अतुलनीय शिल्पकलेचे मंदिर

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

कर्नाटकातील चेन्नकेशवा मंदिरातील मूर्तींचे आणि इतर शिल्पकलेचे वर्णन शब्दांत करणे हे केवळ अशक्य काम आहे. मंदिराची भव्यता, अत्युत्कृष्ट वास्तुशैली, अप्रतिम कलाकुसर आणि आपल्या देवदेवता आणि पुराणकथांना मूर्त रूपात बंदिस्त झालेले पाहून नजरेचे पारणे फिटते हे मात्र खरे... 

भारतातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची, प्रेक्षणीयतेच्या दृष्टिकोनातून क्रमवारी लावायची ठरवल्यास अतिशय  अवघड प्रश्‍न समोर उभा राहील. कारण जगात इतरत्र कुठेही नसतील इतक्या सुंदर अशा ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून गणल्या गेलेल्या वास्तू आणि मंदिरे आपल्या भारतात आहेत. त्यामुळे सर्वात सुंदर मंदिर कुठले, याचे उत्तर देणे तसे अवघडच असेल... पण एक गोष्ट मात्र नक्की, की प्रत्येक सौंदर्याची खुमारी वेगळीच असते व त्याचे स्वरूपही वेगळेच असते. मग ते निसर्ग सौंदर्य असेल किंवा कलाकाराने निर्माण केलेले एखादे सुंदर शिल्प... किंवा सुंदर, भव्यतम असे मंदिर...! या सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्‍या मानवी मनाची जडणघडणही तितकीच वेगळी असते. कर्नाटक राज्यातील काही मंदिरांच्या बाबतीत बोलायचे, तर भारतातील काही उत्कृष्ट मंदिरांमध्ये या मंदिरांची गणना केली जाते. हिमालयाच्या उत्तुंगतेचा अनुभव घेताना आपल्या मनाला निसर्गाच्या निरामयतेची जाणीव जेवढी प्रकर्षाने होते, तितकीच प्रत्ययकारी जाणीव आपल्याला कर्नाटकातील शिल्पकलेच्या उत्कृष्ट परंपरेतून अनुभवायला मिळते. 

एक मात्र खरे, की दक्षिण भारतातील अनेक मंदिरांतून पाहायला मिळणारी शिल्पकला इतकी सुंदर आहे, की तशी कला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. कर्नाटकातील अनेक मंदिरांतून साकार झालेली ही काळ्या कातळातील मूर्तिमंत कलाकुसर पाहणे म्हणजे एका अलौकिक अशा जाणिवेचा अनुभव घेणे होय. नजरेचे पारणे फिटणे म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला कर्नाटकातील बेलूर, हळेबीडू, पट्टदकल, हंपी येथील आणि इतरही काही मंदिरांतून संपन्न झालेल्या शिल्पकलेच्या आविष्कारातून मिळतो. त्यातही बेलूर येथील ‘चेन्नकेशवा’ मंदिर म्हणून ओळखले जाणारे विष्णू मंदिर पाहिल्यानंतर आपण अक्षरशः भान विसरून जातो. कारण या मंदिरातील शिल्पकला इतकी सुंदर आहे, की त्याची इतर कशाशीही तुलना होऊ शकत नाही!

म्हैसूरपासून सुमारे पाच-सहा तासांच्या अंतरावर असलेल्या बेलूर गावातील चेन्नकेशवा मंदिराला मी चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेट दिली होती. त्यावेळी खरेतर शिल्पकलेची जाण नव्हती. परंतु तरीही तेथील शिल्पकला पाहून भान हरपून गेल्यासारखे झाले होते. मात्र शिल्पकलेविषयी थोडाफार अभ्यास केल्यानंतर अलीकडेच पुन्हा एकदा चेन्नकेशवा मंदिर पाहण्यासाठी जाणे झाले. यावेळी या मंदिरातील शिल्पकला पाहून अक्षरशः डोळे दिपून गेले. या मंदिरात जतन केलेले हे शिल्पकलेचे गतकाळातील वैभव पाहून कृतकृत्य झाल्याची भावना मनात निर्माण झाली. अगदी छोटेसे खेडेगाव असलेल्या बेलूरमध्ये इतके सुंदर व मनोहारी मंदिर असेल असे वाटतच नाही. उंच काळ्या भिंतींच्या आड दडलेले हे विष्णू मंदिर गोपूर ओलांडून आत गेल्यानंतरच, त्याच्या संपूर्ण भव्यतेसह आपल्या नजरेला पडते. शिल्पकलेच्या दृष्टिकोनातून विचार करताना भारतातील काही अत्युत्कृष्ट अशा मंदिरांपैकी एक असणारे चेन्नकेशवा मंदिर हे आपल्या सांस्कृतिक वैभवाच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर सांभाळीत शेकडो वर्षांनंतर आजही ताठपणे उभे आहे. विशेष गोष्ट म्हणजे, आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्‍या या मंदिरामध्ये निर्मिती काळापासून ते आजतागायत पूर्ण रूपात, साग्रसंगीत पद्धतीने श्रीविष्णूची पूजाअर्चा केली जाते. यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. या मंदिरातील शिल्पवैभवामुळे दक्षिणेतील होयसळ राज्यकर्त्यांच्या कलावैभवाचा कीर्तिमान ठसा जगभर उमटलेला आहे.     

