जर लस घेतली नाही तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 1 मार्च 2021

‘जर तर’च्या गोष्टी

चिंतूला धावतपळत येताना पाहून मी समजलो की काहीतरी शंका त्याला छळते आहे. श्वास घेण्यासाठी मी त्याला वेळ देतो तोच तो म्हणाला, ‘मी नाही घेतली ती लस तर काय होईल?’ त्यानं न सांगताच मी समजलो की काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्याचं नाकारल्याची बातमी त्यानं वाचली होती. त्यामुळं त्याला थोडा हुरूप आला होता. कारण चिंतू कोणतंही इंजेक्शन घ्यायला भलताच घाबरतो. त्यातून वाचण्यासाठीचा उपाय त्या बातमीत त्याला सापडला होता.

‘‘हे  बघ लस घेण्याची सक्ती नाही. ती घेणं ऐच्छिक आहे. तुला वाटलं तर तू घे, नाही तर नको घेऊस. पण जो काही निर्णय घेशील तो पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच घे. लस म्हणजे काय हे आधी समजून घे. रोगजंतूंपासून बचाव करण्यासाठी निसर्गानं आपल्याला एक अतिशय योजनाबद्ध आणि मजबूत अशी प्रतिकारयंत्रणा बहाल केलेली आहे. कोणत्याही देशाच्या संरक्षण दलापेक्षाही ती अधिक सुसज्ज आहे, असं म्हणता येईल. पण कोणताही देश काही सतत युद्धात गुंतलेला नसतो. त्याचा बहुतांश वेळ शांततेतच जातो. निदान तशी धडपड प्रत्येक जण करत असतो. तरीही कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो. ते लक्षात घेऊन संरक्षण दलाला कायम सतर्क राहावं लागतं. त्यासाठी मग वेळोवेळी लुटुपुटीच्या लढाया खेळाव्या लागतात. त्यांना वॉर गेम्स म्हणतात. त्यातून मग खरोखरच शत्रूनं हल्ला केला तर त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहतो. 

लस म्हणजे शरीराच्या संरक्षण दलाला तय्यार ठेवण्यासाठी केलेला सरावच असतो. आपली रोगप्रतिकार यंत्रणा ही आप-पर भावावर काम करते. म्हणजे आपला कोण आणि परका कोण, हे ती ओळखू शकते. त्यासाठी शरीरात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक निर्जीव पदार्थाच्या किंवा सजीवाच्या बाह्यांगावरच्या प्रथिनांचं ओळखपत्र ती वाचते. आपला असेल तर त्याला सुखेनैव येऊ देते. पण दुष्ट हेतूनं कोणी परका येऊ पाहत असेल तर त्याच्या ओळखपत्रावरून त्याचा सुगावा लागल्याबरोबर ती यंत्रणेला त्याची माहिती देऊन त्याच्या विरुद्ध रामबाण ठरणारी अॅन्टिबॉडीरूपी क्षेपणास्त्रं तयार करण्याची सूचना देते. ती शस्त्रं मग त्या रोगजंतूला पिटाळून लावत शरीराचं स्वास्थ्य कायम राखण्याची तजवीज करतात.

लस म्हणजे या रोगजंतूची ओळख पटवण्यासाठी केलेली लुटुपुटूची लढाईच म्हण ना. त्यासाठी मग त्या रोगजंतूला निष्प्रभ करून तो रोगबाधा तर करू शकणार नाही पण त्याचं ओळखपत्र मात्र शाबूत असेल, अशी व्यवस्था केली जाते. दात काढलेल्या सिंहासारखीच त्या रोगजंतूची अवस्था होते. तो शरीरात शिरू तर शकतो पण रोगबाधा करू शकत नाही. त्यामुळं त्याच्या ओळखपत्राचं निवांत वाचन करता येतं. आणि त्याचा नेमका प्रतिकार करणाऱ्या शस्त्रांची बांधणी  करून ती योग्य त्या प्रमाणात तैनात ठेवता येतात. ती शस्त्रं निर्माण करण्याचा आराखडा, निर्माण करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारी सारी सामग्री तयार ठेवली जाते. 

