रसराज

सतीश पाकणीकर
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

जसराजजींनी पुढ्यातील स्वरमंडल हातात घेतले. ते छेडले. त्याच्या सुरेल तारा झंकारू लागल्या. सर्व शामियान्यात स्वरांचा अंमल सुरू झाला. पुढचा सव्वा ते दीड तास सर्व श्रोत्यांवर स्वरांचे जे गारूड जसराजजींनी केले त्याला तोड नाही.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या कोणत्याही मैफलीत ‘जय हो’ हे दोन शब्द जरी कोणी उच्चारले तरी ती व्यक्ती एका ख्यातनाम लोकप्रिय गायकाबद्दल बोलत आहे हे समजायला वेळ लागणार नाही. पंडित जसराज. जवळपास सात दशकांची शास्त्रीय गायनाची कारकीर्द असलेला हा कलावंत वयाच्या नव्वदीतही गातच राहिला, गाण्यासाठी जगभर प्रवास करीत राहिला, जगभरातील आपल्या शिष्यांना विद्यादान करीत राहिला व अमर्याद चाहत्यांच्या जीवनात संगीतानंद भरत राहिला. असे ‘रसरशीत’ आयुष्य त्यांना लाभणे हा दैवी संकेत असूही शकेल पण त्यामागे त्यांनी केलेला रियाझ, घेतलेली अविरत मेहनत आणि तोंड दिलेला संघर्ष याकडे डोळेझाक कशी करता येईल? का, “गायनकला ही ईश्वरीय देणगी आहे. ती रसिकराजापर्यंत पोहोचवणारा मी फक्त एक दूत आहे.” अशी विनम्र धारणा मनाशी बाळगून संगीतव्यवहार केल्याने त्यांना असे रसरशीत आयुष्य लाभले? ते काहीही असो, त्यांची कारकीर्द तेजाने तळपणारी राहिली हे निर्विवाद!

वर्ष १९७७. नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत पुण्यातल्या रेणुका स्वरूप शाळेच्या एका गल्लीत मी व माझे काही मित्र जमलो होतो. ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाचे नाव ऐकले होते. पण त्याआधी तेथे कधी गेलेलो नव्हतो. ती रात्र मला आजही अगदी काल अनुभवल्यासारखी आठवते. आम्ही सगळे इयत्ता दहावीचे विद्यार्थी होतो. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीचे स्वर्गीय स्वर ऐकत आम्ही शाळेच्या प्रांगणात पाऊले ठेवली आणि तिथल्या ‘स्वर-वारकरी’ पंथाचे कधी होऊन गेलो कळलेदेखील नाही. मग प्रतिवर्षी ही वारी ठरून गेली ती आजतागायत. तीन-चार हजार रसिकांच्या त्या गर्दीतून स्वर-मंचावरील कलाकार दिसायचे ते ‘एखाद्या ठिपक्याप्रमाणे’. पण शेवटच्या रांगेत बसलेल्या आमच्या कानांवर योग्य असे संस्कार करण्याची जबाबदारी मात्र त्या सर्व ठिपक्यांनी घेतली होती. त्याच रात्री आम्ही एक स्वर्गीय स्वर अशाच एका ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या कलावंताकडून ऐकला आणि ते गायन मनात साठवले. त्या स्वरांनी धारण केलेले लौकिक नाव होते – पंडित जसराज! तो अलौकिक स्वर, त्याला साथ करणारा दमदार तबला आणि स्वरांमागून त्याच लीलयेने धावणारी पेटीची साथ हे विसरू म्हटले तरी विसरू शकणार नाही. त्यानंतर १९८३च्या ‘सवाई गंधर्व’ महोत्सवापर्यंत दरवर्षी जसराजजींच्या गाण्यानं आमचे कान लाडावत नेले.

