गुरुत्वाकर्षण नसतं तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 14 जून 2021

‘जर तर’च्या गोष्टी

गुरुत्वाकर्षण नसतं तर आपण कोणीही इथं आज दिसलो नसतो. आपणच कशाला, संपूर्ण सजीव सृष्टीच अवतरली नसती. गुरुत्वाकर्षण आहे म्हणून सर्व सजीवांना जगण्यासाठी योग्य ते पर्यावरण मिळालेलं आहे.

ग्यानबा तसा नेहमी आनंदी असणारा. त्याला चित्रविचित्र प्रश्न पडत असत हे खरं. पण तो त्याच्या तगड्या कुतूहलाचा भाग होता. पण आता तो दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं आल्याचं पाहून मला आश्चर्यच वाटलं. 

‘का रे, काय झालंय? तुझा चेहरा असा उतरलेला का?’ मी विचारलंच.

‘आई मला खूप रागावली आज. ती तशी चुकीचं नाही वागली. दुधानं भरलेली बाटली माझ्या हातातून निसटली आणि खाली जमिनीवर पडून फुटली. दूधही सगळं वाया गेलं. या वस्तू अशा नेहमी खालीच का पडतात...’

‘... हे मी सांगितलंय तुला, अरे...’

‘...माहिती आहे. गुरुत्वाकर्षण. हे गुरुत्वाकर्षणच नसतं तर किती छान झालं असतं. कोणतीही वस्तू अशी खाली पडली नसती. तिची नासधूस झाली नसती. मलाही कसं पक्ष्यांसारखं हवेत मस्त उडता आलं असतं.’  ‘गुरुत्वाकर्षण नसल्याचे हे तुला दिसतात ते फायदे तसे मामुलीच आहेत. उलट ते नसतं तर आपला फार तोटा झाला असता. ते नसल्याच्या तोट्यांचं पारडं फायद्यांपेक्षा चांगलंच जड आहे. गुरुत्वाकर्षण नसतं तर आपण कोणीही इथं आज दिसलो नसतो, आणि आपणच कशाला, संपूर्ण सजीव सृष्टीच अवतरली नसती. कारण पुरातन काळात निळ्या हिरव्या रंगाच्या सूक्ष्मजीवांनी बाहेर टाकलेला ऑक्सिजन तसाच अंतराळात उडून गेला असता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं त्याला धरून ठेवलं आणि हवेत तो साचून राहायला लागला. आपण त्याला प्राणवायूच म्हणतो कारण तो आपल्या म्हणजे समस्त मानवजातीच्या तसंच प्राणिमात्रांच्या जगण्याला आवश्यक आहे. हवेत ऑक्सिजनशिवाय कार्बनडाय ऑक्साईड आणि नायट्रोजन हे वायूही आहेत. त्यांनाही गुरुत्वाकर्षणानं जखडून ठेवलं आहे. याच कार्बन डायऑक्साइडची पाण्याशी प्रक्रिया करून वृक्षवल्ली त्यांचं अन्न म्हणजेच कर्बोदकं तयार करतात. तसंच हवेतून नायट्रोजन मिळवून अनेक प्रथिनांची निर्मिती करतात. याच वनस्पतींपासून आपल्याला ही सारी पोषणद्रव्यं मिळतात. गुरुत्वाकर्षण आहे म्हणून संपूर्ण सजीवांना जगण्यासाठी योग्य ते पर्यावरण मिळालेलं आहे.

जगण्यासाठी ऑक्सिजनप्रमाणेच किंवा त्याहूनही अधिक कळीची भूमिका बजावतं ते पाणी. सूर्याच्या उष्णतेपायी सागरांमधल्या तसंच नदीनाल्यांमधल्या पाण्याची वाफ होते. गुरुत्वाकर्षण नसतं तर तीही दूर अवकाशात उडून गेली असती. आणि धरतीवर पाणीच राहिलं नसतं. याची प्रचिती आपल्याला चंद्रावर मिळते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक षष्ठांश एवढंच आहे. वातावरणाला तिथं धरून ठेवायला ते पुरेसं नाही. त्यामुळंच चंद्रावर हवा नाही, पाणी नाही. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असंच नाहीसं सोडाच पण कमी झालं तरी आपलीही तीच अवस्था होऊ शकते. 

