मनी वसे ते...

द्वारकानाथ संझगिरी
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

...मला जाग आली. मला बायको हलवून जागं करून विचारत होती, ‘झोपेत काय बडबडतोयस. काही वाईट स्वप्न पडलं का?’ मी म्हटलं, ‘अगं सर्वात आशावादी स्वप्न मी आज या कोविडच्या दिवसांत पाहिलं.’

ती रात्र होती. पॅरिसमधला सगळ्यात सुंदर रस्ता म्हणजे शाँझ-एलीझे! ला पॅलेस द काँकर्डपासून सुरू होतो तो समोर आर्क द ट्रिऑम्फ (arc de tromphe)ला संपतो. तो रस्ता मस्त रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला होता. आयफेल टॉवर रात्रीत रमलेलं पॅरिस पाहत होता. त्या भव्य रस्त्यावरचे पब्ज आपल्याच धुंदीत नाचत होते. आर्क द ट्रिऑम्फच्या दिशेनं चाललो होतो. मी पंचविशीतला. रंग गोरा झालेला. डोक्यावर कुरळे सोनेरी केस, डेव्हिड गावर या क्रिकेटपटूसारखे. माझ्या हातात हात घालून होती एक विशीतली मुलगी. चेहरा माझ्या बायकोसारखा. अंगात कपडे सिनेमातल्या करीना कपूरसारखे. तिचेही केस सोनेरी. मी तिला डेटवर घेऊन चाललो होतो. फुटपाथवरचंच कोपऱ्यातलं एक टेबल घेतलं. शॅम्पेन मागवली. वेटर ती मस्तपैकी बर्फाच्या भांड्यात घेऊन आला. तिनं सांगितलं, ‘ती बाटली आधी जोरात हलव.’ वेटरनं ती हलवली. मग बूच उघडलं. वाघानं झेप घ्यावी तशी शॅम्पेननं फेसाळत बाटलीबाहेर झेप घेतली. शॅम्पेन दोन निमुळत्या ग्लासात ओतली. ग्लासाला ग्लास भिडले. एक घोट आत गेल्यानंतर मी तिला म्हटलं, ‘ज व्हूज एमे’ (आय लव्ह यू) ग्लास बाजूला जाऊन आमचे ओठ एकमेकांजवळ सरकले... आणि इतक्यात बाहेर वीज चमकली. ढगांचा गडगडाट सुरू झाला. मला जाग आली. मी गादीवर झोपलो होतो. बायको बाजूला घोरत होती. ती विशीतली नव्हती. तिचे केस सोनेरी नव्हते. मीसुद्धा पंचविशीतला नव्हतो. केस सोनेरी नव्हते. बाजूला कमनीय बाटली होती. पण त्यात पाणी होतं. त्यातले दोन घोट मी प्यायलो आणि वर्तमानातली असहायता मला जाणवली. कोरोनानं जून-जुलैच्या युरोपियन समरची सर्व स्वप्नं उद्ध्वस्त केलेली आहेत, हे मला लक्षात आलं... निराश होऊन मी कुशीवर वळलो. 

पॅरिसमध्ये पहिल्यांदा फिरताना मला वाटलं होतं, की पूर्वीप्रमाणे देव प्रसन्न होणार असेल तर मी पाहिजे तेवढं तप करायला तयार आहे. एवढीच अपेक्षा आहे, की मला पाच वर्षांसाठी त्यानं पुन्हा तारुण्य द्यावं आणि विशीत नेऊन ठेवावं. तेसुद्धा पॅरिसमध्ये. 

हे स्वप्न कुठंतरी सुप्त मनामध्ये जाऊन झोपलं होतं. त्याला अचानक जाग आली आणि मला ते पॅरिसला घेऊन गेलं. पण ते एवढं खट्याळ की बायकोलाच त्यानं मैत्रीण केलं. तिथं  नवीन लेखात घुसू दिलं नाही. स्वप्नानंसुद्धा भारतीय संस्कृती सोडली नाही. 

त्या अंधारात दोन दिवे लख्खपणे पेटले, स्वप्न आणि मन! 

त्यांना कुणी जखडून ठेवू शकत नाही. त्यांच्या फिरण्यावर कोविडची बंधनं नाहीत. त्यांना व्हिसा लागत नाही. त्यांना विमान लागत नाही... आणि मग त्यांच्या आधारे मी फिरायला लागलो. 

