किमानतेमध्ये कमाल अनुभव

सई उपळेकर
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

बॅकपॅकिंग म्हणजे अगदी गरजेपुरते सामान बॅकपॅकमध्ये ठेवून किमान खर्चात स्वतंत्रपणे भटकणे. पैशांचा अभाव म्हणून लोक बॅकपॅकिंग करतात का? पूर्वी करत असतील, पण आता तसेही नाही! बॅकपॅकिंग म्हणजे निरर्थक किंवा दिशाहीन भटकंती नाही! बॅकपॅकिंग ही आता एक विचारधारा आणि एक प्रकारची प्रवास संस्कृतीच झाली आहे...

पैशांची आवक वाढलेला मध्यमवर्ग, बस, ट्रेन, विमान यांच्या स्पर्धात्मक किमतींमुळे प्रवासासाठी उपलब्ध झालेले अनेक पर्याय, स्वतःच्या चारचाकी, बऱ्याच ठिकाणी बाईक्स, कार्स भाड्याने घेण्याची सोय, आधी दुर्मीळ असलेल्या भागांमध्ये आता पोचलेल्या मूलभूत सुविधा; या आणि अशा अनेक कारणांमुळे वर्षातून एकदा यात्रेवर जाणारा किंवा सुटीच्या काळात थोडेफार फिरणारा भारतीय गेल्या दशकात, देशात आणि परदेशात फिरणारा आघाडीचा पर्यटक झाला! आधी ‘गावभर बोंबलत कशाला फिरता’ म्हणणारे आई-वडील आता अभिमानाने सांगतात, की आमचा मुलगा/मुलगी ‘ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर’ आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्या ठिकाणांची ब्लॉग, फोटो स्वरूपात किंवा व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर माहिती देणारा!

प्रत्येकाचा पर्यटन करण्याचा उद्देश वेगळा. कोणाचा धार्मिक, कोणाला निसर्गरम्य स्थळांची ओढ, तर कोणाला इतिहासप्रसिद्ध इमारती आणि पुरातन वास्तूंचे आकर्षण. पर्यटन करण्याची पद्धतही वेगवेगळी! कोणी स्वतःची गाडी चालवत रोड ट्रिप करणे पसंत करतो, कोणी एखाद्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर जातो किंवा कोणी गाडी भाड्याने घेऊन. अशीच भटकंती करण्याची एक पद्धत म्हणजे बॅकपॅकिंग! बॅकपॅक म्हणजे पाठीवर ठेवून दोन्ही खांद्यावर लटकवता येणारी बॅगच! पण या बॅगचे असे काय वैशिष्ट्य, की ती जगभरात अनेक फिरस्त्यांचे जगण्याचे स्रोत ठरली?

बॅकपॅकिंग म्हणजे अगदी गरजेपुरते सामान बॅकपॅकमध्ये ठेवून किमान खर्चात स्वतंत्रपणे भटकणे. पैशांचा अभाव म्हणून लोक बॅकपॅकिंग करतात का? पूर्वी करत असतील, पण आता तसेही नाही! कारण बॅकपॅकिंग ही आता एक विचारधारा आणि एक प्रकारची प्रवास संस्कृतीच झाली आहे. कमीतकमी ओझे... सामानाचे आणि विचारांचेही; कोणत्याही विचारांचा पगडा मनावर न ठेवता खुल्या मनाने, पण विवेकी, स्वशिक्षण भटकंती म्हणजे बॅकपॅकिंग. प्रतिष्ठा चिन्हे म्हणून मिरवणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठीची धडपड सोडली, तर आपण जातोय ते ठिकाण पूर्णपणे अनुभवता येते असा त्यामागचा सारांश. बॅकपॅकिंगची सुरुवात कशी झाली हे नेमके सांगता येणार नाही, पण १९६० च्या दशकात ‘हिप्पी’ संस्कृतीतून ‘मॉडर्न बॅकपॅकिंग’ नावारूपाला आले. 

