हिंदी सिनेमाची भाषा कंची!

मुकेश माचकर 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

चित्रपटसृष्टीमध्ये कोण कुठून आलाय, त्याची मूळ भाषा काय, मूळ संस्कृती कोणती यानं फरक पडत नाही... त्यांच्या सगळ्यांचा घुसळणीतून ‘हिंदुस्थानी सिनेमा’ तयार होतो, तेव्हा तो सगळ्या भारतवासीयांना ‘आपला सिनेमा’ वाटतो...

मध्यंतरी हिंदी सिनेमा उद्योगात म्हणजे मुंबईतच राहून नाव आणि पैसा कमावणाऱ्या काहीजणांना अचानक असा शोध लागला, की मुंबईत हिंदी सिनेमांची निर्मिती होत असल्यामुळंच ते फार छचोर आणि संस्कारहीन आहेत, आता त्यांची निर्मिती हिंदीभाषक पट्ट्यातच व्हायला हवी... आधुनिक रामराज्यच अशा उत्तर प्रदेशातच हिंदी सिनेमे तयार होणं, हे नैसर्गिक आहे, असा साक्षात्कार त्यांना अचानक झाला... त्यांच्या डोळ्यांसमोर ‘लैला माल बा, छैला धमाल बा’, ‘ठोक देब’, ‘पेप्सी पीके लागेलू सेक्सी’, ‘ए राजा लाइन पर आ जा’, ‘सरकाई लो खटिया जाडा लगे’ इत्यादी, सिनेमांच्या भरगच्च नायिकांप्रमाणेच, संस्कारांनी ठासून भरलेल्या सिनेमांची पोस्टर्स झळकली असावीत... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगोलग वैश्विक पातळीवरच्या यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या फिल्मसिटीचा संकल्प सोडला... त्यामुळं हॉलिवूडच्या मंडळींनीही आत्तापासूनच बुकिंगसाठी लाइन लावली असणार आदित्यनाथांच्या कार्यालयासमोर... वैश्विक पातळीवरच्या चित्रणसुविधा त्यांना इतरत्र कुठं मिळणार?

या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लक्षात आली का?

सबंध भारतवर्षात जिला हिंदी चित्रपटसृष्टी म्हणतात किंवा आजकालच्या भाषेत बॉलिवूड म्हणतात, तिचं एकही केंद्र हिंदी पट्टा किंवा आजकाल गोपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये नाही... अगदी देशाच्या राजधानीत दिल्लीतही नाही... या पट्ट्यात गेल्या तीसेक वर्षांत भोजपुरी सिनेमांनी धमाल उडवून दिलेली आहे... पण, या पट्ट्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक सोहळ्यांमध्ये नर्तिका आणून त्यांना अश्लील गाण्यांवर अर्धनग्न किंवा नग्नावस्थेत नाचवण्याचे प्रकार चालतात... त्यांचे सेन्सॉरसंमत रूप यापलीकडं यांतल्या फारशा सिनेमांची मजल गेलेली नाही... हे सिनेमे ‘प्रादेशिक’ म्हणूनच ओळखले जातात, हिंदी सिनेमे म्हणून मान्यताप्राप्त नाहीत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड या हिंदीबहुल राज्यांमध्ये मोठमोठी शहरे आहेत, तिथं फिल्मसिटी होणे अशक्य नव्हते. पण तरीही सिनेमाच्या देशातल्या आगमनापासून त्यांची अशी चित्रपटसृष्टीच नाही, काही खास कलाकृती नाहीत... हिंदी सिनेमा काढणारे, हिंदी सिनेमांत काम करणारे, हिंदी सिनेमांच्या सर्व कलात्मक आणि तांत्रिक अंगांमध्ये गुणवत्तापूर्ण काम करणारे अनेक नामवंत याच पट्ट्यात जन्मलेले, वाढलेले आहेत; पण त्यांना हिंदी सिनेमा काढण्यासाठी मुंबईला यावं लागतं... मराठी सिनेमाचं केंद्र कोलकात्यात असण्यासारखंच आश्चर्यकारक आहे हे, पण आजवर या आश्चर्याचा कुणी विचार केला नव्हता... तशी गरज पडली नव्हती...