वर्ष १९८३. कडाक्याची थंडी तशीच. दिवस .... नव्हे रात्र होती ९ डिसेंबरची. त्यावर्षी मी हळूहळू माझ्या प्रकाशचित्रणाच्या व्यवसायाची सुरुवात केली होती. माझ्या गळ्यात एक एसएलआर कॅमेरा व एक फ्लॅशगन आली 

होती. आता मी आधी पाहिलेल्या त्या संगीतमय ठिपक्यांच्या म्हणजे त्या स्वर-मंचावरच्या कलाकारांच्या अगदी जवळ जाऊ शकत होतो. त्यांचे भाव, त्यांचे विभ्रम, त्यांच्या अदाकारी माझ्या कॅमेऱ्याच्या भिंगातून जवळून टिपू शकत होतो. ‘स्वर-वारी’ बरोबरच एका वेगळ्या अशा ‘दृश्य-जगताच्या’ प्रांतात मी आता पाऊल ठेवत होतो. एकामागून एक असे संगीत महर्षी आपापली कला सादर करण्यास मंचावर येत होते. माझा कॅमेरा त्याचे काम आवडीने करू लागला होता.

“आणि आता यानंतर स्वर-मंचावर येत आहेत रसिकांचे लाडके ‘संगीत मार्तंड पंडित जसराज...” निवेदकाने उद्घोषणा केली. सर्वांच्या नजरा स्वरमंचाच्या शेजारील मोकळ्या जागेकडे वळल्या आणि आपोआप टाळ्या वाजू लागल्या. वाद्ये आधीच मंचावर पोहोचली होती. इतक्यात टाळ्यांचा जोर आणखी वाढला कारण मंचापाशी येऊन उभे होते ‘स्वर-मार्तंड’ जसराज. क्रीम रंगाचे सिल्कच्या कापडाचे धोतर, त्याच रंगाचा सिल्कचा कुडता, त्यावर घातलेले जाकीट आणि त्यावरून घेतलेली काश्मिरी शाल. मागे वळवलेले लांब केस, तरतरीत असे नाक आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असलेले पंडित जसराज रसिकांना मनोमन नमस्कार करीत होते. अभिवादन करीत होते. रसिकांचा आवडता हा कलाकार स्वरमंचावर स्थानापन्न झाला. मी त्या मंचाच्या अगदी पुढे जवळजवळ खेटूनच बसलो होतो. जसराजजींनी पुढ्यातील स्वरमंडल हातात घेतले. ते छेडले. त्याच्या सुरेल तारा झंकारू लागल्या. सर्व शामियान्यात स्वरांचा अंमल सुरू झाला. पुढचा सव्वा ते दीड तास सर्व श्रोत्यांवर स्वरांचे जे गारूड जसराजजींनी केले त्याला तोड नाही. मला त्यावेळी रागांबद्दल काहीच ज्ञान नव्हते. आजही अल्पच आहे. पण त्यांनी त्यावेळी जो राग गायला त्याचं नाव मियाँ की तोडी आहे असं नंतर कळलं. ‘अल्ला जाने, अल्ला जाने’ ही गायलेली बंदिश मात्र ज्या समरसतेनी त्यांनी सादर केली ती अद्‌भुत होती. त्यांच्या काही भावमुद्रा माझ्या कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या हा दुहेरी फायदा.

त्यांचे गायन संपले. ते अजूनही स्टेजवरच होते. मी परत एकदा कॅमेरा सरसावला. बराच पुढे गेलो. आता मला माझ्या कॅमेऱ्यात त्यांच्या चेहऱ्याचा ‘क्लोज-अप’ मिळत होता. अजून एक मुद्रा बंदिस्त झाली. नंतर पुण्यातीलच एका कार्यक्रमात मी त्यांचा तो क्लोज-अप त्यांना दाखवला. ते एकदम खूष झाले. मी टिपलेले त्यांचे ते प्रकाशचित्र त्यांच्याच संग्रही राहणे ही माझ्यासाठीही अत्यानंदाची बाब होती. मला प्रोत्साहन देणारी घटना होती. 

