विलक्षण ब्रह्मपुत्रा...!

-आदिती पटवर्धन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

ब्रह्मपुत्रा नदीबद्दल माझ्या मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. या विस्मयकारक नदीला एकदा का होईना भेटून, डोळे भरून बघून यायचं असं मी ठरवलं आणि सुदैवानं ब्रह्मपुत्रेला अगदी जवळून भेटण्याचा, अनुभवण्याचा योग एकदा नाही, चक्क दोनदा आला... तिच्या त्या भव्यदिव्य रूपापुढं बाकी कशालाच मनात थारा नव्हता. 

शाळेत असताना केव्हातरी एक लेख वाचला होता. एका सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचे विविध अनुभव लिहिले होते. त्यातच त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीचा एक अनुभव होता. नुकतंच ट्रेनिंग पूर्ण झालेले ते अधिकारी नव्यानं सेवेत रुजू होणार होते, चांगलं काम करून दाखवण्यासाठी उत्सुक होते. अरुणाचल प्रदेशात त्यांची नेमणूक करण्यात आली. या प्रदेशाशी फार ओळख नव्हती, त्यामुळं पदभार स्वीकारल्यानंतर कामाला हात घालण्याआधी लोकांच्या समस्या समजून घेण्याचा ते प्रयत्न करू लागले. एका नदीच्या काठी वसलेल्या गावांच्या एका समूहाचा इतर राज्याशी असलेला संपर्क गेल्या पावसाळ्यात महिनाभर संपूर्णपणे तुटला होता, त्याविषयी या पावसाळ्याआधी काहीतरी करायची गरज आहे. असं त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी त्या नदीवर पूल बांधण्यासाठी बजेट मंजूर करून दिलं; जातीनं लक्ष घातल्यामुळं काम वेगानं पुढं ही गेलं आणि पूल तयार झाला. गावांचा प्रश्न सुटला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना समजलं, की या पावसाळ्यात पुन्हा तोच प्रश्न निर्माण झालेला आहे. गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांना कळेना, असं झालं कसं. भक्कम, पक्का पूल बांधला त्याचं काय झालं? ते स्वतः पाहण्यासाठी तिथं गेले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्या ठिकाणी नदीवर पूल बांधला होता तो पूल अगदी तसाच भक्कम उभा होता. पण त्या पुलाखाली नदी कुठं होती? या पावसाळ्यात नदीनं पात्रच बदललं होतं! आता पुलाचा काही उपयोगच नव्हता आणि त्या गावांसाठी नदी नेहमीप्रमाणं रस्त्यात आडवी ठाकली होती.

हा अनुभव लिहून त्यांनी पुढे लिहिलं होतं - ब्रह्मपुत्रा ही काय चीज आहे हे त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं कळलं! ही स्वच्छंदी, मनस्वी नदी कायम तिच्याच मर्जीनं चालते, तिच्या विस्तीर्ण पात्रासमोर नतमस्तक व्हावं, तेव्हा कुठं ती जरा दाद देते.

हा लेख वाचल्यापासून या विलक्षण अशा ब्रह्मपुत्रा नदीबद्दल माझ्या मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. तिबेट, भारत आणि बांगलादेश अशा तीन देशांमधून वाहणारी ही प्रचंड नदी जगातल्या महाकाय नद्यांपैकी एक. भारतात तीस्ता, दिबांग, लोहीत, मानस, कामेंग या नावांनी ओळखल्या जाणाऱ्‍या मुख्य उपनद्या सोडूनही असंख्य लहान लहान उपनद्या, उपउपनद्यांनी ब्रह्मपुत्रेचं हे महाकाय जाळं विणलेलं आहे.

