जर अश्रू आटले तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 7 जून 2021

‘जर तर’च्या गोष्टी  

बातम्या पाहत होतो. सगळ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. त्यात कोरोना इस्पितळाला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांच्या आप्तेष्टांचा आक्रोश तर ऐकवत नव्हता. त्यातच एकानं केलेलं भाष्य तर अतिशय विदारक होतं. ठाक कोरड्या डोळ्यानं तो सांगत होता, ‘आणखी किती सहन करावं लागणार आहे कळत नाही. डोळ्यातले अश्रू तर पार आटून गेले आहेत.’ मनात विचार चमकून गेला. खरंच असं होईल? डोळ्यातले अश्रू असे पार आटून गेले तर! 

दुःख किंवा वेदना अनावर झाल्या की डोळ्यातून घळाघळा आसवं वाहायला लागतात हे खरं. हे भावनोद्रेकापायी झरणारे अश्रू आहेत. खरं तर अश्रूंचे तीन मुख्य प्रकार आहेत. पहिला सातत्यानं वाहणारे अश्रू. त्यांना ‘बेसल’ अश्रू म्हणतात. कांदा कापताना किंवा डोळ्यात केर कचरा गेला की जे वाहतात ते ‘रिफ्लेक्स’ प्रकारचे अश्रू. आणि तिसरा प्रकार आहे भावनाश्रूंचा. दुःख झालं किंवा आनंद झाला म्हणजेही डोळे भरून आणणारे हे ‘इमोशनल’ अश्रू. 

डोळ्यांच्या वरच्या भागात असणाऱ्या अश्रूग्रंथी म्हणजेच लॅक्रिमल ग्लॅन्डमधून हे अश्रू डोळ्यांच्या वरच्या कोपऱ्यात उतरतात. तिथून मग हे सगळीकडे पसरतात. अनावर झाले की डोळ्याच्या खालच्या कोपऱ्यातून बाहेर पडतात. गालांवर ओघळतात. पण काही नाकाजवळच्या कोपऱ्यातून नाकाघशातही उतरतात. 

ज्यापायी त्यांचा उगम होतो ती कारणं या तीन अश्रूंमध्ये वेगवेगळी तर असतातच पण त्यांच्या घटकांमध्येही काही फरक असतात. तरीही अश्रूंमध्ये प्रामुख्यानं सोडियम बायकार्बोनेट, क्लोराईड आणि पोटॅशियम ही रसायनं सापडतात. काही अश्रूंमध्ये मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमही दिसून आली आहेत. सोडियम आणि क्लोराईड असल्यामुळंच आसवांना खारटपणा येतो. पण तीन प्रकारच्या अश्रूंमधलं या रसायनांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. 

बेसल अश्रू सतत वाहत असतात. तीन वेगवेगळ्या थरांनी त्यांची बांधणी होते. पहिला थोड्याफार बुळबुळीत द्रवाचा थर. अळवाच्या पानावरून ओघळून जाणाऱ्या पाण्यासारखी आसवं नुसतीच इकडून तिकडे जाणार नाहीत याची तो खातरजमा करतो. डोळ्याच्या त्वचेला पकडून ठेवण्याची कामगिरी या स्तरावर सोपवलेली असते. दुसरा थर असतो पाण्याचा. याची जाडी सर्वात जास्ती असते. त्यावरही असतो तो तेलकट थर. आसवांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते उडून जाणार नाही याची काळजी हा थर घेतो. हे सतत वाहणारे अश्रू डोळे ओलसर ठेवायला मदत करतात. तुमची नजरही साफ राहील हेही पाहतात. शिवाय डोळ्यात जर काही केरकचरा जमा झाला असेल किंवा काही घातक रसायनांनी बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना घालवून देऊन डोळे सतत स्वच्छ राहतील याची खबरदारी हे बेसल अश्रू घेतात. जर अश्रू संपूर्ण आटले तर हे सतत साथ करून आपल्या डोळ्यांचं आरोग्य राखणारे मदतनीसही आपण गमावून बसू. डोळ्यांसारखा नाजूक आणि अत्यंत उपयोगी अवयवच जर रोगग्रस्त झाला तर त्याला आटलेले अश्रूच नाही का कारणीभूत असणार!

या कोरड्या डोळ्यांचीही एक गंमत आहे. डोळे कोरडे पडल्यामुळं हवेतून येणारे धुळीचे कण त्यांना सतत डिवचत राहतात. त्या त्रासापासून वाचण्यासाठी मग डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत राहतं. ते पाणी त्या धूलिकणांची हकालपट्टी करायला सरसावतं, पण अश्रूंची कमतरता मात्र ते भरून काढू शकत नाही.