भारतात सिनेमाची सुरुवात मुंबईत झाली, हे स्वाभाविक होतं. कारण ल्युमिए बंधूंनी लावलेला चलच्चित्रांचा शोध भारतात, भारतीय पद्धतीनं वापरून भारतीय कलाकृती सादर करता येतील, ही कल्पनाच मुळात दादासाहेब फाळके आणि दादासाहेब तोरणे या मराठी माणसांना सुचली. त्यांनी तिचा पाठपुरावा केला आणि आपल्या कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या... त्यावेळी सिनेमाला भाषाच नव्हती... सिनेमा मूकपट होता... पडद्यावरची पात्रे कोण आहेत, काय बोलत आहेत, हे इंग्रजीमध्ये पाट्या लावून सांगितलं जायचं; आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यानं तसं करून चालणार नव्हतं. मग काही ठिकाणी सिनेमातल्या प्रसंगांचे नाट्यरूप अभिवाचन केलं जायचं, काही ठिकाणी निवेदन व्हायचं, काही ठिकाणी निव्वळ भावपरिपोष करणाऱ्या संगीतातून पडद्यावर काय चाललंय ते पोचवलं जायचं... कथानकं ऐतिहासिक (खरंतर पोषाखी) किंवा पौराणिक असायची, ती सर्वसामान्य प्रेक्षकांच्या परिचयाची असायची... त्यामुळं पडद्यावरचा अत्याभिनय आणि संगीतमय विवेचन यातून काम भागून जायचं... जिथं ज्या भाषेचा प्रेक्षक आहे, तिथं त्या भाषेतून विवेचन झाल्याशी मतलब होता...

हा सिनेमा मूक असल्यानं खऱ्या अर्थानं भारतीय होता... त्यामुळं तो कुठं तयार होतो आहे, याला स्वतंत्रपणे काही फार अर्थ नव्हता... बंदिस्त स्टुडिओंमध्ये राजवाडा, नदीकिनारा, घरं अशा सेट्सवर पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा चित्रित होत होत्या, त्या कोणत्या प्रांतातल्या आहेत, याला काही अर्थच नव्हता... ‘आलमआरा’नं बोलपटांचं युग आणलं तोपर्यंत या देशातला मुख्य प्रवाहातला सिनेमा हिंदी असणार हे सुनिश्चित झालं होतं... 

तोवर हिंदी ही देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची संपर्कभाषा झालेली होती...

...आज ज्याला ‘हिंदी’ सिनेमा म्हणतात, तो मुळात ‘हिंदुस्थानी’ सिनेमा आहे, कारण आज जिला हिंदी भाषा म्हणतो, तीच हिंदुस्थानी भाषा आहे. उर्दू, फ़ारसी, संस्कृत, भोजपुरी वगैरे हिंदीच्या बोली यांच्यातून तयार झालेली संमिश्र खडी बोली... ही काँग्रेसच्या धुरीणांनी देशभरातल्या जनतेबरोबरच्या संवादासाठी (त्यांचा एकमेकांबरोबरचा संवाद आणि पत्रव्यवहार बहुतांश इंग्लिशमधून झालेला दिसतो) हिंदुस्थानी भाषा म्हणून पुढं आणली आणि दक्षिण भारताचा अपवाद वगळता (तिथंही स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी भाषेला विरोध नव्हता, तो हिंदी ही ‘एकमेव राष्ट्रभाषा’ आणि केंद्र सरकारी व्यवहारांची एकमेव भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा निर्माण झाला होता) सगळ्या देशभरात हिंदीचं चलन रुजलं होतं. हिंदी भाषक पट्टा मोठा होता आणि गुजराती, मराठीपासून ओडिया, बंगालीपर्यंतच्या भाषांचं हिंदीशी साधर्म्य इतकं आहे, की त्या भाषकांना हिंदी बोलता आली नाही तरी समजते आणि या भाषा हिंदीभाषकांनाही समजू शकतात. या साधर्म्यामुळं आणि ग्लॅमरमुळं महाराष्ट्रात आजही हिंदी सिनेमा मोठा आणि राज्याच्या भाषेतला मराठी सिनेमा छोटा अशी स्थिती आजतागायत बनून राहिलेली आहे...

