जर उंचावरून नाणं डोक्यात पडलं तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 8 मार्च 2021

जर तरच्या गोष्टी

साठ सत्तर वर्षांपूर्वी एक मजेशीर कविता शालेय स्तरावर ऐकवली जात होती. ‘खल्वाट चंडकिरणे अतितप्त झाला...’ आजच्या प्रचलित चारोळीच्या किंवा इंग्रजीतल्या लिमरिकच्या जातकुळीतली ती कविता होती. ‘खल्वाट’ म्हणजे पूर्ण टक्कल पडलेला गृहस्थ. तर कडक उन्हाच्या तडाख्यानं त्याचं डोकं तापलं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी आणि क्षणभर विश्रांती घेण्यासाठी तो एका झाडाच्या सावलीत जाऊन बसला. पण ते झाड निघालं नारळाचं. आणि डोळे मिटून शांत बसलेल्या त्या गृहस्थाच्या डोक्यावर एक नारळ पडून त्याचे डोळे कायमचे बंद झाले. त्याला कायमची विश्रांती मिळाली. एका अर्थी थोड्याफार क्रूर विनोदाचीच प्रचिती देणारं ते काव्य होतं. 

सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनच्या माथ्यावरही सफरचंदाचं पिकलेलं फळ पडलं होतंच की! पण त्यापायी त्याचा कपाळमोक्ष झाला नाही. कदाचित एक टेंगूळ आलं असेल. पण त्याच्या डोक्यात मात्र विचाराचं चक्र सुरू झालं. नवनिर्मितीचं वारं घोंघावू लागलं. त्यातूनच मग त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपणही समजा एखाद्या चिकूच्या झाडाखाली बसलो तर वरून एखादा पिकलेला चिकू आपल्याही टाळक्यावर पडायला हरकत नसावी. त्यानं आपल्याला जीवघेणा त्रास होण्याऐवजी उलट अनायासे चिकू खायला मिळाला म्हणून आनंदच होईल. 

तर मग प्रश्न असा पडतो की या तीन घटनांमध्ये असा आमूलाग्र फरक का असावा? एकीत प्राण कंठाशी यावेत, दुसरीत अजरामर शोधाचं श्रेय मिळावं आणि तिसरीत पडत्या फळाची आज्ञा नाही पण प्राप्ती व्हावी. 

त्यासाठी आपल्याला पडणाऱ्या वस्तूचं वजन आणि आकारमान, त्याची काठिण्यपातळी आणि किती उंचीवरून ती वस्तू पडली या सर्वांचाच विचार करायला हवा. नारळ तसा वजनदारच. त्यात परत तो चांगलाच टणक. एरवीही नुसता डोक्यावर आपटला तरी झिणझिण्या याव्यात. हेही नसे थोडके म्हणून की काय तो चांगला तीस चाळीस मीटर उंचीवरून झेपावणारा. त्या पायी मग त्याच्या अंगी तसा चांगलाच वेग भिनलेला. या सर्वांचा परिपाक म्हणून त्याच्या आदळण्यापायी होणारी इजाही तितकीच गंभीर. उलट सफरचंद त्या मानानं हलकं आणि किती तरी कमी उंचीवरून येऊन पडणारं. त्याला मिळणारा वेगही मर्यादित. चिकूची तर बातच न्यारी! वस्तूच्या पडण्यामुळं होणारा परिणाम किंवा इजा म्हणा हवं तर त्याच्या संवेगावर म्हणजेच वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारावर अवलंबून असते. 

हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे कालच चिंतातूर चिंतू धावतपळत आला होता. तो नुकताच कधी नव्हे तो अमेरिकेच्या सहलीवर जाऊन आला होता. न्यू यॉर्कमधल्या सर्वात उंच इमारतीला, एम्पायर स्टेट बिल्डिंगला, भेट देऊन आला होता. तिथं सर्वात वरच्या मजल्यावरच्या संपूर्ण परिसराचं मनोहारी दर्शन देणाऱ्या कक्षात गेल्यावर त्याला एक आख्यायिका ऐकवण्यात आली. त्या कक्षाच्या उंचीचा दाखला देण्यासाठी ती तयार केली गेली होती. तिच्यात म्हटलं होतं की त्या उंचीवरून एक पेनीचं नाणंही खाली टाकलं तरी ते ज्याच्या डोक्यावर आदळेल त्याच्यावर आकाशीची कुऱ्हाडच कोसळेल. त्यापायी भयभीत होत चिंतूनं पुढची सहल कशीबशी आटपली आणि परतल्या क्षणी तो त्याची चिंता माझ्यावर सोपवण्यासाठी धावत आला होता. त्यात परत आता मुंबई, पुण्यातही पन्नास साठ मजली इमारती उभ्या राहत आहेत. तेव्हा त्यांच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून एखादं रुपयाचं किंवा पाच रुपयांचं नाणं हातातून निसटलं तर त्या पायी रस्त्यावरच्या कोणातरी पादचार्‍याच्या मृत्यूला ते कारणीभूत 

होईल. आणि तो खून समजून आपल्याला फाशीच दिली जाईल, ही भीती चिंतूला सतावत होती.

