जर हिमालय नसता तर..!

डॉ. बाळ फोंडके
मंगळवार, 27 एप्रिल 2021

‘जर तर’च्या गोष्टी

कविकुलगुरू कालिदासानं आपल्या ‘कुमारसंभवम्’मध्ये हिमालयाची स्तुती केली आहे. पहिल्याच श्लोकात तो म्हणतो, ‘अस्त्युत्तरस्याम् दिशिदेवतात्मा l हिमालयो नाम नगाधिराजः’ उत्तरेला असलेल्या या नगाधिराजाचं समग्र वर्णन त्यानं नंतर केलं आहे. त्याच्या या हिमालयस्तोत्रात आणि इतरही संस्कृत वाङ््मयात हिमालय नेहमीच आपल्या सोबत राहिला आहे, असं म्हटलं गेलं आहे. पण हे चुकीचं आहे. भारताची भूमी अनादी काळापासून अस्तित्वात होती. हिमालयाचा जन्म त्यानंतर झालेला आहे. किंबहुना हिमालय हा जगातला सर्वात कमी वयाचा पर्वत आहे. 

हिमालयाच्या जन्माचीही कहाणी आहे. जगातली यच्चयावत भूमी एकाच कोंडाळ्यात सध्या जिथं ऑस्ट्रेलिया आहे त्या ठिकाणी पहुडलेली होती, पॅन्जिया या नावानं ओळखली जात होती. काही काळानंतर तिचे तुकडे झाले. एक मोठा तुकडा, लॉरेशिया, उत्तरेला गेला. उरलेला गोंडवनालॅंड दक्षिणेतच राहिला. त्यांचेही तुकडे झाले. हे तुकडे त्याच्या खाली असलेल्या द्रवरूप शिलारसावर तरंगत तरंगत दुसरीकडे जाऊ लागले. अखंड भारताचा तुकडा गोंडवनालॅंडपासून वेगळा होत वायव्य दिशेनं सरकत सरकत युरोप आणि आशिया यांच्या लॉरेशियाला जाऊन भिडला. ती टक्कर जोरानं झाल्यामुळं भारतीय भूखंडाचा सीमावर्ती भाग उचलला गेला. तोच हिमालय झाला. अजूनही तो उचलला जातच आहे. म्हणूनच हिमालयाची उंची अजूनही वाढतेच आहे. 

भारतीय भूखंड आणि लॉरेशिया यांची टक्कर जोमानंच झाल्यामुळं हिमालयाचा जन्म झाला. पण समजा भारतीय भूखंड हलकेच लॉरेशियाला जाऊन टेकला असता, टक्कर अशी झालीच नसती तर... तर हिमालयाचा उदय झालाच नसता! जर हिमालय अस्तित्वातच आला नसता तर भारतीय उपखंडाचं काय झालं असतं?

बराच अनर्थ झाला असता. पाण्याला जीवन म्हणतात. कारण जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. बांगलादेश, पाकिस्तान. श्रीलंका, भारत, इतर संलग्न प्रदेश या साऱ्या भूभागाची पाण्याची गरज भागवतात ते मोसमी वारे. तेच तब्बल चार महिने या संपूर्ण भूभागावर अधिराज्य गाजवत पाऊस पाडतात. नदीनाले दुथडी भरून वाहतात. या वाऱ्यांचा उगम होतो नैऋत्य दिशेला असलेल्या ईस्टर बेटांजवळ. तिथून मजल दरमजल करत ते आपल्या बरोबर भरपूर बाष्प घेत भारतीय उपखंडापर्यंत पोचतात आणि तिथं आपल्या जवळचा पाण्याचा सारा खजिना रिता करतात. तसं ते करू शकतात कारण ते अडवले जातात. त्यांना त्यापुढचा प्रवास करणं अशक्य होतं. त्यांच्या वाटेत हिमालय उभा राहतो आणि त्यांना इथंच थोपवून धरतो. तोच जर नसता तर मग या वाऱ्यांना कोणी रोखलं असतं? ते तसेच आपल्या डोक्यावरून आपल्याला वाकुल्या दाखवत पुढं निघून गेले असते आणि आपण ठाक कोरडे राहिलो असतो. संपूर्ण उत्तर भारताचा पठारी प्रदेश सुपीक बनला आहे, सगळ्या देशाची अन्नधान्याची गरज भागवतो आहे तो तिथून वाहणाऱ्या गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यासारख्या महाकाय नद्यांमुळं. पंजाबमध्ये जे भरघोस पीक येतं कारण एक नाही, दोन नाही तर चक्क पाच नद्या त्या प्रदेशाला पाण्याची कमतरता पडू देत नाहीत. या सगळ्या नद्यांचा उगम होतो हिमालयात. त्या नगाधिराजानं अडवलेल्या मोसमी वाऱ्यांनी आणलेल्या पाण्याचा अभिषेक त्या पर्वतमाथ्यावर होतो. तेच पाणी या सगळ्या नद्यांमधून वाहत सगळा प्रदेश सुपीक करून सोडतात. जर हिमालय नसता तर हा सारा भाग राजस्थानासारखा रखरखीत वाळवंटी बनला असता. 

