फ्लेमिंगो

शिरीन म्हाडेश्वर
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

सुखाची, प्रेमाच्या परतफेडीची आस असणं साहजिक आहे. योगासनामधल्या शेवटच्या टप्प्यावर पोचायची घाई असण्याइतकंच ते साहजिक आहे. पण खरी गंमत असते ती तिथं पोहोचण्यामध्ये. फ्लेमिंगो करताना पोटाचे स्नायू आत खेचून, एका पायावर उभी राहून स्वतःमध्ये तल्लीन होऊन जेव्हा खाली झुकतेस तेव्हा खरं आसन घडत असतं.

‘‘जिचा काही उद्देश नाही अशी प्रत्येक गोष्ट जाऊ द्या.. अडगळ होऊन राहिलेलं सामान.. ज्यांचं आयुष्यात काहीच स्थान नाही अशी माणसं.. गुंता झालेले मनातले विचार.. जाऊ द्या” गेला तासभर चाललेल्या काटेकोर योगासनांनंतर थकलेली चिलमन हळूहळू शवासनात जात होती.

शनिवार सकाळच्या सुझॅन लीच्या या योगासनांच्या तासाला ती न चुकता हजर असायची. दर महिन्याला एका नवीन पोझवर ट्रेनिंग देत सुझॅन वेगवेगळी आसनं विद्यार्थ्यांना शिकवत असे. या महिन्याची पोझ होती ‘फ्लेमिंगो’. हंसक पक्ष्यासारखं एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात दुमडणं. त्या दुमडलेल्या गुडघ्याला समोरून वळसा घालून फिरवलेला हात दुसऱ्या हातानं पाठीवर पकडणं आणि शेवटी कणा वाकवून समोर झुकणं. आजची फ्लेमिंगो पोझ चिलमनला खास जमली होती. स्वतःवर खूष होणार तितक्यात सुझॅनने टिप्पणी केली.. 

“पोझमध्ये येण्यासाठी लागणारा फॉर्म पक्का हवा. शेवट गाठणं महत्त्वाचं नाही. तिथं कसं पोचतो ते महत्त्वाचं..” 

हिमालयात कुणा एका गुरूंकडून बरीच वर्षं योगाभ्यास केल्यानंतर अमेरिकेत परत येऊन एका योग स्टुडिओमध्ये इन्स्ट्रक्टर असलेली सुझॅन तिच्या योगासनांच्या निपुणतेसाठी ज्ञात होती. सहसा दुर्लक्षित राहणाऱ्या शवासनाचा एक वेगळाच अनुभव देण्याची खास देणगी सुझॅनमध्ये होती. शेवटच्या सात मिनिटांमध्ये तिचं संथ आवाजातलं लयबद्ध बोलणं, अधूनमधून पेरलेलं साधं जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि हळूहळू सगळ्या संवेदना बधिर करून टाकणारा काही क्षणांचा अपार्थिवाचा अनुभव असं अद्‌भुत मिश्रण त्या शवासनात असायचं. एकदा तिथं आलेलं कुणीही पुन्हा कधीच सोडून न जाण्यामागे हे शेवटचं आसन हे खचितच एक मुख्य कारण होतं. या गोष्टीचा कुणी कधी उघडपणे स्वीकार केला नसला तरीही. 

गेले कित्येक शनिवार चिलमनही नित्यनेमानं इथं येत होती. क्लास व्यतिरिक्त कधीच कुणाशी न बोलणाऱ्या सुझॅनला स्वतःच्या या विलक्षण अनुभवाबद्दल सांगायचं म्हणून एकदा क्लासनंतर ती थोडा वेळ तिथं घुटमळली खरी; पण सुझॅनशी नजरानजर झाली आणि थोड्या क्षणांसाठी मेंदूत गच्च धुकं दाटल्यासारखं झालं. स्वतःचं नावही लक्षात येईना इतपत. पाच क्षणांनी भानावर आली तेव्हा पन्नास टकीला शॉट्स घ्यावेत आणि हँगओव्हर न येता फक्त हवेत तरंगत राहावं असं काहीतरी अद्‌भुत वाटत होतं. त्या तरंगणाऱ्या अवस्थेतच ती घरी आली आणि सुझॅनशी बोलायचं राहून गेलं. पुढच्या शनिवारी सुझॅनशी बोलायला तिनं पुन्हा तोंड उघडलं आणि यावेळी का कुणास ठाऊक शब्दच बाहेर फुटेनात. वाचा गेल्यासारखं. जीभ, ओठ नसल्यासारखं. त्या नेमक्या क्षणांमध्ये सुझॅन चिलमनकडे पाहून किंचित हसत म्हणाली.. 

