निसर्गरम्‍य लंका

डॉ. अपर्णा महाजन 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

कॅनॉल बोट राइडमध्ये दिसणारे असंख्य पक्षी.. बुद्धांच्या मूर्ती.. साडेसहाशे फुटांवरचा दगडातला राजवाडा.. मसाल्यांची घनदाट बाग.. अशोकवन अन् सुरेख मोर.. रंगीबेरंगी कोरल्स व चट्टेरीपट्टेरी मासे.. आणि समुद्र किनाऱ्यावरून दिसणारा अस्ताला जाणारा सूर्य... अशी ही निसर्गरम्य श्रीलंका!

श्रीलंकेला जायचे ठरले त्यावेळी माझ्या आधी फार कोणाबरोबर ओळखी झाल्या नाहीत. एकदम भेटलो ते पुण्याच्या विमानतळावर. हळूहळू सगळे जमा झाले. एकमेकांशी सगळे गप्पा मारत होते. आम्हा साऱ्यांबरोबर अदृश्यपणे जे. डी. होतेच.. जगन्नाथ दीक्षित. खाण्याचा विषय निघाला की जे. डी. हजर!

आमचा एकतीस जणांचा ग्रुप विमानस्थ होऊन दोनेक तासांनी चेन्नई येथे उतरला. तिथून कोलंबो. कोलंबोला पोचलो तेव्हा, एक एसी बस आमची वाट बघत होतीच. तिथून आम्ही तडक लंकेचा विशेष नाश्‍ता घेण्यासाठी गेलो. भुकेल्या आम्हा सर्वांना ती चव, त्यातली नवलाई, दालचिनी घातलेली कॉफी यामुळे मजा आली. तिथे आयेश नावाच्या गाइडबरोबर ओळख करून दिली. इतिहासातला मास्टर्स, वगैरे वगैरे... त्याचे इंग्रजी पटकन समजण्यासारखे नव्हते. मला त्याचे बोलणेच समजत नव्हते. मी भांबावून इतरांकडे पहिले, तर बऱ्याच जणांनी स्वतःला बिनधास्त निद्रादेवीच्या स्वाधीन केले होते. एकीने हळूच दुसरीला ढोसले, पण तिने त्याकडे फारसे लक्ष  न देता आपली झोप कंटिन्यू केली. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. नेगोम्बोला पोचलो. सुंदर हॉटेल. बियाँड वाईल्ड अशा गोष्टींमध्ये बिलकूल हयगय करत नाही. लगेच फ्रेश होऊन तिथल्या डच कॅनॉलवर बोटिंगसाठी गेलो. पक्षी आणि बोट राइड. एक खूपच चुणचुणीत, काळीसावळी मुलगी आमची गाइड होती. शिकवलेल्या आणि पाठ केलेल्या आवाजात आणि पट्टीत, तिने स्वतःची ओळख करून दिली, ‘आय ॲम निमिषा!’ तिने खूप पक्षी, मॅनग्रोव्ह (खारफुटीचे जंगल) पाणवनस्पती, समुद्र आंबा, दालचिनीचे वृक्ष आणि मॉनिटर लिझर्ड दाखवले. एका झाडावर असंख्य पक्षी बसले होते. त्यांची अनेक नावे, त्यांच्या चोचीवरून, पंखावरून त्यातला फरक ओळखणे, आणि त्यातून पेलीकन, कारमोरंट (पाणकावळा), विविध प्रकारचे हेरॉन (बगळे), सारंग असे अनेक पक्षी माहितीचे झाले. लगून (एका उथळ जलाशयामध्ये समुद्राचे पाणी घुसते आणि तो प्रवाह सुरू होतो ती जागा) पर्यंत जाणे हा मला विशेष आवडलेला प्रवास. मला ‘ब्लू लगून’ या सुंदर सिनेमाची आठवण झाल्यावाचून राहिले नाही. एम.ए.ला असताना मित्रांबरोबर ‘अलका’ला पाहिलेला.. 