हसन जिल्ह्यातील हे विष्णू मंदिर, चेन्नकेशवा, केशव, केसव किंवा विजयनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. होयसळ राजा विष्णुवर्धन याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीस, म्हणजेच इ.स. १११७ मध्ये हे अप्रतिम सुंदर असे मंदिर बांधून पूर्ण केले. ‘यागची’ नदीच्या किनाऱ्‍यावर वसलेले बेलूर किंवा वेलापूर हे होयसळ राज्यकर्त्यांचे तत्कालीन राजधानीचे शहर होते. संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी १०३ वर्षांचा अवधी लागला असे मानले जाते आणि होयसळ राजांच्या तीन पिढ्यांनी या मंदिराच्या निर्मितीचे कार्य पूर्ण केले होते. बऱ्‍याचवेळा या मंदिराची पडझड झाली, युद्धकाळात झालेल्या विनाशानंतर त्याची पुन्हा पुन्हा दुरुस्ती करण्यात आली होती असे इतिहास सांगतो. चेन्नकेशवा म्हणजे ‘सुंदर केशव’...! भगवान श्रीविष्णूचे हे मंदिर वैष्णवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे तीर्थ आहे, कारण जवळपास ९०० वर्षांपासून या मंदिरात श्री विष्णूची अखंड  पूजाअर्चा होत आली आहे. या मंदिराचे स्थापत्य, याची वास्तुरचना, मंदिराच्या बाह्य भिंतीवर असणाऱ्‍या अप्रतिम शिल्पाकृती, मोठमोठे शिल्पपट, कोरीव कामाने नटलेल्या नाजूक शिल्पपट्टिका, शिल्पाकृतींच्या अंगाखांद्यावर असलेल्या वस्त्रालंकारांची अतिशय नाजूक कलाकुसर, या शिल्पकलेतून मिळणारी तत्कालीन संस्कृतीची ओळख, शिल्पाकृतींच्या हातामध्ये असणारी विविध प्रकारची वाद्ये, त्यांच्या अंगावर कोरण्यात आलेले अगणित प्रकारचे दागदागिने, वैशिष्ट्यपूर्ण केशरचना यांचे चित्रण, मंदिराच्या भिंतीवर जागोजागी कोरण्यात आलेले शिलालेख, त्यातून मिळणारी ऐतिहासिक माहिती, या सर्व गोष्टींचा विचार करता हे मंदिर म्हणजे संशोधकांसाठी एक अनमोल खजिना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...!  विष्णू आणि लक्ष्मीच्या बरोबरीने, शिव-पार्वती, गणेश, ब्रह्मा, कार्तिकेय, दुर्गा, बरोबर दशावतारांच्या प्रतिमा अशा अन्य देवदेवतांच्या प्रतिमा अतिशय सुंदर पद्धतीने मंदिरांच्या भिंतीवर शिल्पबद्ध केलेल्या आहेतच, पण त्यांच्या जोडीला महाभारत आणि रामायणातील काही महत्त्वाचे प्रसंगही शिल्पबद्ध केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात.