या विस्मयकारक नदीला एकदा का होईना भेटून, डोळे भरून बघून यायचं असं मी ठरवलेलं आणि सुदैवानं ब्रह्मपुत्रेला अगदी जवळून भेटण्याचा, अनुभवण्याचा योग एकदा नाही, चक्क दोनदा आला. विवेक इन्स्पायर या ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकल्पाअंतर्गत अरुणाचल प्रदेशातल्या विवेकानंद केंद्राच्या शाळांतील मुलांची शिबिरं घेण्यासाठी सलग दोन वर्षं मी अरुणाचलला जवळ जवळ महिनाभरासाठी जाऊन आले. हा संपूर्ण अनुभवच कमालीचा विलक्षण आणि समृद्ध करणारा होता... आणि त्याची सुरुवात झाली ती गुवाहाटीला जाताना विमानातून झालेल्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या दर्शनानं! आभाळातून या नदीचं होणारं हे पहिलंच दर्शन मनोहारी तर आहेच, पण तसंच ते जरा धडकी भरवणारंही आहे. नदीचं महाकाय पात्र आभाळातून इतक्या दुरून एवढं विशाल दिसतं, तर ते प्रत्यक्षात केवढं असेल हा विचार करूनच थोडंसं धसकायला होतं.

...आणि खरंच ते तितकं विस्तीर्ण आहे याची खात्री मला काहीच तासांत ते प्रत्यक्षात पाहिल्यावर पटली. अगदी पहिल्यांदा अरुणाचलला गेले, तेव्हा आत्ताचा लोहित नदीवरचा अवाढव्य ढोला-सदिया पूल, जो आसाम आणि अरुणाचल राज्यांना जोडतो, त्याचं बांधकाम पूर्ण व्हायचं होतं. त्यामुळं अरुणाचलला जाण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव मार्ग अवलंबणं भाग होतं. गुवाहाटीवरून साधारण १२ तासांचा रेल्वेचा प्रवास करून तिनसुकियाला पोचलो. तिनसुकियाच्या बस डेपोवरून रोइंगला जाणाऱ्या बसचं तिकीट काढलं. हा प्रवास नक्की किती तासांत पूर्ण होणार हे खात्रीशीर कोणत्याच बस कंडक्टरला माहीत नव्हतं, ज्याला विचारावं तो ‘शायद पाँच-छे घंटा लगेगा... सात भी लग सकता हैं...’ असं मोघम सांगायचा. खरंतर तिनसुकिया ते रोइंग हे अंतर पुणे-मुंबई अंतरापेक्षाही कमी! त्यामुळं एवढं साधं कसं नक्की सांगता येत नाही, असं वाटून गेलं. पण खरं कारण काही वेळातच कळलं.

साधारण तीन तासांचा प्रवास करून झाल्यावर आमची बस नदीच्या काठी येऊन थांबली. रात्रभर ट्रेनचा प्रवास करून थकलेले आम्ही डुलक्या घेत होतो. कंडक्टरनं हाक मारून जागं केलं. ‘दीदी, नदी के पार सामने जो दुसरा बस खडा हैं उसके कंडक्टर को येही वाला टिकट दिखाना, और इसी सीट पर बैठना।’ माना डोलवून सामान उचलून बसमधून उतरलो आणि समोर पाहिलं तर नदीचं पात्र दिसलं. ‘नदी के पार’ असलेला तो पैलतीर मात्र कुठंच दिसत नव्हता! एक मोठी फेरी बोट पात्रात उभी होती आणि बसच्या टपावरून सामान उतरवून फेरीवर चढवण्याचं काम सुरू होतं. ही बस जरी प्रवाशांसाठी असली तरी वाहतुकीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळं या बसच्या टपावर, मागच्या स्टोरेजमध्ये, दोन्हीकडच्या सीटच्या मधल्या जागेत असं जमेल तिथं जमेल ते सामान टाकून लोक त्या सामानाची ने-आण करत होते. टपावरून मोठ-मोठी पोती उतरवली जात होती. ते आम्ही बघत उभे असतानाच मागच्या स्टोरेजच्या जागेतून बकऱ्यांचा एक मोठा कळप मालकानं बाहेर उतरवला आणि त्यांना फेरीवर चढवायला सुरुवात केली. सगळं बघत आम्ही अवघडून उभे असताना एक मावशी हसून बोलायला लागल्या. आम्ही कोण कुठून आलो वगैरे चौकशी करून झाल्यावर शेजारच्या एका हॉटेलवजा ठेल्याकडं बोट दाखवून म्हणाल्या, ‘बैठो वहाँ, आधा-पुना घंटा तो लगेगा सब समान चढाने में..’ भूक लागलेलीच होती. पोऱ्यानं येऊन लगेच हवं नको ते विचारलं, अंड्याची थाळी होती आणि गोड्या पाण्यातला रोहू मासा होता त्याच्याकडं. शिवाय आणि असंच काही थोडं स्नॅक्स प्रकारातलं. मस्त मॅरिनेट करून तळलेल्या रोहू माशाबरोबर भात आणि कालवण खाऊन होईपर्यंत सामानाचं अनलोडिंग, लोडिंग पूर्ण झालं होतं. फेरी बोटवाल्यांनी हाक दिल्यावर आमच्याशी गप्पा मारणाऱ्या मावशी आणि इतर सगळीच स्थानिक माणसं फेरीच्या खालच्या भागात सावलीतली जागा पकडायला पळाली. माध्यान्हीचं टळटळीत ऊन होतं, तरी त्या ब्रह्मपुत्रेला न बघता-अनुभवता खाली गर्दीत जाऊन बसणं मनाला पटेना. आम्ही वरच मोकळ्यावर बसलो. फेरी सुरू झाली. सुरुवातीला उथळ पात्रात साधारण कॅनलसारख्या निमुळत्या, जमिनीत घुसलेल्या नदीच्या भागात फेरी उभी असल्यामुळं नदीच्या विस्तीर्णतेचा पुरेसा अंदाज आला नव्हता, तो फेरी नदीच्या मुख्य पात्रात शिरल्यावर लागलीच आला. नजर जाईल तिथपर्यंत नदीचं पात्रच दिसत होतं, पैलतीर काही केल्या दिसेचना. बोटीतल्या सोबतच्या लोकांना पैलतीरावर जायला किती वेळ लागतो याविषयी विचारलं तेव्हा कळलं, की नदी ओलांडायला लागणारा वेळ हा नदीचं पात्र किती फुगलं आहे त्यावर अवलंबून असतो. कधी कधी हा प्रवास पाऊण तासात पूर्ण होतो, तर कधी कधी दीड-दोन तासही लागू शकतात!