साधारण १९ वर्षे अमेरिका व्हिएतनाम युद्ध सुरू होते. व्हिएतनाममध्ये होणारा हिंसाचार आणि अत्याचार, अमेरिकी युवकांना टीव्हीच्या माध्यमातून कळू लागला, तसा त्यांचा युद्धविरोध वाढू लागला. राजकारणापासून तोपर्यंत दूर राहिलेले अमेरिकेतले हिप्पी या युद्धाविरुद्ध विविध चळवळींतून आक्रोश व्यक्त करू लागले. आपल्याच राजकारणी लोकांचे आणि सरकारचे क्रौर्य पाहून पाश्चात्त्य संस्कृतीपासून हे युवक दुरावत चालले होते आणि त्यांना आशियामधील आध्यात्मिक संस्कृतीचे आकर्षण वाटू लागले होते. पूर्वेकडे त्यांच्या प्रवासाला ‘हिप्पी ट्रेल’ म्हणू लागले. युरोपातले युवक लंडन, कोपेनहागन, पॅरिस, बर्लिन इथून प्रवास सुरू करत. तर अमेरिकेचे युवक लक्झमबर्गहून. इस्तंबूलमार्गे इराण, काबूल, पेशावर, काठमांडू, दिल्ली, मनाली, बनारस, गोवा आणि मग पुढे थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका असा हा प्रवास होता. बराच काळ घरापासून लांब राहणारे हे युवक अगदी गरजेपुरते सामान घेऊन मिळेल ते साधन घेऊन जगत आणि प्रवास करत. या प्रवासादरम्यान राहणाऱ्या देशामध्ये काही युवक ‘पीस कॉर्प्स’ आणि अशाच काही संस्थांचे स्वयंसेवक म्हणून त्या त्या देशातल्या नागरिकांना विकासकामांमध्ये मदत करत. प्रेम, शांतता, स्वातंत्र्य याचा प्रसार करत. या देशांमध्ये हशीश, गांजादेखील स्वस्त मिळत असल्याने बराच काळ एकाच ठिकाणी राहत.

या मॉडर्न बॅकपॅकिंगची सुरुवात हिप्पी संस्कृतीतून झाली असली, तरी आता ती विविध विचारधारेच्या भटक्यांना आकर्षित करते आहे. जगभरात आता विविध संस्कृतीच्या लोकांना सामावून घेणारी बॅकपॅकिंग हॉस्टेल्स आहेत. आता कोणतीही हिप्पी चळवळ नाही, पण प्रवासाची हौस असणारे लोक या बॅकपॅकिंगचा परिपूर्ण अनुभव घेतात. बॅकपॅकिंग म्हणजे निरर्थक किंवा दिशाहीन भटकंती नाही!  

आपण पाहायला जाणार त्या जागेचा भौगोलिक, ऐतिहासिक अभ्यास गरजेचा आहेच, पण तिथल्या संस्कृतीचाही. प्रवासाचे नियोजन आणि आयोजनदेखील गरजेचे. बऱ्याचदा एखाद्या ठिकाणापर्यंत पोचायचे कसे हे माहीत असते, पण तिथून पुढे काय मिळेल याची किंवा कुठे राहता येईल याची माहिती नसते. जसजसे फिरत राहू तसे स्वव्यवस्थापन, प्रसंगावधान अधिक दृढ होत जाते. कमीतकमी सामान असल्याने बरोबर असलेल्या गोष्टींची आठवण राहते आणि त्या गमावून चालणार नाही याची जाणीव राहते. काही गोष्टींची आपल्याला इतकी सवय होते, की त्या जगण्यासाठी आवश्यक वाटू लागतात. पण जेव्हा पाठीवरचे ओझे कमी करता येईल का, असा विचार येतो तेव्हा याच गोष्टींशिवाय आरामात कामे होत आहेत हे लक्षात येते.