त्याची चिंता अनाठायी होती, हेच मी त्याला समजावून सांगत होतो. त्या इमारतीची उंची चांगलीच ताडमाड असेल यात शंका नाही. पण पाच रुपयाच्या नाण्याचं वजन ते किती! दोन चार ग्रॅम. त्यात ते उंचीवरून पडतं तेव्हा सरळ जमिनीचा वेध घेत येत नाही. ते गटांगळ्या घेत राहतं. त्या पायी त्याचा हवेशी चांगलाच संघर्ष होतो. त्यामुळं त्याला मिळू शकणाऱ्या वेगात चांगलीच घट होते. तेव्हा त्याच्या अंगी येणारा संवेगही, म्हणजेच वजन आणि वेग यांचा गुणाकार होऊन येणारी राशी,  मर्यादितच राहतो. त्याची क्षमता जीव घेण्याची सोडाच पण गंभीर इजा करण्याचीही असेल की काय याची शंकाच आहे. पण तेच जर त्या उंचीवरून एखादा पन्नास ग्रॅम वजनाचा नट किंवा बोल्ट हातातून सुटला तर मात्र त्याचं वजन आणि काठिण्य यामुळं डोक्याला चांगलीच खोक पडू शकते. उंची किंवा त्या वस्तूचं वजन जरासं जास्त असेल तर जीवही जाऊ शकतो. म्हणूनच तर जिथं कुठं नवीन बांधकाम होत असतं तिथं वावरणार्‍या प्रत्येकाला स्टीलचं हेल्मेट वापरण्याची सक्ती केली जाते. ते हेल्मेट त्या व्यक्तीचं संरक्षण कवच बनतं. आणि सारा संवेगाचाच खेळ असल्यामुळं उंचीवरूनच कशाला समोरासमोरून येणारी पिस्तुलातून झाडलेली गोळीही अशीच जीवघेणी बनते. ब्रिस्बेनला झालेला कसोटी सामना आठवा. त्या बिचार्‍या पुजारानं अंगावर किती चेंडू झेलले. ताशी तब्बल १६० किलोमीटरच्या भन्नाट वेगानं मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी टाकलेले अंगवेधी चेंडू पठ्ठ्यानं छातीवर, दंडावर, कमरेवर, कुशीत झेलले. त्यानंतरही गडी ताठ उभा राहिला पुढचा चेंडू खेळायला. तो त्यानं सीमेपारही पिटाळला. त्या चेंडूच्या मारापायी त्याचं अंग काळनिळं झालं असेल. संध्याकाळी त्याला हळदीचा लेप लावावा लागला असेल. पेन किलरचा स्प्रे मारून घ्यावा लागला असेल. पण त्याहून गंभीर इजा झाली नाही. बंदुकीतून सुटलेल्या गोळीचं वजन असेल जेमतेम पाच ते दहा ग्रॅम. पण पिस्तुलाच्या नळीतून गोळी सुटते ती ताशी सव्वाशे ते तीन हजार किलोमीटरच्या वेगानं. त्यामुळं तिच्या ठायी भलताच संवेग प्राप्त होतो. आणि अंगी असलेली ऊर्जा तब्बल चारशे न्यूटन मीटरचा पल्ला गाठते. ती कोणाचाही जीव घ्यायला पुरेशी ठरते. पण त्या दोन चार ग्रॅम वजनाच्या नाण्याच्या अंगी असणारी ऊर्जा सव्वा न्यूटन मीटर एवढी मामुली असते. ती काय इजा करणार! 

चिंतूनं उगीचच आपल्या नेहमीच्या स्वभावानं अमेरिकेच्या सहलीचा आनंद लुटण्याची संधी सोडली. पण तुम्ही मात्र तसं करू नका. एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये तुम्हालाही ती कथा ऐकवली जाईल तेव्हा 

फार फार तर ‘असं का!’ एवढाच आश्चर्योद्गार काढा.

संबंधित बातम्या