“काहीही सांगू नकोस. मला माहितेय..” 

तेव्हापासून सुझॅनशी काही संवाद साधायचं तर राहूद्या; पण क्लास व्यतिरिक्त सुझॅनकडे साधं पाहायचंही धाडस कधी चिलमननं केलं नाही. मात्र ती तिथं येत राहिली. प्रत्येक शनिवारी. हळूहळू या संवेदनारहित अवस्थेत जाण्याचं जणू व्यसन लागावं इतपत. 

आजचा शनिवारही याला अपवाद नव्हता. पण चिलमन आज काहीतरी वेगळंच ठरवून आली होती. मागचे तीन दिवस तिच्या डोक्यात काहीतरी रेंगाळत होतं आणि आज त्याच्यावर अंमल करायची वेळ आली होती. घरून इथं यायला निघताना पुन्हा मागं फिरून आकाशला तिनं एक घट्ट मिठी मारली. फोनमध्ये गुंग असलेल्या आकाशने तिला “हां, ठीक आहे” असं म्हणत जवळजवळ झिडकारल्यासारखंच बाजूला केलं आणि स्वतःच्या निर्णयाची तिला आणखीनच खात्री पटली. 

“पायाची बोटं... नाहीशी झालीयेत... पाय... भारहीन... नाहीसे... वितळून जाऊ देत..” सुझॅनच्या शब्दांमध्ये असलेल्या अनाकलनीय ताकदीनं चिलमनचा एकेक अवयव हळूहळू संवेदनाहीन होत होता. शवासनाच्या मध्यावर नेहमी एक क्षण येई जेव्हा पूर्ण शरीरालाच जणू अमूर्ताचा आभास होत असे. गच्च अंधारातही सुझॅनला तिथली सगळी थकलेली शरीरं आणि त्यांमधून क्षणभराची का असेना पण उसंत घेणारी भागलेली मनं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत. त्या ठिकाणी जास्त न रेंगाळता सुझॅन लगेचच या मनांचा पुन्हा इंद्रियप्रवेश करण्याचा प्रवास चालू करत असे. मनाला हे असं क्षणभर का होईना पण कायामुक्त झाल्यामुळं मिळणारी विश्रांती चिलमनला सारखी मोहवत होती. आज तिला परत यायचं नव्हतं. जाणीवपूर्वक. 

****

“हॅलो ९११? इमर्जन्सी आहे. आमच्या स्टुडिओमधली एक विद्यार्थिनी बेशुद्ध झाली आहे. पल्स लागते आहे पण डोळे उघडत नाहीये. शरीर थंडगार पडलंय..” फ्रंट डेस्कवरची लॉरा कळकळीनं लवकर अँब्युलन्स पाठवण्याची विनंती करत होती. एव्हाना दूरवर सायरनचा आवाजही ऐकू येऊ लागला होता. क्लासला आलेल्या इतर विद्यार्थ्यांची लगबगीनं निघायची घाई सुरु झाली. उगीच तिथं गर्दी करून थांबण्यात अर्थही नव्हताच. पुढचा तास रद्द करण्यात आला होता. अँब्युलन्स आली तशी पॅरामेडिक्स टीमला लॉरा आत हॉलमध्ये घेऊन गेली.