आता बऱ्याच ठिकाणी भाड्याने गाडी मिळते, मग सार्वजनिक वाहतूकच वापरण्याचा अट्टहास का, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल. कारण कुठे पोचायचे आहे याहीपेक्षा प्रवास महत्त्वाचा आहे. भारतात प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते म्हणतात. भाषेबरोबर व्यक्ती, संस्कृती, थोड्याफार प्रमाणात वेशभूषा आणि रीतीसुद्धा बदलतात. एका बंदिस्त गाडीत स्वतःच्या धुंदीत बाहेरच्या निसर्गातल्या, समाजातल्या या उदंड अनुभवांना आपण मुकू शकतो!

बऱ्याचदा गुगल आणि गुगल मॅप्स जे दाखवत किंवा सांगत नाहीत, ते अनपेक्षितपणे बसमध्ये शेजारी बसलेल्या आजी, नाक्यावर झाडाखाली बसलेले आजोबा, वडाप चालवणारे काका अथवा बसचे कंडक्टरदादा किंवा ताई सांगून जातात आणि ती जागा या आधी कशी कोणी ‘गुगल प्रसिद्ध’ केली नाही असा प्रश्न पडतो! दुर्गम भागात बस किंवा वडापसाठी थांबलो, तर वेळ वाया जातो असे काहींना वाटू शकते. पण या वेळेत स्थानिकांशी जो संवाद होतो, ती माहिती कोणत्याही पुस्तकात किंवा गुगलवर मिळत नाही. आपल्याला जटिल वाटणाऱ्या कित्येक गोष्टींचे उत्तर बऱ्याचदा या संवादांतून मिळते. कधी कधी गाडीसाठी थांबलेलो असता चिडिचूप शांतता, वहीत डुडल काढत बसणे, वाचत बसणे, हेडफोनवर गाणे ऐकणे किंवा सहज मारलेली पडी यासारखा शांत आणि सुखावणारा अनुभव नाही! कधी वडाप आलीच नाही म्हणून चालत फिरताना काहीच न करणे, यातही एक वेगळीच मजा आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ‘द टाइम यू एंजॉईड वेस्टिंग इज नॉट वेस्टेड.’ म्हणजे जो वेळ ‘वाया’ घालवताना आनंद मिळतो, तो वाया गेलेला नसतो!

कवी मोरोपंतांनी म्हटले आहे,

केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार,

शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार!

स्थानिक लोकांबरोबर फिरल्याशिवाय, त्यांना आणि त्यांच्या संस्कृतीला घडवणाऱ्या साधनांचे अवलंबन केल्याशिवाय आपण आपल्या पूर्वग्रहांना बाजूला ठेवून त्यांच्या दृष्टिकोनातून जग पाहू शकत नाही. जग फिरणे आणि जग पाहणे यात नेमका हाच फरक आहे! ‘होम स्टे’ म्हणजे एखाद्या स्थानिकाच्या घरी राहण्याची आणि खाण्याची सोय. व्यावसायिक पण घरगुती अनुभव. त्या त्या जागेचा अस्सल अनुभव घ्यायला होम स्टेसारखा पर्याय उत्तम!

बॅकपॅकिंग म्हटले की डोळ्यासमोर येतो युरोप बॅकपॅकिंग प्रसिद्ध आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी अनुकूल अशा बऱ्याच सुविधाही आहेत. पण बॅकपॅकिंगच्या विचारधारेशी संलग्न असाल, तर ते तुम्ही कुठेही करू शकता! शेजारच्या शहरात किंवा स्वतःच्या शहरातसुद्धा!!

