बृहस्‍पतीची भूक

श्रीनिवास शारंगपाणी
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

गुरू ग्रहावरचा रेड स्पॉड पृथ्वीपेक्षा मोठा आहे. संशोधनातून असं समोर आलं, की, हा भाग वादळ नसून गुरुवर वास करणारा एक राक्षसी प्राणी आहे. कदाचित सबंध गुरूच तुमुल सजीव असण्याची शक्यता आहे...

’’मिशन कंट्रोल हसन, आर यू रिसीव्हिंग मी?” बृहस्पती-३ यानानं संदेश पाठवला. साधारण बेचाळीस मिनिटांनी तो संदेश इस्रोच्या हसन येथील मिशन कंट्रोलला प्राप्त झाला आणि आनंदाच्या आरोळ्यांनी दालन दणाणून गेलं.

“येस, वी मेड इट!” बोटांनी ‘व्ही’ची खूण करून डॉ. वेणुगोपाल अय्यंगारांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. बुधवारी, दिनांक १८ मे २०४४ रोजी, प्रक्षेपित केलेलं बृहस्पती-३ हे यान सूर्यमालेच्या सर्वात मोठ्या ग्रहाच्या -बृहस्पती अथवा गुरूच्या अगदी निकट जाऊन पोचलं होतं. जवळजवळ तीन वर्षांच्या या दुर्घटनारहित प्रवासामुळे डॉ. अय्यंगारांनी सुटकेचा निःश्वासही सोडला. त्यांनी संगणकाच्या कोपऱ्यातील दिनांकाकडे कटाक्ष टाकला -८ एप्रिल २०४७. म्हणजे यान बरोबर निर्धारित वेळेवर पोचलेलं होतं.

डॉ. अय्यंगारांच्या आनंदाचं कारणही तसंच होतं. बृहस्पती-१ दुर्घटनाग्रस्त होऊन गुरूच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे झालेल्या आघातात अक्षरश: चूर्ण होऊन गेलं होतं. बृहस्पती-३ निदान व्यवस्थित पोचलं तरी होतं. अर्थात पुढची कित्येक वर्षं ते नीट काम करेल की नाही हे पाहावं लागणार होतंच. बृहस्पती-२ या यानानं मात्र बरीच उपयुक्त माहिती पुरवली होती, ही एक चांगली गोष्ट होती. पण त्या यानाशी असलेला संबंध काही वर्षांपूर्वी तुटला होता, त्यामुळे ते आता अस्तित्वात आहे की नाही हेही पाहावं लागणार होतं. बहुधा बृहस्पती-२ यानाच्या विद्युतसंचातील शक्ती कमी किंवा नाहीशी झाली असावी. पण बृहस्पती-२ यानानं पुरवलेल्या अद्ययावत माहितीमुळे बृहस्पती-३ मिशनचं आयोजन काहीसं सुकर झालं होतं.

“हॅलो, ध्रुव. मानसी आणि तेजस ठीक आहेत का?” डॉ. अय्यंगारांनी मिशनच्या मुख्य संपर्क अधिकाऱ्याला फोन करून विचारलं. तेजस आणि मानसी हे दोन ‘ह्युमनॉइड रोबोज’ -मानवसदृश यंत्रमानव - यानासोबत पाठवण्यात आले होते. त्यांच्यामध्ये उच्च दर्जाची कृत्रिम बुद्धिमत्ता होती. अनेक वर्षं चालणाऱ्या मोहिमेमध्ये मानवाला पाठवणं अशक्य होतं. याशिवाय तेथील अतिशीत आणि तीव्र परिस्थिती मानवाच्या उपस्थितीस मारक आहे, हेही एक कारण होतं. यंत्रमानवावर अशा कुठल्याही परिस्थितीचा परिणाम होणार नव्हता, शिवाय उच्च बुद्धिमत्तेमुळे तितक्याच उच्च प्रतीचा अभ्यास शक्य होता.

ध्रुवकडून उत्तर यायला दीड ते दोन तास लागणार हे डॉ. अय्यंगारांना माहीत होतं कारण पृथ्वीपासून निघालेल्या संदेशाला सुमारे सत्तर कोटी किलोमीटर प्रवास करावा लागणार आणि तिकडून येणाऱ्या उत्तरालाही तितकाच. तरीही ध्रुव म्हणाला, “सर तासापूर्वीच्या माहितीप्रमाणे दोघेही उत्तम स्थितीत आहेत आणि यानावरची इतर यंत्रणाही व्यवस्थित काम करीत आहे. ताजी माहिती मी तासाभरानं कळवेनच.”