...तर मुळातला मुद्दा असा की बोलपट सुरू होईपर्यंत मूकपटांचं मुख्य केंद्र मुंबई हेच असल्यामुळं इथं एक सुविहित चित्रपटउद्योग सुरू झाला होता. देशभरातून या उद्योगात नाव कमावण्याची इच्छा असलेले लोक मुंबईत दाखल होत होते, त्यामुळं हिंदी बोलपटही इथंच सुरू झाले, यातही काही आश्चर्य नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुंबई हा मिनी-भारत होता आणि इथं मराठी संगीत नाटकांच्या बरोबरीनं अत्याभिनयी पारशी थिएटरही जोरात चालत होतं... त्यांच्या संयुक्त प्रभावातून भरपूर गाणी भरलेले (एका सिनेमात ६०-७० गाणी असणं नॉर्मल होतं तेव्हा) हिंदी सिनेमे याच शहरात तयार होऊ लागले...

गमतीची गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमांची जी इतर दोन प्रमुख केंद्रं होती ती होती लाहोर आणि कोलकाता... लाहोरला पंजाबी-उर्दूचा वारसा होता, कोलकाता बंगाली वळणाचा... इथं के. एल. सहगलसारखा पंजाबी अभिनेता बंगाली नायक हिंदीत साकारत होता... त्याचवेळी मुंबईशेजारच्या पुण्यातून प्रभात फिल्म कंपनी शुद्ध मराठी उच्चारांच्या हिंदीत बोलणाऱ्या व्यक्तिरेखांचे आणि मराठी नाट्यसंगीताच्या शैलीच्या गाण्यांनी नटलेले सिनेमे काढत होती... लाहोरचा ढंग अर्थातच पंजाबी होता... हे सगळे मुख्य प्रवाहातले हिंदी सिनेमे होते... एकीकडं कोल्हापूरसारख्या, महाराष्ट्रातही अंतर्भागात असलेल्या शहरात मराठी सिनेमांचं कलापूर इतकं समृद्ध झालं होतं की दक्षिणी चित्रपटसृष्टीची पायाभरणी या शहरात झाली, नंतर त्यांची केंद्रं हैदराबाद, मद्रासकडे हलली... तरीही हिंदीभाषक पट्ट्यातल्या एकाही शहरात हिंदी सिनेमानिर्मितीचा दखलपात्र विचारही झाला नव्हता... 

म्हणजे गंमत पाहा, सिनेमे हिंदीत निघत होते, पण त्यांच्या सेटवरची भाषा काय होती?... प्रभातच्या किंवा नंतर राजकमलच्या सेटवरची मंडळी मराठीत बोलणारी होती... प्रभातची मालकमंडळी मराठी होती, तेच दिग्दर्शक, तंत्रज्ञ होते, याच भाषेतले आणि मराठी मुलखातले तंत्रज्ञ होते... अनेक कलावंत मराठी होते... चंद्रमोहन, गुरुदत्त, देव आनंद यांच्यासारखे कलावंत-तंत्रज्ञ पुण्याच्या मराठी मातीत आणि मराठी मुशीत घडले होते. नंतरच्या टप्प्यात काही लोकांना डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर यांच्यासारख्या मराठी कलावंतांच्या हिंदीच्या मराठी शैलीतल्या उच्चारणावर हसू यायचं, पण प्रभातकाळात शांतारामबापूंच्या सिनेमातल्या सगळ्या व्यक्तिरेखा त्याच वळणाचं हिंदी बोलायच्या आणि तेच सगळा भारत ऐकायचा, त्याचं काय?

तिकडं कोलकात्यात न्यू थिएटर्समध्ये बंगालीमध्येच व्यवहार चालायचा. बंगाली कादंबऱ्यांवर आधारित सिनेमांनी आणि त्यांच्यातल्या गाण्यांनी हिंदुस्थानला वेड लावलं होतं... तिकडं प्रेमाच्या वैफल्यातून आत्मनाशाकडे निघालेला ‘देवदास’ तयार झाला, त्यानं एक अख्खी पिढी प्रेमभंगाच्या काल्पनिक दु:खात आणि उसाशांमध्ये लोटून दिली... त्यावर उत्तर म्हणून ‘प्रेमच भाकर, प्रेमच कांदा’ असं म्हणत प्रेमासाठी आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्याची खिल्ली उडवणारा ‘माणूस’ प्रभातनं काढला आणि त्याचं ‘आदमी’ हे (मराठी कलावंतांनीच हिंदीत साकारलेलं) रूप देशभरात गाजलं... ही एक गंमतच होती... हिंदुस्थानी सिनेमामध्ये संपूर्ण भारताचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे, असा काही अध्यादेश कुणी काढलेला नव्हता... पण, हिंदी सिनेमाची घडणच अशा प्रकारे झाली की हिंदी सिनेमाची पडद्यावरची भाषा हिंदी असली तरी पडद्यामागची भाषा फक्त हिंदी नव्हती, ती मराठी, बंगाली किंवा पंजाबी होती आणि या आपसूक जुळून आलेल्या योगानंच हिंदी सिनेमा समृद्ध केला, सर्वसमावेशक केला, ‘भारतीय’ केला... तो गोपट्ट्यातच निघाला असता तर, ही कल्पना अंगावर शहारे आणते ती यामुळंच.