प्रत्येक ठिकाणी बॅकपॅकिंगचा वेगळा अनुभव मिळतो. मलाही मिळाला. पाचगणी-महाबळेश्वरला काय बॅकपॅकिंग करणार, सगळे तर पाहिले आहे असे वाटणे अयोग्य नाही. पण पायी, सायकल आणि टेम्पोमध्ये फिरल्यावर कळले, इथे कारच्या आरामदायी खिडकीतून बरेच काही दिसले नव्हते या आधी! फक्त जातानाचे बसचे तिकीट काढले आणि पाचगणी जवळच्या अल्पपरिचित ठिकाणांची नावे काढली. त्या जागांच्या जवळपास कुठपर्यंत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे, एवढी माहिती काढून ठेवली. राहायची सोय कशी असेल, याचा अंदाज नव्हता म्हणून बरोबर स्लीपिंग बॅग आणि टेंट घेतले. कमीतकमी कचरा या ध्यासाने कुठेही प्लॅस्टिकची पाण्याची बाटली विकत घ्यायची नाही म्हणून भरमसाट पाणी! बसने पाचगणीहून सुमारे सात किमीवर भिलार गावाच्या वेशीवर उतरलो. गाव आत तीन किमीवर होते. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाणारे भिलार भारतातले असे एकमेव गाव आहे. प्रामुख्याने स्ट्रॉबेरीची शेती करणारे हे गाव, महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांतून पुस्तकांचे गाव झाले! या गावात प्रत्येक घरात एक खोली राखीव आहे आणि ती खोली मराठी पुस्तकांनी भरलेली आहे. साहित्यप्रकारानुसार विभाग केले आहेत, अगदी बालसाहित्य ते यूपीएससी परीक्षेच्या तयारीपर्यंत. प्रत्येक घरात एक विभाग असे बावीस विभाग आहेत! पर्यटक कोणाच्याही दारावर न ठोठावता, कोणतीही परवानगी न घेता त्या खोलीत जाऊन विनामूल्य कोणतेही पुस्तक घेऊन वाचत बसू शकतात. अतिशय शांत अशा वातावरणात आवडीचे पुस्तक वाचत बसणे, याहून सुखद अनुभव नाही. याशिवाय काही घरांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोयही उपलब्ध आहे. दोन दिवस डोक्याला कोणताही ताण नाही! त्यानंतर कधी वडाप, तर कधी टेम्पोतून जुन्या महाबळेश्वरमधील गर्दीपासून दूर नयनरम्य कृष्णाबाई मंदिर आणि नंतर राजपुरी येथील राजपुरी लेणी पाहून डोळ्याचे पारणे फिटले! लोकांनी भरलेल्या मोटारी आणि महाबळेश्वरच्या गर्दीला चुकवत, ‘देवराई आर्ट व्हिलेज’ला पोचलो. छत्तीसगढ येथील आदिवासी कला, प्रामुख्याने ‘ढोकरा’ कलेतून काही सुंदर शिल्प इथे तयार केली जातात. आदिवासी कलाकारांचे कलागुण आणि व्यावसायिकतेची सांगड घडवून आणणारे हे छोटे आर्ट व्हिलेज! या वेळी महाबळेश्वर/पाचगणीचे पारसी पॉइंट, टेबल टॉप, आर्थर सीट अशा कोणत्याच ठिकाणी न जाता काहीतरी ऑफबीट केले! हिल स्टेशनची खरी हवा चालत अनुभवता येते. शहरातल्या ट्रॅफिक जॅमला कंटाळून पर्यटन स्थळांना येऊन ट्रॅफिक जॅम करायची गरज नाही हे जाणवले!

पाचगणीला एका बॅकपॅकर्स हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली. हे हॉस्टेल म्हणजे शिपिंग कंटेनर्सनचे रूपांतर डॉरमेटरीमध्ये केले आहे. जगभरातल्या बॅकपॅकिंग हॉस्टेल्सचे वातावरण थोड्याफार प्रमाणात सारखेच असते. इतर वेळी अनोळखी लोकांबरोबर डॉरमेटरीमध्ये राहायचे म्हणजे भीती वाटते. पण त्याउलट बॅकपॅकिंग हॉस्टेलची डॉरमेटरी! वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या, संस्कृतीच्या लोकांना भेटण्याची मस्त संधी असते. सगळे एकत्र राहत असतात, पण आपापल्या तंद्रीत, दुसऱ्याला त्रास होऊ नये असे. बॅकपॅकिंग हॉस्टेल्सचे काही मूलभूत नियम असतात, स्वच्छता आणि दुसऱ्याला त्रास होऊ नये या अनुषंगाने. हॉस्टेलमध्ये सगळ्यांची आवडती एक सार्वजनिक खोली असते, जिथे काही लोक पुस्तक वाचत असतात. काहीजण चित्र काढत असतात, काहीजण लिहीत असतात, काही लोक बोर्ड गेम्स खेळत असतात, काही अनोळखी लोक एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. सहअस्तित्त्वाचे एक सुंदर उदाहरण!!