प्रवासात दिसणारी श्रीलंका म्हणजे केरळ, मुंबई, गोवा आणि कोकण याची सरमिसळ. नारळाची झाडे, समुद्र, मासेबाजार आणि बोटी बोटींनी भरलेल्या खाड्या. साधेसुधे लोक. आम्ही उगाचच मासे बाजार बघायला गेलो, आयेशने सुचवले म्हणून. बिच्चारे आ वासून पडलेले मासे बघून खरेतर दुःखच झाले. सगळे फोटो काढत होते. मीदेखील काढला! एके ठिकाणी भिरभिर जाळे टाकतानाचा क्षण इतका सुंदर होता.. त्याकडे मी थांबून पाहत होते आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनिल अवचट या आमच्या मित्रानी सांगितलेली ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवली.. 

जैजाल जळी पांगीयले, तेच चंद्रबिंब दिसे अतुटले, 

परी थडिये काढुनी झाडिले, ते बिंब कै सांग. 

म्हणजे जेव्हा जाळे पाण्यावरती पसरले, त्यात चंद्र अडकून बसला आहे असे वाटले, पण किनाऱ्यावर ते झाडले तर कुठे गेले ते चंद्रबिंब? अशी ही ज्ञानेश्वरांची ओवी अनुभवल्यासारखे वाटले. मला हे कोणाला तरी खूप सांगावे वाटले. माझ्या मागे असलेले, अजून फारशी ओळख न झालेले आमच्या प्रवासी गटातले एक फोटो काढत होते, त्यांनाच सांगितले मला जे जाणवले ते, त्यांनी पण ऐकून घेतले.

तिथून सिगीरिआला जायचे होते. साधारण तीनेक तासांचा प्रवास होता. आजूबाजूचा प्रदेश, वेगळा निसर्ग पाहत प्रवासाला एक गती आली होती. आयेश कोणी झोपलेय तर कशाला बोलायचे? याचा विचार न करता आपल्या कमावलेल्या आवाजाच्या पट्टीत आणि तेसुद्धा माईकवर त्याची गाइडशिप करत होता. मला त्याचे हसूही येत होते, कौतुकही वाटत होते आणि कधीकधी ‘याला गप्प करा रे कोणीतरी!’ असेही वाटत होते. काहीजण मात्र त्याच्या इंग्रजीतून मिळेल ती माहिती मिळवत होते, लिहून घेत होते. मला तिथली गावांची नावे आधीच अवघड वाटत होती आणि आयेशच्या उच्चारांमुळे तर मी ते लक्षात घेणेही सोडून दिले. माझे नवे मित्रमैत्रिणी जेव्हढे जमेल तितके मला नावे समजावून द्यायचा प्रयत्न करत होते. वाटेत डम्बुल्ला गुहेत बुद्धकालीन अवशेष असलेली मंदिरे पहिली. ग्रॅनाईटच्या डोंगरांच्या कुशीत असलेल्या गुहा, तिथले मोठाले शिलालेख पहिले. एकशे छप्पन बुद्धाच्या मूर्ती. प्राचीन बुद्ध, अर्वाचीन बुद्ध, भविष्यातला बुद्ध, झोपलेला बुद्ध, समतोल साधलेला (balance), उभा राहिलेला बुद्ध.. असा बुद्ध आणि तसा बुद्ध. छतावरती बुद्धाची चित्रे. ज्यांनी मूर्तिपूजेचा धिक्कार केला, त्याच्या केवढ्या तरी मूर्ती. विपश्यना करताना, साक्षी भावाने पाहायला शिकवलेल्या मनाला खरेतर हे मूर्तिपूजन पटत नव्हते. मला एक गोष्ट आठवली, एकदा परमेश्वर आणि माणूस एकमेकासमोर येतात आणि म्हणतात, ‘Hello my creator!’ इथल्या लोकांनी बुद्धाला खूपच व्यावसायिक (commercial) केले आहे असे वाटून खरेतर वाईट वाटत होते. मला स्वतःला बुद्धांचे तत्त्वज्ञान वाचायला, समजून घ्यायला खूप आवडते. पण इथे फक्त दिसत होत्या मूर्ती आणि त्यांचे फोटो काढणे. 