नंतरच्या अनेक मैफलीत जसराजजींकडून कोणकोणते राग ऐकायला मिळाले याची मी उजळणी केली तर ‘नटभैरव’, ’सहेलीतोडी’, ‘अहिरभैरव’, ‘ललत’, ‘गोरखकल्याण’, ‘रामकली’, ‘भैरवी’, ‘बिहागडा’, ‘नटनारायणी’, ‘बैराग, ‘आनंद भैरव’, ‘भटियार’, ‘जोग’, ‘जयजयवंती’, ‘दरबारी कानडा’, ‘बिलासखानी तोडी’, ‘विहंगिनी’ अशी एक भली मोठी यादीच तयार झाली. पण या सर्वांपेक्षा एक वेगळी व भावपूर्ण अशी त्यांची मैफल मला ऐकता आली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगळ यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम १९८८ साली हुबळी येथे होणार होता. मला ‘किराणा घराणे’ असे एक प्रकाशचित्र प्रदर्शन सादर करण्यास मला तेथील संयोजकांनी आमंत्रित केले होते. जवळजवळ एक वर्षभर आधीपासून माझी त्याची तयारी झाली होती. तीन दिवसांचा संगीत महोत्सव, प्रकाशचित्र प्रदर्शन, गंगुबाईंवरील एका पुस्तकाचे प्रकाशन व त्यांच्या पाच दशकातील गाण्यांच्या पाच कॅसेट्सचे प्रकाशन असा भरगच्च कार्यक्रम होता. के. शिवराम कारंथ हे ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखक या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. त्यांच्या व पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते माझ्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार होते. गर्दीने ओसंडून वाहणारा तो कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. शेवटच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात पं. जसराजजींचे गायन झाले. स्वतः गंगुबाई, पं. भीमसेनजी, पं. फिरोज दस्तूर यांच्यासारखे महारथी समोर प्रेक्षकांत बसलेले. जसराजजी त्यांच्या नेहमीच्या थाटात स्वरमंचावर आले. गायनाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणाले- “इस अवसर पर मेरी बडी बहन गंगुबाईजी को मैं बधाई देता हूँ और प्रणाम भी करता हूँ। उन्होने मुझे गाने के लिये इस मंच पर सन्मानित किया है यह मैं मेरा सौभाग्य मानता हूँ। मुझे अनुमती दें।” 

त्यांनी नेहमीप्रमाणे स्वरमंडल छेडले. मैफल सुरू झाली. पहिल्या पाचच मिनिटात त्यांनी सर्व रसिकांची मने काबीज केली होती. त्यांनी त्या सकाळी ‘गुजरी तोडी’ हा राग गायला. त्यातील बंदिश होती –

‘‘चलो सखी सौतन के घर ज‍इहें
मान घटे तो का घट ज‍इहे, पी के दर्सन प‍इहें
ये जोवन अंजुरी को पानी, समो गये पछ्तैये
धोंगी के प्रभु दरश परस कर मन की तपत बुझ‍इहें
चलो सखी सौतन के घर ज‍इहें
मान घटे तो का घट ज‍इहे, पी के दर्सन प‍इहें’’

ते इतके समरसून गात होते की कोणाला कशाचेच भान राहिले नाही. तो केवळ अनुभवायचा क्षण होता. त्यांचे गायन संपले तरी काही क्षण शांतता होती. भानावर आल्यावर सर्व श्रोते उभे राहून टाळ्या वाजवू लागले त्या संपेचनात. एका बाजूच्या जिन्याने उत्सवमूर्ती गंगुबाई स्टेजवर आल्या. त्यांच्या आणि जसराजजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्या थांबवण्याचे कोणतेच कारण दोघांनाही नव्हते. कारण अश्रू हे दृश्य असले तरीही भावना केव्हाच ‘या हृदयीच्या त्या हृदयी’ पोहोचल्या होत्या. जसराजजींनी वाकून गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी एक क्षण जसराजजींच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्यांना लहान मुलासारखे कवेत घेतले. रसिकही धन्य झाले होते.