दक्षिण भारतामध्ये होयसळ राज्यकर्त्यांची कारकीर्द साधारणतः इ.स. १०००च्या सुमारास सुरू झाली आणि १३४६ पर्यंत त्यांनी राज्य केले असे मानले जाते. सुरुवातीच्या काळात बेलूर ही त्यांची राजधानी होती. होयसळ राज्यकर्ते देवभक्त होते, तसेच कलाप्रेमीही असावेत. या बलशाली राज्यकर्त्यांनी त्याच्या राज्यकाळात राज्यातील विविध ठिकाणी एकूण १५०० मंदिरांची निर्मिती केली होती असे म्हटले जाते. त्यातील सर्वोत्तम अशा कलापूर्ण विष्णू मंदिर निर्मितीमुळे बेलूर या लहानशा गावाला ‘दक्षिणेकडील काशी’ किंवा ‘मृत्युलोकातील वैकुंठ’ अशी ख्याती मिळाली होती. विष्णुवर्धन राजाने या मंदिराच्या निर्मितीनंतरच्या काळात त्याची राजधानी ‘द्वारसमुद्र’ म्हणजेच आत्ताचे ‘हळेबिडू’ या ठिकाणी हलवली. विशेष म्हणजे हळेबिडू या नव्या राजधानीच्या ठिकाणीसुद्धा त्याने भव्य अशा एका शिव मंदिराच्या निर्मितीचे कार्य सुरू केले. हेच ते जगप्रसिद्ध ‘होयसळेश्‍वर मंदिर’, जे विष्णुवर्धन राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्रांनी इ.स. ११५० मध्ये पूर्ण केले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याचा सेनापती मलीक कफूर याने होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून राजधानीचा आणि मंदिरांचा विध्वंस केला. या युद्धात ‘दुसरा बल्लाळ’ हा होयसळ राजा, मलीक कफूरच्या सैन्याकडून मारला गेला आणि होयसळ साम्राज्याचा अंत झाला. त्यानंतर इ.स. १३२६ मध्ये दुसऱ्‍या मुसलमान सुलतानाने बेलूर आणि हळेबिडू येथील मंदिरांचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतरच्या काळात विजयनगर साम्राज्याच्या राजांनी या मंदिरांचा जिर्णोद्धार केला. संवर्धन केले. या मंदिराच्या सभोवती असणाऱ्‍या मोकळ्या आवाराभोवती उंच संरक्षक भिंत आणि पूर्व प्रवेशद्वारावर अतिशय कलापूर्ण आणि देखणे गोपुरम, विजयनगर राज्यकर्त्यांनीच बांधलेले आहे. 

चेन्नकेशवा मंदिराच्या भिंतीवर जागोजागी ११८ शिलालेख कोरलेले आहेत. ज्यामध्ये विष्णुवर्धन राजाने मंदिराच्या निर्माण कार्यास सुरुवात केल्याचा उल्लेख असणारा प्रमुख शिलालेखही समाविष्ट आहे. येथे काम करणाऱ्‍या शिल्पकारांनी, बऱ्‍याच शिल्पाकृतींच्या तळाशी शिलालेख कोरलेले आहेत. ज्याद्वारे त्यांनी स्वतःची ओळख दिलेली आहे. काही अप्रतिम कोरीव काम असणाऱ्‍या शिल्पाकृती कुणी निर्मिल्या होत्या, याची माहिती या शिलालेखांमुळे मिळते.

चेन्नकेशवा मंदिर हे ज्या विस्तीर्ण आवारात उभे आहे, त्याच आवारात इतरही काही मंदिरे आहेत. परंतु सर्वात सुंदर आणि भव्य आहे ते विष्णू मंदिरच! वीरनारायण मंदिर, सोमयानायकी लक्ष्मी मंदिर, तसेच कप्पे चेन्निगराय मंदिर, अशी काही महत्त्वपूर्ण मंदिरे याच आवारात आहेत. चेन्नकेशवा मंदिराच्या समोरच गरुडस्तंभ उभा आहे. त्यावरील गरुडमूर्ती अतिशय सुंदर आणि लक्षवेधक आहे. या विष्णू मंदिरात इतक्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत, की काय काय पाहावे आणि किती पाहावे अशी आपली अवस्था होऊन जाते. मुख्य म्हणजे चेन्नकेशव मंदिरातील एक एक मूर्ती पाहताना आणि त्यातील कोरीव कामाचे वैशिष्ट्य न्याहाळताना मान दुखायला लागते... पाहावे तरी किती? आणि लक्षात तरी काय काय ठेवायचे, असे वाटत राहते...! या मंदिराच्या बाह्य भिंतीवर असणाऱ्‍या कोरीव कामाचे वर्णन करण्यासाठी शब्द तोकडे पडतील अशी कलेची श्रीमंती या कातळातून घडवलेल्या शिल्पाकृतींमधून ओसंडताना दिसते. शिल्पकामातील वैविध्य पाहिल्यानंतर मनात येते, की या शिल्पकारांना हे इतके नाजूक कोरीव काम करण्याची कल्पना तरी कशी सुचली असेल?

