फिनिक्स

अभिजित पेंढारकर
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

पंप्या फिनिक्स होता. कितीही संकटं आली, नैराश्य आलं, तरी त्यातून भरारी घेऊन तो उभा राहील, याची मला खात्री होती. पण पंप्या म्हणायचा ‘‘फिनिक्स कसला, मोराएवढं उडता आलं तरी पुरे!’’

पंप्या म्हणजे आमचा जिगरी दोस्त. शाळेपासून सगळ्याच गोष्टीत कायम पुढे असलेला. वक्तृत्व म्हणू नका, एकपात्री अभिनय म्हणू नका, नाटक म्हणू नका…! प्रत्येक ठिकाणी ह्याचीच वट. ज्या स्पर्धेत भाग घेईल, तिथं बक्षीस ठरलेलं. पोरींवर शायनिंग आणि आमचा जळून कोळसा. अर्थात, आम्ही त्याच्यावर जळलो, तरी आम्हाला त्याचा अभिमान होता. पंप्याचं तोंडभरून कौतुक होतं आणि आपल्याला कुणी भाव देत नाही, यामुळं पोटात दुखायचंच. पण ते तेवढ्यापुरतं. पंप्याचा राग यायचा, कधीकधी त्याला कोमच्यात घेऊन बुकलावंसंही वाटायचं, पण ते फक्त मनातले मांडे. पंप्या मित्र म्हणून एवढा प्रेमळ आणि लाघवी होता, की आम्ही द्वेषापोटी बुकललं, तरी तो ‘चलता है यार!’ म्हणून पुन्हा मिठी मारून एकत्र डबा खायला बसेल, अशी आम्हाला खात्री होती.

‘चलता है यार!’ हे त्याचं फेवरेट वाक्य होतं. कुठलीही गोष्ट अशी सहज घेऊन, ‘हर फिक्र को धुएं में उडाता चला गया’ स्टाइल सोडून देणं, ही त्याची, आम्हाला त्याच्याबद्दल असूया वाटायला लावणारी आणखी एक सवय. सहसा त्याला बक्षीस मिळालं नाही असं व्हायचं नाही, पण एखादवेळी कुठल्यातरी परीक्षकानं त्याच्यावर डूख धरून त्याला मुद्दाम डावललं, तरी आमचं रक्त सळसळायचं. अगदी उत्तेजनार्थ बक्षीस असलं, तरी. पंप्यावर मात्र ढिम्म परिणाम झालेला असायचा. ‘चलता है यार!’ म्हणून तो सोडून द्यायचा आणि पुढच्या स्पर्धेच्या तयारीला लागायचा.

पंप्याचं मूळ नाव पंकज पालव. प्रत्येकाला टोपणनावानं हाक मारायची आमची खोड, म्हणून त्याचं नाव आधी ‘पं. पा.’ झालं आणि मग ‘पंप्या.’ हे नाव त्याच्याही एवढं तोंडवळणी पडलं, की चुकून कधीकधी त्याच्याकडूनच त्याचं नाव ‘पंकज’च्या ऐवजी ‘पंपज’ लिहिलं जाईल की काय, अशी शंका वाटायची.

शाळेत पंप्या स्पर्धेच्या क्षेत्रातली यशाची एकेक कमान सहज पार करत गेला. स्पर्धा हा त्याच्यासाठी एक खेळच झाला, पण तरीही त्यानं स्पर्धेला कधी सहजपणे घेतलं नाही. प्रत्येक वेळी तो तेवढीच मेहनत करायचा, तेवढेच कष्ट घ्यायचा. कधी गाफील राहिला नाही, की कधी अतिआत्मविश्वासानं मुजोर झाला नाही. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळत गेलं.

अभ्यास वगैरे गोष्टींची त्यानं फारशी फिकीर केली नाही. अभिनय, वक्तृत्व आणि उत्स्फूर्त कला दाखवण्याचं कुठलंही माध्यम हेच त्याचं विश्व होतं. ‘निदान गरजेपुरता तरी अभ्यास कर,’ हा शिक्षकांचा सल्लाही तो ‘चलता है यार!’ म्हणून सोडून द्यायचा. पोटापुरते गुण त्याला मिळत होते. आवडत्या क्षेत्रात मात्र तो त्याची हुशारी शंभर टक्के वापरून स्वतःला सिद्ध करत होता.