नंतरच्या टप्प्यात कोलकात्यातलं हिंदी सिनेमानिर्मितीचं केंद्र बंद पडलं आणि तिकडची बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी, हेमंत कुमार, नितीन बोस, सचिन देव बर्मन आदी नामांकित मंडळी मुंबईत आली. भारताच्या फाळणीनंतर लाहोरचं केंद्र पाकिस्तानात वर्ग झालं... तिकडचे काही कलावंत मुंबईत आले... हळूहळू मुंबई हेच हिंदी सिनेमाचं एकमेव केंद्र झालं... पण इथल्या चित्रपटसृष्टीवर आणि निर्माण होत असलेल्या सिनेमांवर पंजाबी, बंगाली आणि बंबईया अशा संस्कृतींचा पगडा राहिला... यश चोपडा, बी. आर. चोपडा, रामानंद सागर, राज खोसला, ओ. पी. नय्यर आणि अर्थातच राज कपूर ही पंजाबी फळी. यात राज कपूरनं चॅप्लिन आणि जागतिक सिनेमापासून प्रेरणा घेऊन, के. ए. अब्बास यांच्यासारख्या डावीकडं झुकलेल्या लेखकाच्या प्रभावातून भाबड्या समाजवादी मांडणीचे अखिल भारतीय वळणाचे सिनेमे काढले... त्यानं कधी ‘सरसों दा साग’, ‘मक्के दी रोटी’च्या आठवणी काढल्या नाहीत... ‘चिठ्ठिये नी दर्द फिराकवालिये, लै जा लै जा संदेसा सोणी यार दा’ अशी शुद्ध पंजाबी रचना त्याला ‘हीना’ या पंजाबी बॅकड्रॉपवरच्याच सिनेमात वापरावीशी वाटली. बी. आर. आणि यश चोपडा यांच्या सिनेमांनी मात्र पंजाबियत आणि फाळणीचा दर्द हे धागे धरून ठेवले. त्यांच्या सिनेमांनी पंजाबी संस्कृती (आणि पंजाबी पदार्थ) देशभर पोचवले, हिंदी सिनेमांच्या माध्यमातून. त्यांच्या सेटवर (बहुतेक कलावंत पंजाबी असल्यानं) कशा पंजाबीतूनच गप्पा छाटल्या जायच्या, कसे अहमहमिकेनं पंजाबी पदार्थ शिजवले जायचे, याच्या रसभरीत कहाण्या अजूनही चर्चिल्या जातात. सरसों दा साग, मक्के दी रोटी, गाजर का हलवा, भल्यामोठ्या कोठीवजा हवेल्या, सतत उत्सवी वातावरणात रमलेली कुटुंबं, पंजाबी शब्दांची रेलचेल असलेली गाणी हा एक हिट फॉर्म्युला आहेच की अजूनही व्यावसायिक सिनेमांतला. देखणा, उंचापुरा, दिलदार, लार्जर दॅन लाइफ पंजाबी नायक आणि सौष्ठवपूर्ण दक्षिणी नायिका हे अत्यंत अजब पण सुपरहिट काँबिनेशन हिंदी सिनेमात तयार झालं, ते तो ‘हिंदी’ ओळखीत अडकून न पडल्यामुळं... ‘भारतीय’ असल्यामुळं. 

