माझा मानसिक प्रवास

मीना प्रभु
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

यंदा कुठं जायचं याचा आराखडा आखत असताना लॉकडॉउन जाहीर झालं. या घरकोंडीत काय काय आठवलं? हा प्रश्‍न कठीण आहे. उत्तरं अगणित आहेत...

लॉकडाउनला पहिली प्रतिक्रिया होती ती थोडी सुटकेची पण बरीचशी निराशेची. अग्नेय अशियातल्या तेरा देशांची सफर आणि तिच्यावर प्रकाशित झालेल्या ‘अपूर्वरंग’ पुस्तकाचे चार खंड यांतून नुकतीच मोकळी झाले होते म्हणून ही सक्तीची विश्रांती थोडी भावली. पण माझ्या मनात आफ्रिकेवरचं ‘कृष्णखंड’ हे पुढचं पुस्तक चुळबुळ करत होतं. बरेच दिवस ‘कृष्णखंड’ची मांडणी माझ्या मनात चाललेली. या प्रचंड मोठ्या खंडातल्या कोणकोणत्या देशांवर लिहिणं शक्य आहे याबद्दल भरपूर विचारविनिमय केला होता. अनेक संदर्भ चाळले होते. कुठं जाणं सुरक्षित आहे, कुठे सहज परवानगी मिळत नाही, प्रवास दुष्कर असल्यानं प्रसंग पडल्यास हात द्यायला आपली माणसं कुठं कुठं आहेत याचा शोध घेत होते. 

नेमकं कुठं जायचं याचा आराखडा आखत असताना लॉकडाउन जाहीर झाला नि पायी बेड्या पडल्या. घरकोंडी झाली. यांतून नेमकी कधी सुटका होईल, विमानं कधी सगळीकडं उडतील, वाहतूक काही सुरक्षित होईल, परवान्याच्या कचेऱ्या कधी उघडतील आणि तोवर जागतिक परिस्थिती किती पालटलेली असेल अशी अनंत प्रश्नचिन्हं माझ्या बेतापुढं उभी ठाकली. २०२०च्या उन्हाळ्यातले तीन-चार महिने मी त्या प्रवासासाठी राखून ठेवले होते. ते सगळे बेत या कोविडनं कचऱ्यात फेकले.

आमचं बाकीचं कुटुंब लंडनला अडकल्यामुळं तिथं जाण्याची, त्यांना भेटण्याची प्रबळ इच्छा झाली. आम्ही सर्वजण यंदा ‘मादागास्कर’मध्ये भेटणार होतो. सध्या सगळी मंडळी आपापलं स्वतंत्र आयुष्य घालवत असतात. खुद्द लंडनमध्ये असूनही नेहेमी भेटणं मुश्किल. म्हणून दरवर्षी, नव्या जागी एक आठवडा तरी सर्वांनी मोकळेपणानं एकत्र घालवायचा नियम आम्ही पाळत आलो आहोत. तो बेत यंदा पैसे भरूनही फुका झाला याची फार खंत वाटली. मादागास्कर मी अजून पाहिलेलं नाही. ते हुकलं.

या घरकोंडीत काय काय आठवलं? हा प्रश्न कठीण आहे. उत्तरं अगणित. आतापर्यंत अनेक देश हिंडले. दक्षिण अमेरिकेतला इग्वासू धबधबा, अॅमेझॉनचं पर्जन्यवन, इंकांचं कुस्को नि माचुपिचू, मेक्सिकोतलं अकापुल्को, रिओ, चीनचा फॉरबिडन पॅलेस, ती अफाट भिंत, सम्राटाचं उकरून काढलेलं शिअँचं पुरातन सैन्य, कैरोचं गीझा पिरॅमिड, त्यांतल्या खूफू पिरॅमिडच्या गर्भात समाधी लावणारी एकांत पावघंटा, इजिप्तच्याच सफेद वाळवंटातली नक्षत्रखचित रात्र, इटलीतलं पोपचं संग्रहालय, स्ट्राँबोलीचा धगधगता ज्वालामुखी, ग्रीसमधलं मूळ ऑलिंपिया, इराणमधल्या इस्फहानचा नदीकाठ, तुर्कस्तानमधला तोपकापी पॅलेसमधला ‘हारीम’वसा, नॉर्वेच्या ट्रॉम्सोत लाभलेल्या अपूर्वशा 'अरोरा बोरिअॅलिस'ची आकाशातून उतरलेली मलमली पखरण, मन ढवळून काढणारी अंदमानची ‘सावरकर कोठडी’, जपानात अपरंपार फुललेला साकूरा नि ‘अल्पाइन रूट’च्या आकाशाला भिडणाऱ्या हिमभिंती, सळसळतं, चळवळं न्यू यॉर्क, जगातलं कोणत्याही प्रकारचं जेवण मग ते जपानची सुशी असो वा कोबे बीफ, इटलीतल्या नेपल्सचा पिझ्झा किंवा बीजिंगची चिनी खासियत - मागाल ते  खिलवणारं न्यूयॉर्क ... अशा हजारो आठवणी मनात कायम घोळतच असतात. दरेक ठिकाणच्या जेवणाच्या परी वेगळ्या, चव वेगळी. एकदा हंगेरीमधे अचानक मिळालेलं अप्रतिम ‘गुलाब आइस्क्रीम’ पुन्हा चाखायला मिळेल की नाही? ती जागा पुन्हा सापडण्याची वानवा. क्वीन मेरी २ बोटीवरचे दोन आठवडे तर पूर्णब्रह्म अन्नाचा महोत्सव. वजन न वाढण्याची हमी देत असाल तर त्या बोटीवरून मी खाली उतरणारच नाही!