 कॉलेजला गेल्यानंतर तर त्याच्या कलेला आणखी मोठं आकाश खुलं झालं. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असोत, राज्यस्तरावरच्या नाट्य स्पर्धा असोत, सगळीकडे त्यानं मनापासून सहभाग घेतला, बक्षीसं मिळवली, कौतुकही पदरात पडलं. त्याच्या आवडत्या कला शाखेत तो गेला आणि आम्ही त्याचे सगळे ‘हुशार’ मित्र इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर अशा प्रतिष्ठित आणि सुरक्षित वाटेकडे वळलो. त्याच्याशी रोजचा संपर्क तुटला, पण बातम्यांमधून, वेगवेगळ्या स्पर्धांमधून तो दिसत, भेटत राहिला. त्याच्याविषयी काही ना काही कानावर येत राहिलं. कधीतरी त्याच्या घरी फोनही व्हायचा, पण त्याची भेट व्हायची नाही. तो कुठल्यातरी स्पर्धेच्या निमित्तानं दौऱ्यावर असायचा. हल्ली पूर्वीसारखं बोलणं, भेटणं होतं नाही म्हटल्यावर, ‘चलता है यार!’ ही त्याची टिप्पणी ठरलेली असायची.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना राज्यस्तरावरच्या एका स्पर्धेसाठी त्यानं जोरदार मेहनत घेतली होती. अगदी दिवसाची रात्र, रक्ताचं पाणी करून एक नाटक बसवलं होतं. महत्त्वाच्या भूमिकेत तो होताच. एवढी मेहनत घेऊनसुद्धा त्यांच्या नाटकाला बक्षीस मिळालं नाही. त्यालाच काय, आम्हालाही खूप अपेक्षा होत्या. बऱ्याच वर्षांनी अशा कुठल्यातरी स्पर्धेला जायचा योग आला होता, त्या निमित्तानं पंप्याची भेटही होणार होती. स्पर्धा संपली, निकाल जाहीर झाले आणि आम्ही उदास मनाने बाहेर आलो. हॉलच्या बाहेर एका कोपऱ्यात पंप्या सिगारेट ओढताना दिसला.

‘‘हे कधीपासून सुरू केलंस, पंप्या?’’ मी विचारलं.

‘‘हे कधीतरीच...!’’

‘‘पण सवय लावून घेऊ नकोस...!’’

‘‘नाही रे. म्हटलं ना? कधीतरीच! चलता है यार!’’ पंप्याचं फेवरेट वाक्य आलं आणि तो नॉर्मल आहे, हे लक्षात आलं.

‘‘वाईट झालं यार. हे बक्षीस मिळायला हवं होतं तुम्हाला. तुमच्या टीमचा परफॉर्मन्स बेस्ट होता. आता ह्याच्यावर ‘चलता हे यार!’ म्हणू नकोस!’’ मी सुनावलं.

‘‘नाही, ठीकेय. आम्ही जरा कमी पडलो.’’

‘‘तुमच्या कॉलेजवर परीक्षकांची खुन्नस होती, असं नाही वाटत तुला?’’ मी त्याच्या शांत प्रतिक्रियेवरच आता चिडलो होतो.

‘‘नाही रे. त्यांचं काहीही असो. आम्ही कमी पडलो, हे आहेच ना?’’ 

‘‘बाकीच्यांचे परफॉर्मन्सही असे काही ग्रेट नव्हते. हां, आता तुमचा मेन आर्टिस्ट जरा फापलला, पण…’’

‘‘त्याच्यावर आणखी थोडी मेहनत घ्यायला हवी होती.’’

‘‘सगळ्या गोष्टींची जबाबदारी तूच का घ्यायचीस? त्यानं स्वतः काहीच करायचं नाही का?’’

‘‘तसा बरा होता रे तो.’’

‘‘काय बरा होता? मला असं कळलंय, की त्यालाच मेन रोल देण्यासाठी कॉलेजनं तुझ्यावर दबाव आणला होता.’’

‘‘नाही रे.’’

‘‘उगाच त्यांना कव्हर करू नकोस. तो रोल तू केला असतास, तर पाच-सहा बक्षीसं तरी मिळाली असती तुम्हाला. त्यानं माती खाल्ली म्हणून...’’

‘‘चलता है यार!’’ असं म्हणून पंप्यानं विषय तिथेच संपवला. 