पोलोनारुवा हे चोलकालीन प्राचीन शहर. एकेकाळची श्रीलंकेची राजधानी. युनेस्कोने ते प्राचीन शहर छान जतन केले आहे. जुन्या राजांचे निवासस्थान, राण्यांचा अंघोळीचा तलाव, प्रचंड मोठी बाग आणि प्राचीन काळातले ते वैभव, भग्न अवशेष पाहताना कसा असेल तो काळ अशा विचारात मन गढून गेले होते. 

सिगीरियाचे पास मिळेपर्यंत आजूबाजूचा निसर्ग, विविध पक्षी, झाडे पाहत वेळ घालवत होतो, तेव्हा मोतिया गुलाबी रंगाचे अर्धोन्मीलित पाकळ्या पाकळ्यांचे खरे कमळ पाहायला मिळाले. सर्वसाधारणपणे पाणलिली आणि कमळात गफलत केली जाते, म्हणून ‘खरे’ शब्द वापरला. पाण्यातली लिली हे श्रीलंकेचे राष्ट्रीय फूल आहे. सिगीरियामधला कोणे एकेकाळी खडकातून कोरलेला काश्यप राजाचा किल्ला पहिला. सिगीरियाला सिंहगिरी असेपण नाव आहे. साडेसहाशे फूट उंचीवर त्याने आपला राजवाडा बांधला होता. त्याच्या प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूला अजस्र, आणि महाकाय सिंह कोरले आहेत, दगडात! त्या किल्ल्यातली एक आरशासारखी गुळगुळीत भिंत पाहणे हे एक विशेष होते. तिला पॅरापेट वॉल म्हणतात. हे सारे बांधकाम! १५-१६व्या शतकातले कसे असेल तेव्हाचे तंत्रज्ञान? कसा फोडला असेल हा खडक? इतक्या वरती कशा नेल्या असतील दगड, विटा माती.. काहीही, जे हवे असेल ते? आणि अजून ते इतके टिकले कसे? अवाक होऊन मी पाहत होते. तिथली इतक्या प्राचीन काळी ओल्या गिलाव्यावर काढलेली, विविध ढंगात चितारलेली चित्रे म्हणजे खरेच अविश्वसनीय वाटेल असे सत्य होते. सिगीरियाची चढाई करण्याची मी खूप वाट पाहत होते. विशेषतः फोनवरच्या गप्पांमुळे अधिक. बाराशे पायऱ्या, सलग चढणे वगैरे वगैरे... आव्हान आहे मोठे असे वाटले होते, पण दमेदमेपर्यंत पोचलोच की वर! तिथल्या काही रूपकात्मक दंतकथा, रावणाने त्याच्या काळी लाकडी लिफ्ट वापरून वरती त्याचा लाकडी राजवाडा बांधला होता, अशा काही नावीन्यपूर्ण कथा ऐकल्या.

मला या प्रवासात खूपच आवडलेले एक ठिकाण म्हणजे मसाल्याची बाग. एका दाक्षिणात्य माणसाने अत्यंत उत्साहाने आम्हाला त्याची मसाल्याची बाग दाखवली. प्रत्येक झाडाबद्दल अतीव प्रेमाने तो बोलत असल्याने, ती बाग बघण्याला एक हुरूप आला होता. व्हॅनिला, जायफळ, दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र, कोकोची फळे, अननस, सिनट्रॉनेला; ज्यामुळे म्हणे डास येत नाहीत. (पण कोणीतरी म्हणालेच, ‘इथेच जास्त डास दिसतायत!’) शिवाय तिथे आयुर्वेदिक वनस्पतीही होत्या. हाडजोडी ही आयुर्वेदात हाडे जोडण्यासाठीच वापरली जाते, त्याची रचनापण तशीच होती. सगळ्या झाडांना शहाळ्याच्या तुकड्यांनी अळी केली होती. त्या मसाल्यांमध्ये मला आवडले ते जायफळाचे झाड. असंख्य फळे होती, चिक्कूसारखी. ते कापले की आत लाल लाल चुटूक वेष्टनात गुंडाळलेले जायफळ. तो लाल भाग म्हणजे जायपत्री. बाहेरच्या बाजूला प्रचंड मोठे केवड्याचे बन होते. इतके छान वाटत होते घनदाट मसाल्याची बाग पाहताना! 