“इमर्जन्सी कॉन्टॅक्टला फोन कर सुझॅन.. लवकर!! हे क्रिटिकल आहे..” लॉरा जवळजवळ किंचाळलीच! यांत्रिकपणे सुझॅन सिस्टीममध्ये कस्टमर रेकॉर्डस चेक करू लागली; पण जे डोळ्यासमोर घडलं होतं त्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.  

आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी तिच्या खास शक्तीला असं स्वतःच्या इच्छेनुसार वागवलं होतं. चिलमन शवासनात असताना तिच्या तर्जनीचा आग्नेय दिशेशी असलेला १२७ अंशाचा कोन आणि फ्लेमिंगो मुद्रेत असताना तिच्या बुबळांचा असलेला परीघ यांची मनातल्या मनात आकडेमोड सांधत सुझॅननं स्ट्रेचरवरून बाहेर नेल्या जाणाऱ्या चिलमनकडे पाहिलं. त्या आकड्याशी तादात्म्य असलेल्या अंतरावर शरीराबाहेर तरंगणारं चिलमनचं मन तिला यावेळी स्पष्ट दिसत होतं. अजूनही थकलेलं भागलेलं. जगातल्या मूर्त गोष्टींपासून, माणसांपासून दूर पळून जाऊ पाहणारं.   

****

मिनिओला युनिव्हर्सिटी मेडिकल सेन्टरच्या अतिदक्षता विभागातला चिलमनचा हा चौथा आठवडा. गेले कित्येक दिवस तिला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर्स कसोशीनं प्रयत्न करत होते. पण अजिबातच यश न यावं अशी ही पहिलीच केस. वरकरणी पाहता कंडिशन स्टेबल होती. रक्तदाब, हृदयाचे ठोके अशी महत्त्वाची सगळी प्रमाणं नियंत्रणात होती. रक्ताच्या चाचण्या, एमआरआय, सीटी स्कॅन कुठंही काहीच बोट लावायला जागा नाही. मग असं काय घडलं असावं ज्यानं एखादी व्यक्ती कोणत्याच बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद न देता अशी दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत जावी? बऱ्याच वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना हा प्रश्न जसा वैद्यकीय दृष्ट्या सतावत होता तसाच तो सुझॅनलाही दिवसेंदिवस छळत होता. एक पाऊल पुढं जाऊन तिला हेही ठाऊक होतं की वैद्यकशास्त्राकडे या प्रश्नाची उकल नाही. तिला जे दिसलं होतं त्यावर कदाचित कुणीच विश्वास ठेवणार नव्हतं. पण इतर कुणाला ते पटवून देण्यापेक्षाही चिलमनला यातून बाहेर कसं आणायचं याची काळजी तिला जास्त भेडसावत होती. असं काय घडलं असावं; ज्यामुळं अवघ्या तीसेक वर्षांच्या, वरकरणी व्यवस्थित दिसणाऱ्या एका मुलीला असं असामान्य पाऊल उचलावंसं वाटलं? 

चिलमन बेशुद्ध झालेल्या दिवसापासून सुझॅननं स्टुडिओमध्ये फिरकली नव्हती. हिंमतच नव्हती झाली पुन्हा कुणाला शवासनात नेण्याची. स्वतःच्या चारशे स्क्वेअर फुटांच्या छोट्याशा अपार्टमेंटमधून गेले कित्येक दिवस ती बाहेरच पडली नव्हती. तिला चिलमनला भेटायची जबरदस्त इच्छा झाली. त्याच क्षणी खिडकीच्या तावदानावर बसलेला किरमिजी रंगाचा पक्षी पंख फडफडवत अस्वस्थ चिरकायला लागला. चिलमन इथंच कुठंतरी आसपास होती तर.  सुझॅननं बाहेर पाहिलं. बाहेर पावसाची सतत रिपरिप चालूच होती. खिडकीतून डोकावणाऱ्या प्लुमेरियाच्या झाडाची फांदी हलकीशी जवळ खेचत, तिच्या ओल्या पानावर नाक घासत तिनं डोळे मिटले अन एक दीर्घ श्वास घेऊन बाहेर शून्यात पाहत ती म्हणाली,

“कशी आहेस चिलमन? आवडतेय ही अशी बिनशरीर भटकंती?”