या रोगप्रतिकार यंत्रणेची आणखी एक खासियत आहे. तिची जबरदस्त स्मरणशक्ती. एकदा का एखाद्या रोगजंतूचं ओळखपत्र तिनं वाचलेलं असलं की ते दीर्घ काळ लक्षात ठेवते. आपण नाही का परदेशातून आलेल्या प्रत्येकाच्या पासपोर्टची माहिती संगणकात साठवून ठेवतो. त्यामुळं तो परत आला की त्याचा पासपोर्ट वाचून त्या साठवून ठेवलेल्या माहितीशी ती पडताळून पाहता येते. मग येणारा प्रवासी आपलाच नागरिक आहे की कोणी परदेशी आहे हे तर ओळखता येतंच. पण त्याचा दहशतवाद्यांशी, तस्करांशी, गुन्हेगारांशी काही संबंध आहे की काय हेही चटसारी ओळखता येतं. त्यानुसार मग जी काही कारवाई करायची ती तातडीनं करता येते.

शरीराच्या रोगप्रतिकारयंत्रणेची कामगिरी याच तत्त्वावर बेतलेली आहे. कारण लस देताना त्या ओळखपत्राचा ठसा उमटलेलाच असतो. त्यामुळं आता जिवंत रोगजंतूनं कुहेतूनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्या ओळखपत्राची आठवण जागी होते आणि त्याच्या विरोधात वापरायच्या शस्त्रांची निर्मिती वेगानं होते. आणि तीही भरघोस प्रमाणात. त्या रोगजंतूला आपलं बस्तान बसवायची संधीच दिली जात नाही. शिवाय नुसतीच क्षेपणास्त्रं नाहीत तर ती ज्याच्यावर बसवलेली आहेत असे पेशीरूपी रणगाडेही तयार केले जातात. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यानं हाराकिरी तुकड्या तयार केल्या होत्या. अशी विमानं मग शत्रूवर चालून जात आणि स्वतःचा बळी देत शत्रूची दाणादाण उडवत. अशा किलर सेल्स, संहारक पेशीही, तयार केल्या जातात. सर्व बाजूंनी रोगजंतूची कोंडी करण्याची योजना आखली जाते. 

लस घेतली नाही तर मग या शरीराच्या संरक्षण दलाला युद्धाचा सराव कसा करता येईल? आणि तो नाही केला तर मग रोगजंतू जेव्हा खरोखरच हमला करेल तेव्हा त्याचा मुकाबला कसा करता येईल? उलट त्याला मोकळं रान मिळून तो मोकाट सुटेल. शरीराला खिळखिळं करेल. एरवी रोगाची बाधा झाल्यावरही काही रामबाण औषधांचा मारा करून त्याला जेरीला आणता येतं. पण कोरोनाच्या बाबतीत म्हणशील तर अशी तेजतर्राऱ औषधंही उपलब्ध नाहीत. त्यामुळं शेवटी अंगभूत रोगप्रतिकारयंत्रणेवरच भिस्त ठेवावी लागते. तिला मदत करण्यासाठी, तिचं काम सोपं करण्यासाठीच तर लस घ्यायची. ती न घेतल्यानं उलट त्या रोगप्रतिकारयंत्रणेवरचा भार वाढण्याचीच शक्यता जास्ती. 

लस न घेण्याची कारणंही तशी पटण्यासारखी नाहीत. टोचल्याजागी थोड्या वेदना, क्वचित प्रसंगी सौम्य ताप, डोकेदुखी, माफक अंगदुखी यासारखा त्रास काही जणांना होतो. सर्वांनाच नाही. पण पुढं रोगाची बाधा होण्यापेक्षा तो परवडला. काही जणांना इतर काही व्याधी असतात. त्यामुळं लसीकरणापायी त्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागण्याची शक्यता असते. पण अशा व्यक्तींना लस दिली जात नाही. पण ज्यांना अशा कोणत्याही नकारात्मक बाबींचा अडथळा नाही त्यांनी लस न घेण्यानं आपणहून अरिष्टाला आमंत्रण देण्यासारखंच होईल. 

शिवाय लस न घेतल्यामुळं जर रोगजंतूचा शरीरात शिरकाव झाला तर मग त्याचा प्रसाद अशी व्यक्ती इतरांनाही देऊ शकते. रोगप्रसाराला ती मदतच करते. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनंही ते अयोग्य आहे. एकाअर्थी अशी व्यक्ती समाजविघातक कामच करते, असं म्हणता येईल. लस घेतली नाही तर असे गंभीर परिणाम संभवतात. तेव्हा चिंतू, भलतीसलती शंका मनात न आणता आणि सुई टोचण्याची भीती काढून टाकून लस घ्यायला तयार हो पाहू.’’

संबंधित बातम्या