‘सोलो बॅकपॅकिंग’ म्हणजे एकटेच फिरणे, हा एक वेगळाच अनुभव आहे. भारतात मुलींनी एकटे बॅकपॅकिंग करावे का याला बऱ्याच लोकांचा विरोध असू शकतो. पण ज्या ठिकाणी जायचे त्या जागेची पूर्ण माहिती, तिथल्या लोकांची मानसिकता आणि संस्कृती, स्वावलंबन, आत्मविश्वास, आजूबाजूची जाणीव आणि प्रसंगावधान या सगळ्या गोष्टींबद्दल खात्री असल्यास मुलीही एकट्या बॅकपॅकिंग करू शकतात. कर्नाटकात विजापूर-बदामी-पट्टदकल-ऐहोल-हंपी असे दहा दिवस मी एकटीने प्रवास केला. कधी ट्रेन, बस, रिक्षा तर कधी भाड्याची सायकल. स्थापत्य विषय आवडीचा असल्याने ही स्थळे म्हणजे एक पर्वणीच! दहा दिवस एकदाही घराची आठवण आली नाही की अस्वस्थ वाटले नाही, इतक्या चांगल्या लोकांचा सहवास लाभला. स्त्रियांसाठी पुरेशी शौचालये नाहीत यापलीकडे मला कोणताही अस्वस्थ करणारा अनुभव आला नाही. बदामीला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात बरीच माहिती मिळाली आणि ती ठिकाणे पाहिलीसुद्धा. पण त्यातले एक ठिकाण बराच वेळ फिरूनही सापडले नाही, ते ठिकाण होते एक दरीत! चालुक्य राजा पुलकेशीन याचा एक शिलालेख त्या दरीत कोरला आहे आणि कोणी तिथे जात नाही. मला तो शिलालेख पाहायचाच होता म्हणून  संग्रहालयातल्या काही लोकांना विचारू लागले. तिथे नका जाऊ एवढेच सगळे सांगत राहिले. शेवटी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका काकांना सोबत घेतले. ते म्हणाले हातात दगड ठेवा. मला आधी थोडी शंका आली, पण तशीच थोडी पुढे गेले. दरीच्या तोंडाशी पोचतो ते काय... समोर दगडांच्या कपारीत, तर काही झाडावर लटकलेली वानर सेना! इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या पन्नासेक माकडांना समोर पाहून आणि त्यांचा विशिष्ट आवाज ऐकून धांदल उडाली! या एका दगडाने काय जीव वाचणार होता? नेहमी स्थानिकांचे ऐकावे हा धडा मिळाला. माझ्या बरोबर आलेले काका बिचारे त्या माकडांपासून माझे रक्षण करत होते. पण शेवटी शिलालेख तर पाहिलाच! सुखरूप ऑफिसमध्ये परत आलो. काकांचे आभार मानले. काका कन्नड होते, त्यांना मी बोललेले काही कळत होते का माहीत नाही. पण मी त्यांना टिप देऊ शकते का अशी विचारपूस केली असता काकांनी नमस्कार केला, गोड हसले आणि परत कामाला लागले, पण टिप स्वीकारली नाही!