वाटेत जेवायला थांबलो.. चविष्ट अन्न, पण लंकेतल्या लोकांना पोळ्या बिलकूलच जमत नाहीत! 

तिथून कॅन्डी. तिथली बोटॅनिकल गार्डन्स अपरिमित देखणी. तिथली ऑर्किड्स म्हणजे... डोळे निवले अक्षरशः त्यांचे सौंदर्य पाहून! इतके प्रकार, इतके रंग, इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या नक्षीची फुले... बाप रे बाप! महाकाय वृक्ष, डबल कोकोनट, २४ प्रकारचे गवताचे प्रकार, असंख्य प्रकारचे बांबू आणि कोकेनसुद्धा... आणि त्यात असंख्य पक्षी. निसर्गाच्या सान्निध्यात किती वेगळी असते आपली मनःस्थिती! तिथून झुलत्या पुलावरून जाऊन गाडीत बसायचे होते. पुन्हा जाड्या, बारीक लोकांचे गट करून एका वेळी सातजण, आठजण असे आम्ही गेलो.. धमाल आली तेव्हा.

भूतानसारख्या बुद्धिझममध्ये चिंब न्हालेल्या देशातसुद्धा इथल्यासारखे अवास्तव रूप दिसले नव्हते. इथे बुद्ध धर्म विशेषतः स्तूप आणि तिथले माणसांनी केलेले वातावरण फारच अंगावर आल्यासारखे होते. कर्कश आणि आक्रमक. कॅन्डीला बुद्धाचा दात असलेले मंदिर पाहताना, अरुण कोलटकरांच्या जेजुरी कवितासंग्रहाची आठवण आली आणि त्यांच्या कवितेचा मथितार्थ अधिक खोलवर समजला.

नुवारा इलियाच्या प्रवासात धबधबे, हिरवाई, निसर्ग, गप्पा, फोटो करत अशोकवनापर्यंत पोचलो. मात्र अशोकवनाने माझी निराशा केली. बिच्चारी सीता, असे वाटावी इतकी! स्थितप्रज्ञ भावाने, अलिप्तभावाने सारे अनुभवत राहिले. रामायणात लंका होती म्हणून या लंकेने १९७२ पासून रामायणाला सामावून घेतलेय का, असा प्रश्न रेंगाळत राहिला. पण त्या मंदिरांमुळे दशावतारांची माझी उजळणी झाली. 

एकेकाळी कॉफीसाठी प्रसिद्ध असणारे श्रीलंका आता जगातला सर्वात शुद्ध सिलोन चहासाठी प्रसिद्ध आहे. तिथली चहाची फॅक्टरी पाहिली. हिरवा पाला ते बॉक्समध्ये भरण्यासाठी तयार झालेला चहा. किती प्रकारची चहाची पाने आणि चहापत्ती तयार करण्याचे किती प्रकार! काही वळवून, काही चाळून, काही वाफवून!

एव्हाना आमच्या कानांना लंकन रुपीज, इंडियन रुपीज हे शब्द रुळायला लागले होते. लंडनला पौंड गुणिले ९०  करायचे, जर्मनीला युरो गुणिले ८०. पण इथे भारतीय एक रुपया म्हणजे लंकन २.४०. हा उलटा हिशोब मनात बसायला मला वेळच लागला जरा. मी गुणाकार करणे सोडूनच दिले. वाटेत एके ठिकाणी वॉशरूम ब्रेकसाठी लंकन १,५०० रुपये मोजले आणि आपण काही न घेता, उलट आपलेच देऊन, आपले पैसे गेले याची हळहळ अनेकांच्या मनात डोकावून गेली. गमतीचा भाग! असो.