मुख्य मंदिर 
चेन्नकेशवाचे हे मंदिर ‘एक कूट’ पद्धतीचे म्हणजेच एक गर्भगृह असलेले आणि संपूर्णपणे दगडात बांधकाम केलेले मंदिर आहे. मंदिराचे स्थापत्य कर्नाटक किंवा द्रविड शैली आणि नागर शैली यांच्या मिश्र वास्तुशैलीनुसार बांधण्यात आले आहे. ही वास्तुशैली अतिशय साध्या होयसळ पद्धतीची असून प्रदक्षिणापथ, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. संपूर्ण बांधकाम ‘क्लोराईट शिस्ट’ प्रकारच्या अतिशय मऊ अशा दगडामध्ये केलेले आहे. हा दगड खाणीतून काढल्यानंतर काही काळ अतिशय मऊ असतो, ज्यामुळे नाजूक कोरीव काम करणे सहजसाध्य होते. शिल्पकार नेहमीच शिल्पकाम करण्यासाठी अशा प्रकारच्या पाषाणाला प्राधान्य देतात. भव्य आकाराच्या चौथऱ्‍यावर म्हणजेच जगतीवर संपूर्ण मंदिर उभे असून मंदिराच्या सभोवती रुंद प्रदक्षिणापथ आहे. मंदिराचे गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ यांच्या मधे सभामंडप असून सुरुवातीला या सभामंडपाला भिंती नव्हत्या. विजयनगर साम्राज्यकाळात जेव्हा या मंदिराची डागडुजी करण्यात आली, तेव्हा या मंडपाच्या भोवती असणाऱ्‍या अर्ध्या भिंतीवर दगडातून कोरलेल्या नक्षीदार जाळ्या बसवण्यात आल्या. त्यामुळे हा मंडपही बंदिस्त होऊन गेला आणि सभामंडप व गर्भगृह यांना जोडणारे अंतराळ तयार झाले. सभामंडपामध्ये अतिशय सुंदर कोरीव कामाने नटलेले एकूण ४८ स्तंभ असून त्यातील काही स्तंभांवर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. चौदाव्या शतकात जेव्हा विजयनगर साम्राज्याकडून या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता, त्यावेळी मंदिराच्या मंडपाला आधार देण्याच्या हेतूने मध्यभागी असलेले चार स्तंभ नव्याने बसवले गेले होते. या स्तंभांचे कोरीव काम इतर स्तंभापेक्षा वेगळे असून ते हाताने कोरलेले आहेत. यापैकी एका स्तंभावर विष्णू मोहिनी रूपातील प्रतिमा कोरलेली आहे आणि ती अतिशय सुंदर आहे. सभामंडपाचा आकार चौकोनी असून त्याच्यापुढे असणाऱ्‍या गर्भगृहाचा आकार पंचकोनी आहे आणि त्यानुसार सर्व बाजूंनी वेढलेला प्रदक्षिणापथही आहे. प्रदक्षिणापथ आणि सभामंडप यांच्या मधे विविध प्रकारच्या कोरीव कामाने नटलेलेल्या शिल्पपट्टिकांचे एकावर एक रचलेले थर आहेत. सर्वात तळाकडील थरामध्ये हत्तींच्या अप्रतिम शिल्पाकृतींची पट्टिका आहे. वरव्या थरामध्ये लहान लहान स्त्री प्रतिमा असून काही यक्ष प्रतिमाही पाहायला मिळतात. यामध्ये नृत्यांगना, वाद्य वाजवणारे वादक वगैरे कोरलेले आहेत. याच्या वरच्या थरामध्ये अर्धस्तंभ असून दोन अर्धस्तंभांच्या मधे वेगवेगळे शिल्पपट आहेत. रामायण तसेच महाभारत या महाकाव्यामधील काही प्रसंगांचे चित्रण या ठिकाणी पाहायला मिळते. याच्या वरच्या थरामध्ये जीवनातील प्रसंग दाखवणारे शिल्प आहे ज्यामध्ये मिथुन मूर्ती, दंपती, कामशिल्प यांचा समावेश आहे. उत्तरेकडील भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरण्यात आले आहेत. याच्या वरच्या थरामध्ये चौदाव्या शतकामध्ये बसवण्यात आलेल्या दगडी जाळ्या आहेत. यातील १० जाळ्या उत्तर बाजूला, तर १० दक्षिण दिशेला आहेत. काही ठिकाणी पुराणातील काही प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. सर्वात सुंदर आहेत त्या स्तंभांच्या शिर्षभागी असलेल्या मदनिकांच्या मूर्ती. 