असाच एक उल्लेख करावा अशी व्यक्ती म्हणजे एक रिक्षाचालक, ‘संगना’! साधारण साठीत असलेली ही व्यक्ती, स्वतःचे छोटे पण टुमदार घर आणि सगळी मुले नोकरी करणारी. तरीही पर्यटकांना रिक्षातून बदामी, पट्टदकल, ऐहोलचा प्रवास घडवण्याची मनापासून आवड! त्यांना स्वतःच्या जागेबद्दल इत्थंभूत माहिती आणि प्रचंड अभिमान! काकांना फक्त कन्नड येत होते. त्यांच्या रिक्षात सुंदर सजवलेली एक वही होती. काकांनी आजपर्यंत   बदामी आणि आसपासच्या जागा दाखवल्या, त्या देश-परदेशातल्या सगळ्या पर्यटकांनी त्यांचा अभिप्राय त्यात लिहिला होता. काकांनी लोकप्रिय ठिकाणे दाखवलीच, पण त्याचबरोबर अल्पपरिचित काही जागा दाखवल्या. तिथले जेवण अनुभवता यावे म्हणून एका मित्राच्या धाब्यावर नेऊन प्रत्येक पदार्थाची ओळख करून दिली. आम्हा दोघांची भाषा वेगळी आहे, पण काहीही न बोलता सगळ्या जागा छान अनुभवता येत आहेत हे चमत्कारिकच होते! असा गाइड भेटण्याचा माझा पहिलाच अनुभव आणि कदाचित शेवटचा! या प्रवासादरम्यान मला ‘काव्या’ नावाची एक मुलगी भेटली. तीसुद्धा सोलो बॅकपॅकिंग करत होती. आमची मैत्री झाली आणि आम्ही परत भेटण्याचे ठरवले... त्यानंतर एक वर्षाने मी आणि काव्याने कंबोडिया, व्हिएतनाम आणि सिंगापूर बॅकपॅकिंग केले!

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले बॅकपॅकिंग फारसे कोणी ऐकले नसेल. या भागात सार्वजनिक वाहतूक कशी उपलब्ध आहे याची जास्त माहिती मिळाली नाही. तरीही आपण बॅकपॅकिंग करू असे आम्ही ठरवले. बॅकपॅकिंग करताना सवंगडीही तसेच कसलेले हवेत! काही कारणांमुळे शेवटच्या क्षणी योजनेत बदल होत राहतात. अशा वेळी संयम आणि समजूतदारपणा हवाच, पण वेव्हलेंथही जुळायला हवी! माझ्याबरोबर श्वेता आणि मिहीर असे माझे दोन मित्र होते आणि आमचा एकत्र बॅकपॅकिंगचा हा पहिलाच अनुभव होता. आंध्र आणि तेलंगणा इथे बॅकपॅकिंग हॉस्टेल्स नसली, तरी पर्यटन विभागाची उत्तम गेस्ट हाऊसेस आहेत! विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हंपी तर प्रख्यात आहे. पण नंतर विजयनगरची राजधानी ज्या पेनुकोंडाला हलवण्यात आली, ते पेनुकोंडा बऱ्याच जणांनी ऐकले किंवा पाहिले नसेल. रस्त्याचे काम सुरू असल्याने आम्ही पेनुकोंडाच्या किल्ल्यापर्यंत पोचू शकलो नाही. पण आम्हाला रिक्षातून घेऊन जाणाऱ्या काकांनी तिथे पुरातन अशी एक बारव दाखवली, नुकतीच खोदकाम करताना सापडलेली! अनेक मंदिरे आणि दर्गे या पेनुकोंडामध्ये आढळतात. तसेच विजयनगर साम्राज्याच्या राजांचा सहवास लाभलेला गगन महलही इथेच आहे. पुढे बेलमच्या गुहांकडे प्रस्थान करताना कोणती बस घ्यावी कळत नव्हते. सगळीकडे तेलगू भाषेत लिहले होते. भाषा येत नाही म्हणून एका ड्रायव्हरकाकांना विचारले असता त्यांनी थेट आम्हाला बसपर्यंत नेऊन सोडले. रात्री पोचायला दोन वाजले होते. इतक्या रात्री चालत जावे लागू नये म्हणून कंडक्टरकाकांनी बस स्टॉपसमोर बस न थांबवता थोडे अलीकडे थेट बेलम गेस्ट हाउसच्या गेटसमोर आम्हाला सोडले. एवढ्या रात्री गेस्ट हाउसमध्ये राहायची सोय झाली खरी! भाषा येत नसली तरी स्थानिक लोकांना कधी हातवारे करून तर कधी फोटो दाखवून माहिती मिळवली. लेपाक्षी मंदिर, बेलम, यागंती, बंगनपल्लीचाचा महाल, गुट्टीचा किल्ला, गंडीकोटाचा किल्ला ही अतिशय सुंदर ठिकाणे पाहिली. आपला गुट्टीचा किल्ला आवर्जून पाहायला दुसऱ्या राज्यातून लोक आलेत, म्हणून आमचे गुट्टीमध्ये बरेच आदरातिथ्यही झाले. सहा दिवसांच्या भटकंतीचा खर्च प्रत्येकी फक्त चार हजार रुपये, यामुळे होणारा आनंदपण वेगळाच! 