आपल्या आहाराचाही थोडासा प्रश्न आहे. वास्तविक गुरुत्वाकर्षणापायी आपल्या पचनसंस्थेवर फारसा परिणाम होत नाही. कारण आपल्या अन्ननलिकेशी तसंच जठर आणि आतडी यांच्याशी जोडलेल्या स्नायूंच्या कामात कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळं गुरुत्वाकर्षण नसलं म्हणून अन्नाचं पचन होण्यात काही अडचण येत नाही. तरीही हे अन्न किंवा पाणी आपण घेणार कसं, हा सवाल खडा होऊ शकतो. शून्यवत गुरुत्वाकर्षण असलेल्या अंतराळयानात अंतराळवीर कसे वावरतात हे तू व्हिडिओवर पाहिलं असेल. ते एका जागी स्थिर राहू शकत नाहीत. सतत तरंगत राहतात. मग एका जागी बसून ते जेवणार कसे? समोर ताट ठेवलं तरी तेही तरंगत इकडेतिकडे जात राहणार. म्हणून मग डब्यातून चमच्यानंच त्यांना ते अन्न खावं लागतं. पाण्याचा प्रश्न तर जास्तीच गंभीर होतो. कारण पाण्यानं भरलेला पेला घट्ट धरून ठेवताना जरासा हिंदकळला आणि पाणी सांडलं तर ते खाली जमिनीवर थारोळं करणार नाही. म्हणजे थारोळं होईल, पण तेही तरंगत राहील. इकडे तिकडे भटकत राहील. ते पिता येणार नाही. शिवाय असं थारोळं समजा विजेच्या बोर्डात शिरलं तर कदाचित शॉर्ट सर्किटही होऊ शकतं. अंतराळयानात तर अनेक गुंतागुंतीची आणि नाजूक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असतात. त्यांच्यात पाणी शिरलं तर अनर्थ होऊ शकतो. 

अन्नपचनावर नसला तरी रक्ताभिसरणावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जाणवतो. रोहिणी हृदयापासून शुद्ध रक्त शरीरभर वाहून नेतात. शरीराच्या खालच्या भागात ते नेत असताना त्यांना तसा फारसा प्रयास करावा लागत नाही. कारण गुरुत्वाकर्षण त्यांच्या मदतीला येतं. पण तिथलं अशुद्ध रक्त परत हृदयापर्यंत आणणाऱ्या नीलांना मात्र गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करावं लागतं. त्यासाठी हृदयाला अधिक जोर लावावा लागतो. तसंच हृदयापासून मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्यालाही गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करावं लागतं. गुरुत्वाकर्षण नाहीसं झालं तर मग हृदयाच्या ठोक्यात जी नियमितता आहे तिच्यावर परिणाम होऊन त्याचं काम अनियंत्रित होऊ लागेल. त्याचा रक्तदाबावर अनिष्ट परिणाम होईल. कित्येक वेळा आपण बसलेल्या स्थितीतून झटकन उभे राहतो. तेव्हा चक्कर आल्यासारखं होतं. कारण गुरुत्वाकर्षणापायी रक्त शरीराच्या खालच्या भागात जमा होऊ लागतं. मेंदूला होणाऱ्या पुरवठ्यात घट होते. रक्तदाबात अनियमितता येते. यालाच डॉक्टर ‘पोस्च्युरल हायपरटेन्शन’ म्हणतात. साहजिकच शरीराचा तोल सांभाळण्याचं काम मेंदू व्यवस्थित करू शकत नाही. त्यासाठीच एका झटक्यात उभं राहण्याऐवजी हळू हळू उठावं असा सल्ला, खास करून वयस्क मंडळींना, डॉक्टर देतात. 

ही झाली इथली धरतीवरची गोष्ट. पण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून पृथ्वी ठरावीक कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत राहते. तसंच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण चंद्रालाही पृथ्वीशी बांधून ठेवतं. त्याच्या गुरुत्वाकर्षणापायी समुद्रात भरती ओहोटीचा खेळ चालू राहतो. गुरुत्वाकर्षण नसेल तर चंद्रही आपल्या ताब्यात राहणार नाही. पृथ्वीची वाटचालही बेबंद होईल. एवढंच नाही तर काही वैज्ञानिकांच्या मते ती अवस्था पृथ्वीला झेपणार नाही आणि तिचा स्फोट होऊन तिचे तुकडे तुकडे अंतराळात विखुरले जातील. 

आपल्या मंगळयानाच्या प्रवासालाही गुरुत्वाकर्षणाची मदत झाली आहे. जेव्हा ते मंगळाच्या दिशेनं प्रवास करत होतं तेव्हा मंगळाचं गुरुत्वाकर्षण त्याला आपल्याकडे खेचत होतं. त्यामुळं त्याला स्वतःची ऊर्जा फारशी वापरावी लागली नाही. इंधनाची बचत झाली. पण जसजसं ते मंगळाच्या जवळ आलं तसतशी त्याची ओढ जास्ती झाली. यानाचा वेग वाढू लागला. त्यावेळी मग धरतीवरून संदेश पाठवून आपण त्याला मंगळाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा प्रयत्न करायला भाग पाडलं. त्यामुळं मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाला थोडासा विरोध करत त्याचा वेग कमी झाला आणि संथ गतीनंच ते मंगळावर पोचलं. मंगळावर कोसळून पडलं नाही.

तेव्हा, ग्यानबा तुझ्या वेंधळेपणाचं खापर विनाकारण गुरुत्वाकर्षणावर फोडू नकोस.’

संबंधित बातम्या