यालाच्या सफारीला धमाल आली. बिबळ्या, बिबट्या, ब्लॅक पँथर अशा गप्पा ऐकत, पाणपक्षी पाहत, आमच्या सफारी निघाल्या बिबट्याच्या शोधात. पठ्ठ्याने आमची पूर्ण फजितीच करायची ठरवली होती जणू. पण त्याचे उट्टे मोर आणि ‘मेनी मेनी मोअर’ मोरांनी, भरून काढले. शिवाय घोरपडी.. बाजी प्रभू, तानाजी, शिवकालीन सगळ्यांना स्मरून त्या गलेलठ्ठ, महाकाय घोरपडींना डोळाभरून बघून घेतले आणि कॅमेऱ्यात सगळ्या कोनातून बंदिस्त केले. 

आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे बाटिकचा कारखाना. किती साधे आणि कष्टाळू होते सगळे तिथले लोक! पांढऱ्या कापडाच्या साध्या चौकोनातून रंगीबेरंगी आणि अप्रतिम सुंदर बाटिकची नक्षी असलेला चौकोन अशा चढत्या क्रमाने झालेले बदल तिथल्या प्रमुख बाई आम्हाला दाखवत होत्या. उकळत्या पाण्यातून कापड बुचकळून काढताना बघणेसुद्धा आम्हाला भयावह वाटत होते, पण ते काम करणारी ती स्त्री कशी जादू केली अशा आविर्भावात कापड फिरवून फिरवून दाखवत होती. खूप मनापासून हसत होती. ना तिला आमची भाषा समजत होती, ना तिची आम्हाला. पण त्या हसण्याने तिने मला आपलेसे केले हे नक्की. मग त्या बाईंनी बाटिकची नक्षी असलेल्या डिझाइनर कपड्यांचा एक डेमो दिला. आमच्यापैकीच काही जणांना बोलावून ते छान छान कपडे आमच्यावर गुंडाळून, बांधून दिले, इतके सुंदर पलाजो, स्कर्ट, गाऊन, धोती.. फॅशनपरेड झाली. केवढा उत्साह होता.. मज्जा आली. 

वाटेत, मधेच मुखवटे तयार करण्याचा कारखाना आणि दुकान पाहिले. चित्र विचित्र मोठे मोठे मुखवटे, बुजगावण्यासारख्या अडकवलेल्या आकृती. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींवर किमतीच्या पट्टीबरोबर काही पट्ट्या होत्या, आंधळेपणासाठी, मृत्यूसाठी.. याबरोबर दृष्ट लागू नये म्हणून अशा कितीतरी गोष्टींसाठी उपयोगी (?) पाडणारे ते लाकडी, कागदी, भुश्शाचे मुखवटे पहिले. हे काहीतरी चेटूक, जादूटोणा (black magic) यासाठी आहे की काय.. असे मनात आल्यावाचून राहिले नाही. मी तिथल्या कारागिरांशी गप्पा मारल्या. वीस-पंचवीस वर्षे असे काम करून, ठराविक पद्धतीने ती सुरी पकडून सगळ्यांच्या हाताला घट्टे पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे एकाग्रचित्त भाव बघणे मला जास्त प्रिय वाटले.