संपूर्ण प्रवासभर मी केवळ थक्क होऊन या नदीकडं पाहत राहिले. डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याचं भानही उरणार नाही इतका भारावून टाकणारा अनुभव होता तो. चहूबाजूंनी विस्तीर्ण पसरलेलं नदीचं पाणी, अधून मधून दिसणारी लहानशी बेटं, पाण्यावर तरंगणाऱ्या पाणवनस्पती, शेवाळं... आणि त्या पाण्यावर तरंगत वाटचाल करणारी आमची म्हणावं तर मोठी, पण त्या नदीसमोर अगदीच पिटुकली अशी फेरी बोट. एव्हाना आम्ही नवे, बाहेरून आलेले पाहुणे आहोत हे बोटीवर सगळ्यांनाच कळलं होतं. त्यामुळं दूर क्षितिजावर हिमालयाची शिखरं जशी दिसायला लागली, तसं आजूबाजूच्या लोकांनी आमचं तिकडं लक्ष वेधलं. अगदी दूरवर क्षितिजाच्या किनारी दुपारच्या उन्हात लखलखणारी ती हिमालयाची शिखरं दिसल्यावर तर आम्हाला काय करू काय नको असं झालं.

भरपूर गप्पा मारून, आजूबाजूच्या सौंदर्याचे मनसोक्त फोटो काढून झाल्यावर शेवटी आम्ही शांत झालो आणि नदीकडं फक्त पाहत राहिलो. मनावर ब्रह्मपुत्रेचं गारुड होतं. तिच्या त्या भव्यदिव्य रूपापुढं बाकी कशालाच त्या क्षणी मनात थारा नव्हता. नदीकडं पाहत असतानाच सोबत असलेल्या मित्रानं, अनिरुद्धनं, बॅगेतून बासरी बाहेर काढली आणि त्यावर सारंग रागाची सुंदर आलापी आळवायला सुरुवात केली. त्या क्षणी मात्र खरंच त्या टळटळीत उन्हातही चहूबाजूला शुभ्र शीतल चांदणं पसरलं! शब्द पुरे पडणार नाहीत असा विलक्षण अनुभव तो!