लॉकडाउनमध्ये ‘लॉकअप’ झाल्यावर विश्रांतीची सुटका थोडी उपभोगली पण तिचा फार लवकर कंटाळा आला. कुठे जाणं येणं, सभा भाषणं, सण-उत्सव, नाटक- सिनेमा, मित्र-मैत्रिणी भेटणं, भटकणं, जेवणं खाणं काहीच नाही म्हटल्यावर जगणं मचूळ वाटायला लागलं. नुसत्या फोनवरून बोललं तरी दुधाची तहान ताकावर भागेना. टेलिव्हिजन या चीजेची मुळीच आवड नसल्यानं केवळ पुस्तकं वाचणं एवढाच विरंगुळा. एरव्ही वाचायला वेळ मिळत नाही ही माझी तक्रार असते. आता काय वेळच वेळ! तरी सारखं फक्त वाचत बसण्याचाही कंटाळा आला.

सवयीप्रमाणे काहीतरी लिहावंसं वाटायला लागलं. प्रवासाच्या वाटा सक्तीनं बुजवलेल्या. मग मनात

विचारांचे सट्टे सुरू झाले. प्रत्यक्ष प्रवास नाही तर जीवन-प्रवासाबद्दल काही लिहून बघावं का? माझं आयुष्य कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलीसारखं, सामान्य गेलेलं. लग्नानंतर त्यात फेरफार झाला तो सुखसोयींचा. त्यात लिहिण्याजोगं काय असणार? 

पण माझ्या आई-वडिलांचं आयुष्य मात्र अतिखडतर आणि जगावेगळं गेलं होतं. त्याबद्दल मला फार थोडी माहिती होती. काही ठळक प्रसंगांचे त्यांच्या तोंडून आलेले पुसट उल्लेख हाच एकमेव आधार. तेव्हा स्मरणसाखळीला कल्पनेनं जोडत एक ‘वंश-चरित्रात्मक कादंबरी’ लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. 

नेहेमीच्या प्रवासी लिखाणाहून अगदी वेगळं काही हाताळते आहे. त्यात भीतीबरोबर खूप आनंद आणि उन्मेष अनुभवते आहे. काही व्यक्ती खऱ्या, प्रसंग घडलेले, तर काही व्यक्ती आणि प्रसंग काल्पनिक पण सत्याच्या आसपास घोटाळणारे. त्या व्यक्तींमधे मी इतकी गुरफटून गेले आहे की त्या मला त्यांच्या शरीर प्रकृतीच्या, चेहेरेपट्टीच्या, कपड्या-लत्यांच्या बारकाव्यांसह, चालत्या-बोलत्या दिसतात. माझ्या  अवतीभोवती वावरत असतात. क्वचित भासतातही. त्यांचे संवाद मला ऐकू येतात. ते कागदावर उतरवताना मी पार गुंतून जाते. वेळेचं भान सरतं. आजोबा-पणजोबांच्या सव्वाशे वर्षांपूर्वींच्या काळात पोहोचते. तिथेच रमते. 

हा मानसिक प्रवास मला सर्वांत उल्हसित करतोय. नव्या, वेगळ्या मार्गाला लागलेय. गणपती करायला घेतलाय. त्याचा मारुती होईल की माकड, माहीत नाही. झालंच जर माकड तर ते जगाला दाखवायला हवं असं थोडंच आहे?

भविष्यातला प्रवास पूर्वीइतका सुकर असेल असं वाटत नाही. आर्थिक विवंचना साऱ्या जगाला भेडसावत आहे. तेव्हा सर्व सुरळीत होऊन पूर्वीसासरखा प्रवास कदाचित प्रवाशांना आणि प्रेक्षणीय देशांनाही जड जाईल. आपण फक्त सदिच्छा करायची.

संबंधित बातम्या