अशीच केरळची भटकंतीही रंगली! केरळला व्यावसायिक पर्यटन भरपूर प्रमाणात होत असले, तरी बॅकपॅकिंग करता येईल अशी बरीच ठिकाणे आहेत. केरळमधील सार्वजनिक वाहतूक खासगी असली, तरी स्वस्तात कोणत्याही ठिकाणी आरामात पोचता येते. बॉम्बे चित्रपटातले ‘तू ही रे’ गाणे चित्रित झालेल्या बेकलच्या किल्ल्याला गर्दी नसताना भेट देता यावी आणि वेळेत सूर्यास्त टिपता यावा म्हणून काही न खातापिता वेळेत पोचण्याची नुसती धडपड! फिरत असताना एक दिवस संप जाहीर झाला. बरोबर खायला काही ठेवले नव्हते. शेवटी निर्मनुष्य रस्त्यावर उभे असताना एक पोलीस काका गाडीवरून फिरत होते त्यांना विचारले. सिव्हिल हॉस्पिटल कँटीनमध्ये  जेवण मिळेलच, असे ते सुचवून गेले. संपामुळे गर्दी नसेल म्हणून त्या दिवसात पाय तोडत हिंडलो आणि एक किल्ला पाहिलाच!  

कंबोडिया, व्हिएतनाम आणि सिंगापूर बॅकपॅकिंग हा परदेशवारीचा माझा पहिलाच अनुभव होता. कर्नाटकात बॅकपॅकिंग करत असताना भेटलेल्या काव्याबरोबर जायचे ठरवले होते. सात महिने आधीच प्रचंड माहिती गोळा करून सगळ्या गोष्टींचे बुकिंग केले. परदेशात बॅकपॅकिंग करताना आगाऊ बुकिंग केल्याने बरेच पैसे वाचतात. मुंबईला इमिग्रेशन ऑफिसरने पासपोर्ट पाहिला, कागदपत्र न्याहाळली. प्रथम परदेशवारी, तीही एकटीच. ऑफिसरने वर पाहिले आणि म्हणाले खूप खूप शुभेच्छा! इमिग्रेशन ऑफिसर मान वर करून बघतही नाहीत असे ऐकले होते. सुरुवात छान झाली. काव्या बंगळूरूहून येणार होती. मलेशियाहून कनेक्टिंग फ्लाईट होती, काव्याला तिथेच भेटले! इथून पुढे दोघी एकत्रच होतो. सियाम रिप, कंबोडियाला पोचलो आणि कळले की माझी बॅकपॅक त्या फ्लाईटने आलीच नाही आणि मलेशियालाच काही कारणास्तव अडकून आहे. आता बरोबर फक्त पैसे आणि पासपोर्ट होता. त्या क्षणी काहीही करता येणार नव्हते म्हणून हॉस्टेलला जायचे ठरवले. हॉस्टेलवर वेगवेगळ्या देशांचे लोक एकत्र राहत होते. संध्याकाळी हॉस्टेल कँटीनमध्ये नाश्त्याच्या वेळी अनेकांशी ओळखही झाली. मी आणि काव्या दोघीही शाकाहारी. ‘व्हिगन’ होण्याकडे सध्या बऱ्याच जणांचा कल असल्याने, सगळ्यांना कुतूहल आणि भरपूर प्रश्न! 