तो ऑगस्टचा महिना असल्यामुळं आम्हाला पैलतीरावर पोचायला साधारण सव्वा तास लागला. सुरुवातीला ‘उन्हात बसणारे हे कोण वेडे आहेत’ अशा नजरेनं पाहणारे लोक आम्ही केंद्राच्या शाळेत शिबिर घ्यायला पुण्याहून आलोय हे कळल्यावर उत्साहानं भरभरून गप्पा मारायला लागले. एका मावशींचा मुलगा तिनसुकियाला कॉलेजमध्ये शिकत होता, त्याला भेटून त्या परत घरी परतत होत्या. आठवड्यातून एकदा त्यांची फेरी तिकडं असायचीच, असं त्यांनी सांगितलं. आणखी एका काकांसाठी हा प्रवास अगदी नेहमीचा होता. त्यांचं गावात छोटंसं दुकान होतं, त्यासाठी लागणारं सामान आणायला त्यांना नेहमीच तिनसुकियाला जावं लागायचं. त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं, की आपल्याला बाहेरून दुरून आल्यामुळं आणि एकाच दिवसाचा प्रश्न असल्यामुळं हा असा प्रवास ‘एक्झॉटिक’ वाटतोय, पण ज्यांना हा प्रवास रोजचा आहे, त्यांना यातल्या अनिश्चिततेचा किती त्रास होत असेल! नक्की किती वेळ लागेल माहीत नाही, एखाद्या दिवशी नदीला खूपच पाणी असेल तर फेरीबोट बंद असतात, अशा वेळी प्रवास पुढं ढकलणं आणि पाणी उतरण्याची वाट पाहणं, हा एकमेव पर्याय. पुणे-मुंबईसारख्या वेल-कनेक्टेड आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूपच प्रगत असलेल्या ठिकाणाहून आलेल्या आम्हाला इथल्या भौगोलिक आव्हानांची जाणीव खूपच तीव्रतेनं झाली.

पैलतीरावर दुसरी बस वाट बघतच होती, पण सामान पुन्हा फेरीवरून या दुसऱ्या बसवर, बसमध्ये चढवण्यात आणखी पाऊण तास गेला आणि शेवटी ही बस निघाली. तिनसुकियावरून दुपारी एक वाजता निघालेले आम्ही साधारण रात्री आठच्या आसपास रोइंगला पोचलो. केवळ १०० किमीचा प्रवास करायला आम्हाला तब्बल सात तास लागले होते.

माझ्या सुदैवानं चांगल्या अद्ययावत सुविधांमुळं किती फरक पडतो, याचा अनुभव मला लगेच पुढच्या वर्षी अरुणाचलला जाताना आला. यावेळी लोहित नदीवरचा आसाम आणि अरुणाचल राज्यांना जोडणारा अवाढव्य ढोला-सदिया पूल बांधून पूर्ण झाला होता. नुकतंच त्याचं उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं होतं. खरंतर फेरीचा थरारक प्रवास यावेळी वाट्याला येणार नव्हता म्हणून मी थोडीशी खट्टूच झाले होते. पण जेव्हा या अवाढव्य पुलामुळं सुकर झालेला प्रवास मी अनुभवला, तेव्हा या पुलामुळं इथल्या माणसांचं जगणं किती सुसह्य झालं आहे हे मला कळलं - अवघ्या तीन तासांत आम्ही तिनसुकियावरून रोइंगला मधे एकदाही न थांबता पोचलो होतो! या एका पुलामुळं किती सोपं झालं जा-ये करणं!

रोइंगच्या वास्तव्यात इथल्या देवपाणी नदीचीसुद्धा ओळख झाली. शिबिराच्या शेवटच्या दिवशी देवपाणी नदीवर जाऊन तिचा निरोप घेतल्याशिवाय निघायचं नाही, हा अलिखित नियमच. दिसायला लहानसं पात्र, पण त्या स्फटिकासारख्या नितळ पाण्याचा वेग इतका, की चुकून तोल सुटला तर तो सावरण्याची एकही संधी मिळणार नाही. या नदीच्या काठावरच्या मोठ्या दगडावर बसून, थंडगार पाण्यात पाय बुडवून वाहत्या पाण्याच्या संतत तालावर पद्य म्हणण्याचा अनुभव काही विलक्षणच! नदीवर बांबूचा साधा साकव घातलेला, ज्यावरून झुलत झुलत पलीकडं जाताना खाली पाहिलं की हृदयाचा ठोका चुकावा. या नदीवरसुद्धा आता पक्का पूल बांधून झाला आहे, ज्यामुळं जा-ये करणं सोपं झालं आहे आणि सुदैवानं या नदीनं मात्र पात्र बदललेलं नाही!