एकदा मी डेट रिलिंगचा अनुभव घेतला. माझ्या मुलाच्या घरातून स्वीमिंग पूल दिसतो. रोजच मी त्या स्वीमिंग पूलवर जमलेली कबुतरं पाहत असतो. तशी ती नेहमीप्रमाणं जमली होती. मला नेहमीप्रमाणं त्यांचा हेवाही वाटला. ते कशी उडून कुठंही जायला स्वतंत्र आहेत... आणि मी मात्र अडकलोय माझ्या घरामध्ये. आतमध्ये. चार भिंतींच्या आड. बाहेर जाता येत नाही. फिरताही येत नाही. बघता बघता मी त्यांचे पंख घेतले आणि थेट व्हिएनामध्ये गेलो. ते मला आवडलेलं शहर. तिथल्या सौंदर्यशाली राजवाड्याजवळ एक कॅफे आहे, त्या कॅफेत कॉफी प्यायला सिगमण्ड फ्रॉईड यायचा, असं आमचा एकदा गाइड म्हणाला. त्या व्हिएन्ना दर्शन बसमधून उतरताना मी गाइडकडून त्या कॅफेचा पत्ता घेतला आणि तिथं गेलो. त्या कॅफेच्या मॅनेजरशी बोललो. त्याला सिगमण्ड फ्रॉईडबद्दल विचारलं. त्याला फारसं काही माहीत नव्हतं. पण तो साधारण कुठं बसायचा, ती बाजू आणि ते टेबल त्यानं मला दाखवलं. ती जागा मोकळी होती. त्यावेळी मी कॉफी मागवून तिथं बसलो. संध्याकाळ होती त्यामुळं कॅफेत अनेक माणसं कॉफी प्यायला आलेली होती. ती सर्वत्र बसलेली होती. मला वाटतं त्यांचा काही फ्रॉईडशी संबंध किंवा त्यांना काही फ्रॉईडशी देणंघेणं नव्हतं. पण हा फ्रॉईड कुठंतरी माझ्या मनात होता. त्या दिवशी कबुतराचे पंख घेऊन मी थेट तिथं गेलो आणि माझ्या मनानं कालचक्रसुद्धा फिरवलं. मी १८९० वगैरे सालात गेलो. कॉफीचा ग्लास घेऊन मी जिथं फ्रॉईड बसायचा तिथं बसायला गेलो. बोधी वृक्षाच्या खाली बसल्यानंतर फक्त बुद्धालाच ज्ञान मिळतं. सर्वांना नाही मिळत. पण हे ठाऊक असूनही मी त्या खुर्चीवर बसायला गेलो. ते केवळ त्या खुर्चीचं ऐतिहासिक महत्त्व होतं म्हणून. 

 तिथं एक दाढीवाला म्हातारा बसला होता. फोटोतल्या सिगमण्ड फ्रॉईडसारखा दिसत होता. मी युरोपियन संस्काराप्रमाणे त्याला ‘बॉस, गुड ईव्हिनिंग’ केलं आणि म्हटलं, ‘इथं सिगमण्ड फ्रॉईड बसायचा ना?’ 

तो हसला आणि म्हणाला, ‘हो, ठाऊक आहे. मीच तो सिगमण्ड फ्रॉईड.’

मी जवळपास किंचाळलोच, ‘तू! तू इथं कसा?’ 

‘अरे तू कालचक्र फिरवलंस ना. मी आलो. तुला मला काय सांगायचं ते सांग.’ 

मी परत आश्चर्यानं, ‘हो! म्हणजे तू सायको अॅनालिसिसच्या विषयात प्रचंड काम करून ठेवणारा सिगमण्ड फ्रॉईड? आम्हा पामरांना त्यातलं काही कळत नाही. पण तुझी दोन संशोधनं मला प्रचंड भावली होती. एक सबकॉन्शस माइंड - अंतर्मनाचा तू केलेला अभ्यास. म्हणूनच मी तुला आज भेटू शकलो आणि दुसरं ओडिपस सिंड्रोम.’

त्याच्या भुवया उंचावल्या आणि त्यानं मला विचारलं, ‘तुला ओडिपस सिंड्रोम ठाऊक आहे?’ 

मी, ‘अगदी मोघम. ग्रीक पुराणातली ती एक व्यक्तिरेखा, त्यानं आपल्या पित्याला ठार केलं आणि सख्ख्या आईबरोबर लग्न केलं. या कथेवर पुढं नाटकं निघाली आणि युरोपात ती प्रचंड गाजली.’

‘ठीक आहे. पण नेमकं काय भावलं तुला?’