‘‘चल, चहा मारू!’’ म्हणून आम्हाला टपरीवर घेऊन गेला आणि मग वेगळ्याच गप्पा मारत बसला. त्याचं आत कुठेतरी काहीतरी तुटतंय, हे लक्षात येत होतं, पण ते चेहऱ्यावर दाखवेल, तर तो पंप्या कसला!

शैक्षणिक काळातली पंप्याबरोबरची ते आमची शेवटची भेट. त्यानंतर पंप्या कुठे गेला, काय करतो, काही समजलं नव्हतं. आम्ही डिग्री हातात घेऊन स्पर्धेच्या जगात घुसलो आणि एकमेकांना ढुशा मारत, फट मिळेल तिकडे घुसत पुढे जात राहिलो. हळूहळू प्रकाश दिसायला लागला आणि आपापली बस्तानं बसवली. पंप्या मात्र डिग्री पास झाला की नाही, त्याच्याच क्षेत्रात काम करतोय की आणखी काही, कसलीच कल्पना नव्हती. त्याचं आणि आमचं शहरही वेगळं झालं. आधी उमेदवारी, मग सेटलमेंट, मग लग्न, संसार, पालकत्व, अशी सगळी आव्हानं आम्ही टप्प्याटप्प्यानं पार करत राहिलो, पण शाळा-कॉलेजमध्ये आमच्यापेक्षा कितीतरी उंच भरारी घेऊ पाहणारा पंप्या होता कुठे?

अखेर एके दिवशी त्याचं उत्तर मिळालं. सहज टीव्हीच्या रिमोटशी चाळा करताना कुठल्यातरी चॅनेलवरच्या कुठल्यातरी सिरियलच्या एका एपिसोडमध्ये पंप्या दिसला. सीनमध्ये मागेच उभा होता, अगदी फुटकळ रोल होता, पण ‘पंप्या’ लक्षात येत होता. शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याला फोन करायचा प्रयत्न केला. पण त्याच्या घरचा फोन लागेना, त्याच्याकडे मोबाईल आहे की नाही, याचीही कल्पना नव्हती. मध्यंतरी कुणीतरी आता तो घरी राहत नाही सांगितलं होतं, तेही आठवलं. पंप्या मुंबईत गेला असणार, याचीही कल्पना होतीच, पण त्याला शोधायचं कुठे, हा प्रश्न होता. सुटी संपली, नवा आठवडा नवी आव्हानं घेऊन आला आणि पुन्हा मी पंप्याला विसरून गेलो.

मग पुढे विकेंडला पंप्या असाच कुठं कुठं भेटत राहिला. कधी एखाद्या सिरियलमध्ये, कधी शॉर्ट फिल्ममध्ये, तर कधी एखाद्या सिनेमात. तो जे करतोय, त्यापेक्षाही त्याचा आवाका खूप मोठा आहे, हेही जाणवत राहिलं. मात्र हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो भेटायला हवा होता, ते काही शक्य होत नव्हतं.

एकदा कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र नाटकाला जायची टूम निघाली आणि आम्ही थिएटरात पोहोचलो. नाटक सुरू झालं आणि सगळेच त्यात रमून गेले. किरकोळ नोकराचं काम करणारा एक कलाकार जाम धमाल करत होता. त्याचा रोल अगदी छोटा असला, तरी तो चोपतोय, हे लक्षात येत होतं. पुढच्या प्रवेशात जरा नीट बघितलं आणि एकदम मी ओरडलो, ‘अरे, हा पंप्या!’

आजूबाजूच्या पांढरपेशा प्रेक्षकांनी लगेच ‘शूsss शूsss’ करायला सुरुवात केली आणि मीसुद्धा माझी विस्कटलेली कॉलर ताठ करून खुर्चीत सावरून बसलो. सभ्य प्रेक्षकासारखं पुढचं नाटक बघितलं. पंप्या मात्र मनात भरला होता. आता यावेळी ह्याला गाठायचाच, असं ठरवून नाटक संपल्यावर बॅकस्टेजला गेलो. बाहेर मुख्य कलाकारांबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी उसळलेली होती.

‘‘काय सॉलिड काम केलंस रे, पंप्या!’’ मी त्याला म्हटलं, तेव्हा त्यानं वळून बघितलं.

‘‘पांड्या, तू?’’ त्यालाही आश्चर्य वाटलं होतं.