इथल्या माणसांच्या आयुष्यात असलेलं नदीचं अविभाज्य स्थान आणि तिच्याविषयी असलेलं निस्सीम प्रेम पदोपदी जाणवतं. नदीला पूर येणं, ही गोष्ट इथल्या लोकांसाठी नित्यनेमाची म्हणावी अशीच. दरवर्षी पावसाळ्यात नदी, पात्र सोडून जरा फुगणारच आणि पाणी थोडं का होईना गावा-घरांत शिरणारच, असा त्यांचा त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्या अगदी जवळच्या एखाद्या जरा रागीट माणसाला प्रेमानं आपलंसं म्हणावं आणि त्याच्या रागाचा अधून-मधून होणारा उद्रेकही समजून घ्यावा, तसंच हे त्यांच्यासाठी.

मी दुसऱ्यांदा अरुणाचलला गेले, तेव्हाची गोष्ट. एक शिबिर रोइंगच्या शाळेत घेऊन त्यानंतर पुढचं शिबिर घ्यायला सुनपुऱ्याला जायचं होतं. इथं रोइंगमध्ये पहिलं शिबिर सुरू झालं आणि जो पाऊस पडायला लागला तो थांबेचना. सलग दिवसरात्र पावसाची संततधार सुरू होती. त्याच्या त्या सतत, संथ लयीत बरसण्याची इतकी सवय झाली होती, की बाहेर पडताना पायात चप्पल सरकवावी तसा आपोआप छत्रीकडं हात जायचा. माझी आज्जी सांगायची, की कोकणात बरेचदा असा सलग पाऊस पडायला लागला की सात दिवस थांबायचा नाही, तेव्हा त्याला ‘सातेरं लागलं’ असं म्हणायचे. तसं सातेरं कोकणात नाही, तरी आता अरुणाचलात अनुभवायला मिळणार असं वाटायला लागलं. या संततधारेमुळं पुढच्या शिबिराची चिंता वाटायला लागली. अरुणाचलभरातून मुलं येणार होती, पावसामुळं रस्ते बंद झाले तर काय करायचं हा प्रश्न होता. शिवाय सुनपुऱ्याची शाळा नदीच्या अगदी जवळ आहे, त्यामुळं असा सलग पाऊस झाला, की हमखास शाळेत पाणी भरतं असंही एका शिक्षकांनी सांगितलेलं. धाकधूक वाढत असतानाच आमच्या सुदैवानं पाचव्या दिवशी पाऊस उघडला. सुनपुऱ्यातलं शिबिर व्यवस्थित पार पडलं, बरीचशी मुलं वेळेत येऊ शकली, उरलेल्यांना शिबिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी का होईना येता आलं. तिथं गेल्यावर तिथल्या मुलींशी गप्पा मारताना त्यांनी उत्साहानं नदीचे पावसाळी किस्से सांगितले! ‘दीदी, हमको लगा था इस बार का कॅम्प तो गया,’ असं म्हणत त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. नदीचं पाणी शाळेत आलं, की अख्ख्या शाळेत साधारण गुडघाभर पाणी भरतं. पाण्याची पातळी वाढायला लागली आणि धोक्याचा इशारा मिळाला, की सगळ्या मुलींना घेऊन शिक्षक आणि इतर कर्मचारी ताफ्रागामला असलेल्या शाळेत काही दिवसांसाठी राहायला जातात. ताफ्रागामची शाळा उंचावर असल्यामुळं तिथं पुराचा धोका नाही. विवेकानंद केंद्राच्या शाळांमध्ये अगदी पहिलीपासूनची मुलं निवासी असल्यामुळं अगदी तिसरी- चौथीच्या मुलींसाठीसुद्धा हा अनुभव नवीन नव्हता. आपण अगदी मुरलेल्या असल्याचं आम्हा नवशिक्यांना दाखवून देत त्यांनी आम्हाला आपत्ती व्यवस्थापनाविषयी अनुभवातून शिकलेल्या सगळ्या गोष्टी अगदी घडाघडा सांगितल्या!