पलीकडून उत्तर आलं नाही. पण सुझॅनला माहीत होतं चिलमनचं मन तिथंच कुठंतरी घुटमळतंय. 

“मी तुझ्यावर खूप नाराज आहे चिलमन. तुझ्यासमोर मनःशांतीचं दालन खुलं केलं ते या जगाला आनंदानं हसतहसत सामोरं जाण्यासाठी आणि तू तिथेच जाऊन बसलीस? कशापासून पळून जाते आहेस एवढी?”

“माणसांपासून. आकाशपासून. त्याच्यावर निरतिशय प्रेम करण्यापासून. त्या प्रेमामुळं येणाऱ्या वेदनेपासून..” सुझॅनच्या घरातल्या ओमकाराच्या फोटोसमोरील उदबत्तीच्या ठिपकणाऱ्या निखाऱ्यातून आवाज आला.. “किती किती म्हणून प्रेम केलं मी त्याच्यावर! अगदी स्वतःला विसरून. पण वाट्याला दरवेळी आला तो फक्त तुसडेपणा. अवहेलना. हेटाळणी. अपेक्षाभंग. दमले होते मी तो देऊ शकत नसलेल्या प्रेमाचा पाठपुरावा करताना.”

“मग असं गायब होऊन, पळून जाऊन तरी काय साध्य होईल असं वाटतं तुला?”

सुझॅननं त्या निखाऱ्यावर नजर रोखली. पुढचे काही क्षण तरी तिचा चिलमनवर ताबा होता.. 

त्या जिवाला प्रचंड काहीतरी सलतंय, खुपतंय हे सुझॅनला जाणवत होतं. हा नेमका सल कधीतरी तिनंही अनुभवला नव्हताच का? पुलाखालून किती पाणी वाहून गेलं त्यांनतर. आणि वेदना निव्वळ एक विधान बनून राहिली. 

“हे ‘तू’ मला सांगतेयस सुझॅन? मग तू स्वतः का सगळं सोडून निघून गेलीस वीस वर्षांपूर्वी? पळूनच तर गेली होतीस ना?”

चिलमनला हे कसं समजलं हे विचारणं व्यर्थ होतं. काळ, वेळ आणि इतर सगळ्या मितींच्या पलीकडच्या जगात तिचं वास्तव्य हे एकमेव उत्तर होतं तिच्या प्रत्येक वाक्यामागचं. 

****

लहानपणापासून सुझॅननं जर काही पाहिलं होतं ते फक्त आईवडिलांचं एकमेकांना बोचकारणं. शाब्दिक लढाया. सततची भांडणं. मारामाऱ्या. स्वप्नांमध्ये पऱ्या, राजकुमाऱ्या नी ढगांच्या दुलईत लपेटलेला चांदोबा पाहायच्या कोवळ्या वयात रात्री अपरात्री मधूनच कधी जाग आली तर दुसऱ्या रूममधून ऐकू यायचं ते आईचं जोरजोरात रडणं, वडिलांचं अंगात सैतान शिरल्यासारखं तिच्यावर ओरडणं. लहानपणीच्या आठवणींमध्ये काही होतं तर ते दुःखाची अवकळा पसरलेलं घर.. वडिलांचं मध्येच एक-दोन आठवडे गायब होत राहणं आणि आईचं एकसारखं टिपं गाळत राहणं. मन मोकळं करायला, हे दुःख वाटून घ्यायला कुणी भावंडंही नाही. शाळेत गेल्यावर, नंतर संध्याकाळी इतर मुलांबरोबर खेळताना हे सारं विसरायला व्हायचं. पण अंधार पडला आणि घरी परतायची वेळ आली की आता पुढं काय वाढून ठेवलंय ते लगेच डोळ्यांसमोर यायचं. कसंबसं स्वतःला रेटत घरी यायचं आणि नवनव्या रूपांत तेच चित्र पाहात राहायचं. 