‘तू मग सिद्धांत मांडलास, की मुलींना बापाचं आकर्षण असतं आणि आईला मुलाचं. आजच्या समाजातसुद्धा ही पचणारी गोष्ट नाही. आमच्या हिंदी सिनेमानं तुझा स्वप्न आणि ओडिपस सिंड्रोम मस्त पसरवला.’ 

‘हिंदी सिनेमा? हिंदी सिनेमा म्हणजे काय?’

‘अरे, मी तुला सांगायचंच विसरलो, आमची जी भाषा आहे, ती आहे हिंदी आणि त्या भाषेत प्रचंड प्रमाणात सिनेमे निघतात. हॉलिवूडच्या खालोखाल आता बॉलिवूडचं नाव घेतलं जातं. खरं तर आम्ही बॉलिवूडवाले हॉलिवूडच्याही वर आहोत असं आम्हाला वाटतं. तिथं पूर्वी जे सिनेमे निघत त्या सिनेमांमध्ये नेहमी नायिकेचा बाप श्रीमंत असायचा आणि नायिकेला आई नसायची, असलीच तर ती सावत्र असायची. तिला छळणारी असायची. तसंच मुलाला फक्त आई असायची. ती गरीब असायची. मुलाला बाप नसायचा. खोलवर विचार केल्यावर मला पटलं, हा तुझ्या ओडिपस सिंड्रोमचाच प्रकार आहे. हिंदी सिनेमात उचलेगिरी बरीच असायची. त्यांनी ती तुझी उचलेगिरी केलेली दिसते.’

‘ओ, इंटरेस्टिंग.’

‘त्याचबरोबर स्वप्न याचा उपयोग हिंदी सिनेमानं एवढा केला, की त्यांनी तुला रॉयल्टी द्यायला हवी.’

‘म्हणजे?’

‘स्वप्न म्हणजे अंतर्मनात जे असतं ते वर येतं. म्हणून तर आमच्याकडं म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आमची मंडळी म्हणतील, ‘हॅ! हे सगळे शोध फ्रॉईडच्या आधी आम्हीच लावले. सध्या तशी एक स्टाइल आहे. फॅशन झालीय. 

हं तर मी काय सांगत होतो तुला? हिंदी सिनेमा. 

राज कपूरनं ‘आवारा’त एक स्वप्नगीत पेश केलं. स्वप्नगीत म्हणजे काय? जे अंतर्मनात आहे ते व्यक्त करणारं गीत. जे तूच सांगितलं. नंतर या गीताचा सुकाळ आला. अगदी काल परवापर्यंत म्हणजे २००० सालापर्यंत स्वप्नगीतं पाहायला मिळायची. पूर्वी स्वप्नगीत हे स्टुडिओत साकार व्हायचं. स्टुडिओत एक सेट लावला जायचा आणि त्यात ते साकार व्हायचं. त्यानंतर गाणी स्वित्झर्लंड, तुमच्या ऑस्ट्रिया, जर्मनी, इंग्लंडमध्ये साकार व्हायला लागली. म्हणजे काय हिरो-हिरॉईन राहतात मुंबईत, पण त्यांचं मन त्यांना धाडकन स्वित्झर्लंडमध्ये घेऊन जातं आणि मग ते तिथं नाचायला लागतात. 

त्यामुळं मला एक सिनेमाप्रेमी म्हणून तुला भेटून तुझे आभार मानायचे होते, की तू आमच्या हिंदी सिनेमावर किती प्रभाव टाकला आहेस. हे मला तुला सांगायचं होतं. ती आज संधी मला मिळाली.’

मी सिगमण्ड फ्रॉईडच्या ग्लासाला ग्लास भिडवून कॉफीचा सिप घेतला. तेवढ्यात बायकोनं हलवलं आणि विचारलं, ‘कुठल्या तंद्रीत आहेस? समोरच्या घरात कुणी खास आहे का? नाही, तू ग्लास कुणालातरी उंचावून दाखवतोयस म्हणून म्हटलं.’ 

मी अजूनही त्याच स्वप्नात होतो, ‘तो फ्रॉईड कुठं गेला?’ 

ती म्हणाली, ‘ही कोण फ्रॉईड?’ 

मग मी लगेच भानावर आलो. नाहीतर बायकोला संशय आला असता, की कोविडचा परिणाम माझ्या डोक्यावर झालाय. तिला कुठं सांगणार की माझं अंतर्मन बोलत होतं. 