नदीचं आणि माणसाचं आदिम कालापासूनचं घट्ट विणलं गेलेलं असं एक नातं आहे. नदीची जीवनावश्यकता ओळखून माणसांनी अगदी पहिल्यांदा नगरं वसवली ती नदीच्या काठीच. नदीविषयी एक गूढ आकर्षण, अतीव आदरभाव, निस्सीम प्रेम, तिच्या स्वयंभू, मनस्वी अस्तित्वाचा काहीसा धाक, भीती... अशा नदीविषयीच्या संमिश्र भावना माणसाच्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातून व्यक्त होताना दिसतात. ब्रह्मपुत्रा ही अशीच एक नदी... अनेक वेगवेगळ्या प्रदेशांमधून वाहणारी, जिथं वेगवेगळ्या वंशाच्या, अनेकविध भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या जमातींच्या माणसांचं अस्तित्व आहे... साहजिकच अनेक कथा-मिथकांचं वलय तिच्याभोवती आहे. खरंतर भारतात बरेचदा नदीला आईची उपमा दिली जाते आणि नदीच्या सृजनशीलतेमुळं तिला मातेच्या रूपात पाहिलं जातं. ‘गंगा मैया’ हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण. पण ब्रह्मपुत्रेला मात्र स्त्रीरूपात पाहिलं जात नाही. खरंतर या ब्रह्मपुत्रेच्या महाकाय पात्राकडं पाहून एखाद्या विशालकाय पुरुषाचा भास झाला नसेल, तरच नवल! ब्रह्मपुत्रेचं आणखी एक प्रचलित नाव ब्रह्मपुत्र; ब्रह्मदेवाचा मुलगा!

कालिका पुराणात या ब्रह्मपुत्राच्या जन्माविषयीची वेगवेगळी मिथकं आढळून येतात. शंतनू ऋषींच्या अमोघा या पत्नीला ब्रह्मदेवापासून झालेला मुलगा हा ब्रह्मपुत्र, अशी एक कथा मिळते. आणखी एका कथेमध्ये वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या शापामुळं या कामरूप प्रदेशातील सर्व पवित्र स्थळं नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेवानं ब्रह्मपुत्राला स्वर्गातून नदीच्या रूपात जमिनीवर बोलावलं आणि त्यामुळं सर्व तीर्थस्थळं या नदीच्या पात्रात लुप्त झाली. कोणालाच नदीच्या तळाशी लुप्त झालेली तीर्थस्थळं माहीत नसल्यामुळं या नदीमध्ये स्नान केल्यानं त्या सगळ्या तीर्थस्थळी गेल्याचं पुण्य मिळतं, असं ही कथा सांगते.

याशिवाय या भागातील अनेक आदिवासी जमातींमध्येदेखील जगाच्या उत्पत्तीविषयीच्या, मानवाच्या उत्पत्तीविषयीच्या आणि अर्थातच निसर्गाच्या निर्मितीविषयीच्या असंख्य लोककथा आहेत. या कथांमध्येसुद्धा ब्रह्मपुत्रेचं स्थान तितकंच अढळ आहे.

परतीच्या प्रवासात आणखी एका कामानिमित्त पुढं आसाममधील दिब्रुगढला जाणं झालं. तिथं केंद्राच्या कार्यालयाजवळून ब्रह्मपुत्रा वाहते, असं कळल्यावर धावत सुटण्याशिवाय दुसरं काही सुचलंच नाही. पुन्हा एकदा तिचं वेगळ्या रूपातलं दर्शन... या प्रवासातलं शेवटचं... आणि कदाचित शेवटचंही...! मनात इतके विचार दाटले होते. तिचं धीरगंभीर, विस्तीर्ण पात्र... शांत... अथांग... पैलतीर दृष्टीसही पडू न देणारं... त्यावेळचा किंचित सोनेरी, किंचित गुलाबी छटा असलेला संधिप्रकाश... खालच्या स्तब्ध, हलकीशी लाटही न उमटू देणाऱ्या पाण्यात उमटलेलं आभाळाचं देखणं प्रतिबिंब... सगळं डोळ्यात, मनात साठवून घेतानाच अगदी आपोआप, नकळत हात जोडले गेले... आणि निरोप घेताना मला जाणवलं की हिची अजूनही खूप रूपं आहेत, ती सगळी उलगडायची असतील तर पुन्हा पुन्हा इथं, हिच्या पायाशी यावं लागेल!

संबंधित बातम्या