दुसरीकडं बिमल रॉय, हृषिदा, अशोक कुमार, बाँबे टॉकीज, प्रमोद चक्रवर्ती, शक्ति सामंता हा बंगाली खेमाही मजबूत होता. बिमलदांनी ‘बंदिनी’, ‘सुजाता’, ‘देवदास’, ‘काबुलीवाला’ यांसारख्या बंगाली वातावरणातल्या कलाकृती साकार केल्या. शक्ति सामंतांनी ‘हिंगेर कोचुरी’ हिंदीत ‘अमर प्रेम’ या नावाने आणली. या सिनेमांमधल्या किंवा हृषिदांच्या ‘आनंद’सारख्या सिनेमांमधल्या व्यक्तिरेखा बंगाली होत्या. पंजाबातल्या फाळणीच्या जखमा उरात घेऊन आलेले पण बंगाली कँपमध्येच घडण झालेले गुलजारांसारखे कलावंतही प्रामुख्यानं बंगाली संवेदनांनी प्रभावित झालेले दिसतात. सत्तरीच्या दशकात हृषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांनी प्रामुख्यानं मुंबईतल्या, शहरी कथानकांवर आधारलेल्या सिनेमांची रचना केली, तेव्हा त्यांत नायक होता मराठी अमोल पालेकर. हे काँबिनेशनही फार अन्वर्थक होतं. 

हिंदी सिनेमातला मराठीचा एकमेव झेंडा राजकमलच्या रूपानं फडकत राहिला... शांतारामबापू त्यांच्या वळणाचे सिनेमे अपरिचित कलावंतांना घेऊन काढत राहिले, त्यांचे कलाकार मराठी पद्धतीनं हिंदी बोलत राहिले, त्यांचा एक प्रेक्षकवर्ग ते सिनेमे पाहत राहिला. पण, हिंदी सिनेमावरचा बाकीचा मराठी प्रभाव संपुष्टात आला... राजा नवाथे, वसंत जोगळेकर यांच्यासारख्या मराठी दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमे केले, पण पूर्ण हिंदी वळणानं. मराठीचा एक प्रभाव बंबईया सिनेमांमध्ये मुंबईची संस्कृती म्हणून हिंदीवर प्रभाव टाकत राहिला... गिरगावात लहानाचे मोठे झालेले मनमोहन देसाईंसारखे दिग्दर्शक हिंदीत जी बंबईया बोली घेऊन आले ती मराठीप्रभावित हिंदीच होती. ‘आपुन बोला, ये तो होनाईच था,’ हे सगळं हिंदीतलं मराठीच होतं. पुढं एन. चंद्रा आणि महेश मांजरेकर या दिग्दर्शकांनी मुंबईतल्या आयुष्यावर, गँगवॉरवर सिनेमे केले तेव्हा त्यात मराठी प्रभाव जाणवत होता.

दक्षिणेतली चित्रपटसृष्टी हिंदीत थेट प्रभाव टाकू शकत नव्हती, कारण भाषेची अडचण होती. जेमिनी गणेशनपासून जयललितांपर्यंत तिकडच्या अनेक सुपरस्टार कलावंतांनी हिंदीत येण्याचा प्रयत्न केला, पण अर्धं इकडे अर्धं तिकडे असं गणित जमलं नाही. वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, हेमा मालिनी, रेखा यांसारख्या कलावतींनी पूर्णपणे हिंदीत बस्तान हलवलं तेव्हा त्या हिंदीत स्वीकारल्या गेल्या, हिंदी अभिनेत्रीच झाल्या. नायकांना ते सौभाग्य लाभलं नाही बराच काळ. कमल हासन आणि रजनीकांत यांच्यासारख्या मेगास्टार्सना हिंदीत पहिल्या टप्प्यात फार मोठं यश मिळवता आलं नाही... रजनीकांतनं पन्नाशीत केलेल्या ‘शिवाजी‘ आणि ‘रोबो‘ या सिनेमांनी हिंदीतही सुपरस्टार होऊन दाखवलं. पण, तोवर हिंदीत दक्षिणेचा एक सुप्त प्रभाव होताच. दक्षिणेतली मोठी बॅनर्स नित्यनेमानं हिंदीत सिनेमे करत होती. त्यांची एक शिस्त होती. त्या शिस्तीचं पालन करणारे अभिनेते, लेखक, गीतकार, संगीतकार यांना घेऊन दक्षिणेतल्याच दिग्दर्शकांनी तिकडच्या कौटुंबिक रडारडपटांचे अश्रुपाती रिमेक केले. जितेंद्र, जयाप्रदा आणि श्रीदेवी यांचे ‘हिंमतवाला’पासून ‘पातालभैरवी’पर्यंतचे सिनेमे हा हिंदीतल्या दक्षिण दिग्विजयाचा चरमोत्कर्ष होता... डेव्हिड धवनसारख्या दिग्दर्शकाच्या सिनेमांचा मूळ साचा दक्षिणी असल्यानं तो चित्रीकरणही हैदराबादेतच करायचा आणि त्याच्या सिनेमाच्या सगळ्या एस्थेटिक्सवर, उत्तान गाण्यांवर दक्षिणेच्या गाण्यांच्या चित्रीकरणाचा प्रभाव जाणवतो... हे सगळं तो दादा कोंडकेंच्या तोंडवळ्याच्या गोविंदाला घेऊन करत होता, हे विशेष.