पण पायातली भिंगरी आता मनानं घेतली होती आणि बघता बघता मी परमुलखात जात होतो. एकदा घरच्या छोट्या बारवर मी थंड वाईन चाखत होतो. मद्य ही एकांतात एकट्यानं घ्यायची गोष्ट नाही. ती काय कादंबरी आहे? घेतली हातात आणि एकटा वाचत पडायला. पण नाइलाज होता. परस्त्रीच काय, परमाणसाला भेटणं म्हणजे कोविडच्या विषाणूंना ‘या घर आपलंच आहे,’ असं प्रेमानं आमंत्रण देण्यासारखं. ते दिवस तसे होते. माझ्या मनानं माझी अडचण ओळखली. ते मला थेट फ्रेंच रिव्हेएरात घेऊन गेलं. दहा वर्षांपूर्वी मी त्या गावाला गेलो होतो. पण काल गेल्यासारखं ते गाव माझ्या डोळ्यासमोर होतं. गावाचं नाव आहे सेंट पॉल द व्हेन्स (Saint Paul De Vence). तेराव्या शतकातलं एक टेकडीवरचं ते गाव होतं. खरं तर ते आर्ट म्युझियम होतं. या आर्ट म्युझियमची सुरुवात एका हॉटेलपासून होते. त्या हॉटेलच्या नावाचं स्पेलिंग आहे, La Colombe the Deon. तुमचं फ्रेंच चांगलं असेल तर तुम्ही नीट उच्चार कराल. त्यांची तिसरी पिढी हॉटेल चालवत होती. तुम्ही विचाराल काय कौतुक आहे त्या हॉटेलचं? कौतुक हेच की त्या हॉटेलात पिकासो, बुना, लिझे वगैरे त्या काळातले ज्येष्ठ चित्रकार चित्र काढत. त्यांनी हॉटेलमध्ये काढलेल्या चित्रांचं ते म्युझियम आहे. ते पाहायचा असेल तर तुम्हाला तिथं राहावं लागतं. आम्ही तिथं राहत नव्हतो. पण इच्छाशक्ती काही वेळेला बंद दरवाजे उघडते. मी त्या हॉटेल मालकिणीपुढं माझी रसिकता सिद्ध करण्यात यशस्वी झालो होतो. पण माझ्या लटक्या रसिकतेपेक्षा माझं भारतीयत्व तिला जास्त भावलं होतं. ती एक वर्षभर अगोदर भारतात राहून आली होती. पाहुणचार या शब्दाचा खरा अर्थ तिला भारतात उमगला होता. भारतातल्या, युरोपपेक्षा वेगळ्या संस्कृतीनं ती भारावून गेली. तिनं स्वतः मला हॉटेलमध्ये फिरवून ८०-९० वर्षांपूर्वीची चित्रं दाखवली. चित्रांचं मला अगदी जुजबी ज्ञान आहे. युरोपियन पेंटिंग स्टाइलबद्दल कधी काळी मी जाता जाता जुजबी वाचून गेलो होतो. पण एखादी आर्ट गॅलरी पाहायची असेल तर निदान थोडीफार माहिती हवी. अर्थात मी डॉन ब्रॅडमन मोठे की लता मंगेशकर मोठी हे सांगण्याचा प्रयत्न करू शकेन. पण मोनालिसाचं चित्र इतकं ग्रेट का? हे नाही सांगता येणार मला. ते कदाचित लिओनार्दो दा व्हिन्चीच सांगू शकेल. त्या हॉटेलमधली चित्रं पाहताना चुकीच्या जागी मी दाद दिली असण्याची शक्यता आहे. कारण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत मी चुकीच्या जागी माना कित्येक वेळा हलवल्या आहेत. पण केवळ एक माणूस न कंटाळता दीड, दोन तास चित्रं पाहतो आहे, त्यामुळं तिला भरून आलं असावं. हे मला कळलं कारण तिनं मला आग्रहानं एका बारच्या खुर्चीवर बसवलं आणि माझ्यासाठी एक मस्त फ्रेंच वाईनचा ग्लास घेऊन आली. मी पहिलाच सिप घेतला आणि ती बाई म्हणाली, ‘याच बार टेबलवर बसून पिकासो वाईन प्यायचा.’ मी ऐकलं आणि माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. 