बरं, हा वाऱ्यांना अडवण्याचा सिलसिला एवढ्यापुरताच मर्यादित नाही. मोसमी वारे अरबी समुद्रावरून तसंच बंगालच्या उपसागरावरून येतात. म्हणजेच हिमालयाच्या दक्षिणेकडून येतात. पण तसेच वारे त्याच्या उत्तरेकडूनही येतात. त्यांचा उगम थेट उत्तर ध्रुवावर आणि त्याच्याशी जवळीक असलेल्या आर्क्टिक प्रदेशावर होतो. सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात, म्हणजेच आपल्या हिवाळ्यात, दक्षिण ध्रुव सूर्याकडे तोंड करून असतो. उत्तर ध्रुव सूर्यापासून तसा दूरच असतो. पृथ्वीच्या त्या स्थितीत मग हे वारे तिथून जे दक्षिण दिशेनं सुसाट सुटतात ते गोबीचं वाळवंट ओलांडून धडक मारतात. पण मग त्यांच्या पुढं अडथळा येतो तो हिमालयाचाच. त्यांची वाट तिथंच अडवली जाते. पुढं सरकायची संधीच त्यांना मिळत नाही. 

तसं झालं नसतं तर त्यांनी थेट आपल्या अंगावर उडी घेतली असती. सारा प्रदेश अतिशीत वाऱ्यांनी व्यापून टाकला असता. आपण सारे थंडगार पडलो असतो. ते टळलं आणि आपला समावेश विषुववृत्तीय उष्ण कटिबंधातच झाला. या शीतलहरीपासून हिमालयच आपलं रक्षण करतो. रब्बी आणि खरीप अशा शेतीच्या दोन्ही हंगामांना त्याची मदत होते. 

हिमालयाच्या उत्तरेकडून येणारे वारे गोबीच्या वाळवंटावरून येताना तिथली सगळी धूळही बरोबर आणतात. हिमालय नसता तर ती सारी धूळ आपल्या सुपीक प्रदेशावर येऊन पडली असती. इथल्या शेतीचं अतोनात नुकसान झालं असतं. जवळजवळ सारा देशच थंड, कोरडा वैराण वाळवंट होऊन राहिला असता. अशा परिस्थितीत जगणंच मुश्कील होऊन बसलं असतं. इथं सिंधू संस्कृती फुलली, बहरलीच नसती.

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या नाहीशा झाल्या तर मग त्यांच्यावर भाक्रा नान्गलसारखी महाकाय धरणं कशी बांधता आली असती? त्यांनी अडवलेल्या पाण्याचा सिंचनासाठी तसंच जलविद्युतनिर्मितीसाठी कसा उपयोग करता आला असता? खेड्यापाड्यात प्रदूषणविरहित वीज कशी खेळवता आली असती? हिमालय आहे म्हणून आपला दिवस चोवीस तासांचा झाला आहे. तो केवळ सूर्यप्रकाशाच्या कालावधीएवढा छोटा राहिलेला नाही. 

हिमालय हा देशाच्या संरक्षणयोजनेचा महत्त्वाचा घटक आहे. प्राचीन काळापासून त्यानं देशावर उत्तरेकडून हल्ला होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्याची उंची आणि तिथलं शीत हवामान शत्रूला रोखण्याची कामगिरी इमानेइतबारे बजावत आली आहेत. तंत्रज्ञानाच्या उदयानंतर ही नैसर्गिक तटबंदी थोडी दुबळी झाली असली तरी अजूनही हिवाळ्यामध्ये आपल्यावर शत्रूचा हल्ला होत नाही याचं कारण हिमालयाची तटबंदीच आहे. 

खनिज संपत्तीचा तर खजिनाच हिमालयाच्या पोटात दडलेला आहे. काश्मीरच्या खोऱ्यात कोळसा सापडला आहे. एवढंच काय पण तांबं, शिसं, झिंक, निकेल, कोबाल्ट, अॅन्टिमनी, टन्ग्सट्न, सोनं, चांदी आणखी कितीतरी धातूंच्या खनिजांनी हिमालय समृद्ध आहे. त्यांचं उत्खनन करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते पूर्णत्वाला गेले की भविष्यात ही सगळी खनिजं आपल्या हाती येतील. हिमालयच नाहीसा झाला तर आपण कशाकशाला मुकणार आहोत, याची ही केवळ झलकच आहे. 

संबंधित बातम्या