आता यापुढे मिशन लक्षपूर्वक हाताळावं लागणार होतं. यान गुरू ग्रहाच्या जवळ पोचल्यानंतर काय करायचं हे पंतप्रधानांनी डॉ. अय्यंगार यांना एका गोपनीय बैठकीत सांगितलं होतं. मिशनमधील एक महत्त्वाची कामगिरी १५ ऑगस्ट २०४७ या दिवशी करायची असं ठरलेलं होतं. तो दिवस होताच तसा महत्त्वाचा. भारताला स्वातंत्र्य मिळून त्या दिवशी शंभर वर्षं पूर्ण होत होती. त्यामुळे आता चुका करून चालणार नव्हतं. काही संकटं आलीच तर त्यांचा यशस्वी सामना करावा लागणार होता. म्हणजे चार महिने आणि सात दिवस किंवा बरोबर १२९ दिवस डोळ्यांत तेल घालून मोहिमेवर लक्ष ठेवावं लागणार होतं.

गुरूच्या पृष्ठभागापासून ३८ हजार ते १ लाख किलोमीटर पर्यंत त्याची कडी असल्यामुळे यानाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मोठी होती. दुर्बिणीतून गुरूची कडी शनीच्या कड्यांपेक्षा लहान दिसत असली तरी त्यांची जाडी तीस पासून साडेबारा हजार किलोमीटर असल्यामुळे प्रकरण धोक्याचंच होतं. यानाची कक्षा काही काळ गुरूपासून दूर तर कधी गुरूच्या समीप अशी आखली असल्यानं कड्यांमधील तुकड्यांची यानाशी टक्कर होण्याची भीती होतीच. अर्थात यानावर सुरक्षेची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली बसवण्यात आलेली असल्यानं परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. तरीही सर्व सुरळीत चालेल की नाही ही शंका होतीच. कुठलंही मोठं काम हाती घेतलं की लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि संकटं यांचा सामना करणं कसं अवघड असतं, हे इस्रोच्या शास्त्रज्ञांना अनुभवानं कळून चुकलं होतं.

अभिमानाची गोष्ट ही होती की १५ ऑगस्ट २०४७ या दिवशीचं नियोजित साहस हे सर्वात धाडसी होतं. आजवर ते जगातल्या कुठल्याही राष्ट्रानं केलं नव्हतं. हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या राष्ट्रांनी गुरूच्या जवळपास जाण्याच्या सुमारे डझनभर मोहिमा राबवल्या होत्या पण भारत त्या दिवशी जे करणार होता ते कुणाच्या स्वप्नातही आलं नसावं.

***

चौदा ऑगस्ट २०४७. भल्या पहाटेच डॉ. अय्यंगार उठले. काल रात्री उशिरापर्यंत जागून मिशनचा मागोवा घेत असल्यानं त्यांना जेमतेम तीन-चार तासांचीच झोप मिळाली होती. त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक सहाय्यकाकडे दृष्टिक्षेप टाकला. पंतप्रधानांचा संदेश होता, ‘‘जे काय होत असेल ते तत्काळ कळवा.’’ बातम्यांमध्ये पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आणि इतर सटरफटर बातम्या होत्या. ध्रुवचा संदेशही होता, ‘आत्तापर्यंत ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललंय.’

डॉ. अय्यंगारांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. महिन्यापूर्वीच गुरूपासून लांबवरच्या बिंदूपासून त्याच्या जवळ येण्याच्या कक्षेत असताना गुरूच्या मुख्य कड्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या पाषाणाशी बृहस्पती-३ ची टक्कर होता होता थोडक्यात वाचली होती. मानसी आणि तेजसनं परिस्थिती कौशल्यानं हाताळली खरी; पण त्या पाषाणाचा नेमका आकार, त्याचं वजन आणि त्याच्या पिसाट भ्रमणाची खात्रीलायक माहिती वेळेवर न मिळाल्यामुळं तो यानाला चाटून गेला. यानाच्या पृष्ठभागाला एक पोचाही आला. पण त्याची दुरुस्तीही त्या द्वयीनं व्यवस्थित पार पाडली. खरं संकट तर या पुढंच होतं. यानाची कक्षा बदलली होती. मार्ग-सुधारणा, कोर्स करेक्शन, करायला तब्बल तीन दिवस लागले. आजचा दिवस सुरळीत पार पडला की उद्याचा प्रयोग यशस्वी व्हायला काही हरकत नाही, असं डॉ. अय्यंगारांच्या मनात आलं. मग सबंध दिवस ते त्यांच्या स्टाफबरोबर काम करत राहिले, यानाची स्थिती काय आहे याची मिनिटा-मिनिटाला माहिती घेत राहिले. सर्व काही ठीक आहे याबद्दल समाधान झाल्यावर मगच ते उशिरा घरी गेले.