मंदिराचे छत (विमान) आणि त्यांना आधार देणारे स्तंभ यांना जोडणाऱ्‍या मदालसांच्या रूपात एकूण चाळीस स्त्री प्रतिमा मंदिरांच्या चोहोबाजूंनी कोरलेल्या होत्या. यातील ३८ आजही शिल्लक असून बहुतेक सर्व स्त्री प्रतिमा एकापेक्षा एक सुंदर आहेत... अत्यंत नाजूक अशा कलाकुसरीने नटलेल्या आहेत. या सुरसुंदरी किंवा शालभंजिका म्हणजे चेन्नकेशवा मंदिराचे वैभव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या स्त्री प्रतिमांमध्ये खूप वैविध्य आहे. कुणी नृत्यमुद्रेत आहेत तर कुणी अभिसारीका, कुणी पत्रलेखिका तर कुणी शिकार करणारी मदनिका, एखादी पोपटासमवेत दिसणारी रती आहे, तर काही जणी वाद्य वाजवणाऱ्‍या सुरसुंदरी... या मोठ्या स्त्री प्रतिमांप्रमाणेच लहान लहान स्त्रीमूर्तीसुद्धा आहेत. या मदनिकांच्या व्यतिरिक्त मोठ्या आकारातील अतिशय सुंदर शिल्पाकृती आहेत. या बहुतेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नृसिंह, वामन, वराह, शेषशायी रंगनाथ इत्यादी विष्णू अवतार, नटराज, शिवपार्वती, केवल शिव, कालभैरव, गजासूर वधमूर्ती, अशा शिवाच्या विविध मूर्ती, दुर्गा, हरीहर, ब्रह्मा, सूर्य, अग्नी, गरुड, अष्टदिक्पाल अशा इतरही अनेक देवदेवतांच्या जवळपास ८० शिल्पाकृती या ठिकाणी आहेत. बहुतेक मूर्ती चांगल्या अवस्थेत आहेत आणि अत्युत्कृष्ट कोरीव कामाने नटलेल्या आहेत. खरोखरच, हे सर्व पाहताना केवळ थक्क होऊन जातो आपण! रावण कैलासपर्वत हलवत आहे, समुद्र मंथन, कंस वध, वामन, बळी आणि त्रिविक्रमावतार, कृष्णाचे कालियामर्दन, शेषशय्येवर पहुडलेला रंगनाथ विष्णू अशा पुराणातील अनेक कथाही शिल्पबद्ध केलेल्या पाहायला मिळते.

चेन्नकेशव मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर अप्रतिम कोरीव काम पाहायला मिळते. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल उभे आहेत. तीन दिशांना प्रवेशद्वार असलेल्या या सभामंडपामध्ये सुंदर कोरीव काम केलेले ४८ स्तंभ आहेत हे वर सांगितले आहेच. या सभामंडपाला नवरंग असेही म्हटले जाते. यातील दोन स्तंभ फार सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यातील एक नृसिंह स्तंभ आहे, तर दुसरा मोहिनी स्तंभ. सभामंडपाच्या मध्यभागी चौरसाकार मोकळी जागा आहे आणि त्यावर १० फूट व्यासाचे गोलाकार छत आहे. खोलगट असणाऱ्या छताच्या मध्यभागी अर्धोन्मीलित कमळ असून त्यावर ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या अर्धगोलाकार छताच्या काठावर रामायणातील काही प्रसंग कोरलेले आहेत. विशेष म्हणजे या छताला आधार देणाऱ्‍या चार स्तंभाच्या शिर्षभागी चार मदालसा मूर्ती आहेत. या मूर्ती अतिशय सुंदर आहेत. यातील एक नृत्य करणाऱ्‍या सरस्वतीची आहे. इतर तीन मूर्तीसुद्धा नृत्यांगनांच्या आहेत, परंतु प्रत्येकीची मुद्रा वेगळी आहे. त्यातील एकीच्या हातावर पोपट बसलेला असून ती कदाचित रतीची मूर्ती असावी. या चार मदनिका इतक्या सुंदररीतीने शिल्पबद्ध केल्या आहेत, की आपली नजर त्यांच्यावरून हटत नाही. दगडात कोरलेले गळाहार आणि हातातील कंगन स्वतंत्रपणे मोकळे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. नवरंग मंडपामध्ये इतरही लहान मोठ्या शिल्पाकृती आहेत. 