चारचौघांत मला ‘पांड्या’ म्हटल्यामुळे माझ्या बायकोला धक्का बसला, पण पंप्या मला वेगळ्या कुठल्या नावानं हाक मारू शकत नाही, याची मला खात्री होती. खरंतर आम्ही सगळेच शाळेत एकमेकांना त्यांच्या वडिलांच्या नावावरून हाक मारत होतो. पांडुरंग हे माझ्या वडिलांचं नाव. पंप्या मात्र या पद्धतीला अपवाद होता. त्याचं ‘पंप्या’ हे नाव कुठल्याच काळात बदललं नाही.

नाटकातले सगळे लोकही त्याला त्याच नावाने ओळखतात, हेही माझ्या तिथंच लक्षात आलं. अगदी बॅकस्टेज कामगारांना सेट काढण्यासाठी मदत करण्यापासून सगळ्या गोष्टी तो करत होता. मुख्य कलाकारांनाही त्याचा वकूब लक्षात आली होती, पण वरवर कौतुक करण्यापलीकडं त्यांनी काही केलं नसावं.

‘‘पंप्या, तुला याच्यापेक्षा महत्त्वाची भूमिका मिळायला हवी होती यार!’’ मी पंप्याला म्हटलं. त्याचं उत्तर अपेक्षित होतंच.

‘‘चलता है यार!’’

‘‘नाही रे. सगळीकडे असंच म्हणू नकोस. तुला काहीतरी अचिव्ह करायचं, तर भांडायला हवं. स्वतःचा हक्क मिळत नसेल, तर तो मागून घ्यायला हवा. तुझा स्वभाव बदलून कधीकधी आक्रमकही व्हायला हवं,’’ मी त्याला सुचवलं.

पंप्या फक्त मंद हसला.

‘‘तू एवढा शांत कसा राहू शकतोस? हे क्षेत्र कसं आहे, तुला माहितेय. जे येईल ते ॲक्सेप्ट करू नकोस. तुझी जागा निर्माण कर,’’ मी म्हटलं, पण पंप्या तसं वागणार नाही, याचीही मला कल्पना होतीच.

पंप्याचा निरोप घेऊन निघालो, तरी त्याची ती भूमिका आणि सहज वावरणं मनात राहिलं. नंतरही पंप्या कुठे ना कुठे दिसत राहिला. त्याच्या मेहनतीचं चीज व्हावं, त्याच्या योग्यतेची मोठी भूमिका त्याला मिळावी, असं सारखं वाटत राहायचं, पण ते स्वप्न कधी पूर्ण होणार, याबद्दलही शंका होतीच.

एकदा तर पंप्याला चक्क कुठल्याशा सिनेमासाठी उत्कृष्ट सहकलाकार म्हणून नॉमिनेशनही मिळालं. पंप्यासाठी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती. त्याच्या कामाचं कौतुक झालं होतं, किमान दखल घेतली गेली होती. तो पुरस्कार त्याला मिळाला नाही, ती गोष्ट वेगळी. पण इंडस्ट्रीने त्याची नोंद घेतली, याचाच मला जास्त आनंद झाला.

पंप्या फिनिक्स होता. कितीही संकट आलं, नैराश्य आलं, तरी त्यातून भरारी घेऊन तो उभा राहील, याची मला खात्री होती.

‘‘फिनिक्स कसला, मोराएवढं उडता आलं तरी पुरे!’’ पंप्या म्हणायचा. ‘‘मोराला कुठे जास्त उडता येतं? तो उडतानाही काही भारी दिसत नाही. पण थांबल्यावर पिसारा फुलवतो, तेव्हा असेल तिथून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. तेवढं जमलं तरी पुरे,’’ पंप्यानं मला सुनावलं होतं.

पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्याला फोन केला असता, तरी त्यानं नेहमीसारखीच तटस्थ प्रतिक्रिया दिली असती, याबद्दल खात्री होती. पंप्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती, असं नाही. पण आता एवढी वर्षं काम केल्यानंतर त्याच्या कामाचं चीज व्हायला हवं होतं. त्याला चांगलं काम मिळायला हवं होतं. गरजेपुरते पैसे मिळत होते, पण आता त्याला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळायला हवी होती.

...आणि तोही दिवस उजाडला. पंप्याचा एके दिवशी सकाळी फोन आला.

‘‘पांड्या, काय करतोयंस?’’