स्थापत्य, शिल्प, कलाकुसर याचा एक भव्य दिव्य अनुभव म्हणजे कंबोडियातील अंगकोरवाट आणि अनेक मंदिरे! पहाटे पाचला उठून रिक्षा पकडून सगळी मंदिरे पाहणे, काही ठिकाणी सूर्योदय तर काही ठिकाणी सूर्यास्त पाहत बसणे, संध्याकाळी परतणे आणि स्वीमिंग पूल शेजारी पडून राहणे, वाचत बसणे किंवा गप्पा मारणे हीच दिनचर्या. एकमेकांच्या संस्कृती किंवा अनुभवांविषयी भरपूर चर्चा रंगत असत. हॉस्टेलमध्ये या गप्पांदरम्यान इंग्लंड, अमेरिका, थायलंड, तैवानमधल्या काही लोकांची ओळख झाली. एक दिवस एक पूर्ण संध्याकाळ ‘गन कंट्रोल लॉ’ म्हणजे नागरिकांना स्वसुरक्षतेसाठी रिव्हॉल्वर बाळगता यावी याचे नियम, यावर रंगली. काही देशांसाठी हा धगधगता विषय आहे आणि आपली मजल पर्समध्ये चिली स्प्रे ठेवला की नाही इथपर्यंतच आहे, हे कळून चुकले. जेवढे देश तितक्या प्रकृती! दिवस असाच निघून जायचा आणि बॅकपॅक अजून परत आलेली नाही याचा विसर पडायचा. काही कपडे विकत घेतले, बॅकपॅकमध्ये अजून असते तरी काय! पण एक दिवस हॉस्टेलमध्ये एअरपोर्टहून फोन आला आणि बॅकपॅक परत मिळाली! जे रिक्षावाले दादा आम्हाला रोज मंदिरे दाखवायला घेऊन जात, ते एक दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि घरच्यांशी ओळख करून दिली. कंबोडियामध्ये बराच काळ गृहयुद्ध सुरू होते. अगदी १९८० पर्यंत त्याचे परिणाम दिसत होते. त्या दरम्यान कंबोडियातील सुमारे दोन कोटी लोकांची हत्या झाली होती. काहींसाठी पूर्ण एक पिढीच नष्ट झाली होती. याचे पडसाद अजूनही काही कुटुंबांमध्ये दिसत होते. या सगळ्यातून सावरत तिथले लोक पूर्ण मेहनत करून येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटनाचा अनुभव सुखकर व्हावा याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. पहाटे, रात्री फिरताना कधीच भीती वाटली नाही. 

तसाच अनुभव व्हिएतनामचा! वीस वर्षे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी झुंज देणाऱ्या या देशात, तिथले वॉर बंकर, संग्रहालयातले युद्धाचे फोटो पाहून अचंबित व्हायला झाले. ट्रेकिंग, केव्हिंग, कयाकिंग, क्रुझ असा सुंदर अनुभव घेत व्हिएतनामचादेखील प्रवास संपला. वाटेत भेटणाऱ्या अनेक देशातल्या लोकांनी बऱ्यापैकी भारत अनुभवला होता. काहींना भारताविषयी भाबडे प्रश्नही असायचे. दुसरे देश फिरत फिरत कधी कधी आपल्याला आपला देश अधिक कळू लागतो. विचारधारा विस्तृत होत राहते. म्हणूनच किमानतेच्या वाटेवर कमाल अनुभव घेऊन बघा! बॅकपॅकिंग करून तर बघा!   

संबंधित बातम्या