***

१५ ऑगस्ट २०४७. अलीकडच्या सवयीप्रमाणे डॉ. अय्यंगार पहाटे साडेचारलाच उठले. पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणानंतर तिथेच भारतीय अंतराळसंस्थेच्या पराक्रमाचं चलच्चित्रण दाखवायची योजना होती. अर्थात हे अगदी थोड्या लोकांशिवाय कुणालाही माहीत नव्हतं. पंतप्रधान जिथून भाषण करणार होते त्यामागे एक पडदा झाकून ठेवण्यात आला होता. डॉ. अय्यंगारांकडून संदेश मिळाला की गुरूवरील अंतराळ-साहसाचं चलच्चित्रण जनतेला सर्व माध्यमांमार्फत दाखविण्याची योजना होती. प्रयोग अर्थातच साधारणपणे दोन तास आधी नियोजित होता.

आजचा दिवस डी-डे म्हणजेच क्रांतिकारी दिवस आहे याची डॉ. अय्यंगारांना जाणीव होती. त्यांचं सगळं लक्ष संगणकाच्या दृश्यपटलावर खिळून राहिलं होतं. सकाळचे साडेसहा वाजले होते आणि ध्रुवनं डॉ. अय्यंगारांना संदेश पाठवला, “सर बृहस्पती -३ यानाच्या बाहेरील म्हणजे आउटबोर्ड कॅमेऱ्याचं चित्रण आता तुमच्या संगणकाच्या कोपऱ्यात दिसेल. ते तुम्ही मोठंही करून बघू शकाल. साधारण पंधरा मिनिटांचं हे स्पेशल कॅमेऱ्यातून घेतलेलं चित्रण तुम्ही पाहा आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी ते एडिट करून परत तुमच्याकडे पाठवतो. सगळा प्रकार साधारणपणे तासात संपेल. मग तुम्ही ती चित्रफीत पंतप्रधानांच्या खास संगणकाकडे पोचवू शकाल.”

मग अय्यंगारांनी आपली नजर संगणकाच्या पडद्याकडे वळवली. कोपऱ्यातलं चलच्चित्र ते लक्षपूर्वक पाहू लागले.

***

पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करीत असताना त्यांच्या स्वीय साहाय्यकानं अंगठा वर करून ‘सर्व काही ठीक आणि आम्ही तयार आहोत’ अशी खूण केली तसं पंतप्रधानांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. समारोप करताना ते म्हणाले, “भारतीय अंतराळशास्त्रज्ञांनी एक महान पराक्रम केला आहे. आजवर जगात कुणालाही शक्य न झालेलं साहस त्यांनी करून दाखवलं आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतरिक्षयान बृहस्पती-३ गुरू ग्रहावर पोचल्याचं आपल्या सर्वांना माहीत असेलच. या गुरू ग्रहावर गेली चारशे वर्षं धुमसत असलेलं पृथ्वीच्या आकारमानापेक्षाही मोठं असलेलं एक वादळ अस्तित्वात आहे. शास्त्रीय भाषेत त्याला ग्रेट रेड स्पॉट अर्थात विशाल ताम्रकलंक असं म्हणतात. आजवर गुरूवर फार कमी मोहिमा झाल्या आहेत. या ताम्रकलंकाची स्थिर आणि चलच्चित्र मुद्रित करण्यापलीकडे यावर कुणीही, कोणत्याही राष्ट्रानं संशोधन केलेलं नाही. शतकानुशतकं या गूढ वादळानं शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. आपल्या इस्रोच्या बुद्धिमान शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी प्रत्यक्ष या वादळात एक कुपी सोडली आहे. ही कुपी या वादळाच्या पोटात शिरून आत होत असलेल्या प्रचंड घडामोडींचं निरीक्षण करून हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हा सर्वांना बृहस्पती-३ यानानं या वादळाच्या केंद्रबिंदूत ती कुपी कशी सोडली त्याची चित्रणच इथं दाखवणार आहे. हे चित्रण सर्व वाहिन्या आणि इतर माध्यमांवर दाखवलं जाईलच. आपण सगळे आपल्या बुद्धिमान आणि धाडसी शास्त्रज्ञांचं, तंत्रज्ञांचं अभिनंदन करू या! जय जवान, जय किसान, जय विज्ञान! जय हिंद!!”