अशीच एक आठवण आहे सवाई गंधर्व महोत्सवातील, १९९१मधली. महोत्सवाचा पहिलाच दिवस होता. त्या दिवसाचे कलाकार होते जगन्नाथ (शहनाई), पं.कुमार गंधर्व, श्रीकांत देशपांडे, पं.जसराज व गिरीजा देवी. श्रीकांत देशपांडे यांचे गायन संपत आले तरी पं.जसराज रेणुका स्वरूपवर पोहोचले नव्हते. श्रीकांत देशपांडे यांना अजून एक भजन सादर करायला सांगण्यात आले. ते भजनही संपले. कलाकार स्टेजवरून खाली उतरले. तरीही पं. जसराज पोहोचले नव्हते. ग्रीनरूममध्ये अरविंद थत्ते, संजीव अभ्यंकर व इतर साथीदार वाद्य जुळवून तयार होते. त्यावेळी संपर्कासाठी मोबाईल फोन नव्हते. सगळे स्वयंसेवक काळजीत होते. ग्रीनरूमच्या बाहेर पं. भीमसेन जोशी व त्यांचे मित्र श्रीराम पुजारी एका बाकावर बसले होते. भीमसेनजींच्या चेहऱ्यावर कधी नव्हे तो ताण जाणवत होता. याचं कारण म्हणजे या आधी अशा प्रकारे ‘सवाई स्वरमंच’ इतक्या वेळ रिकामा राहिला नव्हता. एका कलाकाराचे सादरीकरण झाले की पाचच मिनिटात दुसरा कलाकार हजर असे अशी त्या मंचाची परंपरा. आज ती खंडित झाली होती. इतक्यात गाडी आल्याचा निरोप आला. पं. जसराजजींचे आगमन झाले. त्यांना वेळेत निरोप मिळाला नसल्याने सगळा गोंधळ झाला होता. ते लगबगीने ग्रीनरूममध्ये गेले. त्यांनी तानपुरे परत एकदा जुळवले. तीन तानपुरे एकाक स्वरात छेडले जाऊ लागले. हळूहळू पं. जसराजजींच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा होत गेला. पाचच मिनिटात ते स्टेजवर जाण्यास सज्ज झाले. वाद्ये स्टेजवर पोहोचली. निवेदकाने घोषणा केली – नमस्कार करीतच जसराजजी स्टेजवर पोहोचले. इतका वेळ मंडपातही असलेल्या चलबिचलीचे रूपांतर उत्साहात परिवर्तित झाले. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून जसराजजींनी गायनास प्रारंभ केला. अहीर भैरव रागाने त्यांनी सुरुवात केली. ‘रसिया म्हारा आवोजी मेरे द्वारे’ ही विलंबितमधील बंदिश गाऊन त्यांनी द्रुतमध्ये ‘आज तो आनंद आनंद’ ही कृष्णभक्ती असलेली बंदिश सादर केली. आधी झालेला उशीर, सगळ्यांच्याच मनात त्यामुळे निर्माण झालेला ताण या काही काळापूर्वीच्या घटना त्या आनंदाच्या कल्लोळात जणू वाहून गेल्या. हा बदललेला माहोल लक्षात घेत नंतर त्यांनी भैरव बहार मधील ‘बलमा ऋतू सुहानी’ या बंदिशीने त्या आनंदावर कळस चढवला. एका प्रतिभावान कलावंताने अवघड प्रसंगीही रसिकांना कसे काबीज करता येते याचे उदाहरण घालून दिले होते.