मला अशा मंडळींच्या वास्तूंबद्दल आणि वस्तूंबद्दल प्रचंड आकर्षण आहे. ती वास्तू किंवा त्या वस्तू ती मंडळी माझ्यासमोर जिवंत करतात. ती माणसं माझ्यासमोर जिवंत होऊन येतात. त्याच ट्रिपमध्ये मी मार्सेलच्या बंदरावर उभं राहून पाण्यात पाय टाकला होता. जुलैचा महिना होता तो. तरीही पाणी इतकं गार होतं की पाय लाल लाल झाला. पण त्याचवेळी मी लाल झालेला पाय विसरलो, कारण मला समोरून विनायक दामोदर सावरकर त्या पाण्यातून पोहत किनाऱ्यावर येताना दिसले होते. जुन्या पॅरिसच्या गल्लीतून फिरताना ‘पाव परवडत नसेल तर मग केक खा,’ हे शब्द ऐकू आले होते. ऐतिहासिक स्थळी गेलं की माझं हे असं होतं. त्यामुळं मला पिकासो डोळ्यासमोर दिसला. अंग शहरालं आणि मी ती वाईन इतिहासाच्या नावानं संपवली.

त्या शहारलेल्या शरीरानं मी तिथल्या काही कलाकृती विकणाऱ्या दुकानात गेलो. एक सुंदर हत्ती दिसला. लांबून तो काचेचा वाटला होता. तो चक्क ब्राँझचा होता. मग मी एक पुतळा पाहिला आणि थक्क झालो. माणसाचा अर्धा पुतळा. एक हात, एक पाय, एका हातात बॅग, ऑफिसात धावायच्या पोझमध्ये. असा अर्धा. बुनो केटालेन नावाच्या कलावंतानं तो तयार केला होता. त्यामागं म्हणे त्याची एक थेअरी होती. हा केटालेन अर्धा फ्रेंच होता आणि अर्धा इटालियन. माणूस परदेशी नोकरीला आला की सतत घाईत असतो आणि तो घर सोडून परदेशी जातो ना तेव्हा तो जास्त मेहनत घेतो. कारण ती ओढ मायदेशी परतण्याची असते. म्हणून त्यानं तो पुतळा उभा केला. 

पूर्वी कधीतरी विलास सारंगची एक अर्धी मुर्धी नावाची गोष्ट वाचली होती. त्याची आठवण मला या पुतळ्याच्या निमित्तानं झाली. त्या तत्त्वज्ञानासह पुतळ्याची किंमत होती, आजच्या युरोच्या भावात ७५ लाख रुपये. ९८ हजार युरोचा तो पुतळा. त्या किमतीत आमच्या चाळीतल्या शेजारच्या दोन खोल्या मला विकत घेता आल्या असत्या. अर्धा पुतळा घेऊन काय करू? त्या दुकानाच्या बाईनं माझा चेहरा वाचला होता. तिच्या लक्षात माझं दुःख आलं होतं. ते हलकं करण्यासाठी तिनं मला सांगितलं, ‘ही सुंदर मूर्ती घे. इथली आठवण म्हणून ठेव.’ मी किंमत विचारली, ‘किती?’ ती म्हणाली, ‘फक्त एक हजार युरो.’ म्हणजे फक्त ७५ हजार रुपये. माझ्या तल्लख बुद्धीनं हिशोब काढला. मी खाली मान घातली, ती त्या गावातून बाहेर पडेपर्यंत! 

मी कलेच कौतुक करू शकतो, ती विकत घेऊ शकत नाही. त्याला खिसा मोठा लागतो... आणि ७५ हजार रुपये आले आहेत ना, मग ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवावे या विचाराचा माणूस असं काही विकत घेऊ शकत नाही.

त्या दिवशी मात्र माझ्या मनानं ती पिकासोची खुर्ची उचलली. तो अर्धामुर्धा माणसाचा पुतळा उचलला आणि माझ्या घरच्या बारजवळ आणून ठेवला. 

व्हर्च्युअल म्हणजे आभासी ही गोष्ट किती मस्त असते, याची जाणीव मला झाली. हे आभासी जग असतं मस्त. एलिझाबेथ टेलरला तरुण करून थेट स्वर्गातून पृथ्वीवर आणून आयफेल टॉवरवरच्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला जेवण घेता येतं. व्हाइट हाउसमध्ये शिरून ट्रम्पला ‘ए गप ए’ म्हणता येतं. पण आभासी जगातून बाहेर पडल्यानंतर मन अधिक विषण्ण होतं, असं मला या कोविडच्या दिवसांत जाणवलं. 