वीसेक वर्षं झाली असतील आता त्या दिवसाला. घरातल्या या क्लेशांना कंटाळून सोळा-सतरा वर्षांची सुझॅन तडक एक दिवस घराबाहेर पडली ती पुन्हा न परतण्यासाठीच. मित्रमैत्रिणींबरोबर राहून, मिळेल ते काम करत उघड्यावरचं जिणं. महिन्यागणिक बदलणारे बॉयफ्रेंड्स. डोक्यावर मायेचं छत्र नाही ना पाठीवर सुरक्षेचं कवच. सुसाट सैराट काहीही आगापीछा नसल्यासारखी एक दिवस पाठीवर एक बॅग आणि जोडीला चार कपडे घेऊन ती एका फिरत्या समूहाबरोबर भारतात जाऊन धडकली. वाराणसीमध्ये. एका भटक्या पंथामध्ये जाऊन दिवसभर गाणी म्हणायची, मनाला वाटेल तसं जगायचं, नशेत धुंद राहून वाटेल त्याच्याशी संग करायचा हीच आयुष्याची परिभाषा. 

“तुला माहितेय चिलमन.. आयुष्यभर मी माझ्या दुःखांचा समोरासमोर सामना कधीच करू शकले नाही. आपलं आजमितीस काय चुकलं, आपल्याला इतकं कठोर आणि दुर्लक्षिलेलं बालपण का मिळालं, या प्रश्नाचं उत्तर मला कधीच सापडलं नाही. फक्त पळत राहीले दुःखापासून. प्रश्नांपासून. वाराणसीसारख्या एका छोट्या शहरात आठ वर्षं काहीही न करता फक्त नशेच्या आधीन होऊन राहिले. वास्तव टोचत होतं म्हणून एका काल्पनिक जगात राहायला लागले. पण जेव्हाजेव्हा वास्तवाला भिडले तेव्हातेव्हा जाणवलं की दुःख गेलंच नाही. ते नेहमी तिथंच होतं. माझी वाट पाहात.”

चिलमनही अजून तिथंच होती. तिच्यावरचं नियंत्रण सोडून दिलं तरीही. 

“अखेरीस वाराणसीलाच गंगेच्या काठावर एक योगी गृहस्थ भेटले. आई, वडील, भाऊ, बहीण, गुरू, सखा सगळी नाती एका माणसामध्ये एकवटून यावी असा तो ज्ञानी पुरुष. एकही प्रश्न न विचारता त्यांच्या मागं हिमालयावर गेले. योग शिकले. साधना करू लागले. आजूबाजूच्या सृष्टीमध्ये विरघळून जाऊ लागले. मनात इतकी वर्षं माजलेली खळबळ शांत होऊ लागली. 

घराबाहेर पडल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी एक दिवस आईशी बोलावंसं वाटलं म्हणून घरी फोन केला. तेव्हा समजलं की ती पाच वर्षांपूर्वीच निवर्तली होती. बाबानं 

दुसरं लग्न केलं होतं. नवा संसार थाटला होता. तो आनंदात होता. स्थिरस्थावर झाला होता. कोण आनंद झाला त्याला माझा आवाज ऐकून. मला म्हणाला, ‘बाळा घरी ये.. तुझी खूप आठवण येते’ एवढे ड्रग्स घेतले; पण बाबाच्या त्या आर्जवानं काळीज जसं सुखावलं, मन मोहरलं तशी जादू तोवर कोणत्याच नशेत अनुभवली नव्हती. त्याच्या एका प्रेमळ हाकेसाठी माझ्यातली लहान मुलगी आयुष्यभर तडफडत होती. मी परत अमेरिकेत यायचं ठरवलं.” 

परतताना वाटलं.. जिथून आलेय तिथेच चाललेय. त्याच बाबाकडे, त्याच आठवणींकडे, त्याच देशात. पुंजीला काहीच जमलं नाही. मग हा एवढा प्रवास कशासाठी घडवला नशिबानं? 