पंतप्रधानांनी इशारा करताच मागील काळा पडदा बाजूला सरकला आणि एका महाकाय दृश्यपटलावर प्रथम बृहस्पती-३ यानाचं ग्राफिक दाखवण्यात आलं. त्यात ते गुरूभोवती कशा प्रदक्षिणा घालत आहे ते सर्वांना दिसलं. त्यानंतर ते ग्रेट रेड स्पॉटच्या संमुख कसं आलं, ते दाखवलं गेलं. त्यानंतर, या पुढं कुपीचं रेड स्पॉटमध्ये अंतःक्षेपण केल्याचं प्रत्यक्ष चलच्चित्र पाहा, अशी सूचना पडद्यावर उमटली. बृहस्पती-३ यानाची एक बाजू पडद्यावर दृगोच्चर झाली. त्यातून एक तीन मीटर लांब नळी बाहेर आली आणि समोर दिसत असलेल्या रेड स्पॉटवर अचूकपणे रोखली गेली. एका कोपऱ्यात उलटगणती दाखवली जात होती. आकडा शून्यावर येताच एखाद्या बाणाप्रमाणे सूं ऽऽऽऽसूं करीत रुपेरी रंगाची ती कुपी वेगानं ताम्रचिन्हाच्या दिशेनं झेपावली. सुमारे दोन मिनिटं कुपीचा प्रवास विशिष्ट कॅमेऱ्याच्या साह्यानं झूम करून दाखवण्यात आला. आजूबाजूच्या वायुमंडलाला भेदून कुपी रेड स्पॉटकडे धाव घेताना सर्वांना दिसली. दृश्यपटलावर पुन्हा एक सूचना झळकली: या वेळी बृहस्पती-३ यान गुरूच्या अगदी जवळ म्हणजे सुमारे २२०० किलोमीटर अंतरावर होतं. गुरूच्या इतक्या जवळ आजपर्यंत कोणतंही यान गेलेलं नाही. या पूर्वी २०१६ साली नासाचं ज्युपिटर ऑर्बिटर गुरूपासून सुमारे ४२०० किलोमीटर अंतरावर गेलं होतं. दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक जवळ जाणं अतिशय धोक्याचं आहे कारण गुरूवरील वातावरणातील वायूंचा वेग ६०० किमी प्रतितास इथपर्यंत जाऊ शकतो आणि त्या कंपनांचा जोरदार फटका यानाला बसू शकतो. बृहस्पती-३चा हा विश्वविक्रम आहे. आणखी काही दिवसांनी प्रचंड वातावरणाला विरोध करणाऱ्या कुपीतील उपकरणांद्वारे ताम्रचिन्हाचं रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश मिळेल अशी आशा आहे. शास्त्रज्ञांच्या बरोबरीनं बृहस्पती-३ यानावरील मानसी आणि तेजस या दोन मानवसदृश यंत्रमानवांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. मोहिमेबद्दल इतर माहिती दिल्यावर चित्रण बंद झालं आणि “मेरा भारत महान”, “जय हिंद”, “इस्रो झिंदाबाद”, “भारतमाता की जय” अशा आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेला. पंतप्रधान म्हणाले देखील, इतक्या मोठ्याने घोषणा दिल्या जाताहेत की त्या गुरूपर्यंत पोचतील!

***

“सर, काही महत्त्वाची माहिती बृहस्पती-३कडून आपल्याला मिळाली आहे. त्याचं पृथक्करण करण्याचं काम चाललेलं आहे. पण माहिती खूप क्रांतिकारी वाटते आहे. सर, मला वाटतं तुम्ही मीटिंग बोलवा. त्यामध्ये मी ती माहिती सर्वांनाच देईन,” ध्रुवनं फोनवर डॉ. अय्यंगारना सांगितलं.