पिकासो, रेम्ब्राँ, व्हिन्ची, व्हॅन गॉग यांची चित्र पाहताना त्यांचं नेमकं मोठेपण कुणीतरी त्या कलेतल्या तज्ज्ञांनी सांगावं लागतं. निदान मला तरी तसं सांगावं लागतं. कारण मी कितीही रसिक वगैरे असलो तरी चित्रकलेचा विद्यार्थी नाही. मध्यंतरी व्हॅन गॉगबद्दल वाचत असताना त्याचं प्रत्यक्षात दोनदा पाहिलेलं ॲमस्टरडॅमधलं म्युझियम पुन्हा एकदा व्हर्च्युअली पाहिलं. ते म्युझियम पाहत असताना व्हॅन गॉगचं वाचलेलं अख्खं आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं आणि माझ्याच डोळ्यात पाणी आलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॅन गॉग हा प्रचंड काम करून वयाच्या ३७व्या वर्षी गेला. त्याला मानसिक आजार झाला होता आणि तो मानसिक आजार इतका विचित्र होता, की त्या आजाराला जग व्हॅन गॉग सिंड्रोम म्हणायला लागलं. एकदा एका चित्रकार मित्राबरोबर वाद घालताना व्हॅन गॉगनं स्वतःचा कानच कापून टाकला. या मानसिक आजारातली माणसं स्वतःचे अवयव कापतात. डोळे फोडतात. एकूण शेवटी ३७व्या वर्षी त्यानं आत्महत्या केली. पण गंमत पाहा, तोपर्यंत त्याचं फक्त एकच चित्र विकलं गेलं होतं. आज त्याची ९००च्या वर चित्रं जगात आहेत आणि त्याच्या किमती ऐकल्या तर आपला कानावर विश्वासच बसत नाही. त्या आजारपणामध्ये त्याच्यावर देखरेख करणारा एक डॉक्टर होता. त्या डॉक्टरचं त्यानं एक चित्र काढलं. आज त्या चित्राची किंमत किती असेल? विचार करा. मला कल्पना करणं नसतं जमलं. कारण मी त्यातला अत्यंत दर्दी माणूस नव्हे. त्याची किंमत आहे, ७५ दशलक्ष डॉलर्स. कोटीत हिशोब तुम्हीच मांडा. काय दुर्दैव पाहा, जिवंतपणे त्या माणसाला त्या चित्रातून एक डॉलरसुद्धा मिळाला नाही. काही चित्रं महान  नसतील, पण सामान्य माणसाचं काळीज काबीज करतात. 