मधेच हिक्कादुवाला कोरल्स बघायला जाण्याची टूम निघाली. छोटेछोटे जलचर कसे पाण्यात घर करून राहतात, हे पाहायचे होते. मुंग्यांची वारुळे जशी जमिनीवर असतात, तशी ही कोरल्स. रंगीबेरंगी, आकर्षक आकाराची कोरल्स पाहायला आम्ही तैय्यार झालो. ऐन दुपारी बोटीतून जायचे होते. आम्हाला बराच वेळ बोट मिळेना. खालून काच असलेल्या बोटीतून जायची पहिली वेळ. बोट चालवणारे ते श्रीलंकन कोळी तंदुरुस्त आणि काटक होते. बोट ओढत आणत होते. डुबी मारून काच स्वच्छ करत होते. अंग पुसायची तोशीस घेत नव्हते. शेवटी आली बोट. तोपर्यंत आमच्या इतर दोन ग्रुपच्या बोटी कुठल्याकुठे गेल्या होत्या. त्या कोळ्याने आम्हाला माशांना बोलवायला काही खाद्य दिले. आम्ही माशांना भरपेट खायला दिले. चट्टेरी पट्टेरी मासे आले सगळ्या बाजूंनी. टायगर फिश म्हणतात म्हणे त्यांना. डोळे भरून त्यांना पाहिले. खाली काचेतून असंख्य कोरल दिसत होते. कोरलची कॉलनीच. हॅन्स अँडरसनच्या ‘द लिटिल मर्मेड’ची आठवण आली. खूपच सुंदर, रंगीबेरंगी कोरल होते. ऊन, समुद्री वास, लाइफ जॅकेटचा वास या सगळ्याने मला एकदम मळमळण्याचा ॲटॅकही आला. 

संध्याकाळी माझ्या आवडत्या झालेल्या हिंदी महासागराच्या कडेकडेने साधारण एक दीड किलोमीटर चालत चालले होते. सूर्यबिंब अस्ताला निघाले होते. संध्याकाळचा तो समुद्रावरचा वारा, मारवा रागाचे रूप वाटावे असा तो क्षण अनुभवत होते. खूप वेळ एकटीच चालत होते... समुद्राकडे पाहत, सूर्याकडे पाहत, मनातल्या विचारांच्या संगतीने. उगाचच झालेल्या सैरभैर अंतःकरणाने, हुरहुरलेल्या मनाने. तेव्हाच तिथल्या एका किल्लेवजा इमारतीवर श्रीलंकेचा झेंडा फडफडत होत आणि दोन मिनिटांत त्या ध्वजाचे अवरोहण झाले. असा प्रसंगही सहज दिसत नाही. 

शेवटी हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरच्या अप्रतिम सुंदर हॉटेलमध्ये, ‘सिनॅमन’मध्ये मुक्काम केला. तिथल्या एका ट्रॅंक्विलिटी नावाच्या गझिबोमध्ये बसून जे जे पहिले त्याची उजळणी, चर्चा केली. थोडक्यात गप्पा मारल्या, ऐकले, पण मनात राम, रावण, दंतकथा, लंका याविषयी खूप उलट सुलट वीणेचे प्रश्न तयार झाले. त्याची उत्तरे शोधायची आहेत अजून. दुसरे दिवशी विमानतळ जवळ येऊ लागले तेव्हा आयेशने केलेले भाषण, हा या ट्रिपमधला सगळ्यात भावुक क्षण. आयेश किती संवेदनशील मुलगा होता! अत्यंत प्रामाणिक बोलणे होते त्याचे, हृदयापासून आलेले. मला तर डोळ्यात अश्रू आले, त्याचा सच्चेपणा भावून! श्रीलंका सोडली. 

चेन्नईला पोचलो. तिथे सगळ्यांच्यात अधिक मैत्र झाले आहे असे जाणवले. पत्ते खेळताना काळा बिल्ला मिळाला म्हणून चिडवाचिडवी, आपलेपणाच्या गप्पा. आत्ताशी ट्रीपचा मूड आलाय, असे वाटेपर्यंत आम्ही पुण्याला पोचलोही. लगेज-बेल्टवरचे समान येईपर्यंत एकमेकांचा निरोप घेताना कदाचित सगळ्यांच्या मनाची अवस्था त्या समुद्रावरच्या सूर्यास्तासारखी झाली होती. कोरलसारख्या माझ्या मनात नव्या ओळखी घर करू लागल्या होत्या.

संबंधित बातम्या