मधल्या काळात माझ्या थीम कॅलेंडरच्या निमित्ताने तीन वेळा माझा त्यांच्याशी पत्र-व्यवहार झाला. ‘म्युझिकॅलेंडर’, गुरू-शिष्य परंपरा’ व ‘स्वर-नक्षत्र’ या माझ्या तीन थीम कॅलेंडरमध्ये मी त्यांची प्रकाशचित्रे वापरली. त्यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी त्याचं कौतुकही केलं. गुरू-शिष्य परंपरा’ या कॅलेंडरमध्ये त्यांचं वर्णन करताना प्रा. अजित सोमण यांनी शब्द लिहिले होते- “The Mewati Gharana, today recognized by Pandit Jasraj -ji. He has a large repertoire of beautiful bandish compositions with a literacy value. Along with its accents on tunefulness the style also exhibits an ease in all the three octaves, amazing variety of taan patterns. The aesthetics and emotive approach in the development of a Raag creates great joy amidst the listeners. A great combination of purity and romantic beauty.” 

त्यांच्या गाण्यावर तर रसिकांनी प्रेम केलेच पण एक चाहता म्हणून व एक प्रकाशचित्रकार म्हणून मला असे म्हणावसे वाटते की – “जसराजजींना त्यांच्या गुरूंकडून जो गुरुमंत्र मिळाला तो होता –‘शुद्ध वाणी, शुद्ध मुद्रा आणि शुद्ध सूर’. त्यामुळे त्यांचं गाणं तर मनाला भिडलंच पण सुंदर मुद्रेमुळे त्यांची असंख्य प्रकाशचित्रे घ्यावीशी वाटली. अगदी माझ्या गळ्यात कॅमेरा आला त्या १९८३ सालापासून ते सवाई गंधर्व महोत्सवात शेवटचे गायले त्या गेल्या वर्षीच्या १३ डिसेंबर पर्यंत. 

तीन-चार वर्षांपूर्वी एक दिवस मी कोलकाताहून विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरलो. लांबूनच लाउंजमध्ये बसलेले पं. जसराजजी दिसले. एकटेच बसले होते. स्वाभाविकच मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. हात उंचावून ते म्हणाले – “जिओ!” मी माझी ओळख सांगितली. ते प्रसन्न हसले. म्हणाले – “मैं भी कोलकता से आ रहा हूँ। लेने के लिये कोई आ रहा है। इसलिये राह देख रहा हूँ।” माझ्या मनात विचार आला की वयाच्या या टप्प्यावर एवढा प्रवास, मैफली करण्याची उर्जा हे कुठून आणत असतील? वयाच्या ५४-५५ व्या वर्षी स्वेच्छा निवृती घेतलेली अभिमानाने सांगणारे काही चेहरे माझ्या नजरेसमोरून तरळून गेले. त्या चेहऱ्यांसाठी माझे मन गलबलून गेले.

पंडित जसराज तसे म्हटले तर शेवटच्या श्वासापर्यंत गात होते. वयाच्या ८९व्या वर्षी ‘सवाई’त गायले. त्या नंतर अवघ्या दोन महिन्यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी पोहोचले. मग सारे जग ‘कोरोना’मय झालं. तरी यांचे ऑनलाईन शिकवणे सुरूच होते. तीन महिन्यांपूर्वी १७ ऑगस्टला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ‘जसराज’ नावाचे एक सांगीतिक जीवन संपले होते. पण त्याचे गाणे संपले नाहीये, त्यांनी घडवलेल्या असंख्य शिष्यांच्या मुखातून ते वारंवार प्रकटत राहणार आहे हा केवढा तरी दिलासा. 

माझी अशी खात्री आहे की हा इहलोक सोडून जाताना पंडितजींच्या मनात त्यांच्या आवडत्या अहीर भैरव रागातील ही बंदिश त्यांनी नक्की आळवली असेल.....

“आज तो आनंद पूरण ब्रह्म 
सकल घट व्यापक, सो आयो ग्रहनंद 
गरग, पराशर और मुनि नारद 
पढत वेद श्रुति छंद, हरिजीवन प्रभु
गोकुळ प्रकटे, मिटे सकल सुख द्वंद्व”

संबंधित बातम्या