चित्रांबद्दलच या कोविडच्या दिवसात वाचत असताना माझं मन भरकटलं आणि मला थेट पाकिस्तानात घेऊन गेलं. लाहोर हे रसिकांचं शहर आहे. त्या लाहोरमध्ये हिरा मंडी हा एक रसिकांचा बाजार आहे. तिथं कोठीवर अत्यंत सुंदर ललनांच्या तोंडून उत्तम गाणी ऐकता येतात. गुलाम हैदर, ओ. पी. नय्यरसारखे संगीतकार तिथं गाणी ऐकायला जात. २००४ मध्ये क्रिकेटसाठी मी पाकिस्तानला गेलो. तेव्हा माझ्याबरोबर माझा पत्रकार मित्र प्रशांत पवार होता. त्यानंच तिथल्या एका रेस्टॉरंटचा पत्ता शोधला होता आणि तो मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं कारण वेगळं होतं. त्या रेस्टॉरंटचा मालक हा चक्क डाव्या विचारांचा साम्यवादी होता. साम्यवादी माणूस म्हणजे धर्म न मानणारा. पाखंडी. आणि तो पाकिस्तानात कसा? हा प्रश्न आम्हा दोघांनाही होता. पाकिस्तानात धर्म न मानणं म्हणजे चक्क राजद्रोह आहे. त्यामुळं त्याच्या हॉटेलचे जिने चढत असताना, हा विचार आमच्या डोक्यात होता की तो खरंच आमच्याशी बोलेल का? आमच्याशी गप्पा मारेल का? का त्याचं डावंपण लपवून ठेवेल? ते जिने चढता चढता माझं लक्ष आणखी एका ठिकाणी गेलं. त्या जिन्यावरील भिंतीवर अप्रतिम चित्रं दिसली. टाइम मॅगझीनमध्ये त्याबद्दल लिहून आलेला एका लेखसुद्धा तिथं प्रिंट करून ठेवला होता. त्यातली बरीचशी चित्र ही गणिका, वेश्या यांच्यावर आधारित होती. पण एका चित्रानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्या चित्रात एका गिऱ्हाइकाचा हात धरून एक तरुणी निघाली होती. ती मागं वळून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर वात्सल्याचे भाव होते आणि तिचं लक्ष एका पुरुषाच्या हातात असलेल्या लहानग्या मुलाकडं होतं. त्या वेश्‍येचं दुःख त्या चित्रातून टपकत होतं. चित्र अत्यंत जिवंत होतं. या रेस्टॉरंटच्या मालकाशी इतर गप्पा झाल्यानंतर मी त्यांना त्या चित्राविषयी विचारलं. तो माणूस म्हणाला, ‘ती सगळी चित्रं माझीच आहेत.’ मला कौतुक वाटलं. मी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला हे कसं सुचलं?’ ते हसले. त्यांच्या हास्यात नेमके कुठले भाव होते हे मी सांगू शकत नाही. पण ते म्हणाले, ‘ती बाई, जी नाईलाजानं गिऱ्हाइकाबरोबर जातेय ना, ती माझी बहीण आहे. तो पुरुष मी आहे आणि तो मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा आहे.’ मग त्यांनी एक मोठा स्फोट केला. ते म्हणाला, ‘माझी आई एक वेश्या होती. बहीणही वेश्या होती आणि बायकोही वेश्या होती.’ आम्ही निस्तब्ध झालो. तिथून बाहेर पडताना मला साहीर लुधियानवी आठवला. ‘जिने नाझ है हिंदपर वो कहा है?’ या कवितेतल्या ओळी मला आठवल्या. चित्रं, काव्य या गोष्टींचा जन्म हा असाच कुठंतरी सत्यातच होतो. त्या लाहोरच्या वस्तीतून फिरून माझं मन पुन्हा एकदा माझ्या घरी आल्यावर मी अस्वस्थ होतो. बाहेरच्या जगातल्या बातम्या अत्यंत निराशाजनक होत्या. त्यामुळं साहीर पाठ सोडत नव्हता. त्याच्या इतर कवितेतल्या आणि गाण्यातल्या ओळी कानात घुमत होत्या. विशेषतः परप्रांतीयांना घरी चालत जाताना पाहिल्यावर. ‘चीन और अरब हमारा’ हे गाणं आठवलं. त्यात एका ठिकाणी तो म्हणतो, ‘तालीम है अधुरी, मिलती नही मजुरी, मालूम क्या किसी को? दर्दे निहा हमारा’ आणि तरीही तो शेवटी आशावाद दाखवत म्हणतो, ‘पतला है हाल अपना, लेकिन लहू हैं गाढा, पौलाद से बना है, हर नौजवान हमारा, मिल जुल के इस वतन को ऐसा स्वर्ग बनायेंगे, हैरत से...रह जाएगा, सारा जमा हमारा।’ साठ वर्षांपूर्वी साहीर निघून गेला. पण आजही तो आशावाद तो आशावादच आहे. तो पूर्णत्वाला कधी गेला नाही. 

मी अस्वस्थ मनानं फिरत होतो, ते अस्वस्थ मन मला थेट लंडनला घेऊन गेलं. भारताबाहेरचं माझं आवडतं शहर म्हणजे लंडन. का कुणास ठाऊक. पिकॅडलीपासून मध्य लंडन फिरलं ना की माझं मन आजही प्रसन्न होतं. मी फिरता फिरता एका पुतळ्यापाशी थांबलो. मागून कुणीतरी ‘केम छो’ म्हटल्याचा मला भास झाला. पुन्हा तेच शब्द उमटले ‘केम छो’ मला कुणीतरी गुजरातीत विचारल्याचं आश्चर्य वाटलं नाही. लंडनमध्ये इंग्रजीनंतरची लोकप्रिय भाषा गुजरातीच आहे. मी मागं वळून बघितलं तर ते चक्क महात्मा गांधी होते. 

मी म्हटलं, ‘बापूजी तुम्ही? आणि इथं? तुमची गरज खरी आपल्या देशात आहे. हजारो माणसं पायी गावाकडं निघालेली आहेत. शेकडो माणसं मरताहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्हीच मीठ शोधत निघाला होता ना? दांडीवरून. तशीच हातात चिल्ली पिल्ली घेऊन, डोक्यावर सामान घेऊन, पायात फाटलेल्या चपला घालून आपल्या घराकडं निघाले आहेत हे परप्रांतीय. त्यांच्या जखमा पुसण्याचं सोडून तुम्ही इथं काय करताय?’ बापूजी हसले. ते म्हणाले, ‘अरे आपल्या देशात खरंच माझी गरज आहे का? तसा मी आहे नोटेवर. सरकारी जाहिरातीतसुद्धा आहे. पक्षीय राजकारणातल्या ध्वजावरसुद्धा आहे. पण मी मनात आहे का?’

मी म्हटलं, ‘खरं आहे तुमचं म्हणणं. पण ज्यांना तुम्ही चले जाव म्हटलंत त्या देशात तुम्ही?’