“पण क्रांतिकारी असं काय आहे त्या माहितीत?”

“सर, मी सगळं नीट पडताळून पाहतो. कारण मानसी आणि तेजसनं माहिती वेळोवेळी जशी त्यांना मिळाली तशी त्याचा नीट अर्थ लावून पाठवली आहे. पण ती तुटक असल्यानं नीट जुळणी केल्याशिवाय मी ठामपणे सांगू शकत नाही,” ध्रुवनं खुलासा केला.

“ओके, पण किती वेळ लागेल याला?” अय्यंगारांच्या बोलण्यातली उत्सुकता लपून राहत नव्हती.

“सर, जस्ट गिव्ह मी वन मोअर डे.”

“ओके. डन!”

***

कॉन्फरन्स हॉलमधील अंधारात ध्रुवचं सादरीकरण चाललं होतं.

“बृहस्पती-३नं सोडलेली कुपी वेगानं ताम्रकलंकामध्ये घुसली परंतु हायड्रोजन-हेलियमच्या वातावरणामुळे तिचा वेग कमी झाला. पण हे चांगलंच झालं,” ध्रुव सांगत होता. 

“का बरं?” डॉ. अरोरांनी विचारलं. ते बाह्यसृष्टीचे म्हणजेच एक्झोबायॉलॉजीचे अभ्यासक आणि जाणकार होते.

“कारण त्यामुळं स्वत:भोवती फिरणाऱ्या कुपीतील कॅमेऱ्याला ३६० अंशातून चलच्चित्रण करता आलं आणि आपल्याला खूप मोठा डेटा मिळाला.”

डॉ. अय्यंगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कौतुक होतं.

“सुमारे पन्नास किलोमीटर जाडीच्या अमोनिया स्फटिकांच्या ढगांचा थर पार केल्यावर कुपी खऱ्या अर्थानं महाकाय ताम्रकलंकात शिरली. अर्थात शिरली म्हणजे गंमतच आहे म्हणायची. कारण पृथ्वीपेक्षाही मोठ्या आकाराच्या या वादळात सोडलेली कुपी म्हणजे हिमालयाला टाचणीनं टोचण्यासारखं आहे.” ध्रुव थांबला आणि जमलेल्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या समूहाकडे अपेक्षेनं पाहू लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुढं काय सांगितलं जातंय याची उत्सुकता दिसत होती.

अय्यंगारांकडे पाहत ध्रुव म्हणाला, “सर, पहिली गोष्ट म्हणजे ढगांच्या थराच्या वरपासून हा रेड स्पॉट सुरू होतो असा आपला समज होता तो चुकीचा निघाला. तो तसा दिसत असला तरी ते दृष्टिभ्रमामुळं. खरा ताम्रकलंक ढगांखालूनच सुरू होतो पण त्याची शक्ती खूप वरपर्यंत पोचू शकते.”

“हे कसं काय समजलं?” प्रा. गुहा यांनी विचारलं. ते पृथ्वीसदृश ग्रहांच्या संशोधनाचे तज्ज्ञ होते.

“हां, तिथूनच रेड स्पॉटच्या रहस्याची सुरुवात होते. कुपी सोडल्यानंतर काही मिनिटातच ताम्रकलंकामधून काही द्रव्य उसळी मारून मोठ्या दाबानं कुपीला वेढून टाकू लागलं. बृहस्पती-३नं सोडलेली ही कुपी टिटॅनियमयुक्त कठीण धातूपासून बनवलेली आहे. आणि त्यावर हिऱ्याचं वेष्टन असल्यानं तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.”

“अरे बाप रे, म्हणजे हिमालयाला टाचणीची जाणीव झाली म्हणायची!” डॉ. अय्यंगार उद्‌गारले.

“फक्त जाणीवच झाली नाही तर ताम्रकलंकानं प्रतिक्रियाही दिली असं म्हणावं लागेल!” ध्रुवच्या विधानावर दालनात हलकल्लोळ माजला.

“म्हणजे रेड स्पॉट सजीव आहे असं तुम्हाला म्हणायचंय का?” डॉ. अरोरा जवळजवळ ओरडलेच. प्रा. गुहांनीही “येस?” असा प्रश्न करून आपला प्रश्नही तोच आहे असं सूचित केलं.