‘‘पंप्या, तू? एवढ्या सकाळी? तुम्हा कलाकारांना सकाळ माहीत असते का?’’ मी उगाच त्याची खेचली.

‘‘अरे नालायका, उलट तुम्हीच ढुंगण वर करून पडलेले असता, तेव्हा आम्ही सकाळी सातच्या शिफ्टसाठी पाच वाजता घराबाहेर पडलेलो असतो. मला शिकवतोय,’’ पंप्या उचकला.

‘‘बरं, आता फोन कशासाठी केलास, ते सांग.’’

‘‘तुला कुठे इंटरेस्ट आहे ऐकण्यात?’’

‘‘आहे रे, सांग. तू स्वतःहून फोन केलायंस, म्हणजे काहीतरी भन्नाट न्यूज असणार. सांग सांग, एखादी हिरॉईन पटवलीस की काय?’’

‘‘हिरॉईनला पटवणं सोपं आहे रे, चांगल्या रोलसाठी निर्माता-दिग्दर्शकाला पटवणं जास्त कठीण आहे,’’ पंप्या म्हणाला आणि तो काहीतरी भारी बातमी सांगणार, याचा मला अंदाज आला.

‘‘पंप्या, काय बातमी आहे? मोठा रोल मिळाला की काय?’’ मी उत्साहानं विचारलं.

‘‘मोठा रोल नाही मिळालेला....’’

‘‘मग?’’

‘‘लीड रोल मिळालाय.’’

‘‘काय?’’

‘‘हो. एका बायोपिकमध्ये काम करतोय. लीड रोल माझाच आहे.’’

‘‘काय सांगतोस?’’ मी जवळपास उडीच मारली.

‘‘होय. फायनली मला माझा ड्रीम रोल मिळालाय यार. खरं सांगायचं तर मेजर रोल मिळालाय...पहिल्यांदाच!’’ पंप्या उत्साहानं म्हणाला.

नेहमी कुठलीही गोष्ट स्थितप्रज्ञपणे सांगणारा पंप्या आज खरंच उत्साहित वाटत होता. त्याला मनापासून आनंद झाला होता. नाहीतर स्वतःच्या वडिलांच्या निधनाच्या वेळीसुद्धा तो अगदी शांत, संयमित होता. आम्हालाच धीर देत होता. आज मात्र त्याच्या खऱ्या भावना उचंबळून आल्याचं जाणवत होतं. कदाचित एवढे दिवस त्यानं सगळ्या कटू अनुभवांचे जे घोट रिचवले होते, त्यातून काहीतरी चांगलं घडण्याची आशा दिसू लागल्याने त्याच्या मनातले सगळे रंग खुलून आले असावेत.

‘‘पंप्या, भेट की साल्या, बसू एकदा,’’ मी त्याला ऑफर दिली आणि त्यानं ती लगेच मान्य केली. त्याच शनिवारी आम्ही भेटलो. पंप्या भलताच खूष दिसत होता. पुढच्या आठवड्यात तो कॉंट्रॅक्ट साइन करणार होता, त्याला ॲडव्हान्स रक्कमही मिळाली होती.

‘‘घुसलास कसा काय?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.

‘‘घुसलो नाही रे, नशीब फळफळलं, असं म्हण.’’ पंप्या उत्साहानं सांगायला लागला.

‘‘कसं काय?’’

‘‘तुला हरीशनाथ माहितेय ना?’’

‘‘नाही रे. कोण?’’

‘‘अरे, मोठा आर्टिस्ट होता. चारशेच्यावर फिल्म्समध्ये काम केलंय त्यानं. पण बहुतेकवेळा कॅरेक्टर रोल्स मिळाले. तुला `दुनिया का दस्तूर`मधला रद्दीवाला आठवतोय? आणि `सिंदूरी शाम`मधला वॉचमन? आणि तो...’’

पंप्यानं धडाधड हरीशनाथच्या भूमिकांची यादी दिली. हे एक त्याचं वैशिष्ट्य मला फार आवडायचं. त्याला सिनेमातले सगळे संदर्भ तोंडपाठ असायचे. हा तर त्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता.

‘‘त्या हरीशनाथचं काय? त्याच्या ओळखीनं मिळाला का तुला हा रोल?’’ मी बाळबोधपणे विचारलं.