नव्या सहस्रकाच्या आगमनाबरोबर हिंदीत कॉर्पोरेट सिनेमांची पद्धत सुरू झाली... आज मोठमोठी प्रॉडक्शन हाऊसेस तयार झालेली आहेत... ती एखाद्या कंपनीसारखी चालतात, त्यांत एमबीए झालेले, बिझनेस, फायनान्स यात गती असलेले लोक सिनेमाव्यवसायाला आकार देतात, त्यांची सगळ्यांची भाषा इंग्लिश आहे... या पिढीतले दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ हिंदी सिनेमा काढतात, पण एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलतात, पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतरचं भाषण इंग्लिशमध्ये करतात... संवाद रोमन स्क्रिप्टमध्ये लिहून घेतात... त्यांना देवनागरी वाचता येत नाही, तिथं पन्नासेक वर्षांपूर्वी संवादांची लिपी असलेली उर्दू कुठून वाचता येणार?... पण सुरुवातीच्या सिनेमांमध्ये आंग्लप्रदूषित हिंदी उच्चारण करणाऱ्या सनी देओलपासून टायगर श्रॉफपर्यंतच्या प्रत्येक कलावंताचं हिंदी, पुढच्या दोनपाच सिनेमांमध्ये सुधारतं असा अनुभव आहे... 

प्रख्यात स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास एक किस्सा सांगतो... तो ‘नमस्ते लंडन’ या सिनेमात एका फुटकळ भूमिकेत होता... एका प्रसंगात तो, कतरिना कैफ आणि अन्य कलाकार होते. सीन सुरू झाला तेव्हा वीरनं आणि सहकलाकारानं हिंदीत संवाद म्हटले आणि कतरिनाचा संवाद सुरू झाल्यानंतर वीर आश्चर्यचकित झाला... ती अर्धांग्ल उच्चारांत काय बोलत होती, हे त्याला कळलंच नाही... मनातल्या मनात हसून लोटपोट झाला होता तो... ती सिनेमाभर असंच बोलणार आहे, नंतर डबिंगमध्ये डबिंग कलाकार हिंदीत व्यवस्थित डबिंग करून घेईल, असं त्याला सांगितलं गेलं... विचार करा, हिंदीचा एकही शब्द न येणारी आणि अभिनयाशीही फारसा वास्ता नसलेली कतरिना त्या काळातली हिंदी सिनेमातली सगळ्यात लोकप्रिय नायिका होती... हिंदी सिनेमा आणि हिंदी भाषा यांचा परस्परसंबंध काहीच नाही, हे दाखवणारं याहून वेगळं उदाहरण सांगण्याची काही गरज आहे का?

आजचा काळ हिंदी सिनेमात हिंदीभाषक पट्ट्याचं प्रतिबिंब उमटण्याचा आहे. हिंदी सिनेमामध्ये अस्सल हिंदी वातावरण येऊ लागलेलं आहे. मल्टिप्लेक्सेसच्या आगमनानंतर अचानक हिंदीतल्या निर्मात्यांना हा साक्षात्कार झाला की आता हिंदी पट्ट्यातल्या निमशहरी भागांमधल्या कथानकांमध्ये काही नावीन्य आहे, त्या वातावरणातले सिनेमे केले पाहिजेत. मग आधी दिल्लीच्या मध्यमवर्गीय वस्त्यांपासून सुरुवात करून बनारस, बरेली, अमृतसर, कानपूर, जौनपूर, वासेपूर, लखनौ, पाटणा अशा हिंदी बेल्टमधल्या ठिकाणी घडणारे, चित्रित होणारे सिनेमे तयार व्हायला लागले आहेत. या सिनेमांचे तंत्रज्ञ, कलावंत प्राधान्यानं हिंदीभाषक आहेत आणि हिंदी लोकसंगीतापासून ते बोलीभाषांपर्यंत सगळा शुद्ध हिंदी प्रभाव त्यांच्यावर पाहायला मिळतो... 