“हो, हो. आपण या प्रश्नावर माझं प्रेझेंटेशन झाल्यावर मग चर्चा करू,” ध्रुवनं दोन्ही हात पुढे करून म्हटलं.

“ध्रुव, प्लीज कंटिन्यू,” डॉ. अय्यंगारांनी म्हणाल. 

“पुढे कुपी खोलवर गेली तेव्हा आधी वायुरूप हायड्रोजन आणि नंतर हायड्रोजन आणि मिथेनच्या समुद्राची अपेक्षा होती.”

“मग?” डॉ. अरोरांनी न राहवून विचारलं.

“आजूबाजूला ते वातावरण दिसतच होतं. पण खूप खोलवरून द्रवरूप हायड्रोजन, मिथेन, अमोनिया तसंच धातुरूपी रुपेरी हायड्रोजन यांच्यापासून बनलेल्या पदार्थांच्या सर्पिल किंवा ज्याला आपण स्पायरल म्हणतो अशा लाटांनी कुपीला वेढून टाकलं आणि तिला खोलवर शोषून घेण्याची क्रिया सुरू झाली.”

दालनातील अनेकांच्या तोंडून, ‘अरे बाप रे’, ‘ओ माय गॉड’, ‘इन्क्रेडिबल’ असे उद्‌गार उत्स्फूर्तपणे उमटले.

“अर्थात् खूप खोलवर म्हणजे १८० ते २०० किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर संपर्क तुटला. बृहस्पती-३ कायम संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असेलच. परंतु कुपी सध्यातरी मौन बाळगूनच आहे.”

दोन्ही हातांचे पंजे एकत्र जुळवून आणि एक सुस्कारा सोडून डॉ. अय्यंगार म्हणाले, “आणखी काही निरीक्षणं?”

“हां,” ध्रुवनं सुरुवात केली. “आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचं काहीसं अंधुक चित्रीकरण कुपीनं केलं आहे. त्यातून असं दिसून येतंय की हा महाकाय ताम्रकलंक आपल्या सध्याच्या समजुतीपेक्षा काही तरी वेगळाच आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे घटकही तो गिळंकृत करीत होता. आम्हाला असं वाटतं की त्याला संवेदनाही असाव्यात!”

“डू यू मीन टू से इट, दॅट डॅम ग्रेट रेड स्पॉट, इज अ लिव्हिंग थिंग?” डॉ. अरोरांनी भेदक प्रश्न केला.

“आय डोन्ट नो सर. पण तसंच काहीसं असलं पाहिजे असं मला वाटतं,” ध्रुव नम्रपणे उत्तरला.

“हे आश्चर्यजनकच आहे,” प्रा. गुहा म्हणाले.

“ध्रुव, कुपीतून मिळालेला सर्व डेटा माझ्याकडे पाठव. मी आणि डॉ. अरोरा सविस्तर अभ्यास करू. शिवाय तुलाही आम्ही वेळोवेळी त्यात सामील करून घेऊच!” डॉ. अय्यंगार म्हणाले.

“द मीटिंग इज ओव्हर!” त्यांनी घोषणा केली.

***

पुढील सहा महिने डॉ. अय्यंगार, डॉ. अरोरा आणि ध्रुव निरीक्षणं अभ्यासत राहिले. “नेचर” आणि “स्पेस जर्नल” सारख्या अनेक सुप्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकांतून त्यांनी प्रबंध प्रसिद्ध केले. त्या प्रबंधांमुळे जगभरात खळबळ माजली. वृत्तपत्रांनी “आर वुइ अलोन?’ या प्रश्नाचं उत्तर मिळालं” अशा अर्थाचे मथळे छापून त्या प्रबंधांनी प्रसिद्धी दिली. भारतीय अंतराळसंस्थेचं आणि शास्त्रज्ञांचं कौतुक झालं.