‘‘गाढवा, हळू बोल! हरीशनाथ ‘वर’ जाऊन पंधरा वर्षं झाली. त्याच्या ओळखीनं मला रोल कसा मिळेल?’’ पंप्या उचकला.

‘‘मग तूच सांग काय ते.’’

‘‘हरीशनाथवर बायोपिक येतोय. दमानिया ब्रदर्स प्रोड्यूस करणार आहेत. आणि त्यात मला लीड रोल मिळालाय,’’ हे सांगताना पंप्याचा चेहरा उजळला होता.

‘‘काय सांगतोस पंप्या! एवढ्या मोठ्या बॅनरच्या फिल्ममध्ये तू लीड रोल करणार? च्यायला, आधी सांगितलं असतंस, तर ह्या बारमध्ये व्हिस्की पिण्याऐवजी तुला ताजमध्ये शॅम्पेन पाजली असती!’’ मी त्याला कडकडून मिठी मारली. मला खरंच मनापासून आनंद झाला होता. अगदी पंप्यापेक्षा जास्त. अर्थात, तोही कमी उत्साही नव्हता. त्याचा भिडस्तपणा सोडून अगदी मोकळेपणानं माझ्याशी बोलत होता. मला सुरुवातीला किंचितशी शंका आली होती, तसा तो काही नशेत बरळत नव्हता. खरंच त्याला आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळाली होती. हरीशनाथ हा चारशेहून अधिक सिनेमांत काम केलेला, तरीही काहीसा उपेक्षित राहिलेला कलाकार. मलाही त्याचा चेहरा माहीत असला, तरी त्याचं नाव माहीत नव्हतं, यावरूनच त्याच्याबद्दल लोकांना किती कमी माहिती होती, हे लक्षात यावं. आयुष्यभर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून राहिलेल्या हरीशनाथच्या आयुष्यावरच्या बायोपिकमध्ये त्याचा रोल एका ज्युनिअर आर्टिस्टनंच करावा, अशी कल्पना दिग्दर्शकानंच मांडली होती आणि निर्मात्याला ती मान्य झाली होती. हा अभिनव प्रयोग चित्रपटसृष्टीला वेगळं वळण देईल, अशी चर्चा होती.

रीतसर ऑडिशन घेऊन पंप्याची या भूमिकेसाठी निवड झाली होती. त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी होती आणि ती त्याला डावलायची नव्हती. त्यानं मेहनत घ्यायलाही सुरुवात केली होती. हरीशनाथचं चरित्र वाचून झालं होतं. त्याच्याविषयी आणखी कुठून कुठून माहिती मिळवायचा प्रयत्न चालू होता. हरीशनाथच्या पंधरा वीस फिल्म्स पुन्हा बघून झाल्या होत्या. दोन महिन्यांनी शूटिंग सुरू होणार होतं आणि त्याआधी पंप्याला त्याच्या सगळ्या फिल्म्स बघून संपवायच्या होत्या. मधल्या काळात तो दुसरं कुठलंही काम करणार नव्हता. अगदी त्याचं लाडकं नाटकही!

एवढा भारावलेला आणि जीवतोड मेहनत घेणारा पंप्या पाहणं हा एक विलक्षण अनुभव होता. या काळात मी पंप्याबरोबर जास्तीत जास्त काळ राहायचा प्रयत्न केला. अगदी कॉलेजकाळातल्या होस्टेलच्या दिवसांची आठवण झाली. पंप्याचा भूमिकेचा अभ्यास जवळून बघणं हा एक वेगळाच आनंद होता. तो रोज डायरीत नोंदी करत होता, हरीशनाथची एखादी वेगळी लकब लक्षात आली, तर ती करून बघण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठीही पंप्यानं धडपड केली.

शूटिंग आता पंधरा दिवसांवर आलं होतं आणि पंप्याची तयारी पूर्ण झाली होती. त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो मलाही सोशल मीडियावर शेअर करायचा होता. शूटिंगचा मुहूर्त होईपर्यंत या प्रोजेक्टबद्दल काहीही जाहीर करायचं नाही, अशी अट पंप्याच्या कॉंट्रॅक्टमध्ये घालण्यात आली होती.