पण इतक्या वर्षांचा हा प्रवास म्हणजे निव्वळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही हेदेखील कुठंतरी कळत होतं. बाबाकडे माझ्या चुरगळलेल्या बालपणाचा गुन्हेगार म्हणून बघणारी नजर आता पूर्वीसारखी दाहक राहिली नव्हती. बाबा तर तोच होता. पण त्याला काही समजावून पटवून देण्यात अंगातली शक्ती आता वाया जात नव्हती. त्याला माफ केल्यानं एका खूप मोठ्या ओझ्यातून मी स्वतःच मोकळी होत होते. आपल्या माणसांवर आपण निरपेक्ष प्रेम करावं, त्यातून मिळणाऱ्या जमाखर्चाचे हिशोब मांडायला जाऊ नयेत हे शहाणपण माझं मलाच कमवावं लागलं गं, चिलमन..”

टेबलावरच्या फुलदाणीतलं पाणी हललं. डुचमळू लागलं. चिलमनच्या अश्रूंनी फुलदाणीतलं पाणी झपाझप वाढू लागलं. उतू जाऊ लागलं. स्वतःचं शरीर सोडून एवढे दिवस लोटले तरी तिचं मन मात्र अजूनही अस्वस्थ भटकतच होतं. 

“सुखाची, प्रेमाच्या परतफेडीची आस असणं साहजिक आहे. योगासनामधल्या शेवटच्या टप्प्यावर पोचायची घाई असण्याइतकंच ते साहजिक आहे. पण खरी गंमत असते ती तिथं पोहोचण्यामध्ये. फ्लेमिंगो करताना पोटाचे स्नायू आत खेचून, एका पायावर उभी राहून स्वतःमध्ये तल्लीन होऊन जेव्हा खाली झुकतेस तेव्हा खरं आसन घडत असतं. त्यातला आनंद असा एका क्षणापुरता तोलू नकोस चिलमन..” 

“सुझॅन बेटा! अगं काय अशी एकटीएकटी बोलत राहतेस!” आतल्या खोलीमधून एक क्षीण थरथरता आवाज आला.  

“तू उठलास का बाबा? मला बोलवायचंस ना..पाणी हवंय का?”

“आजही तुझ्या स्टुडिओमध्ये गेली नाहीस बाळा? किती दिवस स्वतःला कोसत राहशील त्या मुलीसाठी! इतरांना माफ करायचं शिकलीस तशी आता थोडं स्वतःलाही माफ करायला शीक. इतरांना एवढे धडे देतेस ना.. त्यामधला पहिला आणि शेवटचा धडा तोच. मधे बाकीचं सगळं रामायण..”

काही न बोलता सुझॅन तिथल्या तिथं निश्चल 

उभी होती. खिडकीशेजारच्या शेगडीवर ठेवलेलं 

पाणी गॅस पेटवलेला नसतानाही उकळायला लागलं. 

गडद तांबूस रंगाच्या वाफेची वर्तुळाकार वलयं हवेत 

विरून जाऊ लागली. इतका वेळ निष्प्राण असल्यागत भासावा असा जागचा न हललेला खिडकीवरचा पक्षी भरारी घेत आकाशात झेपावला. 

तितक्यात फोन किणकिणला.. “मॅडम.. मिनिओला हॉस्पिटलमधून बोलतेय.. गुड न्यूज आहे..”

सुझॅनच्या शब्दांमध्ये असलेल्या अनाकलनीय ताकदीनं चिलमनचा एकेक अवयव हळूहळू संवेदनाहीन होत होता. शवासनाच्या मध्यावर नेहमी एक क्षण येई जेव्हा पूर्ण शरीरालाच जणू अमूर्ताचा आभास होत असे. गच्च अंधारातही सुझॅनला तिथली सगळी थकलेली शरीरं आणि त्यांमधून क्षणभराची का असेना पण उसंत घेणारी भागलेली मनं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत.

संबंधित बातम्या