा मित्र किंवा मैत्रीण असावी. कधी कधी मित्रमैत्रिणींमध्ये मतभेद होतात. परंतु शेवटी मैत्री टिकवणं आणि ती वाढवणं आपल्या हातात असतं. आमची मैत्री आजही कायम आहे याला कारण आमचे जुळलेले विचार..          

- प्रार्थना बेहेरे
 

शब्दांकन : संतोष भिंगार्डे

संबंधित बातम्या