मधेच एकदा पंप्याशी फोनवर बोलणं झालं, तेव्हा शूटिंगचं अजून नक्की नसल्याचं त्यानं सांगितलं. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि शूटिंग ठरलेल्या वेळी सुरू कसं होत नाही, असा प्रश्न मला पडला. त्यानंतर दोन तीन दिवसांनी सहज टीव्ही सर्फ करताना एका सिनेमाच्या मुहूर्ताच्या बातमीनं लक्ष वेधून घेतलं. ‘हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिकांमधून झळकलेले, पण फारशी प्रसिद्धी न मिळालेले कलाकार हरीशनाथ यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक तयार केला जात आहे.’ अशी ती बातमी होती. माझे कान टवकारले गेले. पंप्याचं नाव ऐकण्यासाठी मी अधीर झालो होतो. पंप्यानं आधी कळवलं कसं नाही, याबद्दल थोडासा रागही आला होता, पण तो गडबडीत असेल, असा विचार मनात आला आणि ‘चलता है यार!’ म्हणून मी सोडून दिलं.

पुढची बातमी ऐकली आणि माझ्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला. त्या बायोपिकमध्ये हरीशनाथ यांची भूमिका सध्याचा सुपरस्टार केदार शर्मा करणार होता. माझा कानांवर विश्वासच बसेना. मी पुन्हा ती बातमी नीट ऐकली. ऐकण्यात काही चूक झाली नव्हती. अस्वस्थ झालो. नेटवर सर्च केलं, तिथेही काही वेबसाइट्सवर ही बातमी दिसली. पंप्याचं नाव कुठेही नव्हतं. मग पंप्यानं मला थाप मारली होती की काय? नाही, पण तो माझ्याशी खोटं कशाला बोलेल? किती एक्सायटेड होता तो! अशी गंमत कशाला करेल?

मी पंप्याला फोन केला. त्यानं उचलला नाही. कामात असेल, असं समजून स्वस्थ बसलो, पण स्वस्थता लाभली नव्हती. पुन्हा थोड्यावेळानं फोन केला, तोही त्यानं उचलला नाही.

पंप्याचं करिअर एका नव्या उंचीवर नेणारी ही संधी खरंच त्याच्या हातातून गेली होती का? पंप्या निराश झाला असेल का? म्हणून माझा फोन घेत नसेल का? त्यानं नैराश्यातून स्वतःचं काही बरंवाईट तर....

मनात नको नको त्या शंका आल्या.

मेसेजलाही त्यानं रिप्लाय केला नाही.

बराच काळ अस्वस्थ होतो. अखेर रात्री माझा फोन वाजला. पलीकडे पंप्या होता.

‘‘काय म्हणतोयंस, पांड्या?’’ त्यानं नेहमीच्या शैलीत प्रश्न विचारला, पण हा त्याचा ‘कमावलेला’ आवाज आहे, हे लगेच जाणवलं.

‘‘पंप्या, अरे तू त्या बायो...’’

‘‘बघितलीस ना बातमी?’’ माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या पंप्या पुढे सुरू झाला. ‘‘अरे, कास्टिंगची काहीतरी गडबड होती. ही सगळी कमर्शिअल गणितं असतात रे. मी लीड रोलमध्ये काम करणं आणि एखाद्या सुपरस्टारनं करणं, ह्यात फरक आहेच ना? त्यानं एखाद्या साइड आर्टिस्टचा रोल केला, तरी शंभर कोटींचा धंदा होईल. साइड आर्टिस्टनं लीड रोल केला, तर त्याला बघायला कोण येणार? खरंय ना?’’

‘‘अरे, पण कमिटमेंट...’’

‘‘कमिटमेंट पाळलेय प्रोड्यूसरनी. त्याच फिल्ममध्ये मी एक रोल करतोय. हरीशनाथच्या मित्राचा. मित्र त्याला सल्ला देतो आणि तिथून त्याचं आयुष्य बदलतं, असा महत्त्वाचा सीन आहे.’’

‘‘एक सीन?’’

‘‘नाही रे, हा मेजर सीन आहे. आणखी दोन तीन असतीलच. सिनेमातला टर्निंग पॉइंट आहे यार! जाम मजा येईल!’’

‘‘अरे, पण...’’

‘‘तुला म्हटलं ना, आपण असू तिथून लक्ष वेधून घ्यायचं. मोरासारखं. फिनिक्स वगैरे नाही आपण. मोर असलेलं चांगलं. आकाशात उंच नाही, तर निदान या झाडावरून त्या झाडावर तरी भरारी घेऊ शकतोच ना? चलता है यार!’’

संबंधित बातम्या