तरीपण गंमत पाहा, आज अनुराग कश्यप, नितेश तिवारी, तिग्मांशु धुलिया, अभिषेक चौबे, शरद कटारिया यांच्यासारखे दिग्दर्शक संपूर्ण सिनेमा चित्रित करतात त्या त्या शहरात, पण ते तिथं राहत नाहीत, ते मुंबईतच राहतात आणि चित्रपटसृष्टीत काम करतात ते मुंबईतच. निव्वळ चित्रीकरणोत्तर सोपस्कारांच्या व्यवस्था, बाकीच्या यंत्रणा इथं आहेत, हेच याचं कारण नाही. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मायानगरी आहे आणि देशाचं मेल्टिंग पॉट आहे, हा मिनीभारत आहे... भारताच्या प्रत्येक प्रांतातली मंडळी भले मनात जातपात, धर्मभेद वगैरे घेऊनच इथं येत असतील, पण इथल्या व्यवहारांत त्यांना तसा भेदभाव करता येत नाही... इथं तुमच्या खोपटाची एक भिंत मुसलमानाच्या घराशी कॉमन असते, दुसरा शेजारी ख्रिस्ती असतो, तिसरा पंजाबी असतो, समोर साउथ इंडियन असतात, मागं कुणी आसामी असतो, पलीकडे कुणी बंगाली असतो. चाळींपासून इमारतींपर्यंत सगळीकडे हीच बहुभाषी संस्कृती नांदत असते आणि प्रामुख्यानं हिंदीतच व्यवहार करत असते... चित्रपटसृष्टीही याच प्रकारे चालते... मुंबईमध्ये कोणत्याही सांस्कृतिक दबावांविना लिहिता येतं, व्यक्त होता येतं, समविचारी माणसांबरोबर चर्चा करता येते, भांडता येतं, इथं सृजनशीलतेला धुमारे फुटतात, मनाची भूमी एकारलेली राहत नाही, ती व्यापक होते, एक दृष्टिकोन तयार होतो, कोण कुठून आलाय, त्याची मूळ भाषा काय, त्याची मूळ संस्कृती काय, यानं काही फरक पडत नाही... त्यांच्या सगळ्यांच्या घुसळणीतून ‘हिंदुस्थानी’ सिनेमा तयार होतो, तेव्हा तो सगळ्या भारतवासीयांना ‘आपला सिनेमा’ वाटतो... त्यांना स्पर्श करतो... तो पाहणाऱ्या दक्षिणेतल्या प्रेक्षकाच्या ओठांवर पंजाबी गाणी रुळतात, पंजाबी प्रेक्षकाला ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’चा ठेका ताल धरायला लावतो, राजस्थानातली शौर्यगाथा मराठी माणसाचे बाहू फुरफुरवते, ‘तान्हाजी’ची वीरगाथा दिल्लीतही तुफान प्रतिसाद मिळवते आणि ‘शिवाजी द बॉस’चा दक्षिणी भडकपणा बंगाली भद्रलोकांनाही भावून जातो...

...हा खरा भारत आहे... 

हा खरा भारताचा सिनेमा आहे... 

तो ‘हिंदी सिनेमा’ नाही, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, अनेक भाषा बोलणाऱ्या, अनेक संस्कृतींचे संस्कार घेऊन आलेल्या गुणवंतांच्या सामुदायिक प्रयत्नांमधून हिंदी भाषेत तयार होणारा ‘हिंदुस्थानी’ सिनेमा आहे... आणि म्हणूनच लखनौ, प्रयागराज, कानपूर वगैरे प्रत्येक शहरात एक अशा सुसज्ज फिल्मसिटी उभारल्या गेल्या तरी सगळ्या देशाला कवेत घेणारा, सगळ्या देशाची स्वप्नं, आकांक्षा प्रतिबिंबित करणारा, या खंडप्राय देशातल्या अफाट विविधतेतल्या ‘एकत्वम्’चा साक्षात्कार घडवणारा खराखुरा हिंदी सिनेमा प्रादेशिक हिंदीभाषक पट्ट्यात नव्हे, तर फक्त आणि फक्त मुंबईतच होऊ शकतो... बाकी भरगच्च भोजपुरी संस्कारशीलतेसाठी वैश्विक ‘रामराज्य’ आहेच!

संबंधित बातम्या