‘होय, पण तुला सांगू हे लंडन शहर आहे ना हे एकेकाळी जगाचं छप्पर होतं. मार्क्स कुठला?’

मी म्हटलं, ‘अर्थात जर्मनीचा.’

‘पण त्याच्या राजकीय मतांमुळं त्याला जर्मनीनं हाकललं. तेव्हा बायको, मुलांसह याच लंडनमध्ये तो काही दशकं राहिला. इथंच त्यानं एन्जलबरोबर राजकीय चर्चा केली. इथंच ब्रिटिश म्युझियमच्या रीडिंग रूममधून त्यानं अभ्यास केला. मार्क्सवादाचं बायबल दास कॅपिटल लिहिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ब्रिटिश म्युझियममध्ये बसून डॉक्टरेट पूर्ण केलं. त्यांना इथं कुणी जात विचारली नाही किंवा राहायला घर नाकारलं नाही.’

‘हे मात्र खरं,’ मी म्हटलं.

‘अरे क्रांतीच्या आधी लेनिनसुद्धा इथंच राहून गेला आणि आम्ही सगळे शिकलो कुठं? इथंच ना? मी, विनायक सावरकर, जवाहर आणि तरीही आम्ही त्यांना भारतातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न केला. पण इथं आम्ही राहिलो ना त्या वास्तू ही मंडळी जपून ठेवताहेत. तोडत नाहीत. त्यावर छान एक निळा बोर्ड लावतात. ज्यांनी आपलं राज्य उलथवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या घरावरसुद्धा त्यांनी हे निळे बोर्ड लावलेत. त्यांनी या गोष्टी मनात ठेवल्या नाहीत. इतिहास हा इतिहासासारखा जपला. तू विनायक सावरकर ज्या इंडियन हाउसमध्ये राहिला, ते घर पाहिलंस ना?’

‘होय’

‘तू डॉ. बाबासाहेबांचं झालेलं स्मारकही पाहिलं असशील?’

‘हो, पाहिलं बापूजी.’

‘टिळक राहिले. ते घर पाहिलंस?’

‘नाही, ते राहिलंय अजून.’

‘पुढच्या वर्षी येशील तेव्हा नक्की पाहा. या सगळ्यांनी इंग्लडविरुद्ध लढा दिला. पण आज त्यांचा इतिहास या शहरानंच जपून ठेवलेला आहे आणि माझा तर चक्क पुतळा उभा केला.’

‘पण बापूजी आपल्या समृद्ध देशात आपल्या आशा कधी पूर्ण होणार?’ ‘आशावाद सोडू नकोस,’ बापूजी मला म्हणाले.

‘अरे मला जेव्हा पीटरमारीटज स्टेशनवर फर्स्ट क्लासचं तिकीट खिशात असतानाही ट्रेनमधून उतरवलं ना, तेव्हा मी अाख्खी रात्र त्या तिथल्या काळोख्या वेटिंग रूममध्ये बसून काढली. तिथंच मला एक आशेचा किरण मिळाला. तो पकडून मी लढायचं ठरवलं. बघता बघता त्या किरणाचा प्रकाशझोत झाला आणि पारतंत्र्याचा अंधार उजळून निघाला. अनेकजण यात आपापल्या मार्गानं प्रकाश किरण घेऊन सामील झाले. काहींनी शस्त्र हातात घेतली. काही निःशस्त्र होते आणि आम्ही कधीही आशा सोडली नाही. तूही सोडू नकोस. सध्या देश कोविडच्या विळख्यात सापडलेला आहे. पण हा विळखा कधीतरी सुटेल आणि पुन्हा आपला देश नक्कीच समृद्ध होईल. ती ताकद आपल्या देशात आहे आणि आपल्या देशाच्या तरुणांमध्ये आहे. माणसांमध्ये आहे. ती ताकद होती म्हणूनच आपण ब्रिटिशांविरुद्ध स्वतंत्र मिळवू शकलो आणि ती अशी पटकन जात नाही. ती असतेच.’

मी बापूजींच्या पाया पडलो आणि म्हटलं, ‘तुमचा आशावाद अर्थात आम्हाला पुढचा मार्ग दाखवेल.’

इतक्यात मला जाग आली. मला बायको हलवून जागं करून विचारत होती, ‘झोपेत काय बडबडतोयस. काही वाईट स्वप्न पडलं का?’

मी म्हटलं, ‘अगं सर्वात आशावादी स्वप्न मी आज या कोविडच्या दिवसांत पाहिलं.’

संबंधित बातम्या