डॉक्टरांना विचाराल तर अश्रू आटण्याची शक्यता तशी नगण्यच असल्याचं ते सांगतील. म्हणजे वय झालं की काही वेळा हा अश्रूंचा ओघ कमी होतो. किंवा डोळ्यांना काही इजा झाली असेल तरीही तसं होऊ शकतं. वय जसजसं वाढत जातं तसतसं बेसल अश्रू ढाळण्याचं प्रमाणही कमी होत जातं. खास करून मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात जी हार्मोन्सची स्थित्यंतरं होतात त्याचाही परिणाम अश्रूंच्या प्रमाणावर होत असतो. पण अश्रू साफच आटले असं होत नाही. आपण दिवसाकाठी किती अश्रू ढाळतो या प्रश्नाचं उत्तर ऐकून तर तुम्ही तोंडात बोटच घालाल. तब्बल पंचावन्न ते एकशे दहा मिलिलिटर. त्या मानानं अनावर रडू कोसळल्यावर त्यात पडणारी भर तशी कमीच असते. ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का...’ असं म्हणत लेकीची सासरी पाठवणी करताना माय-लेकीच्या रडण्याचं वर्णन ही तशी कविकल्पनाच आहे. अर्थात हे खरं की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये भावनोद्रेकापायी ढाळलेल्या अश्रूंचं प्रमाण जास्ती असतं.. 

तरीही भावनांच्या उमाळ्यापोटी आपण का रडतो, असा प्रश्न उपस्थित होतोच. त्याचं नेमकं उत्तर शोधण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. तरीही त्यावर जैविक, सामाजिक आणि मानसिक प्रभावांचा परिणाम होतो असं दिसून आलं आहे. ज्यावेळी माणसाला अतीव दुःख होतं किंवा असह्य वेदना होतात किंवा हतबल झाल्यासारखं वाटतं अशा वेळी समाजातल्या इतरांचं लक्ष वेधून घेऊन त्यांच्याकडून मदत मिळावी ही अपेक्षा अश्रूपाताकडून व्यक्त होत असते. आणि मग त्या व्यक्तीचं सांत्वन करत त्याला किमान पक्षी मानसिक आधार द्यायला इतर पुढं सरसावतात. त्यामुळं मग त्या वेदनेची टोचणी कमी व्हायला मदत होते. तसंच या प्रकारच्या अश्रूंमध्ये इतर दोन प्रकारच्या अश्रूंमध्ये नसलेली काही वेदनाशामक प्रथिनं असतात.  

लहान मुलाला भूक तहान लागते, किंवा मलमूत्र विसर्जन झाल्यामुळं शरीर स्वच्छ करण्याची गरज भासते अशा वेळी ते आक्रोश करतं. पण त्यात फक्त रडण्याचा आवाजच येतो. अश्रूंचा पाझर फारसा होत नाही. याचं कारण त्यांच्या अश्रूग्रंथींची पुरती वाढ झालेली नसते. काही वेळा ती झालेली असली तरी त्या ग्रंथींमधून डोळ्याकडे अश्रू वाहून नेणाऱ्या नलिका चोंदलेल्या असतात.

कांदा कापतानाही अश्रूंचा पाझर सुरू होतो. खरं तर डोळ्यांना काहीही खुपायला लागलं की अश्रूग्रंथी आपली उत्पादनक्षमता वाढवतात. कांद्यांमधल्या काही रसायनांचा मारा डोळ्यांना सहन होत नाही. पण तीव्र गंध मग तो भले सुगंध का असेना, तेज प्रकाश, हवेतली धूळ, धूर, फरशी साफ करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायनं एवढंच काय पण जास्ती वेळ कॉम्प्युटरच्या पडद्याकडे पाहणं यापायी डोळे चुरचुरतात. त्यापासून मोकळीक देण्याचं कामही अश्रूच करतात. 

शेवटी राहिले नक्राश्रू आपल्याला दुःख झाल्याचं नाटक करण्यासाठी ते ढाळले जातात असा समज आहे. तो तसा चुकीचा नाही. कारण सतत पाण्यात राहिल्यामुळं शरीरात साचलेले क्लोरिन बाहेर टाकण्याचा मगरीचा तो हमखास उपाय असतो. 

ते सोडले तर इतर तिन्ही प्रकारचे अश्रू आपली मदतच करत असतात. तेच जर आटले तर त्यांची जागा कशी भरून काढता येईल?

संबंधित बातम्या