मंडपाच्या दुसऱ्‍या टोकाला गर्भगृह असून त्याचे प्रवेशद्वार अप्रतिम अशा कोरीव कलाकुसरीने नटलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जय आणि विजय या द्वारपालांच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ आकारातील अतिशय सुंदर प्रतिमा आहेत. प्रवेशद्वारावरील रुंद तुळईवरील कोरीव काम पाहिल्यानंतर मन थक्क होऊन जाते. कातळात इतके सुंदर, नाजूक आणि बारीक कोरीव काम कसे बरे शक्य आहे, असा प्रश्‍न मनात आल्यावाचून राहत नाही. मकरतोरणाच्या खाली मध्यभागी लक्ष्मीविष्णूची सुंदर प्रतिमा आहे. खालच्या बाजूला त्याकाळातील वाद्ये वाजवणारे वादक बसल्याचे पाहायला मिळते. दोन्ही बाजूला असलेल्या मकरावर वरुण आणि वारुणी बसल्याचे दिसते. गर्भगृहामध्ये सहा फूट उंच, चतुर्भुज केशव मूर्ती असून तेथे असलेल्या शिलालेखामध्ये तिचा उल्लेख ‘विजयनारायण’ असा केला आहे. तीन फूट उंच चौथऱ्‍यावर ही मूर्ती उभी असून हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत. मूर्तीच्या पाठीमागे वलय असून त्यावर दहा विष्णू अवतार कोरल्याचे पाहायला मिळते.

आज घडीला मंदिराच्या गर्भगृहावर शिखर नाही. परंतु सुरुवातीच्या काळात या मंदिरावर भूमिज पद्धतीचे शिखर होते असे मानले जाते. एकोणिसाव्या शतकामध्ये केलेल्या पुनर्बांधणीच्या काळात मंदिराचे शिखर कायमचे काढून टाकले असावे. चेन्नकेशवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला लहान आकारातील मंदिर प्रतिमा पाहायला मिळतात. त्या लहान लहान मंदिरावर असणाऱ्‍या शिखराप्रमाणेच, मुख्य मंदिराचे शिखर नागर वास्तुशैलीत बांधलेले होते असे म्हटले जाते. जे नेहमीच्या द्राविडीयन प्रकारच्या शिखर शैलीपेक्षा वेगळे होते. या मंदिरात जागोजागी शिलालेख कोरल्याचे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे काही शिल्पमूर्तीच्या तळाकडे शिल्पकारांनी आपले नाव कोरल्याचे पाहायला मिळते. 

चेन्नकेशवा मंदिरातील मूर्तींचे आणि इतर शिल्पकलेचे वर्णन शब्दांत करणे हे केवळ अशक्य काम आहे. ही शिल्पकला स्वतःच्या नजरेने पाहून या अतिशय सुंदर अशा कलेचा आस्वाद घेण्यातच खरा आनंद आहे. मंदिराची भव्यता, अत्युत्कृष्ट वास्तुशैली, अप्रतिम कलाकुसर आणि आपल्या देवदेवता व पुराणकथांना मूर्त रूपात बंदिस्त झालेले पाहून नजरेचे पारणे

फिटते हे मात्र खरे. आवारात असणाऱ्‍या इतर मंदिरांतही सुंदर शिल्पकला पाहायला मिळते. एकूणच, बेलूर येथील ‘चेन्नकेशवा मंदिर’ प्रत्येकाने एकदा तरी पाहिले पाहिजे असे या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते.

संबंधित बातम्या