प्रबंधांचा निष्कर्ष असा होता की ग्रेट रेड स्पॉट तथा ताम्रकलंक हा एक सजीव किंवा सजीव प्राणिमात्राचा एक भाग आहे. त्याला संवेदना तर आहेतच पण तो आजूबाजूच्या अनेक पदार्थांना शोषून घेऊन भक्ष्य बनवतो. त्यांच्या शोषणामधूनच तो ऊर्जा मिळवतो आणि हेच त्याच्या शतकानुशतकांच्या आयुष्याचं रहस्य आहे. पृथ्वीच्या दुप्पट आकाराचा हा भाग वादळ नसून गुरूवर वास करणारा एक राक्षसी प्राणी आहे. अर्थात त्याची रचना आणि कार्य हे आजवर माहीत असलेल्या सजीवांच्या रचना आणि कार्य यांच्यापेक्षा पूर्णत: भिन्न आहे. कदाचित सबंध गुरू ग्रह हाच एक मोठा तुमुल सजीव असण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे आणि यासाठी गुरू तसच शनी यांसारख्या प्रचंड ग्रहांच्या मोहिमा इस्रो लवकरच हाती घेईल.

डॉ. अय्यंगारांना अनेक ठिकाणांहून व्याख्यानं आणि चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं. त्यांच्या विचारांना त्यातून एक वेगळीच गती मिळाली.

एकदा ते आणि डॉ. अरोरा चर्चा करीत बसले होते. डॉ. अरोरांनी विचारलं, “वेणू, आपल्या या शोधांचा आणि जेया हायपोथेसिस तसंच पॅनसायकिझम यांचा जवळचा संबंध आहे असं मला वाटतं!”

अय्यंगार उत्तरले, “हे बघ अरोरा, जेया हायपोथेसिस असं म्हणतं की सर्व चराचर सृष्टीसह पृथ्वी एक प्राणिमात्र आहे आणि ती त्या तत्त्वासह आपला कार्यक्रम पुढं नेत असते. मुळात ‘जेया’ ही ग्रीक पृथ्वीदेवता आहे. त्यापासूनच युरोपीय भाषांत ‘जिओ’ म्हणजे पृथ्वी हा शब्द प्रचलित झाला. आपल्या संस्कृतीत वसुंधरेला जीवित मानलेलंच आहे. इतकंच काय तर अनेक ग्रह ताऱ्यांनाही सजीव स्वरूप दिलेलं आढळतं. आता पॅनसायकिझमबद्दल म्हणशील तर या सिद्धांताप्रमाणे अंतरिक्षासह सृष्टीतील सर्व वस्तूंना मनासारखी चेतावृत्ती असते. अर्थात या सिद्धांतानुसार खडक आणि वृक्ष यांना चेतावृत्ती नाही. इथंच माझा विरोध आहे. ज्या वस्तूंना स्वत:ची गती म्हणजे आत्मगती असते त्या सर्वांना, म्हणजे वृक्ष, वादळं, तारे, ग्रह इ. सर्वांना ही चेतावृत्ती असली पाहिजे असं माझं मत आहे.”

“हां, म्हणूनच ताम्रकलंकाला आणि गुरूलाही चेतावृत्ती असली पाहिजे! बरोबर ना?” डॉ. अरोरांनी विचारलं.

“ऑफ कोर्स. माझं मन तर यापुढंही जाऊन सांगतंय की जिथं वैश्विक मूलद्रव्य हायड्रोजन आहे तिथं सर्वत्र ही चेतना असली पाहिजे. आपल्या पृथ्वीवर तो पाण्याच्या रूपात आहे. त्यामुळे इथल्या सृष्टीची चेतावृत्ती प्राणी आणि वनस्पतींच्या रूपात आहे!”

“मग तर सूर्य जो बव्हंशी हायड्रोजन-हेलियमचा बनलेला आहे तो आणि तेजोमेघ-नेब्युला, दीर्घिका या सगळ्याच…”

“येस, ऑफ कोर्स. त्यासाठी बृहस्पती मोहिमेसारखीच सूर्य जीवित आहे का त्याचा अभ्यास करणारी मोहीम हाती घ्यावी अशी विनंती मी पंतप्रधानांना करणार आहे.”

“ग्रेट. खरंच असं संशोधन आपल्याला अंतिम 

सत्यापर्यंत नेईल असा मला विश्वास वाटतो. ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’, असं आपल्या पूर्वजांनी म्हटलंच होतं,” डॉ. अरोरा म्हणाले.

“हायड्रोजन हाच विश्वाचा मूळ घटक असल्यानं त्यालाच ‘ब्रह्म’ समजून आपण अभ्यास केला पाहिजे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याची आता वेळ आलेली आहे!” दूरवर कुठंतरी दृष्टी रोखून डॉ. अय्यंगार म्हणाले.

संबंधित बातम्या